प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

रोमन बादशाही सत्तेचा काल (ख्रि. पू. ३०-इ.स. ४७६) - रोमन बादशाही सत्तेचा काळ म्हणजे रोमन राष्ट्राच्या अवनतीचा काळ असा सामान्य समज आहे, परंतु ही समजूत चूकीची आहे. कारण बादशाही सत्तेच्या या काळांत, साम्राज्याची भरभराट, शत्रूवरील विजय आणि विस्तृत भूभागावर सत्तेचा प्रसार या दृष्टीनें पाहतां रोमन राष्ट्राचे वैभव शिखरास पोहोंचलेलें आढळतें. बादशाही सत्तेचा काळ म्हणजे अवनतीचा काळ हा समज रूढ होण्याचीं दोन कारणें आहेत. पहिलें कारण असें कीं, ऑगस्टसच्या वेळेपासून लोकसत्ताक पद्धति बदलून राजसत्ताक पद्धति म्हणजे एकतंत्री राज्यकारभार सुरू झाला; म्हणजे अर्थात् अवनति झाली असें पुष्कळांनां वाटतें. दुसरें कारण असें कीं, रोमन बादशाहीच्या उत्तरार्धांत राजसत्तेवर ख्रिस्ती संप्रदायसत्तेनें आपला पगडा बसविला हें रोमन राष्ट्राच्या अवनतीचेंच चिन्ह होय, असें कित्येकांचें म्हणणें आहे.

वास्तविक पाहतां या दोन्हीहि कारणांत विशेष अर्थ नाहीं. कारण रोम येथें लोकसत्ता असतांनाहि आधुनिक अर्थाची खरी लोकशाही तेथें होती असे म्हणतां येणार नाहीं. कारण, रोमन साम्राज्यांत ज्यांनां नागरिकत्वाचे पूर्ण राजकीय हक्क नाहींत, अशा जित लोकांची आणि प्रत्यक्ष गुलामांची संख्याच पुष्कळ होती. रोमचा राज्यकारभार लोकसत्तेच्या वेळीं कांहीं अंशीं प्रातिनिधिक स्वरूपाचा होता; पण तितक्या अंशानें तो बादशाही सत्तेच्या वेळींहि होता. निदान ऑगस्टस व पहिले कित्येक बादशहा यांच्या वेळीं तरी राज्यकारभाराच्या घटनेंत फारसा फरक झालेला नव्हता. शिवाय बादशाही पदाला वंशपरंपरेचा हक्क केव्हांच लागू करण्यांत आलेला नव्हता. या एकाच गोष्टीवरून रोमन बादशाही आणि शुद्ध राजसत्ताक पद्धति यांतील फरक स्पष्ट दिसतो. अखेर अखेर बादशहांनीं अगदीं अनियंत्रित कारभार हातीं घेतला खरा, तथापि बराच काळ सेनेट सभा आणि लोकांनीं निवडलेले कॉन्सल हे बाह्यतः तरी राज्यकारभाराचे पुढारी म्हणून गणले जात असत.

ऑगस्टसच्या काळापासून रोमच्या इतिहासांत एका नव्या युगाचा आरंभ होतो हें मात्र खरें आहे. बादशहा म्हणजे एक कायमचा सर्वाधिकारी (डिक्टेटर) असून सेनेटपेक्षांहि अधिक सत्ता त्याच्या हाती असे. राज्यपद्धतींतला हा फार मोठा फरक होय. परंतु या फरकाबरोबर रोमन राष्ट्राच्या अवनतीला सुरुवात झाली असें मात्र होत नाहीं. रोमन वाङ्‌मयांतलें सुवर्णयुग आणि रौप्ययुग म्हणजे बादशाही सत्तेची आमदानी उर्फ ऑगस्टस व त्याच्या नंतरचे कांहीं बादशहा यांच्या कारकीर्दीचा काळच होय. तसेंच पांच चांगल्या बादशहांच्या म्हणजे नर्व्हा ते मार्कस ऑरीलिअस (इ.स. ९६-१८०) यांच्या वेळीं रोमन राष्ट्राला उत्तम सुखाचे दिवस लाभले. यावरून बादशाही अंमलाची निदान पहिलीं दोन शतकें तरी अवनतीचा काळ म्हणून मानतां येत नाहींत. मार्कस ऑरीलिअसच्या नंतर रोमन राष्ट्रांच्या अवनतीला स्पष्टपणें सुरुवात झाली हे खरें आहे. व तिच्या कारणाचें बीज त्याच्या बराच काळ अगोदर पेरलें गेले होतें हेंहि खरें आहे. फार तर काय सर्व रोमचा इतिहास लक्षांत घेतां रोमन सत्तेच्या स्थापनेपासूनच तिच्या नाशाचीं बीजें पेरलीं गेली होतीं असें म्हणणें भाग पडतें. ख्रिस्ती संप्रदायाच्या वाढत्या सत्तेबरोबर रोमच्या सत्तेचा अधःपात सुरू झाला असें गिबन आदिकरून कित्येक इतिहासकारांचें म्हणणें आहे पण तें अतिशयोक्तीचें आहे. वास्तविक पाहतां, रोमन साम्राज्यांतील गुलामगिरीची पद्धति, अल्पसंख्याक धनिक वर्ग व बहुसंख्याक निर्धन बेकार वर्ग, वरिष्ठ वर्गातील खालावत चाललेली लोकसंख्या व त्याबरोबरच ख्रिस्ती धर्मसत्तेचें वाढतें वर्चस्व, या अनेक कारणांमुळें रोमन साम्राज्यसत्ता लयास गेली असें म्हणावें लागतें.

या अंतस्थ कारणांबरोबर दुसरें महत्त्वाचें बाह्य कारण म्हणजे रोमन साम्राज्याच्या सरहद्दींवरील रानटी राष्ट्रांचीं वाढती सत्ता हे आहे. जगांतील इतिहासावरून पाहतां एका राष्ट्राचें स्थैर्य शेजारपाजारच्या अनेक राज्यांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. रोमनें प्रथम इटालींतील राज्यें व नंतर सिसिली, कार्थेज ही राज्यें जिंकून घेतलीं, व त्या प्रदेशांत रोमन वसाहती, रोमन संस्कृति व रोमन नागरिकत्वाचे हक्क यांचा फैलाव करून रोमन साम्राज्य कांहीं अंशी एकजीव केलें. परंतु यूरोपच्या उत्तरेकडील व पश्चिमेकडील रानटी लोक रोमन साम्राज्याच्या बाहेर राहिले त्यामुळें त्यांच्यावर रोमन संस्कृतीचा कांहीं एक परिणाम झाला नाहीं. तथापि, अनेक शतकांच्या सान्निध्यानंतर या रानटी लोकांनीं कांहीं बाबतींत आपली सुधारणा करून घेतली. रोमन लोक आणि उत्तरेकडील हे रानटी लोक मूळ एकाच वंशांतले असावे असें वाटतें, व त्यामुळें आपला समाज सुधारण्याची क्षमता त्यांच्या अंगीं वसत होती. या रानटी लोकांचा सीझरच्या स्वा-यांपासून रोमच्या युद्धकलेशीं संबंध आल्यामुळें या बाबतींत त्यांनीं रोमन लोकांचें एकदम अनुकरण केले, आणि नैसर्गिक जोम, क्रूरपणा आणि दृढनिश्चय या रानटी गुणांनां युद्धकलेची जोड मिळून हे शेजारी अखेर रोमला डोईजड झाले.

या रानटी लोकांच्या संकटांतून स्वतःला वांचविण्याचा एक मार्ग रोमला मोकळा होता. सीझरच्या वेळींच त्यांचा रोमन साम्राज्यांत अंतर्भाव करून व त्यांच्यामध्यें रोमन संस्कृतीचा आणि रोमन नागरिकत्वाच्या हक्कांचा प्रसार करून त्यांनां रोमन राष्ट्राशीं एकजीव केलें असतें तर हें संकट टळलें असतें. परंतु हे धोरण रोमनें स्वीकारिलें नाहीं. जगाच्या इतिहासांत जागतिक सुधारणेचें आणि मानव जातीच्या प्रगतीचें पाऊल मिश्र मानववंश निर्माण झाल्यानेंच पुढें पडलेलें दिसून येतें. रोमन राष्ट्राच्या आद्य काळांत रोमन समाज अनेक बाह्य रक्तांच्या मिश्रणानें बनला होता. पण पुढें २५-३० पिढ्या मात्र त्यांत नवीन मिश्रण झालें नाहीं, व त्यामुळें मूळचा रोमन समाज निःसत्व बनत चालला. रोमन लोकसत्ताकाच्या अखेरीचे आणि बादशाही सत्तेच्या आरंभीचे रोम येथील बरेचसे पुढारी व खुद्द बादशहा अस्सल रोमन जातीचे नव्हते. तात्पर्य, रोमन साम्राज्यांतील दूरदूरच्या प्रांतांतले लोक खुद्द रोम शहरांतल्या लोकांपेक्षां अधिक बुद्धिमान् व कर्तृत्ववान् निपजूं लागले, आणि या सर्वांहून रोमन साम्राज्याच्या सरहद्दीवरचे रानटी लोक रणांगणावर अधिक बलिष्ठ ठरून त्यांनीं रोमन सत्तेचा विध्वंस केला.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .