प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

श्रुति व पुराणें यांचा संबंध.- वेदांच्या प्रत्येक संहितेमध्यें दुस-या संहितांच्या ज्ञानाची अपेक्षा ठेवलेली आहे त्या अर्थीं सर्व वेदांच्या संहिता जवळ जवळ एकाच कालीं झाल्या हें उघड आहे. तसेंच इतिहासपुराणांचा उल्लेख वेदांत आहे त्यामुळें संहितीकरणाच्या कालांत इतिहासपुराणें कोणत्या तरी स्वरूपांत होतीं. वेदकाल म्हणजे ॠग्वेदांतील अत्यंत जुन्या सूक्तांच्या कालापासून भारती युद्धाच्या कालापर्यंत पसरलेला अनिश्चित कालविभाग होय. या कालविभागाचें ऐतिहासिक ज्ञान मिळण्यासाठीं जें साहित्य उपलब्ध आहे त्याचे खालील वर्ग पाडतां येतील.

(१) वैदिक वाङमय.
(२) इतिहास आणि पुराणें.
(३) अर्वाचीन काळची माहिती.

वेद हे सर्व लोकांचें वाङमय नसून विशिष्ट देवतांनां आणि यज्ञांच्या विस्तृत स्वरूपाला महत्त्व देणा-यांचें वाङमय आहे. जी गोष्ट वेदोक्त नाहीं ती उत्तरकालीन ही विचारपद्धति या कारणामुळे उपयोगी पडण्याजोगी नाही. अर्वाचीन वाङमयांतच दिसणा-या किंवा वाङमयांत मुळींच द्दग्गोचर न झालेल्या ज्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यामध्यें द्दष्टीस पडतात त्या केवळ अर्वाचीन कालीं उत्पन्न झालेल्या असें खात्रीपूर्वक म्हणतां येणार नाही. वैदिक वाङमयाची तत्कालीन इतिहासाचें संपूर्ण ज्ञान देण्याची असमर्थता त्या वाङमयाच्या याज्ञिकी स्वरूपावरूनच ठरते. संपूर्ण इतिहासचित्र रेखाटावयास त्याच्या जोडीला इतिहास आणि पुराणें हीं घातलीं पाहिजेत. त्यांशिवाय मंत्ररचनाकालाचेंहि स्वरूप समजणार नाहीं.

वेद हें वाङमय सर्वजनव्यापी नाहीं तर समाजांतील एका विशिष्ट वर्गाचें आहे आणि तें यज्ञ करणारांनीं आपल्या धंद्याच्या साधनेसाठीं एकत्र जुळविलेलें आहे. ही एकत्र जुळणी करतांना त्यांनीं बरेंचसें जुनें वाङमय उपयोगांत आणलें, आणि त्यामुळें वाङमयास थोडी विविधताहि प्राप्त झाली आहे. ज्या गोष्टींचें बाहुल्य या वाङमयांत दिसतें त्यांचे सर्वव्यापित्व आणि ज्यांचा केवळ जातांजातां उल्लेख होतो अशांचा महत्त्वाभाव हीं आपण कल्पितां कामा नयेत. उपासनाविषयक बाबतींत तर अधिकच जागृत राहिलें पाहिजे. कां कीं, या बाबतींमध्ये दुस-याच्या कार्यक्षेत्रास गौणत्व देण्याची किंवा त्या क्षेत्रासंबंधानें मूकवृत्ति दाखविण्याची इच्छा यज्ञाच्या स्तोत्यांस किंवा प्रचारकांस अधिकच असावयाची. ज्या अनेक दैवतांचा अथर्ववेदांत उल्लेख येतो आणि जीं इतर वेदांतून मधूनमधून डोकावतात आणि जे उपासनेचे प्रकार यज्ञांगानें न दिसतां स्वतंत्र द्दष्टीस पडतात ते श्रौतसूत्रांतर्गत कल्पनेंत जरी यज्ञांगानें दाखविलेले असले तरी त्यांचें पृथक्त्व वेदांत अनेक ठिकाणीं दिसून येतें आणि यामुळें ज्या गोष्टी यज्ञांगानेंच केवळ द्दष्टीस पडतात त्या पृथक्पणें असणें इतर गोष्टींतहि शक्य आहे अशी कल्पना करण्यास अवकाश आहे.

वेदकालीन स्थितीचा इतिहास जुळविण्यासाठीं जें साहित्य आपणांस उपलब्ध आहे त्यांत इतिहासपुराणांतर्गत कथांचा उल्लेख प्रामुख्यानें केला पाहिजे. इतिहास व पुराणें हे बरेच उत्तरकालीन ग्रंथ होत. तथापि ते ग्रंथ ज्या व्यक्तींचा इतिहास देऊं पाहतात त्या व्यक्तींपैकीं अनेक व्यक्तींचा उल्लेख वेदांतच येतो; व प्रत्यक्ष इतिहास व पुराणें हे शब्द वैदिक वाङ्मयांत आहेत. ज्या वेळेस इकडे ब्राह्मणें तयार होत होतीं त्या वेळेस देशांतील अनेक राजांचीं व वीरपुरूषांचीं चरित्रें (कदाचित् निराळया वर्गाकडून) जमा होत होतीं असें दिसतें. आणि त्यांचें थोडेंबहुत संकलनहि ब-याच जुन्या कालीं झालें असावें. संहिता जितक्या लवकर बुकें बांधून पडल्या तितक्या लवकर इतिहास पुराणें ग्रंथबद्ध झालीं नाहींत, आणि असें होण्यास कारणहि होतें. श्रौतविषय अगोदरच अप्रिय होऊन बसला होता. त्यांत ढवळाढवळ करण्याची तरी फिकीर कोण करतो? परंतु पुराणांची गोष्ट तशी नव्हती. कवींस पुराणांतील कथा गावयाच्या होत्या आणि नवीन इतिहासहि आंत ढकलावयाची लोकांची इच्छा होती, आणि त्यामुळें जे संस्कार आजचीं जुडगीं बनण्यापूर्वी वेदास झाले तेच पुढें मोठया प्रमाणावर इतिहासपुराणांस झाले. वेदांच्या पवित्रत्वामुळें ते अक्षरभ्रष्टत्वापासून सुटले असें नाहीं. कां कीं, अक्षरभ्रंशाचीं उदाहरणें आपणांस जागोजाग दिसतात. ॠग्वेदांतील जे अनेक मंत्र अथर्ववेदांत दृग्गोचर होतात त्यांत आपणांस शब्दांचा फरक पुष्कळ दिसतो आणि तो सर्व बुद्धिपुरःसर म्हणजे कांहीं विशिष्ट गोष्टी साधण्यासाठीं केलेला द्दष्टीस पडतो. हे जे फरक द्दष्टीस पडतात त्यांचा हिशोब घेऊन पाहिंले तर त्यांच्या पाठीमागें पुष्कळ इतिहास लपलेला आपल्याला दिसेल. यजुर्वेदाच्या अनेक शाखांची तपासणी केल्यास आपणांस असें दिसून येईल कीं अर्धेच मंत्र घेणें,  एका मंत्रास दुस-या मंत्राचा तुकडा जोडणें, हरणीचा पाय कापून तेथें कुतरीचा पाय लावणें यांसारखे अनेक फरक केले आहेत. असें जर आपणांस दिसत आहे तर वेद हे अक्षरभ्रष्टतेपासून बरेचसे बचावले त्याचें कारण वेदां विषयीं भयमिश्रित पूज्यवुद्धि लोकांच्या मनांत वागत होती असें जें मानतात तें संभवनीय नाही. सामान्य लोक वेदांत फिरवाफिरव ती काय कारणार? व कशाकरितां? ॠग्वेदांतले जे मंत्र हौत्राकरितां म्हणावयाचे. त्या मंत्रांच्या मूळ अर्थाकडे लक्ष नसे. आध्वर्यव करतांना यजूंतील मंत्रार्थाकडे लक्ष नसे. याज्या आणि पुरोनुवाक्या अर्थापेक्षां ऐकण्याच्या तत्त्वावरच निवडलेल्या असत. मूळग्रंथामध्यें नवीन वाक्यें घुसडून देणा-या मनुष्यास वेदांचें अपौरूषेयत्व किंवा जैमिनीनें अकांड तांडव करून सिद्ध केलेली शब्दांची नित्यता खास आडवी येणार नाहीं. वेदांतील शब्दांत फिरवाफिरव करून सोय कोणाची होणार? फार तर यज्ञ करणा-या ॠत्विग्मंडळाची. ॠत्विग्मंडळास फिरवाफिरव करावयाची झाल्यास ब्राह्मणांतर्गत विधिवाक्यांची फिरवाफिरव करण्यांत फायदा होईल. मंत्रवाक्यांत फरवाफिरव करण्याची आवश्यकता काय? कुटण्यासाठीं जर कोंबडयाच्या स्तुतीचा मंत्र वापरतां येण्यास लोकांचें वेदभाषेविषयींचे अज्ञान मोकळीक करून देतें, म्हणजे वाटेल तो मंत्र व वाटेल ती क्रिया यांची सांगड जोडतां येते, तर मंत्रांत फेरबदल करण्याचे परिश्रम करण्याइतका महामूर्ख कोण आहे? याशिवाय यज्ञविषयक ज्या प्रयोगाच्या सोई करावयाच्या त्या सोई सूत्रकारांनींच करून दिल्या आणि त्या सोई प्रयोगग्रंथलेखकांनीं आणखी वाढविल्या, यामुळें वेदांची अक्षरें भ्रंशापासून बरीचशीं अलिप्त राहिलीं. इतिहास पुराणांची गोष्ट तशी नव्हती. आपणांस अनुकूल असा इतिहास मिळविण्यासाठीं इतिहासग्रंथांत फेरबदल करविण्याकडे मनुष्याची अधिक प्रवृत्ति होते. यामुळें इतिहास ग्रंथांत फेरबदल पुष्कळ झाले, आणि पुराणांस पुष्कळसा अर्वाचीनपणा आला. तथापि पुराणांचीं मुळें वेदकालापर्यंत जाऊन पोंचतात हें खास.

वैदिकवाङ्मयांत ज्यांचें अस्तित्वहि आढळून येत नाहीं, तथापि उत्तरकालीन वाङ्मयांत ज्यांचा विकास दृष्टीस पडतो अशीं कांही शक्य किंवा कल्पनानिर्मित विचारांगे भारतीय वाङ्मयांत दृष्टीस पडतात. उदाहरणार्थ जैनवाङ्मयास ज्या ज्या कारणांनीं विशिष्टत्व आलें तीं अंगें घ्या. जैन वाङ्मयामध्यें जे जे विचार दृष्टीस पडतात ते कांहीं अंशीं आरण्यकांतून दृष्टीस पडतात. शिवाय आरण्यकविचाराशीं सदृश असे विचार ब्राह्मणांत व मंत्रभागांतहि द्दष्टीस पडतात. याप्रमाणें जैन विचारांची परंपरा वेदांतील विचारांशीं जरी जुळली तरी जैनांच्या ज्या सृष्टिविषयक कल्पना आहेत त्यांची पूर्वपरंपरा वेदांत सांपडत नाहीं. जैनग्रंथांत विद्याधराचें बरेंच महत्व वर्णिलें जातें पण विद्याधरांचा मागमूस वेदांत बिलकूल नाहीं. यक्षकिन्नरांचा उल्लेख वेदांत क्वचितच दिसतो. जैनेतर वाङ्मयामध्यें विद्याधरकिन्नरांचें अस्तित्व नाहीं असें नाहीं. कथासरित्सागरामध्यें विद्याधरांचें अत्यंत प्रामुख्य वर्णिलें आहे आणि विद्याधरांचा राजा होणें हें ध्येय दाखविलें आहे. कथासरित्सागरामध्यें जैनांची निंदा करणा-या राजमंत्र्यास एका ठिकाणीं उपहासस्थान केलें आहे त्यावरून कथासरित्सागरास देखील जैननिर्मित ग्रंथ म्हणण्यास कोणी प्रवृत्त होईल; तथापि विद्याधरकिन्नरांचें अस्तित्व पुराणांतहि आहे. 'गन्धर्वस्य ध्रुवेपदे' इत्यादी तुटक वाक्यें व 'सोम गंधर्वाकडून आणला' इत्यादी तुटक कथा गंधर्वांचें अस्तित्व वेदवक्त्या ॠषींस मान्य होतें किंवा परिचित होतें असें भासवितात, तथापि त्यांस यज्ञसंस्थेच्या अभिमान्यांनीं हविर्भाग मिळूं दिला नाहीं. आयुष्यसूक्तांत 'वसून्रूद्रानादित्यान् मरूतोथ साघ्यान्ॠभून्यक्षान्गंधर्वाश्च पितृ श्च विश्वान् । तेभ्यो जुहोमि बहुधा घृतेन मानः प्रजा रीरिषो मोत वीरान् ॥ या मंत्राखेरीज गंधर्वांस हवी मिळूं देण्याचे प्रसंग यज्ञसंस्थेच्या अभिमान्यांनीं उद्भूत होऊं दिले नाहींत आणि हा मंत्र देखील तैत्तिरीयांनीं आपल्या संहितेंत शिरूं दिला नाहीं. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे कांहीं मोठया व लठ्ठ देवांनां मोठेपणा देऊन लहानसहान देवतांनां क्षुद्र करून टाकण्याकडे यज्ञसंस्थेच्या अभिमान्यांची प्रवृत्ति होती. उलट आरण्यककारांची व पुराणांची प्रवृत्ति कोणत्या तरी एका देवास किंवा तत्त्वास मोठेपणा देऊन मोठया देवांस हीनतेज करण्याकडे आणि सर्वच देवांनां थोडीबहुत मान्यता देण्याकडे होती. तथापि सर्वव्यापी एकेश्वरी कल्पना, बृहद्देवराज्यकल्पना आणि देवबाहुल्यकल्पना यांचींहि मुळें वेदकाळापर्यंत जातात हें खास. मंत्ररचनाकाल हा देवबाहुल्यकालाच्या क्षीणतेचा व बृहद्देवमहत्त्वाच्या प्रारंभाचा काल होय. यजूंचा उर्फ अध्वर्यूंचा काल हा बृहद्देवांच्या प्राधान्याचा काल होय आणि आरण्यकाचा काल हा एकेश्वरी कल्पनेच्या प्रारंभाचा व सर्व देवांस एकाच मापानें विकण्याचा काल होय.
 
हवन किंवा यज्ञ ही मनांत कल्पना आली म्हणजे कंटाळवाण्या विधींची, घरभर पसरलेल्या धुराची आणि अश्रुपात करणा-या यजमान व यजमानपत्नीची कल्पना मनांत येते, आणि असले यज्ञ पाहण्यासाठीं लोक चोहोंकडून जमत ते केवळ भिक्षुकी खटपटींने आणि मूढ भक्तीनें विचारशक्ति किंवा रसिकता नष्ट झालेले लोक होते कीं काय असा विचार मनांत येतो. सामान्यतः यज्ञांत ज्या दिवशीं पशुहनन असेल त्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी जमते तर रक्तपात पाहण्यासाठीं जनता सतृष्ण झाली होती कीं काय आणि तिला खूष करण्यासाठीं क्रौर्याशिवाय यज्ञसंस्थेपाशीं दुसरें कांहीं नव्हतें कीं काय असाहि विचार मनांत येतो; परंतु यज्ञसंस्थेच्या अनेक अंगांकडे लक्ष्य दिलें तर असें दिसून येईल कीं, बहुतेक सर्व इंद्रियें रिझविण्याचीं साधनें यज्ञसंस्थेंत होतीं. सोमरसाचे एकामागून एक चमस पिण्याचा हक्क जरी ॠत्विजांनी आपल्याकडेच ठेवला होता तरी सामान्य जनांस ओढतील अशा गोष्टी त्या संस्थेंत अनेक होत्या ही गोष्ट श्रौतवाङ्मय वाचूं लागलें असतां अधिकाधिक पटावयास लागते.
 
आज विसाव्या शतकांत असलेल्या आपणांस प्राचीन काळीं यज्ञयाग कसे चालत होते, त्यांच्या ठायीं श्रद्धा कशी रहात होती वगैरे गोष्टींबद्दल प्रथम विस्मय वाटतो. यूरोपीयांस तर याज्ञिक वाङ्मय म्हणजे एक पद्धतशीर अगडबंब मर्खूपणा वाटतो आणि या बेटया लबाड भिक्षुकांनीं लोकांच्या डोक्यावर काय लादलें हें त्यांनी पाहिलें म्हणजे सैतानाची वाईट पण महत्कृत्याबद्दल जशी तारीफ करावी तशी यज्ञकर्त्यांची तारीफ करावी असें देखील क्वचित्प्रसंगीं त्यांच्या मनांत येतें. श्रद्धेची जोड आज  निरर्थक वाटणा-या विधींना उत्पन्न कशी झाली हें कोडें उकललें पाहिजे. प्रस्तुत प्रश्नाविषयीं जिज्ञासा उत्पन्न झाली असतां खालील विचार मनांत येतात.
 
प्रथमतः, अग्नीबद्दल असलेली पूज्यबुद्धि आणि तो देवांचा दूत, पुरोहित, हव्यवाहक आहे या कल्पना द्दष्टीस पडतात, आणि जर देवांनां कांहीं पोंचवावयाचें असलें तर तें  अग्गीमार्फतच पोंचविलें पाहिजे हे लक्षांत आलें म्हणजे तें अग्नीसच समर्पण कां करावयाचें हें कळते.
 
शिवाय बळीची मुख्य कल्पना म्हणजे स्वर्गांतील देवतांस संतुष्ट करण्यासाठी आपलें सर्वस्व समर्पण करण्याऐवजीं दुस-या कोणास तरी पाठविणें. कर्मवादास म्हणजे जो करील तो भरील या कल्पनेस प्राधान्य उत्तरकालीं म्हणजे उपनिषदांत द्दष्टीस पडतें. त्याच्या अगोदरची लोकप्रिय कल्पना आपल्या ऐवजीं देवतांकडे प्रतिनिधि पाठविणें ही दिसते. ही कल्पना चोहोंकडे दृष्टीस पडते. ख्रिस्ती व ज्यू या दोघांसहि मान्य असलेल्या जुन्या करारांत अब्राहम हा प्रथम देवाला संतुष्ट करण्यासाठीं आपला मुलगा बळी देत होता. आणि पुढें त्यानें मेंढा बळी देऊन देवास तुष्ट केलें अशी कथा आहे. शुनःशेपाच्या आख्यानांत प्रतिनिधीची कल्पना आली आहे. ही कथा बरीच जुनी असावीं; कां कीं, शुनःशेपाचें सुक्त ॠग्वेदांत आहे. हरिश्चंद्र हा दाशरथी रामाचा बराच पिढयांपूर्वीचा पूर्वज होता  शुनःशेपाचा बळी वरूणास संतुष्ट करण्यासाठीं होता आणि वरूण ही फार जुनी आणि प्राचीन महत्त्वाची पण पुढें महत्त्व कमी झालेली देवता होती असें मानतात, या दोन गोष्टींवरूनहि शुनःशेपाचें आख्यान प्राचीन समजण्यास हरकत दिसत नाहीं.
 
यज्ञांतील पशु किंवा बलि हा प्रतिनिधीरूप असतो हें सिद्ध होतें. सोमयागामध्यें देखील सोम हा पुरूष आहे म्हणून कल्पना केली आहे. त्याला राजा म्हटलें आहे आणि पुढें जेव्हां ब्राह्मणांस क्षत्रिय राजापासून आपलें स्वातंत्र्य सिद्ध करावेसें वाटलें तेव्हां त्यांनीं आपला राजा सोम ठरविला.  
 
प्रतिनिधिकल्पनेच्या पुढची पायरी म्हणजे रूपकात्मक होय. यज्ञांत अनेक गौष्टी रूपकात्मक आहेत आणि यज्ञ सिद्ध करण्यासाठीं जी विचारपद्धति आली आहे ती देखील रूपकात्मकच आहे. दर्श-पूर्णमास म्हणून जी दर पंधरा दिवसांनीं इष्टि करावयाची असते ती रूपकात्मकच आहे. त्यांत नाद करून असुरांस पळवून लावणें, झाडणीच्या स्वरूपांत असलेल्या वेदानें वेदीरूप पृथ्वी झाडणें, इत्यादि गोष्टी आणल्या आहेत. वेदानें पृथ्वी झाडून निष्कंटक होत नाहीं म्हणून स्तंबयजुर्हरण म्हणजे यजुष्मंत्रांनीं गवताच्या ठोंबांच्या रूपांत असलेले राक्षस 'स्फ्य' च्या रूपांत असलेल्या इन्द्राच्या वज्रानें ठार मारणें इत्यादि विधी आहेत. जादूटोण्यामध्यें शत्रूचा प्रतिनिधी कांही तरी धरून त्या प्रतिनिधीचें हनन करावयाचें असतें. जो द्वेष 'इफिजी' म्हणजे पुतळा करून जळण्यांत द्दष्टीस पडतो तोच जादुगारींत विरूद्ध पक्षाच्या प्रतिनिधिरूप पदार्थावर मांत्रिक क्रिया करीत असला म्हणजे त्याच्या ठायीं ज्याच्या हितासाठीं क्रिया होत असेल त्यांचे चित्त अडकवितो. कै. महादेव मोरेश्वर कुंटे यांनी सोमयागाचें   पूर्णस्वरूप म्हणजे भारतीयांच्या स्थलांतरावर रूपक आहे असें एका परिशिष्टांत सोमयागाचें पृथक्करण करून दाखविलें आहे. असो.
 
यज्ञसंस्थेमध्यें सामान्य जनांवर छाप टाकणारे किंवा त्या संस्थेवर श्रद्धा उत्पन्न करणारे जे भाग होते त्यांचा विचार पुढें होईल.
 
अमानुष शक्तींशीं संबंध ठेवणारे, स्तोत्रें करणारे आणि यज्ञयाग व चेटुकें करणारे जे लोक होते त्या लोकांच्या चळवळी, आपआपसांतील भांडणें आणि स्पर्धेमुळे त्यांनीं उत्पन्न केलेले विधी व एकमेकांपासून एकमेकांनी घेतलेले विधी आणि वाङ्मय व वाङ्मयांत केलेले फेरफार या सर्वं गोष्टींचा परस्पर संबंध असून त्या सर्वांचा देशांत ब्राम्हणांस प्राप्त झालेल्या प्रामुख्याशी निकट संबंध आहे. भिक्षुकी चळवळ आणि भिक्षुकी भांडणे ज्यांस समजणार नाहींत त्यांस वेदांचे ऐतिहासिक स्वरूपच समजणार नाहीं आणि यज्ञविधींचें ब्राह्मणांतर्गत उपबृंहण आणि सूत्रकरांनीं हे विधी इतके लट्ठ बनले असतांना आणखी लट्ठ बनविण्याचा कां प्रयत्न केला याचें कोडें उकलावयाचें नाहीं . देशामध्यें ज्या स्पर्धांनीं वैदिक वाङ्मयावर आणि पुढे पौराणिक वाङ्मयावरहि परिणाम घडविला त्या स्पर्धांमध्यें ब्राह्मण व ब्राह्मणेतर (विशेषें करून क्षत्रिय) यांची स्पर्धा, राजपौरोहित्याबद्दल स्पर्धा आणि लोकांकडून वर्गणी ओढूं पाहणा-या स्वयंसिद्ध पुरोहितांची आपल्या वर्गांतच चाललेली स्पर्धा या सर्वांची प्रामुख्यानें गणना केली पाहिजे. ज्याप्रमाणें दोन मंत्र्यांच्या आपआपसांतील स्पर्धेमुळें सर्व राष्ट्रांच्या सौख्यासौख्यावर परिणाम घडतो त्याचप्रमाणे भिक्षुकी भांडणाच्या योगानें आणि भिक्षुकांच्या वर असलेल्या सामान्य जनांच्या श्रद्धेमुळें सर्व जनतेवर आणि कधीं कधीं अनेक राष्ट्रसमुच्चयांवर परिणाम घडतो. त्यांत हेच भिक्षुक ग्रंथकार आणि तत्त्ववेत्ते म्हणून पुढें आले म्हणजे ते आपल्या विचारपरंपरेचा छाप भविष्यकालीन वाङ्मयावर मारतात आणि सर्व संस्कृति त्या पूर्वींच्या तात्पुरत्या भिक्षुकी कारणामुळें उपस्थित झालेल्या भेदांनी व्याप्त होते. भिक्षुकी प्रयत्न एक तर लोकांस दुस-याकडे जाऊं न देतां आपल्याकडे ओढण्यासाठीं होतील किंवा दुस-याच्या चालू कार्यांतच आपलेहि हात धुवून घेतां येतील तर पहावें या इच्छेनें होतील. भिक्षुकांतील जीवनार्थ कलह या देन्ही अंगानीं द्दष्टीस पडतो व वाङ्मयावर परिणाम घडवितो. एकानें लोकांवर छाप ठेवण्यासाठीं अमुक प्रयत्न केला तर दुस-यासहि त्याच प्रकारचा प्रयत्न करावा लागतो. एकानें एखादा विधि निर्माण केला तर दुस-यास आपलें अस्तित्व त्याच्या चालू विधींत घुसडण्याची इच्छा उत्पन्न होते. कधी कधी एकानें एक प्रयत्न सुरू केला असला तर स्पर्धेचा संशय गि-हाइकांस उर्फ भाविक मंडळीस येऊं न देण्यासाठीं प्रतिपक्षाची किंवा त्याच्या प्रयत्नांची स्तुति करून आपला क्रयविक्रय अधिक महत्त्वाचा आहे असा बोध करण्याचाहि कांहीं चतुर योजकांकडून प्रयत्न होतो. वेळेस त्वयार्धं मयार्धं वृत्ति वापरावयाची, वेळेस दुस-याची नालस्ती करावयाची किंवा स्पर्धां करीत असलेल्या कर्माची तारीफ करावयाची पण कर्मकर्त्याची निंदा करावयाची, हे सर्व प्रकारचे प्रयत्न प्राचीन लोकसंग्रह करणा-या भिक्षुकांत दिसून येत असत.

सध्यां महाराष्ट्रांत किंवा हिंदुस्थानांत अथर्ववेद्यांचें अस्तित्व जवळ जवळ नष्ट झालें आहे असें म्हटले तरी चालेल. तथापि अथर्ववेद्यांनीं जे प्रकार पुढें आणले ते प्रकार मात्र नष्ट झाले नाहींत. अशिक्षित मांत्रिकांचा जादूटोणा, जादूटोण्यांतूनच बाहेर पडलेले बारीकसारीक संस्कार आणि जादूटोण्यांस श्रौतमंत्रांचा सोनेरी मुलामा चढवून बनलेलीं ॠग्विधानांतर्गत कर्मे, निरनिराळ्या प्रकारच्या शांत्या आणि संस्कारांबरोबर येणारे लौकिक आचार व जादूटोणा यशस्वी व्हावा आणि त्यावर विश्वास रहावा म्हणून त्याच्या अनुषंगानें आलेलें वैद्यक, अनेक प्रकारचीं शिल्पकर्में आणि फलज्योतिष, कौल, शकून यांवर भरंवसा आणि त्या भरंवशावर पोट भरणारे लोक या सर्वांचे अस्तित्व आहेच. शास्त्र खेरीज करून जो अथर्वमूलक भाग आहे त्याची आवश्यकता सध्यांचा मूठभर सुशिक्षितवर्ग वगळला तर इतरांस हजारों वर्षांपूर्वी जशी होती तशीच आहे.

अथर्वविज्ञानाचा इतिहास बराच मनोरंजक आहे. अथर्वे हे अत्यंत पुरातन भिक्षुक होत. इराणी लोक यांस ''अथ्रवन्'' म्हणत. मात्र यांच्या भिक्षुकीस व्यवस्थितपणा श्रौतवाङ्मयाचा आणि श्रौतकर्माचा पूर्ण विकास होण्यापूर्वी आला नव्हता असें दिसतें. यांचे मंत्र पाहिले तर ते भाषेवरून उत्तरकालीन दिसतात आणि तंत्रापेक्षां मंत्रांच्या शब्दांस गौरव प्राप्त झाल्यानंतर आणि तो गौरव त्रयीवाल्यांनीं उत्पन्न केल्यानंतर बनविलेले अगर जमा केलेले दिसतात. श्रौतकर्मवाल्यांस परंपरागत वाङ्मयाचा उपयोग करावयाचा होता आणि तो उपयोग करण्यासाठीं विधिबोधक ब्राम्हणें तयार झालीं. परंतु अथर्व्यांपुढें तो प्रश्न नव्हता. त्यांचें तंत्र तयारच होतें आणि त्या तंत्रात बसविण्यासाठीं मंत्रच तयार करावयाचे होते आणि आपल्या ग्राम्य दिसणा-या जादूटोण्यांस गौरव आणावयाचा होता. अर्थात् त्यांस ब्राह्मणग्रंथांची आवश्यकता नव्हती. मंत्र आणले पण समाजांत स्थान मिळविण्यासाठीं श्रौती मंडळींत त्यांस शिरकाव करून घ्यावयाचा होता. तो शिरकाव करून घेण्यासाठीं त्यांचे पुढचे प्रयत्न होते.

पुढे वाचा:श्रुति व पुराणें यांचा संबंध

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .