प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

यज्ञसंस्थांचे परिणाम.- भोंवतालच्या सामाजिक आयुष्यांतील ज्या विविध आणि परस्परांशी असंबद्ध अशा गोष्टी होत्या त्यांची यज्ञसंस्थांनी संगति लावली. उदाहरणार्थ :

(१) लोकांच्या गोत्रप्रवरांची यादी करणें आणि पैतृक परंपरेशीं संबंध राखणें. हें यज्ञानीं केले आणि त्यामुळें सत्रांचें विवेचन करतांना आश्वलायनाच्या श्रौतसूत्रांत गोत्रप्रवरांचें विवेचन करावें लागलें.
 
(२) नृत्य. हें अर्थात् लौकिकच पण तें श्रौतांत शिरलें तसेंच    

(३) संगीत. नृत्य व संगीत हीं महाव्रतांत दिसून येतातच.
 
(४) शिल्पकला ही यज्ञांत अनेक कारणामुळें येते तिचें सविस्तर विवेचन मागें केलेंच आहे.
 
(५) प्राणिशास्त्र हेंहि यज्ञांच्या अनुषंगाने वाढलें हें अश्वमेधाशीं संबद्ध अशा पशूंच्या यादीवरून दिसून येईलच.
 
(६) व्याख्याने.
 
(७) इतिहासपुराणें. यज्ञाच्या प्रसंगीं जी मंडळी जमत तेथें या प्रकारची बौद्धिक करमणूक असे असें अनेक पुराणांतील कथांच्या व उपनिषदांच्या प्रसंगावरून दिसून येईल.

(८) रानटी जातींच्या रीतीरिवाजांचा आर्यांच्या आयुष्यांत समावेश झाला असणें शक्य आहे. ''निषादस्थपतिं यजेत'' या विधिवाक्यावरून परकीय लोक आणि देश्य लोक यांचे धार्मिक एकीकरण होत होतें असें दिसते.
 
(९) जत्रा ह्याहि यज्ञप्रसंगानें उपस्थित झालेल्या दिसतात.
   
असंतुष्टांनीं यज्ञसंस्थेवर हल्ला केला, सात्वतप्रमुख भागवतांनीं भक्तिसंप्रदाय स्थापन केला आणि यज्ञावर कुरघोडी केली. यज्ञांतील मौज दुस-या सभारंभांनीं घेतलीं. यज्ञ शुष्क झाले. यज्ञाचे आज तागाईत अवशेष शोधावयाचे झाल्यास वर्गीकरण करावें लागेल तें असें कीं, गर्दी जुळविणारे मौजेचे प्रकार कोणीकडे गेले आणि यज्ञांचे विधि कोणीकडे गेले.
 
(१) बेचव यज्ञ, (२) यज्ञसंक्षेप उर्फ स्मार्त. हे एका बाजूचे अवशेष होत. दुस-या बाजूचे अवशेष म्हटले म्हणजे (१) बौद्धजैनादि संप्रदायांचे उत्सव, (२) शैववैष्णवादि संप्रदायांचे उत्सव, (३) मुसलमानी मोहरम, (४) व सध्यांच्या काँग्रेसच्या चळवळीसारखे प्रसंग होत.
 
यज्ञ सर्व व्यवहारांचा समुच्चय असल्यामुळें त्यांतुनच बराचसा व्यवहारधर्महि निघाला असणें शक्य आहे.
 
यज्ञ ही मोठी सर्वांचें उत्पन्न एकत्र करण्याची व सांघिक संपत्तीचा एकत्र उपभोग घेण्याची संस्था होती. यामुळें कांहीं सांघिक कल्पना व धर्म प्रसारांत आले.

यज्ञामुळें नवीन वसाहती स्थापन झाल्या. जंगलात जावयाचे तेथील भूमि नांगरावयाची, आणि तेथें हा मोठा उत्सव करून लोक आणावयाचे, आणि कांहीं तात्पुरती मोठी वस्ती उत्पन्न करावयाची; अशा आशेनें कीं, पुढें कायमची वस्ती उत्पन्न होईल.
 
वैश्यादि वर्गास यज्ञामुळेंच बरकत येणार. कारण माल खपण्याची यज्ञभूमि हें मोठें स्थान होतें. त्यामुळें वैश्याचे हितसंबंध यज्ञाशीं बांधले गेले.
 
''निषादस्थपतिं यजेत'' या विधिवाक्यामुळें कांहीं निषाद राजासहि आपलें राष्ट्र एकदम संस्कृत करण्यास तेथें नागरिक बोलावण्यास उत्तम निमित्त होते. त्यामुळें आर्य आणि अनार्य क्षत्रिय हे दोघेहि सद्दश झाले. निषादांचा नाश करून आर्यांचा विस्तार न करतां जंगली लोकांस क्षत्रिय करून विस्तार करतां येईल. या कल्पनेच्या प्रसारात वाव मिळाली. नवीन वसाहत करण्यास क्षत्रियांच्या अगोदर ब्राह्मणहि जात ही गोष्ट अगस्त्यादिकांच्या उदाहरणांवरून सिद्ध आहे.
 
अनेक राजे येथे जमावयाचे त्यामुळें अग्रपूजा कोणाची प्रथम स्थान कोंणाचे याचा संबंध येथेंच येतो. राजांचे तंटे येथंच व्हावयाचे आणि त्यामुळेंच सार्वराष्ट्रीय धर्मशास्त्र (इंटरन्याशल ला) येथेंच उत्पन्न झालें.
 
यज्ञ म्हणजे मनुष्य नसलेली व्यक्ति होय. ही अशी मोठी संस्था असल्यामुळे, संस्थानविषयक आणि संस्थाविषयक कायदे येथेंच निर्माण झाले. सर्व द्रव्य यजमान अर्पण होई पण यजमान तें वांटून टाकी. त्यामुळें द्रव्य संस्थेचें, त्यांतील निर्वाहापुरता खर्च यजमानानें घ्यावा, बाकी सर्व वांटून टाकावे, या कल्पना प्रथम येथेंच उद्भूत झाल्या.
 
यज्ञाचें एक कार्य समाजाच्या विस्ताराचें होतें त्यामुळे जेव्हां हिंदुस्थानांत वसाहत चोहोंकडे झाली तेव्हां यज्ञ संपुष्टांत येत चालले.
 
यज्ञ करणा-या लोकांमध्यें क्षत्रिय तसे ब्राह्मणहि आहेत. सर्वच यज्ञ  सनीहारार्जित द्रव्यावर होत असतील असें नाहीं. कांहीं यज्ञ ब्राह्मण स्वतःच्या पैशानें करीत असावेत. ब्राह्मणांच्या संपत्तीची कल्पना आपणास स्पष्ट असल्याशिवाय हें विधान पटणार नाही. वेदकालीन ब्राह्मण सुखवस्तु व क्षत्रियांपेक्षां  देखील बरे असावेत. ब-याचशा प्रसंगीं त्यांचें अग्रस्थान सर्व लोकांच्या मनावर स्पष्टपणें ठसेल असे प्रसंग यज्ञांमुळें वारंवार उत्पन्न होत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .