प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

नि:शुक्रजोत्पत्ति.- कृत्रिम उपायांनी नि:शुकजोत्पत्ति (Partheno-genesis) करण्याचे प्रयोग मोठे मनोरंजक व महत्वाचे असतात; व त्यांवरुन ज्या गोष्टी केवळ अदृश्य शक्तिमुळें घडून येतात असें वाटण्याचा संभव असतो त्या साध्या रासायनिक क्रियांनीच होत असतात असें सहज सिद्ध करुन दाखवितां येतें. सीअर्चिन किंवा स्टारफिश किंवा आनेलिड (एक प्रकारचा जलचर प्राणी) याच्या अंडयामध्यें शुकबिंदूचा प्रवेश झाला कीं, तात्काल परिणाम असा होतो कीं, अंडयाभोवतालचें वेष्टन म्हणून ज्याला म्हणतात तें तयार होण्यास सुरवात होतें. लोएबनें असें शोधून काढलें कीं, हें गर्भावेष्टन गर्भवियुक्त अंडयामध्यें कित्येक आसिडांच्या विशेषत: सेंद्रिय मॉनॉबेसिक अ‍ॅसिडांच्या साहांय्यानें उत्पन्न करतां येतें. कर्बवायूनेंहि ही क्रिया घडवून आणतां येतें. शिवाय असें आढळून आले आहे की, उच्च प्रकारचें आम्ल (ज्याच्या अणूंचें वजन जास्त असतें तें) जास्त परिणामकारक असतें. खुद्द शुकजंतू तरी अंडयामध्यें उच्च प्रतीचें आम्ल घालण्याचेंच काम करुन त्या योगानें गर्भावेष्टन निर्माण होउं लागण्यास कारण होत असावा. शारीरिक रसायनांमध्यें कांही क्रिया होऊन त्यामुळें गर्भावेष्टन तयार होऊं लागतें व त्यामुळें अंड्यांतील प्राण्याची वाढ होऊं लागते. इतर प्राण्यांच्या अंडयांमध्यें अशाच प्रकारचा फरक होऊं लागण्यास वरील आम्लादि साधनामध्यें थोडाफार फेरबदल करावा लागतो. परंतु जरुर तेवढी काळजी घेतल्यास सर्व जातींच्या प्राण्यांच्या अंडयांमध्यें शुक्राच्या साहाय्यावांचूनहि गर्भाची वाढ करुन दाखवितां येणें शक्य आहे. आणि अशा कृत्रिम उपायांनी जन्मास आलेल्या प्राण्यांपैकीं निम्याहून अधिक अंडयांमध्ये शुक्राच्या योगानें उत्पन्न होणा-या प्राण्यांप्रमाणेंच सर्व बाबतींत असतात, व हे कृत्रिम प्राणी नैसर्गिक प्राण्याइतका काल जगूंहि शकतात.

 हे कृत्रिम उपायांनीं उत्पन्न केलेले प्राणी नैसर्गिक प्राण्यांप्रमाणें शारीरिक वाढ पावून प्रौढावस्थेस पोहोंचतात काय? असा प्रश्नहि कोणी करतील. त्याला उत्तर असे कीं, डिलेज नामक शास्त्रज्ञास सीअर्चिन जातीचे प्राणी कृत्रिम उपायांनी निर्माण करुन त्यांची प्रौढ दशेपर्यत वाढ झालेली दाखविण्याच्या पयोगांत यश आलेलें आहे. प्रो. लोएब यांना अशाच कृत्रिम साधनांनीं सात पूर्ण वाढ झालेले व चांगले निरोगी बेडूक तयार करतां आलेले आहेत. हे निपितृक तथापि पूर्ण वाढ पावलेले बेडूक ''अंडयांना फक्त एका टांचणीनें भोंक पाडून उत्पन्न करतां आले होतें. ''अशा त-हेची कृत्रिम उत्पत्ति पुढें शरीरांतील उष्णता हवेंतील उष्णतेवर अवलंबून नसणा-या प्राण्यांमध्येहि करणें शक्य होईल असे वाटतें.

शिवाय केवळ अशाच कृत्रिम रासायनिक उपायांनीं एका अंड्यापासून जुळे प्राणीहि उत्पन्न करतां येणें शक्य आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .