प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.

जग व ईश्वर यांच्या संबंधीं विचारांचा मोकळेपणा - बौद्धांनीं बुद्धाच्या संवादांत अनेक पाखांड मतांचा उल्लेख केला आहे. त्या पाखंडांपैकीं बहुतेक पाखंडें त्या वेळेस प्रसिद्ध मतें म्हणून अस्तित्वांत असलीं पाहिजेत. त्यांचें अस्तित्व, त्या काळीं जग व ईश्वर यांच्या संबंधाच्या प्रश्नांवर किती मोकळेपणानें विचार होत असे हें दाखवितें. त्या पाखंडांचें स्वरूप लक्षांत येण्यासाठीं ब्रह्मजाल सुत्तांतील एक उतारा संक्षेपानें येथें देतों.

''बांधवहो, कित्येक यती व ब्राह्मण आपणांस अंतातिक म्हणवितात; आणि जगाच्या मर्यादित्वासंबंधानें किंवा अमर्यादित्वासंबंधानें चार विचार व्यक्त करतात...... ते म्हणतात जग मर्यादित आहे; इतकें कीं, त्याच्या भोंवतालचा मार्ग निश्चित करतां येइ्रल, आणि तो कां, तर मी आपल्या अंतर्दृष्टीनें सांगू शकतों म्हणून ...... आणि दुसरे तसा मार्ग निश्चित करणें अशक्य आहे असें म्हणून पहिल्या मतास चूक म्हणतात .......... कित्येक असें म्हणतात कीं, जग ऊर्ध्व दिशेनें व अधो दिशेनें मर्यादित आहे. पण त्याच्या विस्तृततेला मर्यादा नाहीं. चौथ्या प्रकारचे ब्राह्मण किंवा यती तर्कटें रचणारे आहेत. ते म्हणतात कीं, जग हें समर्याद तरी अमर्याद आहे, आणि आपआपल्या मतांचें तर्कटी समर्थन करतात. यांतलेच कित्येक म्हणतात कीं, तें समर्यादहि नाहीं आणि अमर्यादहि नाहीं .......

''अनेक यती व ब्राह्मण उलटपालट करणा-या सापसुरळीप्रमाणें द्वयर्थी बोलण्याला संवकले आहेत. त्यांचें द्वयर्थी बोलणें चार प्रकारचें आहे. ते म्हणतात कीं, चांगलें अगर वाईट असें वस्तुतः कांहींच नाहीं. जेव्हां मी एखादें चांगलें किंवा वाईट म्हणतों तेव्हां मी आपली इच्छा अगर द्वेष व्यक्त करतों एवढेंच. त्यांनां कोणत्याहि गोष्टीविषयीं प्रश्न विचारला म्हणजे ते म्हणूं लागतात कीं, मी तुम्हांस चूक म्हणत नाहीं किंवा बरोबरहि म्हणत नाहीं.''

गौतमाच्या दृष्टीनें ठरलेल्या या योग्यायोग्य मूढांच्या पुढील पाय-या गौतम अशा वर्णन करतो:- ''ते म्हणतात, मीं मत दिल्यानें (मताविषयीं अभिमान जडून) विकारवश होईन आणि त्यामुळें मी दुःखाचें अगर खेदाचें स्थान होईन. पण तें मला नको, व म्हणून मी निर्णय देऊं इच्छित नाहीं.

''मूढांचा तिसरा प्रकार असाः कांहीं ब्राह्मण हुषार, बारीक सूक्ष्म भेद काढण्यांत पटाईत, वितंडवादांत कुशल आणि दुस-याच्या विचारसरणीचे तुकडे पाडीत हिंडणारे आहेत. मीं कोणतेंहि विधान केलें तर ते त्याचीं कारणें मागतील आणि माझ्या चुका दाखवून देतील. मग मला त्याचें उत्तर देतां येणार नाहीं. आणि त्यामुळें मला दुःख होईल. तें दुःख माझ्या प्रगतीस विघातक होईल, म्हणून या वादविवादास भिऊन मी योग्योयोग्य काय हें सांगत नाहीं.

''यतींचा आणि ब्राह्मणांचा आणखी एक (चवथा) मूढ वर्ग आहे. तो म्हणतो, तुम्ही मला जर विचाराल कीं परलोक आहे कीं काय, आणि तो आहे असें जर मला वाटत असेल, तर तो आहे म्हणून मी म्हणेन; पण मी तर तसें म्हणत नाहीं. माझें मत अमुक आहे किंवा तमुक आहे असें मी म्हणत नाहीं आणि तें निराळें आहे असेंहि म्हणत नाहीं. परलोक नाहीं असें म्हणत नाहीं आणि आहे म्हणणारांचा निषेधहि करीत नाहीं. असें म्हणून ते खालीलप्रमाणें प्रत्येक विधानाला द्विधा उत्तर देतात:-

अ  (१) परलोक आहे.
    (२) परलोक नाही.
    (३) परलोक आहे आणि नाहीं दोन्हीहि.
    (५) परलोक नाहीं व नाहीं असेंहि नाहीं.
ब  (१) कांहीं आकस्मिक जीव आहेत (कारण ते या लोकांत किंवा परलोकांत आईबापांशिवाय म्हणजे कारणांवाचून जन्मास येतात).
    (२) असे आकस्मिक जीव नाहींत.
    (३) असे जीव आहेत व नाहींतहि.
    (४) असे जीव नाहींत, व नाहींत असेंहि नाहीं.
क  (१) फल असतें व तें सत्कृत्य अगर दुष्कृत्य यांच्या परिणामामुळें उत्पन्न होतें.
    (२) फल नसतें.
    (३) फल असतें व नसतेंहि.
    (४) फल नसतें व नसतें असेंहि नाहीं.
ड  (१) तथागत (जो मनुष्य सत्यापर्यंत पोहोंचतो तो) मरणोत्तरहि अस्तित्वांत असतो.
    (२) तो तसा नसतो.
    (३) तो असतो व नसतोहि.
    (४) तो नसतो, व नसतो असेंहि नाहीं.''

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .