प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

वैयक्तिक उपासनेचा संकोच, व श्रौताची वृद्धि.- वेदग्रंथांचे साहित्य जमा होण्यास आणि त्यांचें वर्गीकरण होण्यास यज्ञसंस्थेची वाढ व व्यवस्थितपणा हीं कारण झालीं. आणि यज्ञसंस्थेची वाढ होण्यास सामुच्चयिक कर्मांची वाढ कारण झाली. सामुच्चयिक कर्मांची वृद्धि तपासतांना साधारण पणें एक नियम आढळून येतो हा की, वैयक्तिक कर्में जशींजशीं कमी होत चाललीं तशींतशीं सामुच्चयिक कर्मे वाढत चाललीं. अग्निहोत्रहोम प्रत्येकाकडून होईनासा झाला तेव्हां त्याला अपूर्वता आली आणि अग्न्याधानाचा लांबलचक विधि आला. शिवाय कार्मांची सामान्यता जेव्हां कमी होत जाते आणि कित्येक विशिष्ट धंदेवाईक लोकांच्या हातांत तीं कर्मे जातात तेव्हां असा परिणाम होतो कीं, कर्मामध्ये ठाकठिकी येते, त्याचे नियम ठरतात; आणि या गोष्टी झाल्यामुळें सामान्य जन कर्मास अधिकाधिक पारखा होऊं लागतो. व्यक्तीच्या हातून पारमार्थिक कर्म होईनासें झालें म्हणजे प्रथम तें प्रतिनिधीच्या द्वारें होऊं लागतें. घरच्या देवांची पूजा   ब्राह्मणामार्फत करविणें हा प्रकार त्यांतलाच होय. प्रतिनिधीचा खर्च एकटयास सोसेनासा झाला म्हणजे जो तें कर्म करीत किंवा करवीत असेल त्यासच द्रव्यद्वारें मदत करावी आणि आपण तें कर्म चालले असतां घटकाभर जाऊन बसावें असा प्रकार सुरू होतो. श्रौतधर्मांचें एकंदर स्वरूप असें बनत चाललेलें दिसतें कीं, त्यांत व्यक्तिचें कर्तव्य थोडें होऊन धर्म सामुच्चयिक होत होते. या स्वरूपाची वाढ होण्यास कारण घरोघरचें अग्निकर्म सुटलें आणि तें सुटण्याचे मुख्य कारण उष्ण देशांतील अग्नीच्या जोपासनेची अस्वाभाविकता होय.

वेदकालांत आणि त्यानंतरच्या स्मृतिकालांत जी अग्निसान्निध्यानें उपासना द्दष्टीस पडते ती फारशी घरोघर असल्याचें दिसत नाहीं. अग्निसान्निध्यानें घरोघर प्रसंगीं संस्कार होत असतील, तथापि प्रत्येक घरीं अग्नीचें नित्य अस्तित्व केव्हांच गेल्याचें दिसून येत आहे. आपल्या पूर्वजांची वसती ज्या वेळेस हिंदुस्थानच्या सरहद्दीवर म्हणजे गांधारादि देशांत किंवा त्याहीपलीकडे कोठें तरी थंड ठिकाणीं होती तेव्हां अग्निसान्निध्यानें घरोघर कर्में होत असावींत. अग्नीची सेवा हा भारतांतील भूमीवर टिकणारा धर्म दिसत नाहीं. भारतांतील उष्ण हवेंत अग्नीवर इतकें प्रेम करण्याची आणि त्याचें सातत्य उपदेशिण्याची लौकिक आवश्यकता नाहीं. आजच्यापेक्षां प्राचीन काळची हवा अधिक थंड असेल असें म्हणता येत नाहीं. पंजाबसारख्या प्रदेशांत हिवाळयांत थंडी बरी पडते, तथापि उन्हाळे फारच उष्ण आहेत. एकंदरीत हवा व-हाडच्या हवेपेक्षां फारशी भिन्न दिसत नाही. अशा प्रदेशांत अग्नीचें कोडकौतुक करण्याची बुद्धि अस्वाभाविक होय. प्रत्येक घरांत अग्निहोत्रकर्म रहाणें कठिण होतें. उलट अग्निसाधन ही एक आनंदाची चीज न रहातां भविष्यत्कालीं ''पंचाग्निसाधन'' हे एक देहदंडनाचें तप समजलें गेलें. हिंदुस्थानच्या उष्ण हवेंत जो पांच अग्नींस जवळ करतो तो खरा तपस्वी आणि देहदंडन करणारा. अग्नीचा उपयोग तो आनंदाचें स्थान समजून न होतां देहदंडनाचें साधन म्हणून करण्यांत आला. आमची अशी समजूत होते कीं अग्नीच्या उपासनेचा वैयक्तिक पण सार्वत्रिक धर्म घरोघरच्या आचरणांतून ॠग्वेदमंत्रकालींच पार निघून गेला असावा. अग्नीचें पूजन हिंदुस्थानच्या भुमीवर रूजलेंच नाहीं. पारशांचें कर्म एकाग्नीवरील आहे. भारतीयांत जें त्रेताग्नीवर कर्म सुरू झालें तें समाजांतील कित्येक निवडक व्यक्तींच्या किंवा धंदेवाईक आर्त्विज्य करणारांच्या घरचें असावें. त्रेताग्नीवर कर्म करणारांमध्ये देखील अजस्त्रपक्ष आणि उद्धरणपक्ष म्हणजे नेहमी तीन अग्नी ठेवणारांचा आणि नेहमीं एकच अग्नि ठेवावयाचा आणि त्याचे वेळेवर तीन करावयाचे असें करणारांचा असे दोन पक्ष असल्यानें त्रेताग्नीच्या सार्वत्रिकतेविषयीं संशय उत्पन्न होतो.
 
यज्ञसंस्थेच्या इतिहासांत अग्न्याधान म्हणून जी एक संस्था आहे तिचें अस्तित्व वैयक्तिक उपासनालोपाचें निदर्शक आहे. सप्त हविःसंस्था म्हणून ज्या सात संस्था आहेत त्यांतील अग्न्याधान ही प्रथम संस्था धरली जाते. आज अग्निहोत्राचा स्वीकार करतात तो अग्न्याधानानंतर करावयाचा असा रिवाज  आहे. तथापि यज्ञांच्या वाढीच्या इतिहासांत असें दिसून येतें कीं, अग्न्याधानानंतर अग्नीहोत्र घ्यावयाचें हा प्रकारच नवीन आहे. विवाहानंतर खरोखर फार थोडक्या दिवसांत म्हणजे पंधरा दिवसांच्या आंतच अग्नीहोत्रस्वीकार आहे. तथापि अग्न्याधानाच्या प्रयोगांत हा भावी अग्नीहोत्री बेहेडयाच्या बियांनी आपल्या पुत्रांबरोबर एकीबेकीचा जुगार खेळतो असें दाखविलें आहे. म्हणजे अर्थात् तो त्या वेळेस म्हातारा नसला तरी ब-याच वयाचा असला पाहिजे हें उघड आहे. म्हणजे ज्या काळांत अग्नीहोत्र घेणें ही स्वाभाविक विवाहोत्तर क्रिया नाहीशी होऊन समाजांतील थोडके लोक आणि ते देखील आपल्या उतार वयांत अग्नीहोत्र घेऊं लागले अशा काळांत या संस्काराची स्थापना झाली हें उघड आहे. आणि अग्नीहोत्रस्वीकार ही गोष्ट याप्रमाणें जराशी अपूर्व झाल्यामुळेंच त्याच्या स्वीकाराचा विधि वाजत गाजत (विधीमध्यें घोडा वैगरे आणून) करण्याची प्रवृत्ति होणार. अग्न्याधान हा प्रयोगच अशा कालीं बसविला गेला कीं, त्या वेळेस दर्शपूर्णमासाचा प्रयोग तयार होता. अग्न्याधानाच्या मंत्रांत दर्शपूर्णमासाचें नांव आलें आहे आणि अग्न्याधानाची फलश्रुति दर्शपूर्णमास करण्याची संधि असें दाखविलें आहे. म्हणजे अग्न्याधान हा विधि ''दर्शपूर्णमास'' उत्पन्न (द्दष्ट) झाल्यानंतरच दृष्ट झाला.
 
अग्न्याधानाचें विधान प्रत्यक्ष यजुर्वेदांतच आहे त्यामुळें यजुर्वेदाच्या घटनेच्या कालीं अग्नीहोत्राचा स्वीकार कमीं होत होता आणि सोमहि दुर्मिळ झाला होता हे अन्यत्र दाखविलें आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .