प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

अनुस्फटिक व प्रतिस्फटिक स्थिति:- सचेतन पदार्थांतील मुख्य आधारभूत द्रव्य प्रतिस्फटिक जातीचें (Colloidal) म्हणजे स्फटिकाकारविहीन किंवा तत्समुच्चयविहीन असतें; आणि म्हणून सचेतन आणि अचेतन पदार्थांमधील मुख्य फरक हाच होय असें कोणी म्हणेल. त्याला उत्तर असें कीं, हें वर्गीकरणहि आतां उरत नाहीं; कारण सामान्यत: अनुस्फटिक जातींचे असणारे अनेक पदार्थ प्रतिस्फटिक - जातीचे बनवितां आलेले आहेत; उदाहरणार्थ, * (१) Ba So4, * (२) BaCo3, * (३) CaSo4, * (४) NaC1 वगैरे. अंड्यामधील पांढरा भागहि जो प्रतिस्फटिक जातीचा असतो तो अनुस्फटिक जातीचा बनवून दाखविलेला आहे.

इतकेंच नव्हे तर एकच पदार्थ या दोन्हीहि स्थितींत असलेला सांपडूं शकतो. आल्बुमेन हा पदार्थ प्रतिस्फटिक स्थितीत बहुधा असतो, पण त्याचेच पुष्कळशा वनस्पतिगोलकांमध्ये (aleuron-grains) षट्कोणाकृति स्फटिक बनलेले आढळतात. उलट पक्षीं, सिलिका हा पदार्थ अनुस्फटिक जातीचा बहुधा असतो, पण त्याचाच सरसासारखा प्रतिस्फटिक जातीचा पदार्थ बनतो. म्हणून प्रतिस्फटिकजातित्व हें सचेतन सृष्टीचें भेददर्शक लक्षण आहे असें म्हणतां येतं नाहीं.

पृथ्वीची रचना प्रथमपासून कशी होत गेली याचा इतिहास पाहतां असें वाटतें कीं, ती वायुमय स्थितींतून पुढें गेल्यावर पृथ्वीवरील पदार्थांना प्रतिस्फटिक जातीचें स्वरुप प्राप्त होऊं लागलें. अशा जातीच्या पदार्थांचे उत्तम कण अनिश्चित स्थितींत राहिले आणि त्यांच्यावर स्फटिककण तयार झाले. असाच प्रकार हल्लींहि चालू असतो; आणि प्रथम प्रतिस्फटिक जातीचें पदार्थ भराभर बनत असतात व नंतर त्यांपासून अनुस्फटिक जातींचे द्रव्य तयार होत असतें. मागील अनंत काळामध्यें पृथ्वीवरील पदार्थामध्यें अत्यंत सावकाशपणें कसा विकास होत गेला, त्याचें थोडक्यात स्वरुप वरील क्रियेंत पहावयास मिळतें. उदा- विकाससिध्दान्ताप्रमाणें कोणतीहि जीवजाति ज्या निरनिराळया अवस्थांमधून जाऊन निर्माण झालेली असते (Phylogeny) त्याच सर्व अवस्थांमधून तज्जातीय प्राणी गर्भावस्थेच्या थोडक्या काळांत जात असतो (Ontogeny). यावरुन अनुस्फटिक जातींच्या व प्रतिस्फटिक जातींच्या पदार्थांची उत्पत्ति मूळ एकाच प्रकारच्या द्रव्यापासून झालेली आहे असें सिद्ध होतें, निरिंद्रिय पदार्थांमध्यें सिलिकॉन हें मुख्य द्रव्य असतें आणि सेंद्रिय पदार्थामध्यें कार्बन हें मुख्य द्रव्य असतें. हीं दोन्ही द्रव्यें चतुर्धाशक्तिक असतात आणि तीं पुष्कळ निरनिराळया प्रकारच्या स्वरुपांत आढळतात.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .