प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.

सृष्टचमत्कार [ॠग्वेद]

सृष्टचमत्कार [ॠग्वेद]

१२महाभूत (पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश)
उल्का.- ॠग्वेद कालापासून हा शब्द तुटणारा तारा या अर्थानें योजितात. ब्राह्मण गंथांत विस्तव, जळतें लांकूड, या अर्थी याचा उपयोग केला आहे. अथर्ववेदांत उल्कुषी हें जें क्कचित् उपयोगांत आणिलेलें रुप आहे तेंहि वरील अर्थाचेंच आहे.
ध्राजि.- ॠग्वेदांत व मागाहून झालेल्या ग्रंथांत वा-याचा जोर असा याचा अर्थ आहे. हिंदुस्थानांत अरण्यें उद्वस्त करणारे जे जोराचे वारे वाहतात त्या वा-यांचा बोध या शब्दानें होतो. कांही ठिकाणीं सामान्य गति असा व बहुतेक ठिकाणीं वा-याचा वेग असा अर्थ आहे. परंतु 'वातस्य ध्राजिरसि' असा उल्लेख केलेला आहे यावरुन ध्राजि शब्दाचा सोसाटा असा अर्थ असावा असें दिसतें.
प्रबुध्.- हा शब्द ॠग्वेदांत एका ठिकाणीं आढळतो. हा निम्रुचि (सूर्याच्या अस्तकाली) याच्या उलट असून सप्तमी विभक्तींत उपयोगांत आणिला आहे. याचा सूर्योदयी असा अर्थ आहे.
मर्क.-ॠग्वेदांत एके ठिकाणी हा शब्द आढळतो. तेथें त्याचा (सूरोमर्क:) सूर्यग्रहण असा अर्थ रॉथ करतो. सायणाचार्यांच्यामतें याचा 'शुद्ध करणें' असा अर्थ आहे. एके ठिकाणीं मर्क याचा राक्षसवाचक अर्थ आहे.
वात.-ॠग्वेद व मागाहून झालेल्या ग्रंथांत याचा वारा असा अर्थ आहे. तैत्तिरीय संहितेंत पांच प्रकारच्या वा-यांचा उल्लेख आला आहे. ॠग्वेदांत एका ठिकाणीं झिमरच्या मतें ईशान्येकडील वारा असा याचा अर्थ आहे.
ध्वांत.- यजुर्वेदांत व पुढील ग्रंथांत हें एका वा-याचें नांव आहे 'ध्वांतं वाताग्रं' असें तैत्तिरीय संहितेंत वचन असून 'ध्वनियुक्त' असा सायणाचार्य त्याचा अर्थ करतात.
पुरोवात.- 'पूर्वेकडील वायु' याचा उल्लेख तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणग्रंथ यांत आहे. गेल्डनरच्या मतानें याचा अर्थ पर्जन्यापूर्वीचा वायु असा आहे व तो बरोबर दिसतो.
प्रचलाका.- तैत्तिरीय संहितेंत व काठक संहितेंत याचा अर्थ मेघस्फोट असा असावा असें वाटतें.
प्रतिश्रुत्का.- (प्रतिध्वनि) यावरुन यजुर्वेद संहितेच्या कालासारख्या जुन्या काळीं देखील या निसर्ग चमत्काराला नांव दिलेलें आढळतें व कौषीतकी ब्राह्मणांत हि आढळतें.
१०प्रासच.- तैत्तिरीय संहितेंत याचा अर्थ मेघस्फोट असा होतो परंतु तैत्तिरीय ब्राह्मणांत प्रासच; या विशेषणाचा तुफानी पावसानें पडलेलें पाणी असा अर्थ होतो.
११सलिलवात.- यजुर्वेद संहितेंत विशेषण या अर्थानें व 'पाण्यापासून येणा-या वातानें उपकार केलेला' अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. हा शब्द बहुतवरुन समुद्राकडून येणा-या नैॠत्य दिशेकडील पावसाळी वा-यास लावलेला असावा.
१२महाभूत.- निरुक्तांत व ऐतरेय उपनिषदांत याचा अर्थ महाभूतें, महातत्वें (पृथ्वी,आप,तेज,वायु व आकाश) असा आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .