प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.

हिंदुस्थान हा भारत कोणामुळें.- हिंदुस्थानास 'भारतवर्ष' कां म्हणतात? आपण कोणत्या भरतावरुन आपणांस भारतीय म्हणवितों, याची जिज्ञासा आपणांस स्वाभाविक आहे. पुराणग्रंथमूलक असा समज आहे कीं, दुष्यंत व शकुंतला यांचा पुत्र जो भरत तो या देशाचा सार्वभौम राजा झाला आणि त्यावरुन देशास 'भारतवर्ष' नांव पडलें. या भरताचा संबंध महाभारतानें कुरुकुलाशीं वर्णिला आहे. आणि कुरुंचा घराण्यांतील यादवीच्या काव्यास महाभारत व यादवीस भारतीयुद्ध असें नांव आज प्रचलित आहे. ॠग्वेदांत भरत नांवाचे लोक वर्णिलेले दिसतात. त्यांचें तृत्सूंशी नातें किंवा कदाचित् ऐक्य दिसून येतें. त्यांच्या विजयांचें वर्णनहि वेदांत आहे. मंत्रोत्पन्न माहिती दुष्यन्तपुत्र भरताच्या नांवानें देशास नांव मिळालें या पुराणग्रंथांच्या विधानाविषयीं संशय उत्पन्न करते. इतिहास कोणाचा हा प्रश्न आपण उत्पन्न केला त्या वेळेस असें लिहिलें आहे की, ज्या जातीचें किंवा राष्ट्रांचें हिंदुस्थानांत अस्तित्व किंवा प्रामुख्य असेल त्यांचा इतिहास आपणांस लिहिला पाहिजे. आर्य हा शब्द यजनविषयक असल्यामुळें, केवळ आर्यांचा म्हणजे विशिष्ट त-हेनें यजन करणा-यांचा इतिहास आपणांस द्यावयाचा नाही. आपणांस देशांत जी राष्ट्रें ज्ञात होतात त्यांची मोजदाद घेतली पाहिजे आणि त्या क्रियेपासून इतिहासास सुरुवात केली पाहिजे. ही मोजदास घ्यावयाची ती दाशराज्ञ युध्दाच्या अनुषंगानें घेऊन जी राष्ट्रे वगळलीं जातील त्यांचा मागाहून इतिहास घेतला पाहिजे. प्राचीन काळीं चळवळ करणारीं बरीच राष्ट्रें दाशराज्ञ युध्दामध्यें सामील झालीं आहेत. पुरु, कुरु, भरत यांचे पौराणिकांनी वंशैक्य धरलें आहे, तें तसे आहे म्हणून वेद साक्ष देतात काय याचाहि इतिहासार्थ वेदांकडे लक्ष देणा-यानें विचार केला पाहिजे.

भरत हें ॠग्मंत्र व तदनंतरच्या वैदिक वाङमयांत फार महत्वाचें असें एका लोकांचे नांव आहे. ॠग्वेदसंहितेंत सुदास आणि तृत्सु लोकांबरोबर यांच्या नांवाचा उल्लेख तिस-या आणि सातव्या मंडळांत वारंवार येतो; आणि साहाव्या मंडळांत त्यांचा संबंध दिवोदासाबरोबर दिसून येतो (ॠ..१६, ४-५). एका ठिकाणीं (ॠ..८,४) भरत लोक तृत्सूंप्रमाणें पुरुंचे शत्रू आहेत असें म्हटलें आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .