प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

रोमन लोकसत्ताकाचा काळ, पूर्वार्ध (ख्रि. पू. ५१०-१३१) - रोम येथें राजसत्ताक शासनपद्धति नाहींशी होऊन लोकसत्ताक राज्य स्थापन झालें तें ख्रि. पू. ५१० पासून ख्रि. पू. २९ पर्यंत टिकलें. या मोठ्या काळाचे दोन विभाग पडतात. पहिला रोमन लोकांच्या एकीचा व जुटीचा आणि रोमन साम्राज्याच्या विस्ताराचा काळ होय; आणि दुसरा रोमन लोकशाहींतील पुढा-यांच्या आपसांतील युद्धाचा काळ होय. यांपैकीं पहिल्या कालविभागांत-म्हणजे ख्रि. पू. ५१० पासून १३१ पर्यंतच्या काळांत-रोमन लोकांनीं सर्व इटाली देश जिंकून आपल्या अंमलाखालीं आणिला; इतकेंच नव्हे तर भूमध्यसमुद्राच्या पलीकडील आफ्रिकेच्या किना-यावरची कार्थेज येथील बलिष्ठ राजसत्ताहि त्यांनीं धुळीस मिळविली. लोकसत्ताकाच्या पूर्वार्धांतील रोमच्या इतिहासाचें टांचण येणेंप्रमाणें:-

ख्रि. पू. ५१०-४५१- लोकसत्ताक स्थापन होऊन कॉन्सल म्हणून राज्यकारभार चालविणारे दोन मुख्य अधिकारी नेमण्यांत येऊं लागले. पहिल्या वर्षीं जूनिअस ब्रूटस व मार्कस होरेशिअस या दोघांनां कॉन्सल नेमण्यांत आलें. रोम व कार्थेज यांच्यामध्यें व्यापारी तह झाला (५०९). एट्रुस्कन लोकांच्या राजानें रोमन लोकांचा पराभव केला. नंतर तीस लॅटिन शहरांचा संघ बनून त्यानें टार्क्विन घराण्याला पुन्हां रोमचें राज्य मिळवून देण्याचा कट केला, व रोमबरोबर युद्ध सुरू केलें. पण त्यांत लॅटिन लोकांचाच मोठा पराभव होऊन रोमन लोक विजयी झाले. तेव्हां लॅटिन संघानें रोमबरोबर मित्रत्वाचा तह केला (४९७). रोम येथें पॅट्रिशियन व प्लीबियन यांच्यामध्यें मोठा तंटा होऊन प्लीबियन लोक रोम शहर सोडून गेले. पण पॅट्रिशियन लोकांनीं त्यांनां राज्यकारभारांत कांहीं हक्क देऊन परत आणिलें (४९४). लवकरच रोमन लोकांची सर्व लॅटिन प्रदेशावर सत्ता प्रस्थापित झाली. ४९१ मध्यें रोमच्या राज्यांत मोठा दुष्काळ पडला असतां सरकारच्या खर्चानें गरीब प्लीबियन कुटुंबांनां धान्य वांटण्याचें मार्शिअस कोरिओलेनसनें ठरविलें; परंतु हें कृत्य लोकसभेला न आवडल्यामुळें तिनें कोरिओलेनसला हद्दपार केलें. तेव्हां त्यानें व्हॉल्शिअन्स नामक रोमच्या शत्रूंनां मिळून रोमवर स्वारी केली; पण अखेर स्वतःच्या आईच्या व बायकोच्या विनंतीवरून तो शत्रुपक्ष सोडून देऊन रोमला येऊन मिळाला. ४८६ मध्यें स्प्यूरिअस कॅशिअस व्हिसेलिनस हा कॉन्सल होता. त्यानें कांहीं सार्वजनिक जमिनी गरीब प्लीबियन व लॅटिन लोकांनां वांटून देण्याचें ठरविलें. त्याबद्दल पॅट्रिशियन लोकांनीं रागावून त्याला वर्षाच्या शेवटीं गुन्हेगार ठरवून फांशीं दिलें. ४६३ मध्यें रोममध्यें व सर्व इटाली देशांत भयंकर मोठा प्लेग झाला, व त्याच वर्षी व्हॉल्शिअन्स व ईक्विन्स लोकांनीं रोमवर स्वारी केली. या काळांत पॅट्रिशियन व प्लीबियन यांच्यामध्यें राजकीय हक्कांबद्दल तंटा चालू होता. ट्रिब्यून नांवाचे प्लीबियन लोकांतर्फे अधिकारी नेमण्यांत येऊं लागले. त्यांची संख्या प्रथम पांच होती ती नंतर दहा झाली. ४५४ मध्यें रोमनें तीन वकील ग्रीसमध्यें सोलॉनच्या कायद्याच्या लेखी प्रती करून आणण्याकरितां पाठविले. हे वकील ४५२ मध्यें परत आल्यावर नवीन रोमन कायद्याचें कोड तयार करण्यांत आलें.

ख्रि. पू. ४५१-३९०- नवे दहा कायदेपट तयार करून ते फोरममध्यें जाहीर ठिकाणीं ठेवण्यांत आले. ४५० मध्यें त्यांमध्यें आणखी दोन नव्या कायदेपटांची भर घालण्यांत आली. ४४५ मध्यें पॅट्रिशियन आणि प्लीबियन यांच्यामधील मिश्र विवाह कायदेशीर ठरविण्यांत आले. ४३१ मध्यें ईक्विन्स व व्हॉल्शिअन्स लोकांनीं रोमवर स्वारी केली, परंतु रोमन लोकांनीं त्यांचा पराभव केला. ४०५-३९६ पर्यंत रोमन लोकांनीं व्हीयाय लोकांशीं युद्ध करून अखेर जय मिळविला. ३९० मध्यें गॉल लोकांनीं रोमवर स्वारी करून ७ महिने रोमला वेढा दिला; व लोकांनां लुटून शहराची बरीच नासधूस केली. परंतु अखेर पांचशें शेर सोनें देऊन रोमन लोकांनीं गॉल लोकांनां परत लाविलें.

ख्रि. पू. ३७६-२६४- रोमन कायद्यांमध्यें कांहीं महत्त्वाचे फेरफार होऊन ३६७ पासून कॉन्सलच्या जागेवर नेमलें जाण्याचा महत्त्वाचा हक्क प्लीबियन लोकांना देण्यांत आला. ह्या काळांत अनेक लढाया झाल्या. ३६७-३३९: उत्तर इटालींतील गॉल लोकांबरोबर युद्ध, ३६२-३५८: बंडखोर लॅटिन शहरांबरोबर युद्ध. ३५८-३५१: टार्क्विनि व इतर एट्रुस्कन शहरांबरोबर युद्ध, ३५०-३४५: व्हॉल्शिअन्स व ऑरन्साय लोकाबरोबर युद्ध, ३४३: पहिलें सॅमनाइट युद्ध, ३४०-३३८: पहिलें लॅटिन युद्ध, ३२६-३०४: दुसरें सॅमनाइट युद्ध, २९९-२९०: तिसरे सॅमनाइट युद्ध, २८५-२८२: लॅटिन संघाबरोबर युद्ध, २८०-२७५: पिर्‍हस बरोबर युद्ध अशीं अनेक युद्धें करून रोमन लोकांनीं सर्व इटाली देश आपल्या ताब्यांत आणिला.

ख्रि. पू. २६४ ते १३२- या काळांत रोमनें इटालीच्या बाहेर परदेशांबरोबर युद्धें केली. २६४-२४१ : पहिलें प्यूनिक युद्ध, २१८-२०१: दुसरें प्यूनिक युद्ध व १४९ - १४६ : तिसरें प्यूनिक युद्ध हीं तीन कार्थेजियन लोकांबरोबर अत्यंत निकराचीं युद्धें करून अखेर रोमन लोकांनीं कार्थेज येथील सत्तेचा पूर्ण विध्वंस केला. याच कालविभागांत २१५-२०६: पहिलें मॅसिडोनियन युद्ध, २००-१९७ : दुसरें मॅसिडोनियन युद्ध व १७१-१६८ :  तिसरें मॅसिडोनियन युद्ध अशी तीन युद्धें अत्यंत बलिष्ठ अशा मॅसिडोनियन सत्तेशीं करून ती राजसत्ताहि अखेर रोमन लोकांनीं धुळीस मिळविली. शिवाय कॉरिंथ व सिसिली यांशीं युद्धें करून ते प्रदेश रोमन साम्राज्यास जोडण्यांस आले.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .