प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १४ वें.
अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना.

स्वर्ग. - पितर आणि यम राहतात ती जागा आकाशाच्या मध्यभागीं आहे (ऋ. १०.१४,१५). ती जागा सगळ्यांत उंच आकाशांत आहे. ती तिसऱ्या द्युलोकांत असून आकाशाच्या अति खोल जागीं आहे. तेथें शाश्वत प्रकाश आहे. (ऋ. १०.१४,८;  ९.११३,७ ते ९). अथर्ववेदांत या जागेचें वर्णन सर्वांत उंच असणारें ज्योतिर्मय विश्व (अ. वे. ११.४,११; ४.३४,२), आकाशाचें शिखर (अ. वे. १८.२,४७), तिसरें आकाश आणि तिसरा स्वर्ग असें केलें आहे (अ. वे. ९.५,१ व ८; १८.२,४८). मैत्रायणि संहितेंत पितृलोक म्हणजे तिसरा लोक असें वर्णन आहे (मै. सं. १.१०,१८; २.३,९); ऋगवेदांत पितृलोक म्हणजे सूर्याचा अति उंच भाग असेंहि वर्णन आहे (ऋ. ९.११३,९); पितर हे सूर्याशीं संयोग पावतात, ते त्याचें रक्षण करतात (ऋ. १०.१०७,२; १०.१५४,५); त्यांच्या करितां सूर्य आकाशांत प्रकाशतात (ऋ. १.१२५,६); पितरांचा विष्णूच्या पावलांशीं योग होतो (ऋ. १०.१५,३); धार्मिक लोक विष्णूचें सर्वात उंच जें पाऊल किंवा स्थान तें स्थान पाहून आनंदित होतात (ऋ. १.१५४,५); देव ज्या ठिकाणीं आनंद करतात तिकडे पोंचण्यासाठीं विष्णूनें तीन पावलें टाकलीं, त्याप्रमाणें जेथें धार्मिक लोक यज्ञ करतात तेथें पोंचण्यासाठीं सूर्य उषेच्या पाठीमागून जातो. जे सुकृती लोक स्वर्गांत जातात त्यांचाच तारे हे प्रकाश होत असें ताऱ्यांच्या संबंधानें वर्णन येतें (तै. सं. ५.४,१३; श. ब्रा. ६.५.४,८) पुराणपुरुषीं अत्रि अगस्त्य व सप्तर्षि वगैरे नक्षत्रपदाला चढविले गेले असें वर्णन आहे (तै. आ. १.११,१,२); यम आणि देव ज्या झाडाखालीं पान करतात त्या झाडाचा उल्लेख ऋग्वेदांत येतो. (ऋ. १०.१३५,१). अथर्ववेदामध्यें एका अंजिराच्या झाडाजवळ तिसऱ्या स्वर्गांत देव वस्ति करतात व पान करतात असें वर्णन आहे (अ. वे. ५.४,३).

मरणोत्तर स्थितीसंबंधाचे महत्त्वाचे उल्लेख ऋग्वेदाच्या नवव्या व दहाव्या मंडळांत येतात. या संबंधाचे थोडेसे उल्लेख पहिल्या मंडळांतहि येतात. कडक तपश्चर्या करणारे, लढाईंत प्राण देणारे वीर व यज्ञांत उदारपणानें दक्षणा देणारे यांनां पारितोषिकादाखल स्वर्ग मिळतो (ऋ. १०.१५४,२ ते ५; १.१२५,५; १०.१०७,२). अथर्ववेदामध्यें यज्ञदक्षणा देणाऱ्यांनां नानाप्रकारचीं सुखे मिळतात असा उल्लेख वारंवार येतो.

स्वर्गामध्यें मृताला आनंदमय जीवनक्रम लाभतो (ऋ. १०.१४,८; १०.१५,१४; इ.), या ठिकाणीं त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात (ऋ. ९.११३,९ व ११), या ठिकाणीं त्याचें देवांशीं सान्निध असतें (ऋ. १०.१४,१४), विशेषत: यम आणि वरुण या दोन राजांच्या सहवासांत त्याचा काळ जातो (ऋ. १०.१४,७). स्वर्गामध्यें मृतांनां जरा येत नाहीं (ऋ. १०.२७,२१). त्यांनां तेथें सुंदर शरीर मिळतें व देवांनां ते प्रिय होतात (ऋ. १०.१४,८; १०.१६,५ इ.), तेथें मातापिता, पुत्र इत्यादि त्यांनां भेटतात (अ. वे. ६.१२०,३), पत्नी आणि अपत्यें यांचा योग तेथें होतो (अ. वे. १२.३,१७), तेथें शारीरिक व्यंग नसतें व दुसरी कोणत्याहि प्रकारची अपूर्णता तेथील जीवनांत नसते (ऋ. १०.१४,८; अ. वे. ६.१२०,३). तेथें आजार नाहीं, लंगडेपणा नाहीं, वांकडेतिकडे अवयव नाहींत (अ. वे. ३.२८,५). मृतांनां त्या लोकांमध्यें सर्व प्रकारें पूर्ण असे अवयव व शरीर लाभतें. इत्यादि वर्णन अथर्ववेदांत आणि शतपथ ब्राह्मणांत पुन: पुन: आलेलें आहे.

ऋगवेदामध्यें मृत हे आनंद करितात असें सामान्य वर्णन पुष्कळ वेळां आलेलें आहे (ऋ. १०.१४,१०; १०.१५,१४; इत्यादि). ऋगवेदांत एका ठिकाणीं (ऋ. ९.११३,७ ते ११); स्वर्गांत मिळणाऱ्या आनंदाचें विस्तरश: वर्णन आलें आहे. स्वर्गांत प्रकाश अक्षय्य असतो, तेथें जलप्रवाह अत्यंत वेगाचे असतात, तेथें गतीला निरोध नाहीं (तु. तै. ब्रा. ३.१२.२,९), तेथें सात्विक व आत्मिक अन्न आहे व तें भरपूर आहे, तेथें आनंद, सुख, समाधान, सर्व इच्छांची पूर्ति या गोष्टी आहेत, तेथें प्रेमाचा आनंद आहे (तै. ब्रा. २.४.६,६), तेथें भरपूर कामाचा आनंद आहे (अ. वे. ४.३२,२), तेथील आनंद हा पृथ्वीवरील अतिश्रेष्ठ आनंदाच्या शंभरपटीनें मोठा आहे (श. ब्रा. १४.७,१,३२ व ३३). या सुखी लोकांच्या स्वर्गांत गायन आहे, वादन आहे (ऋ. १०.१३५,७). सोम, घृत आणि मध यांचा येथें सारखा प्रवाह वहात असतो (ऋ. १०.१५४,१). घृताचे येथें मोठाले सांठे आहेत व दूध, मध आणि मद्य यांच्या मोठाल्या नद्या आहेत (अ. वे. ४.३४,५ व ६; श. ब्रा. ११.५.६,४); येथें नाना रंगाच्या वाटेल ती इच्छा पुरविणाऱ्या तेजस्वी गायी आहेत (अ. वे. ४.३४,८); येथें श्रीमंत, गरीब, समर्थ आणि गांजलेले असा भेद नाहीं (अ. वे. ३.२९,३). संहितांमध्यें आणि ब्राह्मणांमध्यें हा जो स्वर्गलोकींचा जीवनक्रम वर्णिला आहे त्याला उपनिषदांमध्यें देवलोकींच्या नाशवंत व कनिष्ठ प्रकारच्या सुखाचें स्थान दिलें आहे. या सुखानंतर पुन: जन्म येतो. उपनिषदांमध्यें ज्यांनां सत्याचें पूर्ण ज्ञान झालेलें आहे, त्यांनांच फक्त परमात्म्याशीं ऐक्य प्राप्त होऊन शाश्वत शांतीचा अक्षय्य आनंद व खरी अमरता प्राप्त होते असें मत व्यक्त झालें आहे. याप्रमाणें सुकृत करणाऱ्या मृत लोकांनां स्वर्गांत जो जीवनक्रम लाभत होता तो जीवनक्रम श्रमरहित व सुखोपभोगयुक्त समजला जात होता. या जीवनक्रमांत त्यांच्यांतील मृत्युलोकींचीं व्यंगे नाहींशीं झालेलीं असत, व देवांच्या संगतींत गान, पान व शारीरिक भोग भोगीत ते काळ घालवीत.

याज्ञिकांची कल्पना स्वर्ग म्हणजे भौतिक सौख्यपूर्ण पृथ्वीपेक्षां जास्त आनंददायक असा लोक असावा अशी दिसते. स्वर्ग म्हणजे सुकृत करणारांचें जगत् आहे (ऋ. १०.१६,४). सुकृति आणि धार्मिक मनुष्य जे यज्ञ वगैरे व्यवस्थेनें करतात ते या जगांत आनंदांत राहतात. या स्वर्गामध्यें त्यांनीं पृथ्वीवर केलेल्या इष्टापूर्तांशीं त्यांचा संयोग होतो. ऋत्विग्वर्गास ज्या दक्षणा त्यांनीं दिल्या असतील त्याबद्दलचा मोबदला येथें त्यांनां मिळतो (ऋ. १०.१५४,३ इ.). ब्राह्मणग्रंथांत असें म्हटलें आहे कीं, जे विधिपूर्वक यज्ञ करतात, त्यांनां आदित्य, अग्नि, इन्द्र, वरुण, वायु, बृहस्पति, प्रजापति, ब्रह्मा यांच्याशीं सलोकता व सायुज्यता प्राप्त होते (श. ब्रा. २.६४,८; ११.४.४,२१; तै. ब्रा. ३.१०.११,६) तैत्तिरीय ब्राह्मणांत (३.१०.९,११) कोणी एक ऋषि आपल्या ज्ञानाच्या योगानें सुवर्णाचा हंस होऊन स्वर्गांत गेला व सूर्याशीं तादात्म्य पावला असें वर्णन आहे. तैत्तिरीय संहितेंत एका ठिकाणीं (६.६,९) कांहीं विवक्षित यज्ञयाग केल्यानें मनुष्य जीवंत स्वर्गाला पोंचतो अशी कल्पना आहे.

एका विवक्षित रीतीनें अभ्यास केला असतां मनुष्य मरणापासून मुक्त होऊन ब्रह्म्यांशीं सात्मता पावतो (श. ब्रा. १०.५.६,९), कांहीं एक गूढ गोष्ट ज्ञात करून घेतल्याचा मोबदला म्हणून मनुष्य या लोकांत पुन्हा जन्म पावतो (श. ब्रा. १.५.३,१४). याप्रमाणें शतपथ ब्राह्मणांत कर्मफलप्राप्ति व देहांतरप्राप्ति या कल्पनांचीं बीजें सांपडतात. बऱ्याच प्राचीन सूत्रग्रंथांत या कर्मविषयक व पुनर्जन्माबद्दलच्या आणि स्वर्ग व नरक यांसंबंधीं कल्पना आढळून येतात इतकेंच नव्हे तर ब्राह्मणकाळाच्या उत्तर भागांत देखील म्हणजे छांदोग्य, बृहदारण्यक, कठ या जुन्यांत जुन्या उपनिषदांतहि या कल्पना परिपक्व अवस्थेंत दृग्गोचर होतात. कठोपनिषदांत नचिकेताची गोष्ट आहे (पृ.१७७ पाहा). हा नचिकेता मृत्यूच्या दरबारांत जातो तेथें मृत्यु त्याला असें सांगतो कीं, ज्यांचें पुण्य, स्वर्ग आणि अमरत्वप्राप्तीपुरतें नाहीं ते पुन: पुन: मृत्यूच्या कबजांत सांपडतात व संसारांत पुन: येतात. इहलोकीं ज्यांनां शरीर प्राप्त होतें किंवा ते एखादा अचेतन पदार्थ होऊन येतात. जो आत्म्याचें संयमन करतो तो विष्णूच्या अति उंच स्थानाप्रत पोंचतो. आपल्या कर्मानें जे अधम ठरतात त्यांच्याकरितां नरक असतो.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .