प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.
 
देशपरत्वें शाखाविभाग व यज्ञकन्यासंबंधः- ‘भरतवर्ष’ या संज्ञेनें प्रसिद्ध असलेल्या भूप्रदेशाच्या मध्य भागांतून ‘नर्मदा’ नदी वहात असल्यामुळें तिला भरतवर्षाची मध्यरेषा म्हटलें आहे. या मध्यरेषेच्या दक्षिण व उत्तर बाजूस चतुर्वेदांच्या कोण कोणत्या शाखा विभागरुपानें अस्तित्वांत असलेल्या आढळतात हें सांगतों. मध्यरेषेच्या म्हणजे नर्मदानदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत यजुर्वेदाची आपस्तंबी, ऋग्वेदाची आश्वलायनी, सामवेदाची राणायनी व अथर्ववेदाची पैप्पलादी या चार शाखा अस्तित्वांत असून या चारी शाखांचें अध्ययन करणारे ब्राह्मण परस्परांत ऋत्विजांचीं कामें करतात व रोटीबेटीव्यवहारहि करतात. आपस्तंबी शाखा म्हणजे यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेवरील सूत्रभेदानें झालेल्या सहा शाखांपैकीं एक असून आश्वलायनी म्हणजे ऋग्वेदाची ‘शाकल’ या नांवानें प्रसिद्ध असलेली शाखा होय.

नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशांत शुक्लयजुर्वेदापैकीं माध्यंदिनी, ऋग्वेदाची शांखायनी, सामवेदाची कौथुमी आणि अथर्ववेदाची शौनकी या चार शाखा अस्तित्वांत असून या चार शाखांचें अध्ययन करणा-या ब्राह्मणांत परस्पर आर्त्विज्यसंबंध व रोटीबेटीव्यवहार होता. ऋग्वेदामध्यें बाष्कल म्हणून एक शाखाभेद असून या शाखेचें कल्पसूत्र शांखायन नांवानें प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच शांखायन सूत्रानुसारी ब्राह्मणसमाजास त्यांच्या सूत्रभेदावरुन शांखायनी शाखेचे ब्राह्मण म्हणतात.

तुंगभद्रा, कृष्णा व गोदा या नद्यांच्या सभोंवतालच्या म्हणजे सह्याद्रिपर्वतापासून आंध्र (तेलंग) देशापर्यंत विस्तारलेल्या प्रदेशांत, ज्या शाखेवर आश्वलायन सूत्र लिहिलें गेलें आहे अशी, ऋग्वेदाची शाकलशाखा अस्तित्वांत असून या ऋग्वेदीय शाखेचा ‘ऐतरेय’ म्हणून ब्राह्मणग्रंथ प्रसिद्ध आहे.

गुजराथ प्रांतापैकीं उत्तरेकडील भागांत बह्वृच म्हणजे ऋग्वेदाची शांखायनी किंवा बाष्कल नामक शाखा अस्तित्वांत असून या शाखेचा ‘कौषीतकी’ नांवानें प्रसिद्ध असलेला ब्राह्मणग्रंथ आहे.

गोदावरी नदींच्या दक्षिण दिशेस व आग्नेय दिशेस म्हणजे तैलंगणापासून समुद्रापर्यंत विस्तारलेल्या प्रदेशांत कृष्ण यजुर्वेदापैकीं तैत्तिरीय शाखेवर प्रसिद्ध असणा-या सहा सूत्रांपैकीं आपस्तंबसूत्रानुयायी लोकांची आपस्तंबी म्हणून प्रसिद्ध असलेली शाखा अस्तित्वांत आहे.

सह्याद्रिपर्वताच्या पायथ्यापासून नैर्ऋत्य दिशेस समुद्रापर्यंतच्या प्रदेशांत व परशुरामक्षेत्रासन्निध कृष्णयजुर्वेदावरील सूत्रभेदानें प्रसिद्ध असलेली हिरण्यकेशी नामक शाखा अस्तित्वांत आहे.

मयूरपर्वता (?) पासून गुजराथच्या सरहद्दीपर्यंत यजुर्वेदापैकीं मैत्रायणी नामक शाखा अस्तित्वांत असून तिचा फैलाव उपर्युक्त प्रांताच्या वायव्येकडील सरहद्दीपर्यंत झालेला आहे.

अंग (बिहार), बंग (बंगाल), कलिंग (ओरिसा), कानीन (?) व गुजराथेंतील पूर्वोक्त प्रदेशाखेरीजचा भाग या सर्व ठिकाणीं शुल्कयजुर्वेदाची ‘माध्यंदिन’ उर्फ ‘वाजसनेयी’ शाखा अस्तित्वांत आहे.

याज्ञवल्क्य ऋषीनें शुक्लयजुर्वेदापैकीं ‘काण्व’ नामक प्रथमशाखेचा विस्तार सर्व देशांत केला.

नर्मदेच्या उत्तर भागांत असलेल्या पूर्वोक्त ‘मध्यंदिनी’ ‘शांखायनी,’ ‘कौथुमी, ‘शौनकी’ व वर सांगितलेली ‘काण्व’ नामक शाखा या पांचहि शाखा ‘गौड’ या नांवानें ओळखल्या जाणा-या ब्राह्मणवर्गांत प्रचलित आहेत व नर्मदेच्या दक्षिण भागांत प्रचलित असणा-या पूर्वोक्त आपस्तंबी, आश्वलायनी, राणायनी, पैप्पलादी व मैत्रायणीनामक पांचहि शाखा ‘पंचद्राविड’ नांवानें प्रसिद्ध असलेल्या ब्राह्मणवर्गात प्रचलित आहेत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .