प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

वेदांचें संहितीकरणः- वेदांचा उपयोग ऐतिहासिक माहिती काढण्यासाठीं करावयाच्या पूर्वीं आपणांस ज्या अनेक गोष्टी विचारांत घेतल्या पाहिजेत. त्यांतील एक महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे मंत्रांचा कालनिश्चय करण्यापूर्वी संहितीकरणाचा कालनिश्चय केला पाहिजे ही होय. संहितीकरणानंतर मंत्ररचनांच्या पौर्वापर्याकडे धांव घेतां येईल. संहितीकरण ही उत्तरकालीन क्रिया होय. या क्रियेची व तिच्या अनुषंगानें होणा-या चळवळींची यथार्थ कल्पना आल्यास इतिहासांतील एक महत्त्वाचा धागा जोडतां आला असें होईल. संहितीकरणाचा विचार करतांना उपस्थित होणारे प्रश्न आणि त्यांस उत्तरें येणेंप्रमाणेः-

१. मंत्रांच्या संहिता कोणत्या प्रयोजनानें बनल्या ? याला उत्तर हेंच कीं, ऋत्तिवजांस आपला अभ्यासग्रंथ स्वतंत्र पाहिजेच असे यामुळें संहितीकरणार्थ प्रथम प्रयत्न झाला.
२. संहिता बनल्या त्यांत जीं अनेक सूक्तें आलीं आहेत तीं कवींनीं जशीं बनविलीं तशींच आज आपणांस उपलब्ध आहेत किंवा जुळवाजुळव करतांना निरनिराळ्या कवींनीं कदाचित् निरनिराळ्या कांळीं बनविलेल्या ऋचा पुढें दुस-या कोणींतरी एकत्र करुन सूक्तें तयार केलीं आहेत ? म्हणजे ज्याप्रमाणें अनेंक मंत्रद्रष्ट्यांची सुक्तें एकत्र होईन ऋग्वेदसंहिता बनली त्याप्रमाणें अनेक ठिकाणच्या ऋचा एकत्र करुन मंत्रद्रष्टयांनीं आपलीं सूक्तें बनविलीं आहेत काय ?  याला उत्तर हेंच कीं, जुना मंत्रसंग्रह नवीन याज्ञिक क्रियेसाठीं वापरला गेल्यामुळें नवीन कार्यासाठीं विकृत होण्याचा संभव आहे. तथापि ऋग्वेदांतील बरींचशीं सूक्तें मूळ कवींनीं केलीं तशींच उपलब्ध झालीं आहेत असा आज संशोधकांचा समज आहे. परंतु बरींचशीं सूक्तें अनेक ठिकाणच्या ऋचा एकत्र घेऊन केलीं असावींत. यजुर्वेदांतील यजु आणि मंत्र पहातां ते ज्या अर्थी विशेष प्रयोजनासाठीं लावावयाचे आहेत त्या अर्थी एकसारखी क्रमानें त्यांची रचना झाली आणि ती कायम राहिली हें शक्य नाहीं. अथर्ववेदांत (२० कांड पहा) तर ऋग्वेदांतील ऋचा हौत्रासाठीं निवडून त्या यज्ञांत म्हणण्याच्या क्रमानें लावल्या आहेत.

३. संहितीकरणाच्या काळीं अनेक काळच्या ऋचा एकत्र केल्या गेल्या असल्या तर आपणांस इतिहासज्ञान मिळविण्याच्या अभ्यासास कांहीं क्षेत्र आहे कीं नाहीं ? संहितेमध्यें ऋचांचा अगर सूक्तांचा कालनिर्णय करणें शक्य नाहीं अशा स्थितींत वेद हें साहित्य इतिहासकारास केवळ त्याज्य आहे काय ? त्याज्य नाहीं असें उत्तर या प्रश्नास देतां येईल. वेदांचा अभ्यास करतांना सूक्तांच्या कालभेदाकडे दुर्लक्ष करुन सर्व वेद म्हणजे एकच ग्रंथ धरुन आपणांस ऐतिहासिक अभ्यास कांहींसा करता येईल. जेथें वेदांतर्गत कालामध्येंच पौर्वापर्य पहावयाचें नाहीं पण केवळ संहितीकरणाचा काल ही ज्या युगाची अंतिम मर्यादा आहे त्या प्राचीन युगाची परिस्थिति स्थूलपणें पहावयाची आहे तेथें वेदांतील सूक्तांचा काल अनिश्चित आहे ही गोष्ट आडवी येणार नाहीं. या मर्यादेंत पाश्चात्यांनीं केलेला वेदाभ्यास उपयोगी आहे. परंतु ऋचांत व्यक्त होणा-या समाजस्थितींचें पौर्वापर्य मात्र लावतां येणार नाहीं. आज ऐतिहासिक पंडितांना वेदोक्तता याचा अर्थ संहितीकरणाच्या कालापूर्वीं अस्तित्व एवढाच आहे पण संहितीकरणाच्या कालाइतका पूर्वींचा इतिहास समजणें ही गोष्ट देखील लहान सहान नाहीं. कां कीं, संहितीकरणाचा काल सुदैवानें बराचसा निश्चित आहे.

संहितीकरणाच्या कालाचें आणि प्रयोजनाचें स्पष्टीकरण करण्यासाठीं मंत्र आणि ब्राह्मण यांचा परस्परसंबंध व्यक्त केला पाहिजे.

यूरोपीय संशोधकांनीं आणि विशेषेंकरुन वाङ्मयाच्या इतिहासलेखकांनीं उदाहरणार्थ विंटरनिट्झनें वाङ्मयाच्या घटनेसंबंधानें असें एक मत प्रतिपादिलें आहे कीं, संहिता उर्फ मंत्रभाग जवळजवळ संपूर्ण तयार झाल्यानंतर ब्राह्मणें तयार झालीं. मंत्रभागांतील मंत्रांचा जन्म ब्राह्मणांतील विधिवाक्यांच्या जन्मापूर्वींचा आहे हें स्थूलपणानें म्हणण्यास हरकत नाहीं. पण मंत्रभागाचें संहितीकरण झाल्यानंतर ब्राह्मणभागाचा जन्म झाला असेल असें संशोधकांचें मत असल्यास तें आम्हांस मान्य नाहीं. ब्राह्मणरचना आणि संहितीकरण या दोन्ही क्रिया समकालीन व अन्योन्याश्रयी आहेत असें आम्ही म्हणतों. तैत्तिरीय, कठ इत्यादि संहिता मंत्रब्राह्मणमिश्रित आहेत एवढेंच नव्हे तर तैत्तिरीय ब्राह्मणहि मंत्रमिश्रित आहे. ही केवळ बाह्य दृष्टि झाली. पण संहिता बनविण्याचें प्रयोजन लक्षांत घेतलें म्हणजे संहितेचीं व ब्राह्मणांचीं जुडगीं जवळजवळ एकाच काळांत तयार झालीं असें भासूं लागेल. पुष्कळ मंत्र ब्राह्मणकालीनहि असतील. मंत्र आणि ब्राह्मणें भिन्नकालीन आहेत हें सिद्ध करण्यास भाषा हें प्रमाण देखील आणतां येणार नाहीं. उत्तरकालीं देखील प्राचीन भाषेंत काव्य करतां येतें आणि जेव्हां उत्तरकालीन काव्यांत प्राचीन काळच्या काव्यांतील शब्द पुनरुक्त होतात तेव्हां तर भाषेचें प्रमाण दुर्बल ठरतें. आध्वर्यवास पोषक असा जेव्हां मंत्र असेल तेव्हां तो जुन्या भाषेंत मुद्दाम लिहिला जाण्याचा संभव असतो. यज्ञांनां उत्तान स्वरुपता येण्यापूर्वी कृष्णयजुर्वेदाच्या मंत्रांचा समुच्चय करण्याची क्रियाहि शक्य नाहीं. जेव्हां यज्ञसंस्था संपूर्ण तयार झाली तेव्हांच कृष्णयजुर्वेदाची संहिता बनली आहे. शुक्लयजुर्वेद तर त्या नंतरचा.

ज्या अर्थी वैदिक मंत्रांची मांडणी सहेतुक आहे, आणि ज्याअर्थी वेदांच्या ऋचांचा विनियोग ब्राह्मणांत केला आहे त्या अर्थी मंत्र आणि ब्राह्मणांतर्गत विधिवाक्यें यांचें पौर्वापर्य काळजीपूर्वक ठरविलें पाहिजे. सूक्तांचें अस्तित्व अगर त्यांचीं मांडणी सहेतुक आहे हे विधान सर्व वेदांस थोडयाबहुत अंशानें लागू पडणार आहे तथापि तें यजुर्वेदास विशेषेंकरुन लागू पडणार आहे. मंत्र आणि क्रिया यांचें नातें अध्वर्यूनें जितकें निकट ठेवलें पाहिजे तितकें होत्यानें ठेवण्याचें कारण नाहीं. होत्याच्या मंत्रांशी संलग्न अशीं विविध कार्ये यज्ञांत नाहींत. त्याला शंसन तेवढें करावयाचें. आप्रीसूक्तादि अण्वाद सोडले तर असें म्हणतां येईल कीं, होत्यानें अमुक मंत्रा ऐवजीं तमुक मंत्र म्हटला तर मोठें बिघडेल असें नाहीं पण अध्वर्यूची तशी गोष्ट नाहीं. त्याला विशिष्ट मंत्र म्हणावयाचा आणि विशिष्ट कृति त्यानंतर किंवा तो म्हणणें चालू असतां करावयाची. यामुळें अध्वर्यूचे मंत्र अधिक अनुरुप असावे लागतात आणि यामुळेंच ते मंत्र आणि कार्यबोधक विधिवाक्यें यांच्यामध्यें कालाचें अंतर फारसें नसणें शक्य आहे.

ब्राह्मणांतर्गत विधिवाक्य हें केवळ मंत्राचें विनियोगकारी नसून उत्पादकहि असण्याचा संभव आहे. मंत्र व ब्राह्मणें यांपैकीं काय जुनें असावें तें ठरविण्याचे स्थूल नियम येणेंप्रमाणेः -
(१) ब्राह्मणवाक्यांपैकी विधिवाक्यें मंत्रांपेक्षां जुनीं असणें शक्य आहे. कां कीं, कांहीं मंत्रांची उत्पत्ति ॠतु-प्रयोजनांमुळें झाली असेल आणि प्रयोजन म्हणजे विधिवाक्य अगोदर उत्पन्न झालें असेल.

(२) जेव्हां एखाद्या विधीशीं म्हणजे कृतीशीं जोडलेल्या मंत्राचा अर्थाअर्थीं संबंध नसेल तेव्हां मंत्रवाक्य प्राचीन व त्यामुळें अगोदर सोंवळें झालेलें असे असावयाचें आणि त्या मंत्राचा विनियोग करून घेण्याची जबाबदारी यज्ञयोजकांवर पडल्यामुळें त्यांनी त्या मंत्राची क्रियेशीं संगति जोडली असावी.

(३) मंत्र आणि प्रयोगांतर्गत क्रिया यांची संगति जितकी सुंदर व बेमालूम तितका तो मंत्र प्राचीनत्वाच्या बाबतींत संशयास्पद समजावा. तथापि सुंदर संगति हेंच अर्वाचीनत्वाचें चिन्ह समजूं नये.

या तत्त्वांनीं यजुर्वेदाचें परीक्षण केलें असतां मंत्रांच्या कालाविषयीं बरीच माहिती उपलब्ध होण्यासारखी आहे. व संहितीकरणाच्या क्रियेचीं बरीच रहस्यें बाहेर पडतील असें वाटतें. असो.

संहितीकरणाच्या इतिहासांत तीन काल अथवा प्रयत्न दिसतात. जेव्हां ॠत्विजांची कार्ये भिन्न होऊं लागलीं आणि प्रत्येकाची विद्याहि भिन्न झाली तो संहितीकरणाचा प्रथम काल अथवा प्रयत्न होय. आजच्या स्वरूपांत संहिता दिसतात त्याप्रमाणें जेव्हां प्रथम बनल्या तो तृतीय किंवा अंतिम काल अथवा प्रयत्न होय. याच्या अगोदरचा प्रयत्न म्हणजे संहितांच्या आजच्या स्वरूपांतील नवीन घातलेला भाग वगळला असतां संहितांचे जें स्वरूप होतें तें होय. प्रत्येक संहितेंतील व ब्राह्मणांतील नवीन भाग काढतां येतो. शुक्लयजुर्वेदांत पुरवण्यांसारखे जे भाग आहेत ते आणि शतथब्राह्मणांतील उत्तरकालीन भाग हे भारती युद्धानंतर कांहीं पिढया उलटून गेल्यानंतर जोडले गेले असावेत. तसेच अथर्ववेदाचें २० वें कांडहि बरेंच उत्तरकालीन असावें. ॠग्वेदांतील दाहावें मंडल उत्तरकालीन असावें इत्यादि शोध पूर्वींच्या संशोधकांनी केलेच आहेत. या प्रत्येक वेदास असलेल्या नवीन पुरवण्या सोडून दिल्या तरी प्रत्येक वेदाचें पृथक् अस्तित्व कल्पितां येतें. त्या स्थितींत जेव्हां वेद होते तेव्हां संहितीकरणाचा द्वितीय काल होता असें म्हटलें पाहिजे.

ज्या व्यासांनीं महाभारत तयार केलें त्याच व्यासांनीं म्हणजे कृष्णद्वैपायन उर्फ वेदव्यास यांनींच वेदांच्या संहिता बनविल्या अशी कल्पना पूर्वींच्या संस्कृत ग्रंथकारांच्या परंपरेंत अनेक प्रसंगी व्यक्त झाली आहे. व्यासांनीं संहिता बनविल्या असोत अगर नसोत, आपणांस आज हें स्पष्ट दिसत आहे की, कौरवपांडवांचें जें घोर युद्ध झालें त्या युद्धाच्या फार तर ५० वर्षे अगोदर किंवा नंतर या संहिता बनल्या असाव्यात म्हणजे ही मंत्रांचीं जुडगीं तयार झालीं असावींत. कदाचित् असें असेल की, यज्ञविस्ताराची आणि द्वितीय संहितीकरणाची चळवळ कुरूयुद्धापूर्वीं शेंपन्नास वर्षें सुरू झाली असून या युद्धानंतर एक दोन पिढयांत या संहिता बांधून पडल्या असाव्यात आणि ब्राह्मणेंहि त्याच सुमारास, तयार झालीं असावींत. भारती युद्धाचा काल कोणताहि असो, भारती युद्धापासून संहितीकरणाचा तृतीय कालहि फारसा दूर नाहीं.  संहितीकरण बरेंचसें व्यासांनीं करून त्यांच्या शिष्यांनीं पूर्ण केलें असणे शक्य आहे. संहितीकरणाच्या इतिहासांतील दुसरा प्रयत्न व्यासांचा असावा. प्रस्तुत विधानांस प्रमाणें येणेंप्रमाणेः-

(१) धार्तराष्ट्रांचा उल्लेख कठसंहितेंत येतो.

(२) परीक्षिताचा उल्लेख अथर्ववेदांत येतो.

(३) तैत्तिरीय संहिता करणारा तित्तिर हा वैशंपायनाच्या शिष्याचा शिष्य. वैशंपायन हा भारती युद्धाशीं समकालीन असून जनमेजयाशीं समकालीन होता.

(४) याज्ञवल्क्य हा शुक्ल्यजुर्वेदाचा म्हणजे वाजसनेयी या नांवानें प्रसिद्ध असलेल्या एका नवीन अध्वर्युसंप्रदायाचा उत्पादक असून हाहि जनमेजयाशीं संभाषण करतांना दाखविला आहे. हा वैशंपायनाचा शिष्य असून पूढें भांडून दूर झाला अशी आख्यायिका आहे.

(५) वैशंपायन हा पांडवांचा व कौरवांचा पितामह जो व्यास त्याचा शिष्य होता

(६) तैत्तिरीय संहिता, ब्राह्मण, आरण्यक हीं एकाच्याच हातचीं आहेत. कां कीं, त्यांचा एकमेकांशीं इतका निकट संबंध आहे. कीं, एक ग्रंथ लिहितांना दुस-या ग्रंथाची योजना मनांत असल्याशिवाय सांप्रत जशी रचना झाली आहे तशी रचना होणेंच शक्य नाही. ॠग्वेदाची ज्याप्रमाणे संहिता एकाची आणि ब्राह्मण भलत्याचें तशी गोष्ट तैत्तिरीय शाखेची नाहीं. वरील विवेचनारून असें सिद्ध होतें कीं, तैत्तिरीय संहिता, अथर्ववेदसंहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, कठसंहिता आणि वाजसनेय संहिता हीं जवळ जवळ एकाच वेळेस झालीं. काण्व व माध्यंदिन शाखा या वाजसनेय संहितेचेच भेद असल्यामुळें त्या त्याच सुमारास झाल्या.

पुढे वाचा:वेदांचें संहितीकरण

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .