प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ५ वें.
असुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.

हिटाइट व मिसरी लोकांचा संबंध. - ख्रि. पू. १७व्या शतकापासून हिटाइट लोकांचा इजिप्शियन उर्फ मिसरी लोकांशीं युद्धविषयक संबंध येऊं लागला. त्या पूर्वीची हिटाइट लोकांची माहिती मिळत नाहीं. हिटाइट लोकांच्या मिसरी लोकांशीं राजकीय उलाढाली झाल्या त्या येणेंप्रमाणें:-ख्रि. पू. १५२८ हिटाइट लोकांची तिसरी टेथमॉसिस याच्या बरोबर मेगिढो येथें लढाई झाली. ख्रि. पू. १४०० या वेळेपासून हिटाइट लोक बरेच प्रबळ झालें. त्यांनीं सीरियामधील मिसरी लोकांच्या प्रांताकडे मोर्चा वळविला. आणि कडेश हें आपलें दक्षिणेकडील राजधानीचें शहर बनविलें. ख्रि. पू. १३६० मिसरी राजा पहिला सेती यानें हिटाइटांच्या कडेश राजधानीवर हल्ला केला. ख्रि. पू. १३४१ त मरोसर याचा मुलगा मौथनर याला त्याचा भाऊ खेटसर यानें ठार मारिलें, व गादी बळकाविली. ख्रि. पू. १३४० त कडेशची दुसरी लढाई यांत मिसरी राजा दुसरा रामेसीस यानें हिटाइट व त्यांचे दोस्त यांच्यावर मोठा विजय मिळविला. ख्रि. पू. १३२५ त हिटाइटांचा राजा खेटसर आणि मिसरी खत्तुशील राजा दुसरा रामेसीस यांच्यामध्यें तह झाला. कडेशच्या लढाईचीं कविताबद्ध आणि इतर वर्णनें आणि उपर्युक्त तहासंबंधाचा लेख सांपडला आहे. एबर्स म्हणतो या महत्त्वाच्या लेखावरून हिटाइट लोकांची संस्कृति आणि त्यांचे राजकारण बरेच सुधारलेलें होतें असें दिसतें. या तहनाम्याचें ब्रुगशनें केलेलें भाषांतर मोठाल्या कागदाचीं सात पानें आहेत. या तहाचीं कलमें एका चांदीच्या पत्र्यावर खोदून व त्या पत्र्याच्या मधोमध खेटा लोकांच्या सुटेख या प्रमुख देवतेचें चित्र काढून हा रत्नपट खेटा राजानें रामेसीस राजाला दिला होता. हिटाइट लोकांचे लेख उपलब्ध झाल्यापासून मिसरी देवालयांच्या भिंती वरील देखाव्यांचा अर्थ बरोबर समजूं लागला आहे. या एकंदर साधनांवरून हिटाइट लोकांचें हें प्राचीन राष्ट्र किती सुधारलेलें होतें याची कल्पना येते.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .