प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति

पौराणिक वंशावळींची रचना व ग्राह्याग्राह्यता - भारतीय संस्कृति फार प्राचीन असून अगदी पुरातन काळींहि हिंदुस्थानांत अनेक राज्ये होती. ज्या देशांत अनेक राज्यें भरभराटीस आलीं व संस्कृतीहि उच्च दर्जापर्यंत पोहोचली होती, तेथील राजांचीं नांवें कथांमध्यें ग्रथित होणें अगदीं स्वाभाविक आहे, कारण त्या प्राचीन काळांत बहुतेक ज्ञानाचा सांठा म्हणजे ऐतिहासिक कथांचा असावयाचा; हल्लीच्या काळाप्रमाणें विविध विषयांचा भरणा त्या काळी नव्हता. तेव्हां अशा प्राचीन काळांतील प्रसिद्ध राजांची माहिती राष्ट्रांतील पुढील पिढयांना सर्वस्वी अज्ञात असावी, ही गोष्ट अत्यंत असंभवनीय वाटते; आणि उलट असा सिद्धान्त प्रस्थापित होतो कीं राजांविषयींच्या ह्या प्राचीन कथा सामान्यतः ख-या असेंच धरून चाललें पाहिज. मात्र मानवी पुराव्यांतील काहीं तपशीलाचा भाग चुकीचा असण्याचा संभव असल्यामुळें वरील कथांतील विशिष्ट हकीकतीच्या खरेखोटेपणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची कोणालाहि मुभा राहणारच.

आतां दुसरा एक असा आक्षेप येण्यासारखा आहे की, मूळ वंशावळी ख-या असल्या तरी मागाहून त्यांत कोणी फेरफार करून खोटी नांवे घुसडली नसतील कशावरून? पूर्वीच्या काळांत खाजगी व राजघराण्यांच्याहि खोटया वंशावळी तयार केल्याची उदाहरणें आढळतात. येथेंहि आक्षेपकांनीं ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे की, कोणतीहि खोटी, बनावट गोष्ट  होण्यापूर्वी तद्वत खरी व सत्य गोष्ट अस्तित्वांत असावी लागते; इतकेंच नव्हें तर त्या सत्य गोष्टीला विशेष महत्त्व व किंमत असावयास पाहिजे; म्हणजेच तिच्या लोभामुळें मनुष्य बनावट गोष्ट करून ती सत्य असें भासविण्याचा प्रयत्न करतो. याच न्यायानें खोटया वंशावळी मागाहून झाल्या असल्यास त्यापूर्वी ख-या वंशावळी अस्तित्वांत असल्याच पाहिजेत. अशा ख-या वंशावळी अगदीं प्राचीन काळी राजे किंवा सत्ताधिपती समाजाचे शास्ते बनूं लागल्यापासूनच तयार होऊं लागल्या असल्या पाहिजेत. आतां अशा वंशावळीत आद्यपुरुष कोणी सूर्य किंवा चंद्र मानला गेला एवढयावरूनच पुढील वंशावळ आद्यंत चूक मानण्याचें कारण नाहीं; कारण कोणत्याहि वंशाचा अगदीं मूळ पुरुष ख-या माहितीच्या अभावी, कोणी काल्पनिक व्यक्ति मानणें साहजिक असतें. परंतु नंतर एकाच घराण्यांतील राजपुरुषांची परंपरा लागून त्यांचे राज्य टिकलें म्हणजें ख-या वंशावळी निर्माण होतात.

तेव्हां सुसंस्कृत समाजाच्या अगदी आद्य काळापासून ख-या वंशावळीं प्रथम निर्माण होणार; नंतर त्या नमुन्यावर काल्पनिक किंवा खोटया वंशावळी बनविण्याचा विचार कोणाला सुचणार. अशा बनावट, खोटया वंशावळी नवे राजे किंवा सत्ताधारी उत्पन्न  झाल्यावर  त्यांचा जुन्या प्रसिद्ध घराण्यांशीं संबंध जोडण्याकरतां तयार करण्याचा विशेष संभव असतो. या अनुमानाप्रमाणें हिंदुस्थानांतील मध्ययुगीन व अर्वाचीन काळात काही बनावट वंशावळी नजरेस आल्या आहेत; त्याचप्रमाणे पुराणांतर्गत कांही लहान घराण्यांचा मोठाल्या प्रसिद्ध राजघराण्यांशी खोटाच संबंध जोडून दिल्याची उदाहरणें पुढें मांडण्यांत आलीं आहेत.

तसेंच प्रत्येकाला आपल्या प्राचीन कुलपरंपरेबद्दल अभिमानच वाटत असल्यामुळें राजेलोक, त्यांचे पुरोहित व सामान्य भाटवर्ग यांनीं मोठया दक्षतेनें ख-या वंशावळींची माहिती जतन करून ठेवली असली पाहिजे. स्तुतिपाठकांचा व पोवाडे करणारांचा वर्ग हिंदुस्थानांत पूर्वापार अस्तित्वांत असून तो आपल्या कवनांनीं व कथांनी राजांच्या स्वकुलाभिमानाला उद्दीपित करीत असे, व लोकांचीहि ऐतिहासिक जिज्ञासा तृप्त करीत असे. संस्कृत वाङ्मयात अशा कथांवरून श्रवणप्रसंगाचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. आणि घराण्याची परंपरा चांगली उज्वल असल्यावर खोटया बनावट वंशावळी करण्याचें कारणच नाहीं.

आतां प्रचीन वंशावळीत मधल्या दीर्घ काळांत कांही  चुका कांही लोप व कांही लबाडी होणें संभवनीय आहे; तसेंच कांही अप्रिय गोष्टी त्यांतून वगळल्या जाणेंहि शक्य आहे. उदाहरणार्थ विश्वामित्र ज्याचा शेवटचा पुरुष तें कान्यकुब्ज घराणें व काशीघराणे ही पौरवकुलांतील सुप्रसिद्ध व धर्मशील राजा भरत यांच्या वंशापासून निर्माण झाली, अशी चुकीची माहिती कांहीं कांहीं पुराणांत आढळते. खुद्द रामायणांतील अयोध्येच्या राजांच्या वंशावळींमध्यें राजांचा अनुक्रम चुकलेला आहे व कित्येक राजे गाळलेले आहेत. रामायण ग्रंथ ब्राह्मणकृत आणि त्या वेळच्या ब्राह्मणांमध्यें ऐतिहासिक सत्यनिष्ठा तितकी नसल्यामुळें वरील चुका झाल्या असल्या पाहिजेत. पण कान्यकुब्ज व काशी घराण्यांतील वंशावळींत मात्र कोणी हेतुपुरस्पर फेरफार केलेला असावा. परंतु उत्तर हिंदुस्थानांत खरी माहिती भरपूर उपलब्ध असल्यामुळें खोटी माहिती चव्हाटयावर आल्यावाचून रहात नाहीं. स्तुतिपाठक सर्वत्र पसरलेले असल्यामुळे अनेक खरे अल्प खोटयांस मारक झालेले आहेत. कान्यकुब्जघराण्याचा भरतवंशांशी संबंध जोडण्याचे उघड कारण असें दिसतें कीं भरतराष्ट्रीय लोकापासूनच पुढें अनेक ब्राह्मणकुलें निर्माण झाली हें सत्य असल्यामुळें विश्वामित्रांचें ब्राह्मणत्व लोकांनां तितकें क्रांतिकारक वाटले म्हणून वरील फरक केला असावा. रामायणाची लोकमान्यता हजारों वर्षें चालूं असली तरी सूर्यवंशावळी अनेक ठिकाणी ग्रथित असल्यामुळें खुद्द रामायणांतील चुकीची वंशावळ देशांत मान्यता पावूं शकली नाहीं.

संस्कृत ग्रंथांत कांही ठिकाणी काल्पनिक वंशावळी आढळतात, परंतु त्या व ख-या राजवंशावळीं यांतील फरक चांगला लक्षांत येण्यासारखा आहे. असल्या  काल्पनिक वंशावळींत सृष्टयुत्पत्तीचें वर्णन देतांनां दक्षासंबंधानें, पितरांसंबंधानें तसेंच निरनिराळया प्रकारच्या अग्नींच्या संबंधानें वगैरे दिलेल्या आहेत. तसेंच अपु-या माहितीच्या आधावर ख-या वंशावळी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ भार्गव, आत्रेय, वासिष्ठ वगैरे ब्राह्मणकुलांच्या ब्राह्म. वायू, मत्स्य व लिंग पुराणांत  दिलेल्या वंशावळी. या वंशावळी ग्राह्य मानतां येत नाहींत. त्यांतील पिढयांची कांहीं नांवे बरोबर आहेत पण बाकी ॠषींच्या व गोत्रांच्या नांवाचीं कांहीतरी भरती केलेली आहे या ब्राह्मणकुलांच्या वंशावळी क्षत्रिय वंशावळींचें अनुकरण करण्याकरतां मागाहून तयार केलेल्या आहेत हें स्पष्ट दिसतें. आणि प्राचीन काळापासून परंपरेनें ख-या वंशावळीं चालत आलेल्या नसल्यामुळें मागाहून इकडून तिकडून गोळा केलेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारावर त्या बनविलेल्या आहेत.

तथापि मूळ प्रसिद्ध पुरुषांच्या ख-या वंशावळी नसत्या तर मागाहून ब्राह्मणवंशांच्या व इतर वंशावळी बनावट तयार झाल्या नसत्या तेव्हां मूळ व ख-या वंशावळी क्षत्रिय राजवंशाच्या होत. ख-या क्षत्रिय  वंशावळींतील भरपूर व सरळ दिलेली माहिती आणि उलट बनावट वंशावळींतील चुका व अपुरेपणा ही ताडून पाहिली म्हणजे राजकुलांच्या वंशावळींचे प्राचीनत्व व विश्वसनीयत्व ही दोन्हीं मनाला ताबडतोब पटतात.

राजेलोकांच्या वंशावळीचें संरक्षण करण्याचें काम वैदिक ब्राह्मणांनीं केलेलें नाहीं, कारण त्यांशीं समकालीन ब्राह्मणवर्ग अस्तित्वांत होता किंवा नाहीं याची शंका आहे. ते काम दरबारांतल्या लोकांचे म्हणजे ज्यांनां राजघराण्यांची परंपरा कायम राखण्याचे खाजगी स्वार्थदृष्टीनें महत्त्व वाटत असतें अशा लोकांनीं केलेलें आहे. हे लोक म्हणजे राजांचे स्तुति पाठक होत. त्यांत उत्तरकालीं ब्राह्मणहि असत, पण वरील काम ते ब्राह्मकर्म म्हणून नव्हें, तर दरबारांतील नोकर या नात्यानें करीत असत. प्राचीन काळचे ॠषी किंवा कडक वर्तनाचे ब्राह्मण असल्याऐहिक गोष्टींत सहसा लक्ष घालीत नसत. एखाद्या विशेष प्रसंगी कायते ते त्यांत पडत. त्यांनीं आपल्या स्वतःच्या ब्राह्मण कुलांच्या- वंशावळीहि तयार करून ठेवण्याची फिकिर केली नाहीं; व त्यामुळेच ख-या ब्राह्मणवंशावळी आज उपलब्ध नाहींत. तशा वंशावळी मूळ असत्या तर त्या वैदिक वाङ्मयाप्रमाणें सुरक्षित राहाणें अशक्य नव्हतें. या अनेक कारणांस्तव राजघराण्यांच्या वंशावळी ख-या प्राचीन व ग्राह्य धरून चालण्यास कांही हरकत दिसत नाहीं. या निर्णयाला दुसरा आधार मिळतो तो असा कीं, ऐल उर्फ सोमवंशीय लोकांनां उत्तरहिंदुस्थान व दक्षिणेकडील प्रदेश कसा व्यापला याची आपणांस जी माहिती आहे तशी बरोबर माहिती संस्कृत ग्रंथांत या वंशावळींतच फक्त सांपडते. शिवाय मानववंशशास्त्रविषयक माहितीशीं ही वंशावळींतील माहिती तंतोतंत जुळते. हा तर तिच्या विश्वासनीयतेबद्दलचा अगदीं निर्दोष पुरावा होय.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .