प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १४ वें.
अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना.

यम. - सुखसंपन्न मृतांचा मुख्य यम होय. ऋग्वेदांतील कवींच्या विचारांत मरणोत्तर स्थितीसंबंधाचे विचार फार थोडे येत असल्यानें यमाला उद्देशून फक्त तीन सूक्तें केलेलीं आढळतात (ऋ. १०.१४; १०.१३५; १०.१५४). यम आणि यमी यांचा संवाद हें एक आणखी यासंबंधीं सूक्त आहे (ऋ. १०.१०). ऋग्वेदांत यमाचें नांव ५० वेळां आलेलें आहे व तें फक्त पहिल्या आणि दहाव्या मंडळांत आलेलें आहे. तो देवांच्या संगतींत आनंद करितो (ऋ. ७.७६,४; १०.१३५,१). यमाबरोबर ज्या देवतांचीं नांवें येतात त्या देवता म्हणजे वरुण (१०.१४,७), बृहस्पति (१०.१३.४) आणि अग्नि या होत. अग्नि हा मृतांना घेऊन जाणारा असल्यानें त्याचें आणि यमाचें नातें साहजिकच जवळचें आहे. अग्नि हा यमाचा मित्र आहे (ऋ. १०.२१,५). तो यमाचा पुरोहित आहे (ऋ. १०.५२,३). यमानें लपलेल्या अग्नीला शोधून काढलें (ऋ. १०.५१,३). अग्नि, यम आणि मातरिश्वन् हीं एकाच परमेश्वराचीं नांवें आहेत असें एका ठिकाणीं सांगितलें आहे (ऋ. १.१६४,४६). अगिन व इतर देवता यांच्या समूहांत यमाचेंहि नांव सांपडतें. (ऋ.१०.६४,३; १०.९२,११).

याप्रमाणें यम हा देव आहे असें ध्वनित केलें आहे. त्याला देव मात्र म्हटलेलें नाहीं, त्याला मृतांवर शासन करणारा राजा असें म्हटलें आहे (ऋ. ९.११३,८; १०.१६,९). मृत मनुष्य स्वर्गांत गेल्यावर यम आणि वरुण यांच्यासमोर जातो (ऋ. १०.१४,७). यमाला उद्देशून एका सूक्तांत यमाचा पितरांशी विशेषत: अंगिरसांशीं संबंध दाखविलेला आहे (ऋ. १०.१४,३ व ५). अंगिरसांबरोबर तो यज्ञाला येतो व तेथें आनंद करितो (ऋ. १०.१४,३ व ४; १०.१५,८). तैत्तिरीय आरण्यकांत (६.५,२) यमाच्या घोडयांचा उल्लेख आहे. यमाचे घोडे हिरण्यनेत्र व लोहमय खुरांचे आहेत असें वर्णन आहे. यम हा लोकांनां एकत्र करितो (ऋ. १०.१४,१), मृताला विसांव्यासाठीं स्थान देतो (ऋ. १०.१४,९; अ. वे १८.२,३७) व त्याच्याकरितां वसतिस्थान तयार करितो (ऋ. १०.१८,१३).

यमाचें घर आकाशाच्या अगदीं दूरच्या भागांत आहे (ऋ. ९.११३,८). तीन स्वर्गांपैकीं दोन सवित्याचें आहेत व एक यमाचा आहे (ऋ. १.३५,६). हा यमाचा स्वर्ग सर्वांत उंच व तिसरा आहे. वाजसनेयी संहितेंत (१२.६३) यम आणि यमी हीं स्वर्गांत सर्वांत उंच ठिकाणीं राहतात असें म्हटलें आहे. यमाचें वसतिस्थान देवांचें घर असून यमाभोंवती गायन आणि अलगुज वगैरे वाद्यांचें वादन चालू असतें. (ऋ. १०.१३५,१४).

यमाकरितां सोम तयार करितात, त्याला घृतहि हवन करितात (ऋ. १०.१४,१३). आपल्या भक्तांनां त्यानें देवांकडे न्यावें व दीर्घ आयुष्य द्यावें अशी त्याची प्रार्थना करितात. (ऋ. १०.१४,१४).

विवस्वान् हा यमाचा पिता होय (ऋ. १०.१४,५). व सरण्यू ही त्याची माता होय (ऋ. १०.१७,१). वैवस्वत हें नांव यमाला दिलेलें पुष्कळ वेळां आढळतें (ऋ. १०.१४,१ इ.) वैवस्वत हें नांव इन्डो-इराणी काळांत वेगळ्या स्वरूपांत सांपडतें. अवेस्तामध्यें वीवङ्ह्वन्त हा पहिलयानें सोमसवन करणारा मनुष्य म्हणून सांगितला आहे आणि त्याला या सोमसवनाबद्दल बक्षिस म्हणून यिम हा पुत्र मिळाला आहे. अथर्ववेदांत (ऋ. १८.२,३२) यम हा विवस्वतापेक्षां श्रेष्ठ असून त्याजपेक्षां कोणीहि श्रेष्ठ नाहीं असें वर्णन आलेलें आहे.

ऋग्वेदांत १०.२०,४ या ठिकाणीं यम आणि यमी हीं आपणाला गंधर्व आणि अप्सरा (अप्या योषा) यांची संतती म्हणवितात. यम हा एकटाच मर्त्य आहे असा उल्लेख यमीचे बोलण्यांत येतो (ऋ. १०.१०,३). दुसऱ्या एका सूक्तांत यमानें मरण पतकरून आपल्या देहाचा त्याग केला असें म्हटलें आहे (ऋ. १०.१३,४). तो दुसऱ्या लोकांत गेला. बहुतांकरितां त्यानें मार्ग शोधून काढिला. जुने पितर ज्या ठिकाणीं गेले त्या ठिकाणीं जाण्याचा मार्ग त्यानें शोधून काढिला (ऋ. १०.१४,१ व २). मर्त्यांपैकीं प्रथम मृत्युवश जाहलेला असा हा यम होय (अ. बे. १८.३,१३), या ठिकाणीं मर्त्य म्हणजे मनुष्य असाच अर्थ घ्यावयास पाहिजे. मर्त्य म्हणजे देव असाहि पुढें अर्थ होऊं लागला. मृतांमध्यें पहिला व सर्वांत जुना असा हा यम असल्यानें त्यानंतर मृत्युवश झालेल्या लोकांचा तो सहजच नायक मानला गेला. त्याला विश्पति म्हणजे वसति करणारांचा नायक असें नांव आहे. आमचा पिता असेंहि त्याला उद्देशून म्हटलें आहे (ऋ. १०.१३५,१) मनुष्यांनां उत्तरकालीन ग्रंथांत विवस्वान् आदित्याचे वंशज असें म्हटलें आहे तें यमाच्या व त्यांच्या संबंधामुळें म्हटलेलें दिसतें (तै.सं. ६.५,६ श. ब्रा. ३.१.३,४ ऋ. १.१०५,९). यमाचा आणि सूर्याचा संबंध असल्याचें ऋगवेदावरूनहि दिसतें. यमानें दिलेला दिव्य घोडा (सूर्य) असा जो (ऋ. १.१६३) उल्लेख आहे त्याचा अर्थ अमर झालेल्यांनां यमानें दिलेलें सूर्यलोकींचें स्थान हा कदाचित् असावा. मृत्यु हा यमाचा मार्ग आहे (ऋ. १.३८,५). एके ठिकाणीं (ऋ. १.१६५,४) मृत्यु म्हणजेच यम असें विधान केल्याचें दिसतें. यमाचा पायांतील खोडा हा वरुणाच्या पाशाप्रमाणेंच आहे (ऋ. १०.९७,१६).

या प्रकारचे यमाचे गुण असल्यानें ऋग्वेदकालीं यमाची थोडीफार भीतीच वाटत असली पाहिजे. अथर्ववेदांत व तदुत्तरकालीन यमविषयक कथांत मरणाचे भीतिजनक देखावे यमाशीं निकटसंबंद्ध झाल्यानें यम हा मृत्यूचा देवच होऊन बसला. उत्तरकालीन संहितांत अंतक व मृत्यु यांच्याबरोबर यमाचें नांव येतें. निर्ऋति म्हणजे रोग (अ. वे. ६.२९,३ मै. सं. २.५,६) याबरोबर यमाचें नांव येतें. मृत्यु हा यमाचा दूत म्हणून सांगितला आहे (अ. वे. ५.३०,१२). मृत्यु हा मनुष्यांचा स्वामी आहे, यम हा पितरांचा स्वामी आहे असें अथर्ववेदांत सांगितलें आहे (अ. वे. ५.२४,१३ व १४). झोंप यमाच्या राज्यांतून येते (ऋ. १९.५६,१).

यम हा शब्दाचा अर्थ जुळे असा आहे. या अर्थानें हा शब्द ऋगवेदांत पुष्कळ वेळां आलेला आहे. यम हा शब्द लगाम या अर्थानें वेदांत थोडया वेळां आलेला आहे. यमीचा यम हा जुळा भाऊ होता (ऋ. १०.१०). अवेस्तामध्येंहि यम याला जुळेपणाचा अर्थ आहेसा दिसतो (यस्न. ३०.३). अवेस्तामध्यें आढळत नाहीं. तरी त्यानंतरच्या वाङ्मयांत यिम याला एक बहीण होती असें सांगितलें आहे व या बहिणीचें नांव यिमे असें असून या भावाबहिणींनीं पहिले मनुष्याचें जोडपें उत्पन्न केलें असें वर्णन आहे. भारतीय वाङ्मयाच्या उत्तरकालांत जेव्हा यम हा मृत्यूचा देव होऊन दुष्टांनां शासन करणारा झाला, तेव्हां त्याच्या नांवाची व्युत्पत्ति लावतांना, यम (नियंत्रण करणें) हा धातु त्या नांवाच्या मुळाशीं आहे असें मानूं लागले. पण ही व्युत्पत्ति वेदकालीं यमाविषयींच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पनांशीं नीटशी जुळत नाहीं.

उलूक म्हणजे घुबड आणि कपोत म्हणजे खबूतर हे यमाचे दूत मानले आहेत (ऋ. १०.१६५,४). या ठिकाणीं यम म्हणजेच मृत्यु मानला असावा. यमाचे आणि मृत्यूचे दूत एकच आहेत असें दिसतें (अ. वे. ८.८,११). वरील दूतांखेरीज यमाचे नेहमींचे दूत म्हणजे दोन कुत्रे असून त्यांचें विस्तारानें वर्णन (ऋ. १०.१४) आलेलें आहे. त्यांनां चार डोळे आहेत, त्यांचें नाक रुंद आहे, रंगानें एक काळ्या पट्टयांचा करडा व दुसरा तपकिरी आहे, ते सरमेचे पुत्र होत. ते रस्त्यावर बसून यमलोकाचें रक्षण करितात (ऋ. १०.१४,११; अ. वे. १८.२,१२). या कुत्र्यांच्या जवळून मृतानें नीट पुढें निघून जावें व यमाबरोबर आनंद करणाऱ्या पितरांस भेटावें असें सांगितलें आहे (ऋ. १०.१४,१०). मृताला यमानें या कुत्र्यांजवळ रक्षणार्थ नेऊन सोडावें आणि त्याचे रोग सर्व दूर करून यमानें त्याचें कल्याण करावें अशी यमाची प्रार्थना केलेली आहे.

यमाचे कुत्रे असुतृप म्हणजे जीवामध्यें तृप्ति मानणारे असतात, ते मनुष्याकडे बारीक नजर ठेवितात आणि यमाचे दूत म्हणून मनुष्यलोकांत सर्वत्र फिरतात. सूर्याचा प्रकाश नेहमीं मिळावा अशी त्यांची प्रार्थना केली जाते. या प्रकारच्या वर्णनावरून यमाच्या कुत्र्याचें काम कोण मनुष्य मृत्युवश होण्यासारखा आहे हें शोधून काढणें आणि यमाच्या राज्यांत शिरण्यासाठीं जे लोक आपला मार्ग क्रमीत असतात त्यांजवर नजर ठेवणें हें आहे असें दिसतें. अवेस्तामध्यें चार डोळ्यांचा पिवळ्या कानाचा कुत्रा चिनवत पुलापाशीं पाहरा करितो असें सांगितलें आहे. हा पूल इहलोक आणि परलोक यांच्यामध्यें आहे. हा कुत्रा पवित्राचरणी मनुष्यांच्या अंतरंगांतून राक्षसाला आपल्या भुंकण्यानें पळवून लावतो. हा राक्षस या पवित्र लोकांनां नरकांत ओढून नेईल अशी भीति असते. यमाचे दोन कुत्रे दुर्जनांच्या आत्म्यांनां यमाच्या राज्याबाहेर ठेवण्याचें काम करीत होते अशी कल्पना असल्याबद्दल पुरावा फारसा नाहीं, तरीपण अशीं कल्पना असणें शक्य दिसतें. (ऋ. ७.५५,२ ते ५) या मंत्रांचा और्फेक्ट याच्या मतें असा अर्थ होतो कीं, वरील कुत्र्यांचा उपयोग दुर्जनांनां बाहेर ठेवण्याकडे केला जात होता. अथर्ववेदांत यमाच्या दूतांचा उल्लेख करतांना अनेकवचन अथवा द्विवचन घातलेलें आहे. यमाच्या दोन कुत्र्यांपैकीं एक काळा व दुसरा करड्या रंगाचा काळया पट्टयांचा आहे असें वर्णन आहे (अ. वे. ८.१,९). ब्लूमफील्डच्या मतें यमाचे दोन कुत्रे म्हणजे चंद्र आणि सूर्य होते. बरगाईनच्या मतें हे कुत्रे म्हणजे अगिनरूप यम आणि यमी यांचींच रूपें होत.

वेदामध्यें व इतर प्राचीन ग्रंथांत जे यमासंबंधीं उल्लेख सांपडतात त्यांजवरून यम हा पुरूष निरनिराळ्या लोकांच्या परंपरागत कथांत आढळतो व या यमाकडे मृतांच्या आत्म्यांचें अधिपतित्व आहे असें दिसतें. यमाच्या कथांमध्यें तो मनुष्यजातीचा पहिला पिता असून पहिला मृत्युवश जाहलेला इसम हाच आहे असें वर्णन येतें व या त्याच्या आद्य स्थानावरूनच त्याचे ठिकाणीं अधिपतित्वाची कल्पना केली गेली. यम आणि यमी (यिम आणि यिमे) हें भावाबहिणींचें युग्म इन्डो-इराणी काळांतील कथेंत आहे. यमाला अगम्यगमनाच्या दोषांतून मुक्त करण्याचा जो प्रयत्न दिसतो (ऋ. १०.१०) त्याजवरून अशा प्रकारच्या गमनासंबंधींची कल्पना पूर्वीं होती हें उघड होतें. इन्डो-इराणी काळांत यम हा सत्य-युगांतील राजा अशी कल्पना असेल. कारण अवेस्तामध्यें तो पृथ्वीवरील नंदनवनाचा राजा आहे, तर ऋग्वेदांत तो र्स्गांतील नंदनवनाचा राजा आहे. यम हा आद्य मानव होय अशी फार प्राचीन कालापासून कल्पना असावी असें रोटचें व दुसऱ्या कांहीं पंडितांचें मत आहे. मेयरच्या मतें यम म्हणजे आत्मा अशीच आरंभींची कल्पना होती व यमी ही इन्द्राणीप्रमाणें मागाहून कवीच्या कल्पनेंतून निघाली. दुसऱ्या कांहीं पंडितांच्या मतें निसर्गांतील कांहीं घटनेला यम हें नांव प्रथम दिलें गेलें. कोणाच्या मतें अग्नीच्या विवक्षित रूपाला यम असें म्हणत. अस्तास जाणारा सूर्य याला यम हें नांव प्रथम पडून नंतर तो मृतांचा देव कल्पिला गेला, असें कांहीं लोकांचें मत आहे. हिलेब्रँटच्या मतें यम म्हणजे चंद्र होय. चंद्राचे ठिकाणीं मृत्यु हा स्पष्ट दिसतो. तो सूर्याचें मृत्यूवश होणारें अपत्य आहे व त्याचा पितरांशीं निकट संबंध आहे. हिलेब्रँटच्या मतें फक्त इन्डोइराणी कळांतच यम हा चंद्र देव होता. पुढें अवेस्तांत अथवा वेदांत त्याचें हें स्वरूप राहिलें नाहीं. तेथें तो पृथ्वीवरील नंदनवनाच्या किंवा पुण्यशील मृतांच्या लोकाचा राजा मानला गेला.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .