प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ५ वें.
असुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.

हिटाइट अथवा हट्टि राष्ट्र व संस्कृति. - हे लोक अतिप्राचीन कालीं सिरिया व पूर्व आशियामायनर या प्रदेशभर पसरलेल्या एका मानवजातींतील होते. इ. स. पू. १६ व्या शतकांत त्यांनीं प्रथमच उत्तरकालीं कॅपॅडोशिया नांवानें प्रसिद्ध असलेल्या प्रांतांत आपलें एक बलिष्ट राष्ट्र निर्माण केलें. सुब्बिलुलिउम हा त्यांचा पहिला मोठा राजा होऊन गेला; याच्या आधीं खत्तुशील नांवाचा निदान एक तरी राजा झाला असावा. या वेळीं हट्टी लोक मोठ्या जोमानें दक्षिणेंत घुसले. त्यांनीं मिटनि लोकांचें राज्य पादाक्रांत  केलें व उत्तर सिरिया आणि पश्चिम मेसापोटेमिया हे देश कांहीं अंशी व्यापण्याकरितां व कांहीं अंशीं मांडलिक बनविण्याकरितां ते पुढें सरसावलें; या देशांत त्यांचे कांहीं सजातीय अगोदरच येऊन राहिले होते. लवकरच त्यांचें इजिप्तशीं वितुष्ट आलें आणि दुसऱ्या खत्तुशीलच्या अमदानींत यांच्या सत्तेची वरकमान असतांना दुसऱ्या रामेसीस बरोबर हे कडेशची लढाई खेळले. या लढाईचा निकाल अनिश्चितच झाला पण या लढाईंत त्यांचें सामर्थ्य त्यांच्या प्रतिपक्षाच्या सामर्थ्यांपेक्षां मुळींच कमी दिसून आलें नाही. या व यापूर्वीच्या काळच्या हट्टी राजांच्या राजकीय पत्रव्यवहारावरून असें दिसून येतें कीं, ते इजिप्त व बाबिलोनी दरबारांशीं व्यवहारदृष्टया समान दर्जाचें वर्तन ठेवीत; आणि सिरियामध्यें विशेषत: अ‍ॅमोराइट जातींशीं त्यांचें एकसारखें युद्ध चालू असे. या काळीं हट्टीच्या साम्राज्यसत्तेखालीं पश्चिमेकडील फ्रिजिया व लिडिया हे दोनहि देश येत असावेंत. दुसऱ्या खत्तुशीलच्या पुढील पिढींत बोगस कुइ येथील पत्रव्यवहाराला फारसें महत्त्व राहिलें नाहीं व यानंतर दोन शतकांनी सुरुवात झालेल्या अमर्ना बखरीवरून त्या वेळीं कॅर्चेमिश हें प्रमुख हट्टी शहर असून, उत्तर सिरियालाच हट्टिस्थान म्हटलेलें आढळतें. तेव्हां असें शक्य दिसतें कीं, हट्टी लोकांनां जेव्हां इजिप्तची भीति वाटेनाशी झाली तेव्हां साम्राज्यकेंद्राचें उत्तरसिरियांत स्थलांतर झालें असें असेल तर, पुढील हल्लींचा इतिहास बोगझ कुइ येथील अवशेषांत न पाहातां जेरॅब्रस आणि इतर मध्ययुफ्रोटिस नदीकांठचीं स्थळें यांतील अवशेषांत पाहावा लागेल. कर्चेमिस येथील हट्टीलोकांच्या वसाहतीमुळें ते पुरे व्यापारी बनून त्यांच्यातींल डोंगरी ताकद नाहींशी झाली; इतकेंच नव्हे तर असुरियाच्या वाढत्या उत्तर सेमिटिक मधील सत्तेशीं त्यांचे निकट सान्निध्य होऊं लागलें. दुसऱ्या खत्तुशील राजाला या सेमिटिक सत्तेच्या प्रादुर्भावाची भीति वाढत असे. याच्या नंतरच्या अनौंत नांवाच्या एका राजाला असुरी लोकांची जांचणी वाटू लागली होती आणि यापुढें अजमासें एक शतकानंतर, पहिला तिग्लथ पिलेसर याच्या राज्यारोहणापासून हट्टी सत्ता नाहींशी करण्याची असुरी लोकांची प्रयत्नपरंपरा सुरू झाली. निनेव्हेच्या सैन्यांनीं उत्तर सिरिया आणि आग्नेय आशियामायनर यांवर स्वाऱ्या करून हळूहळू हट्टी लोकांचा बीमोड केला. तथापि हट्टी लोकांनीं पुष्कळ काळपर्यंत मोठ्या नेटानें त्यांचा प्रतिकार केला व सिरिया आणि पूर्व-आशियामायनर या ठिकाणीं इ. स. १००० वर्षे पर्यंत सर्वांत जास्त वर्चस्व यांचेच होते; व नवव्या शतकाच्या उत्तरार्धांत असुरी लोकांची सत्ता बरीच वाढेतोपर्यंत हट्टींचें सिरियांतील स्थान नाहीसें झालें. नाही. हावेळपावेतों यांच्या कॅपॅडोशिया प्रांताची काय स्थिति होती याची आपणांस अद्याप माहिती मिळत नाहीं; पण प्राचीन काळीं जेथें यांचें चांगलें वर्चस्व होतें त्या एउयुक आणि टॅना येथील फ्रिजिअन शिलालेखांच्या अस्तित्वावरून असें दिसतें कीं, असुरिया आणि हिटाइट यामधील कलहाच्या पूर्वावस्थेंत संगॅरियस दरींतील मांडलिक राजा स्वतंत्र झाला आणि त्यानें हट्टींच्या दौर्बल्यावस्थेंत आपल्या पूर्वी वरिष्ठ असलेल्या राजाच्या घरचा मुलूख बळकावून आपलें राज्य वाढविलें. किमेरियांतील लोकांनीं फ्रिजियाचें राजघराणें बुडवून, लिडियाला मर्मनड सत्तेच्या अन्तर्गत स्वातंत्र्य दिल्यानंतर सुद्धां ''श्वत सिरियन लोक'' कॅपॅडोशियामध्यें होते. क्रोएससला साहाव्या शतकांत हे लोक प्तेरिया येथें आढळल्यावर त्यांचा त्यानें अखेरचाच नायनाट केला. तथापि यांच्या बऱ्याचशा धार्मिक व इतर चाली मागें होत्या व त्या ग्रीक ग्रंथकारांनीं नमूदहि केल्या आहेत. यांचे संबंधीं थोडी सविस्तर माहितीची टीप पुढें दिली आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .