प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ५ वें.
असुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.

मिटनि लोक. - मिटनि हें प्राचीन महत्त्वाच्या राष्ट्रांपैकीं एक आहे. इजिप्शियन लोक यांनांच नहाराइन म्हणतात, आणि बायबलमध्यें यांचा आराम-नहाराझ या नांवानें उल्लेख आहे. तथापि या राष्ट्राचा संगतवार असा इतिहास अद्याप उपलब्ध झाला नाहीं. आधुनिक संशोधनांत मिटनि राष्ट्रासंबंधीं कांहीं तुटक तुटक माहिती मिळाली आहे ती येणें प्रमाणें:-ख्रि. पू. १५८० त इजिप्तचा पहिला राजा तेहुतीमस यानें आशियावर स्वारी केली तेव्हां तो मिटनि राज्यावर चालून गेला होता. सरहद्दीवर झालेल्या लढाईंत त्यानें मिटनीच्या राजाचा पराभव केला. यावेळेपासून नाइल नदीच्या प्रदेशांतील लोक, आणि युफ्रेटीस नदीच्या प्रदेशांतील लोक यांचे सतत दळणवळण सुरू झालें. ख्रि. पू. १५२२ त तिसरा तेहुतिमेस यानें मिटनीचें राज्य जिंकून घेऊन इजिप्तचें मांडलिक बनविलें. ख्रि. पू. १४७०-१४०० तेल एल अमर्ना येथील कागदपत्रावरून या काळांत मिटनीच्या राज्यांत आर्तटन, अर्तशुम, सुतर्ण, दुप्रत्त या नांवाचे राजे होऊन गेले. या काळांत पुष्कळ मिसरी राजांनीं मिटनि येथील घराण्यांतील राजकन्यांशी लग्ने केलीं होतीं. यावरून या वेळीं मिटनी लोकांचे राज्य बरेंच महत्त्वास चढलें होतें. असें दिसतें ख्रि. पू. १४०० या सुमारास मिटनी लोकांनी हिटाइट लोकांशीं दोस्ती केल्याचें दिसतें आणि त्यांनीं हिटाइट लोकांनां अनेक लढायांत मदतहि केली होती. इजिप्तमधील १८व्या घराण्याच्या अखेरीस इजिप्शियन लोकांनां आमोराइट लोकांच्या देशांतून हांकून देण्यास मिटनी लोक कारणीभूत झाले होते. यावेळी मिटनी लोकांचे सामर्थ्य चढत्या स्वरूपांत होतें. मिटनि लोकांनी कानानाइट व बाबिलोनियन राजांशीं सख्य करून मिसरी लोकांबरोबर सतत झगडा चालविला होता. ख्रि. पू. १२२५ त मिटनि लोकांचा राजा कुशन-रिश्-अथइम यानें सीरियावर स्वारी करून इस्त्रालाइट लोकांनां आठ वर्षे बंदिवासांत टाकलें होतें. या नंतर आलेपो, हमात आणि दमास्कस हीं आरेमियन लोकांच्या ताब्यांत गेलीं होती, व यांतूनच नंतर दमास्कस, हमात, झोबाह वगैरे राज्यें स्थापन झालीं. मिटनि आणि मेसापोटेमियांतील आरेमियन राष्ट्रें यांची सत्ता असुरियन राष्ट्रांचें सामर्थ्य वाढत गेल्यामुळें कमी झाली. ख्रि. पू. ११२० त पहिला तिग्लथपिलेसर या असुरियन राजानें बराच मिटनीप्रांत जिंकला आणि तिसरा अशुरनझिरपाल यानें सर्वच मिटनी देश असुरियन राज्याला जोडला.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .