प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ५ वें.
असुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.

इजिप्तची सत्ता. - इसवी सनापूर्वी १७०० च्या सुमारास इजिप्तवर स्वाऱ्या करणारें जे हिक्सॉस त्यांच्या कालांत, पॅलेस्टाइनच्या इतिहासाची रूपरेषा थोडी स्पष्ट दिसूं लागते. ''जेकब'' व ''अनथ'' ह्या विशेष नामांतील देवतावाचक शब्दांवरून हे हिक्सॉस मूळ आशियाखंडांतील रहिवाशी असल्याचें दिसत आहे. ह्या लोकांची इजिप्तमधून हकालपट्टी झाल्यानंतर एक गोष्टी  विशेष नजरेस येते ती ही कीं, पॅलेस्टाइन व सीरिया ह्या प्रांतांत युफ्रेटीस नदी पावेतों इजिप्तनें स्वाऱ्यांचें सत्र सुरू केले होतें, व ज्याचें राजकीय ध्येय असुरिया व एशियामायनर ह्या देशांशीं निगडित झालें होतें अशा ह्या प्रदेशावर इजिप्तनें लागोपाठ जयपरंपरा मिळविल्यामुळें पुढें रूढ झालेल्या राजकीय धोरणाचा पायाच पक्क्या रीतीनें बसविला गेला.

बाबिलोनिया व इजिप्त ह्यांच्या वर्चस्वासंबंधीच्या कांहीं त्रुटित गोष्टी वगळतां. इसवी सनापूर्वीच्या १६व्या शतकापर्यंत पॅलेस्टाइन प्रांताचा स्पष्ट इतिहास सांपडत नाहीं. ह्यानंतर मात्र पॅलेस्टाइनची इतिहासपरंपरा बरीच सुसंबद्ध आढळते. इ. स. १८८७ मध्यें सांपडलेल्या अमर्नालेखांत पश्चिम आशिया व इजिप्त यामध्यें तिसऱ्या आणि चौथ्या अ‍ॅमेनोफिसच्या कारकीर्दीत (इ. सनापूर्वी १४१४-१३६०) कांहीं वर्षे चाललेल्या राजकीय गोष्टींसबंधी पत्रव्यवहार आहे. खमुरबीमुळें प्रसिद्धीस आलेलें पाहिलेच बाबिलोनियन राजघराणें पूर्वकालांत मोडतें. वरील शिलालेखांतील भाषा व लिपि या एशियामायनरमधील हिटाइट लोकांत व सिरिया व पॅलेस्टाइन येथील राजेलोकांत प्रचलित होत्या. कालक्रमानुसार, इजिप्तच्या वैभवास ओहोटी लागली व मध्यंतरी असलेल्या भूप्रदेशाच्या मालकी हक्कांत हिटाइट हें इजिप्तचें प्रातिस्पर्धी बनलें. मिटनी (उत्तर सीरिया व मेसापोटेमिया) ह्या बलाढय राज्यांतून बाहेर पडलेल्या हिटाइट लोकांशीं संबंध असलेल्या इराणी लोकांनीं यरुशलेमपर्यंत आपले विशिष्ट सांस्कृति परिणाम घडवून आणले होते हें त्यावेळच्या व्यक्तिनामांवरून दिसतें. त्याचप्रमाणें नुकत्याच जमीनीत सांपडलेल्या अवशेषांवरून इजियन संस्कृतीबरोबर दिसून आलेल्या संबंधामध्यें भर म्हणून वरील कागदपत्रांनीं, मेलूहा (अरबस्तान) मेसापोटेमिया, व लिव्हॅन्ट या प्रांतांतून स्वाऱ्या करणाऱ्या लुटारू टोळ्यांचे उल्लेख केले आहेत. ह्या पॅलेस्टाइन प्रांतांतील लहान लहान शहरांवर बऱ्याच परस्थ राजांचा अम्मल होता. ह्यापैकीं कांहीं राजांस इजिप्तच्या राजानें नेमलेलें होतें इतकेच नव्हे तर कांहींस त्याच्या  हातून राज्याभिषेक झाले होते. ह्या पौरराज्यांचे विस्तार किती लहान लहान असत हें अगदीं परस्परालगत असलेल्या यरुशलेम, गेझर, अस्कॅलॉन व लॉकिश ह्या ठिकाणच्या राजांच्या वारंवार आलेल्या उल्लेखांवरून स्पष्ट दिसतें. ह्या राजांमध्यें जरी परस्परांशी भाऊबंदकी व वैमनस्यें असत तरी इजिप्तच्या राजाची सार्वभौम सत्ता व अतिंम न्यायाधिकारित्व ते कबूल करीत व किरकोळ प्रसंगीं इजिप्तच्या राजास प्रतिरोध करण्यास मात्र ते एकत्र मिळत असत व आपापसांत परस्पर दोस्ती राखीत. समुद्र किनाऱ्यालगतचीं यरुशलेम इत्यादि नगरें सोडून देतां, बंदोबस्ताचा सारा भर उत्तरेकडे व विशेषत: अमूर ह्या पौरराज्यावर पडत असे. उपरिनिर्दिष्ट युग हें अंतस्थ बंडालीचें होते व खुष्कीनें व जलमार्गानें उत्तरसिरीया व आशियामायनर ह्या प्रांतातून ह्याकाळीं वारंवार लुटारूंचे जबरदस्त हल्ले होत असत. चोहोंकडे खळबळ माजून राहिली होती व एकीकडे इजिप्तच्या सार्वभौमत्वाची निष्ठा व दुसरीकडे उत्तरदिशेस चाललेल्या खळबळीशी अंतस्थ तह यामध्ये पॅलेस्टाइन राष्ट्रांस स्वत:च्या सामर्थ्यावर कांहीं करणें अशक्य झाल्यामुळें त्याची स्थिती फार केविलवाणी झाली होती. ह्यावेळच्या कागदपत्रांत शत्रूच्या आगमनाचें हुबेहुब वर्णन केलें आहे, त्याच प्रमाणें पॅलेस्टाइन हें राष्ट्र इजिप्तशीं किती राजनिष्ठ आहे व त्या मानानें इतर लगतचे राजे इजिप्शियन सार्वभौमाशी किती राजद्रोहपूर्वक वागतात इत्यादि गोष्टींबद्दल विवेचन आलें असून शेवटीं लेखकानें स्वत:च्या संशयित वर्तनाची माफी मागितली आहे. समुद्रकिनाऱ्याबद्दलच्या वैमनस्याचें वर्णन करणारे यरूशलेमचे कागदपत्र अत्यंत मजेचे आहेत. ह्यामध्येंच हबिरू नामक शेजारच्या लोकांनीं बराच गोंधळ माजवून दिल्याचें वर्णन आहे. ''हबिरू'' याचा ''हिब्रू'' याशीं संबंध दाखविला जातो. त्यामध्यें मानववंशशास्त्रदृष्ट्या व इतिहासदृष्ट्या कांहींच महत्त्व नाहीं. परंतु ह्या राजनिष्ठ मांडलिकांनां मदत करण्याची इजिप्तच्या अंगांत ताकद नव्हती इतकेंच नव्हे तर प्राचीन मिटनी राष्ट्रानें आपलें राजकीय स्वातंत्र्य गमावले होतें व हिटाइट लोकांची सत्ता स्थिर झाली होती. ह्या अमर्ना कागदपत्रांतून उपलब्ध झालेली तत्कालीन इतिहासपरंपरा बोगझ्कुइ ह्या प्राचीन हिटाइट साम्राज्यांतील राजधानींत सापडलेल्या शिलालेखांतहि पुढें चालू आहे. त्यानंतरच्या इजिप्तमधील कागदपत्रांवरून असें दिसतें कीं, एकोणिसाव्या राजघराण्यांतील पहिला सेती ह्यानें इ. सनापूर्वी १३२० मध्यें पॅलेस्टाइनवर स्वारी केली. परंतु इ. सनापूर्वी १३०० च्या सुमारास दुसरा रामेसीस ह्याचा पॅलेस्टाइनपेक्षां थोडा जास्त प्रांत स्वत:कडे ठेवण्या बद्दलचा हिटाइट लोकांशी मोठ्या शिकस्तीनें तह होईपर्यंत हिटाइट लोकांशीं  भांडणें चालूच होतीं. हा प्रांत देखील मोठ्या मुष्किलीनें राखला गेला; कारण लिव्हॅंट व आशियामायनर यांतील बंडाळी व असुरियाचें पुनरुज्जीवन ह्या गोष्टी पश्चिम आशियाच्या राजकीय इतिहासाची पुनर्घटना करीत होत्या.

तिसऱ्या रामेसीसच्या कारकीर्दीत म्हणजे ख्रि. पू. १२००-११६९ च्या सुमारास पॅलेस्टाइन प्रातांत पुन: बंडाळी सुरू झाली. फिलिस्टाइन लोकांचा त्या चळवळीशीं बराच संबंध होता. तथापि इजिप्तनें आपली राजसत्ता पुन्हां बरीच विस्तृत केली व पॅलेस्टाइन आणि सिरियाचा कांही भाग परत मिळविण्यांत रामेसीस यास बरेच यश आलें. सबंध आशियाखंडापासून पॅलेस्टाइन प्रांत तुटक राखून आपल्या अंकित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इजिप्तची कारकीर्द संपुष्टात आली होती आणि ह्या पॅलेस्टाइन प्रांतासहि आपल्या नैर्ॠत्य दिशेस असणाऱ्या बलाढय इजिप्शियन साम्राज्याची सत्ता जाणवूं लागली होती. थोडया कालानंतर तिग्लथपिलेसर यानें इ. सनापूर्वी ११०० च्या सुमारास असुरियन साम्राज्यसत्तेचा विस्तार पूर्वीच्या मोठ्या हिटाइट साम्राज्याच्या सत्तेखालीं असणाऱ्या पश्चिमेकडील भूप्रदेशावर लांबपर्यंत वाढविला. ज्या कालासंबंधीं बाह्य पुरावा फारच त्रोटक सांपडतो त्या ह्या कालांतच नवीन नवीन राजकीय घडामोडी होऊं लागल्या व नवीन नवीन पौरराज्यसंघ अस्तित्वांत येऊ लागले. राजकीय दृष्टीनें पॅलेस्टाइन प्रांत इजिप्शियन किंवा हिटाइट साम्राज्याचा भाग झाला होता. परंतु ह्यानंतरच्या कालांत पॅलेस्टाइनचा इस्त्रायली इतिहासाशीं बराच निकट संबंध येतो.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .