प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

यज्ञसंस्थेचें प्राचीनकाळीं राष्ट्रीय आयुष्यांत स्थान.- वैदिक राष्ट्रें लहान टोळयांसारखी होती. त्यांस एकत्र जोडणा-या संस्थेचा अभाव होता. ती उणीव यज्ञांनी भरून काढली. त्या काळच्या समाजाच्या चरित्रांत यज्ञप्राधान्य कोणत्याहि प्राचीन ग्रंथांत किंवा प्राचीनकालविषय 'इतिहास' ग्रंथांत दिसून येणार आहे. वैदिक वाङ्मयापैकी मंत्रवाङ्मय एका काळच्या सामान्य लेकांचेच वाङ्मय होतें. तशीच वेदिक भाषाहि सामान्य होती. यज्ञादि धर्म किंवा यज्ञविषयक मूलधर्म हाहि सामान्य होता. हवनाखेरीज इतर उपासनाप्रकार प्राचीनकालीं होते, ते श्रौतधर्मांत शिरले नाहींत पण नष्टहि झाले नाहींत. ते उत्तरकालीन वाङ्मयांत दिसतातच. वैदिक वाङ्मय व यज्ञसंस्था यांचे संवर्धन ब्राह्मणांनी यज्ञसंस्था वाढवून केले.

पुरूषसूक्तांत हविः, आज्य, इध्म, बर्हिःप्रोक्षण, संभार, पृषदाज्य, पशु इत्यादि यज्ञावयवांचा उल्लेख आहे. तसेंच ॠचांचा यजूंचा व सामांचा उल्लेख आहे. त्यांवरून असें दिसून येईल कीं, ॠग्वेदसंहिता यज्ञसंस्था बरीच प्रगल्भ झाल्यानंतर संपूर्ण झाली; आणि ॠग्वेदसंहिता तयार होत असतांच मंत्रांचें समुच्चयीकरण आणि कोणत्या ॠत्विजांकडून कोणते मंत्र म्हटले जातात तें पाहून त्याप्रमाणे वर्गीकरण बरेंचसें झालें होते. पुरूषसूक्तांत धर्म यज्ञांगानेच आहे हें तत्त्व ओळखलें गेले - (यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्). ॠग्वेदाचे मंत्र तयार होण्याचें कार्य संपूर्ण होण्यापूर्वी एक असा काल आला कीं, त्यांत घरोघरचें अग्निहोत्र किंवा साग्निक वैयक्तिक धर्माचरण कमी कमी होऊं लागलें, आणि यज्ञाची किल्ली अध्वर्यू व होते यांनी फिरवावी आणि लोकांनीं तमाशा पहावा म्हणजे धर्म झाला, या प्रकारची स्थिति उत्पन्न झालीं. यज्ञसंस्था ब-याच वाढल्यानंतर संहिता तयार झाल्या. अनेक यज्ञांच्या प्रसंगीं कांहीं प्रश्न उपस्थित होत. त्यांचा निर्णय होई व तो पुढें नियम बने. या प्रकारची क्रिया आपणांस ब्राह्मणांत दिसते. शिवाय कांहीं नवीन प्रघात कोणी सुरू केला तर त्याचें नांवहि यज्ञास चिकटे. या तर्हेनें कांहीं यज्ञसंस्था व यज्ञांगें व्यक्तींच्या नांवावर पडलीं आहेत.

उदाहरणार्थ कृष्णयजुर्वेदांत कोणत्या ॠषीच्या नांवावर कोणकोणते याग प्रचलित झाले याबद्दलचें टिपण येथें देतों.

ॠषी याग स्थल
अंगिरस द्विरात्र सं. ७-१-४
गर्ग त्रिरात्र सं. ७-१-७
अत्रि चतूरात्र सं. ७-१-८
जमदग्नि चतूरात्र सं. ७-१-९
उद्दालकपुत्र 'कुसुरूबिंद' सप्तरात्र सं. ७-२-२
बृहस्पति अष्टरात्र सं. ७-२-३
बृहस्पति चतुर्विंशतिरात्र सं. ७-४-१
वसिष्ठ एकोनपंचाशद्रात्र सं. ७-४-७
उदन्युपुत्र 'मुंडिभ' अश्वमेधानंतरच्या
अवभृथसंबंधी
होत्रापैकीं एका
मंत्राचा विनियोग
 ब्रा. ३-९-१५
 अरूणी व द्यांपातॠषीचा
पुत्र प्लश
 सावित्रचयन संबंधी

प्रश्नोतरें
 ब्रा. ३-१०-९
 गौतमगोत्री देवभाग
ॠषी
 सावित्राग्नीचा
साक्षात्कार
 ब्रा. १०-९
 वृष्णिपुत्र शूष  सावित्रोपदेश  ब्रा. ३-१०-१०
 भरद्वाज  सावित्रप्राप्ति  ब्रा. ३-१०-११
 नाचिकेता  नाचिकेतचयनाचा
प्रवर्तक
 ब्रा. ३-११-८
 वृष्णिपुत्र गोबल  नाचिकेताग्नीपैकीं
विशिष्टपद्धतीचा
पुरस्कर्ता
 ब्रा. ३-११-९
 शंड व मर्क  शुक्रामंथिग्रह ग्रहण
करण्याचा प्रचार
यांच्याकरितां पडला
 सं. ६-४-१०
 वसिष्ठ  स्तोमभागसंज्ञक
मंत्रसमुदायाचा
प्रवर्तक
 सं. ३-५-२
 अथर्वा  अग्निमंथनाचा प्रचार  सं. ३-५-११
 कण्व  सामगायक आचार्य  सं. ४-३-१३


ॠग्वेदमंत्राच्या आरंभी व मध्यकालीं, ब्राह्मण हा वर्ग पूर्णपणें निर्माण झाला नव्हता, तो ॠग्वेदमंत्ररचनेच्या अंतिम कालीं झाला.

ब्राह्मणांचें महत्त्व यज्ञांनीं वाढविलें, कां कीं, यज्ञकर्में करण्यास बरेच दिवसांची उमेदवारी लागे, व समाजांतील अनेक क्रिया मिळून होणारें कार्य यज्ञाशिवाय दुसरें नव्हतें. असलेंच तर राज्य हांकण्याचें.

ॠचांच्या संहिता बनविणें, त्यांचा अभ्यास करून वेदांगें काढणें, या क्रियांस कारक यज्ञसंस्थाच होय, दुसरें नाही.

ॠचांचा अभ्यास आणि वेदांगांचा पूर्व प्रयत्न हा ब्राह्मणांत आहे, आणि त्यामुळें, ब्राह्मणें हा प्रथमचा वेदाभ्यास होय.

अध्वर्यू म्हणजे यजुर्वेदी हे मुख्य लटपटे, कर्तृत्वान्, आणि ब्राह्मणांस पुढारीपण आणणारे होत, आणि यांनींच व्यवस्थापकत्व (आध्वर्यव) आपल्याकडे घेतलें. होता, सामक, ब्रह्मा इत्यादि मानाच्या जागा दुसऱ्यांकडे ठेवून किल्ल्या आपल्या हातीं ठेविल्या. भांडणे लागावयाचीं तीं म्यानेजरीकरितां. वसिष्ठ विश्वमित्राचें भांडण पौरोहित्याबद्दल. काहीं भांडणें यज्ञांतील स्थानाबद्दल. यजुर्वेदाच्या अनेक शाखा व अनेक सुत्रकार असण्याचें कारण हेंच कीं, त्यांच्यामध्यें यज्ञविषयक संस्थास्थापक निरनिराळे पुरूष उपजले. ॠग्वेद ही केवळ गाण्यांची संहिताच आहे. परंतु यजुर्वेद म्हणजे इतिकर्तव्यतांचा ग्रंथ आहे. इतिकर्तव्यता प्रयोगकृत्यांच्या वैविध्याप्रमाणें विविध असणार. एका नाटककंपनींतून भांडणें होऊन जशी दुसरी नाटककंपनी निघावयाची, त्याच क्रियेनें, शुक्ल व कृष्ण यजुर्वेदीयांचे मुळ भांडण झालें, आणि त्यामुळेंच यजुर्वेदांत एकाच मजकुराची पण भिन्न मांडणीची विविधता आली.

श्रुति यज्ञार्थच अवतरल्या असें प्राचीन पंडित म्हणत आहेत आणि तें खरें आहे. वेदांतर्गत सर्व काव्यें यज्ञाकरतां तयार झालीं असें नव्हे. तथापि यज्ञाकरतां गोळा करावीं लागलीं आणि त्यांचा विनियोग यज्ञाकरतां  गोळा करावी लागलीं आणि त्यांचा विनियोग यज्ञाकरतां झाला हें खास एवढें सत्य असतां श्रुति यज्ञार्थ अवतरल्या असें विधान केवळ स्वाभाविक गौरव होय. यज्ञविवेचकांस आपल्या धंद्यांच्या गौरवासाठीं तसें व्यावहारिक बोलणें बोलावें लागलें. संहिताकरणावर, म्हणजे मंत्राचीं जुडगीं बांधण्याच्या क्रियेंत यज्ञयोजकांच्या बोटांच्या रेषा स्पष्ट उमटल्या आहेत.

वेदांगें यज्ञसंस्था पूर्ण दशेला पावल्यानंतर निर्माण झालीं ती यज्ञसंस्थेनें, आयुष्याच्या तसेंच समाजाच्या विद्यासंचयाच्या कोणकोणत्या भागावर परिणाम घडविले त्यांची निदर्शक आहेत. प्रयोजनाशिवाय ज्ञानाची किंवा कशाचीच व्यवस्थित मांडणी अनवश्य आहे. यज्ञसंस्थेचा चढ, मध्य व उतार हीं ॠग्वेदांतील मंत्रांत दृष्ट होणाऱ्या संहिताकरणार्थ प्रयत्नाच्या कालापासून वेदांगकालपर्यंत दिसून येतात.

यज्ञसमारंभ सुरू कोण करितो, त्यास पैसा कसा आणितो, ॠत्विज गोळा कसे करितो इत्यादि इतिकर्तव्यता यजुर्वेदांत वर्णिल्या आहेत.

यजुर्वेदांत यज्ञसंस्था पूर्ण प्रगल्भ झालेली दृष्टीस पडते. तींतील यज्ञसंस्था पाहिली म्हणजे असें दिसतें कीं, यागांचे इष्टि, पशु, सोमयाग आणि चयन हे मुख्य सांच्यासारखे प्रकार असून इतर प्रकार थोडया बहुत फरकाने यांसारखेच आहेत.

यज्ञांत लौकिक भाग व उपासना यांचे मिश्रण आहे. लौकिक भागांचे पुढे ''विधि'' बनविले. यज्ञसंस्थेत उपासने खेरीज आलेल्या अवांतर गोष्टींमध्ये कांहीं मनोरंजनाच्या, कांहीं खाद्यपेयांच्या व पाकशास्त्राच्या, कांहीं रचनाप्रकारांच्या, कांहीं जत्रेच्या स्वरूपांच्या, काही स्त्रीविषयक-वेश्या पूसंली इत्यादिकांच्या आहेत. यज्ञासंबंधीची प्रेक्षक मंडळी, व त्यास दिलेलीं स्थानें यावरही ग्रंथांत विवेचन आहे. यज्ञांतील व्याख्यानें, वादविवाद इतिहासपुराणें हा पुढील संस्कृतीच्या संवर्धनास कारण झालेला भाग होय. समाजांतील निरनिराळे वर्ग आणि त्यांचा यज्ञांशीं संबंध हा एक मोठा महत्त्वाचा विषय होईल. यज्ञाविषयीं असंतुष्ट होणारा वर्ग त्या कालीं होता याला प्रमाणें यज्ञविषयक वाङ्मय वाचतांना वारंवार द्दष्टीस पडतात. (१) उपनिषदवाले, (२) क्षत्रिय, (३) आचरणाचें महत्त्व सांगणारे-बौद्ध जैनादि (४) भक्तिसंप्रदायी (५) इतिहास पुराणांचे भाट यांची विरूद्धता आपणांस परिचित आहेच, पण या वर्गाचें अस्तित्व मंत्रकालांतच दिसून येतें. जैमिनीचें मीमांसाशास्त्र यज्ञाच्या उतरत्या काळांतलें आहे. कां कीं त्याशिवाय इतक्या अट्टाहासानें यज्ञसिद्धि करण्याचें प्रयोजन नव्हतें. जैमिनी बऱ्याच अंशी यज्ञघातक आहे, कां कीं मीमांसेमुळे यज्ञ ही क्रिया स्वतंत्र राहिली नाहीं तर नियमांनीं जखडली गेली आणि यज्ञ म्हणजे, लोकप्रवृत्ति बदलेल त्याप्रमाणें जो समारंभ बदलत नाहीं असा समारंभ किंवा नाटक करण्याचा रिवाज स्थापन झाला.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .