प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

उत्तरकालीन इतिहास - पश्चिमेकडे व पूर्वेकडे ग्रीक संस्कृतीचें शेवटीं काय झालें एवढेंच आतां पहावयाचें उरलें. लॅटिन भाषा चालणा-या पश्चिम भागांत ग्रीकभाषेचें ज्ञान व ग्रीक वाङ्‌मयाचें मूळावरून ज्ञान हें एकंदर संस्कृतीच्या अवनतीबरोबर दिवसानुदिवस दुर्मिळ होत चाललें, व शेवटी ५ व्या शतकानंतर स्तिमित युगांत तर आयर्लंडशिवाय तें कोठेंच राहिलें नाहीं. लॅटिन वाङ्‌मयामध्यें ज्या ग्रीक दंतकथा आल्या होत्या त्या मात्र तशाच कायम राहिल्या; आणि कांहीं थोड्या भिक्षूंच्या संघानींहि या कथा जिवंत ठेवण्याचें काम केलें. यानंतर ग्रीकसंस्कृतीच्या प्रवाहास पुन्हां सुरुवात झाली. प्रथम स्पेनमधील मूर लोकांनीं ग्रीक संस्कृतीचें पुनरुज्जीवर केलें; व नंतर चवदाव्या शतकामध्यें कान्स्टांटिनोपलहून पुन्हां ग्रीक विचारांचा नवा प्रवाह आला. एकंदर ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाबरोबर ग्रीक संस्कृतीचा प्रवाह पुन्हां जोरानें वाहूं लागला, व वर्तमान जग ज्या प्रवाहाबरोबर भविष्य कालाकडे जात आहे, त्या प्रवाहांत हा प्रवाह येऊन मिळाला. पूर्वेकडे ग्रीक संस्कृति ही परकीय असल्याकारणानें तिचा नायनाट झाला असें पुष्कळ लोक समजतात. पण हा समज चुकीचा आहे. स्तिमित युगामध्यें बिझॅन्शिअमच्या पूर्वेकडील प्रदेशांत व पश्चिमेकडील भागांतहि ग्रीक संस्कृतीला पूर्णपणें ओहोटी लागलेली होती; व सरतेशेवटीं ग्रीक संस्कृतियुक्त पूर्वेकडील भाग इस्लामच्या ताब्यांत गेला हें खरें. पण एवढ्यामुळें ग्रीक संस्कृतीचें पूर्णपणें उच्चाटन झालें असें जे कित्येक विद्वान् समजतात तें मात्र बरोबर नाहीं. ग्रीक संस्कृतीचा बराच भाग सिरियन ख्रिस्ती लोकांनीं आपल्या भाषेंत आणलेला मुसुलमानांनां आढळून आला, व त्यांनीं ग्रीक तात्त्विक व शास्त्रीय वाङ्‌मय सिरिअकमधून अरबी भाषेंत आणण्यास सुरुवात केली. अरबी पांडित्याची इमारत या पायावरच पुढें उभारली गेली. या दृष्टीनें पाहतां अरबी तत्त्वज्ञान, गणित, भूगोल, वैद्यक व भाषाशास्त्र हीं सर्व ग्रीक शास्त्रांवर रचलेली आढळून येतील. पाश्चात्त्य पंडितांच्या मतें, पूर्वेकडे काय अगर पश्चिमेकडे काय आरिस्टॉटल हाच ज्ञानाचा गुरु होता. कारण, हिपॉक्राटीझ व गेलेन यांचे धन्यवाद मुसुलमान वैद्य अद्यापि गातात. इस्लामी संस्कृतीमध्यें ग्रीक संस्कृतीचा लोप झालेला दिसतो हें खरें; पण याचें कारण ग्रीक संस्कृतीस मागें सारून इस्लामी संस्कृतीनें वरचष्मा मिळविला हें नसून, कांहींका कारणानें होईना, पुढील काळांत इस्लामी संस्कृतीसच एकंदरींत ओहोटी लागली हें होय.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .