प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

श्रौतकर्मसंकोचानंतरच्या भिक्षुकी चळवळी.- श्रौतकर्म दिवसानुदिवस नष्ट होत चाललें तथापि लोकांचा जगांतील अमानुष शक्तींवर, मुहूर्तांवर, संस्कारांवर आणि वेदमंत्रांवर विश्वास नाहींसा झाला नव्हता. अथर्व्यांचे गृह्यकर्म पूर्वीपासून तसें चाललेंच होतें आणि यासाठीं त्यांचेच कर्म करून श्रौतकर्मोपजीवी लोकांस भाकरी मिळवावयाची होती. यज्ञ लोकांस अप्रिय झाले, आतां बेकार झालेल्या त्रैविद्यांनां अनेक निरनिराळ्या धंद्यांत शिरलें पाहिजेच, या प्रकारच्या परिस्थितीमुळें ब्राह्मणकुळांत जन्म झाला असून श्रौतकर्मांत नसलेला असाहि वर्ग वाढणें स्वाभाविक होतें. द्रोणाचार्यासारखे ब्राह्मण असल्या प्रकारचे वर्ग असल्याचीच साक्ष देतात. श्रौतकर्मज्ञांपासून उत्पन्न झालेला हा सुशिक्षित वर्ग सामान्यतः इतर लोकांपेक्षां अधिक संपन्न असावयाचा आणि परंपरागत वैदिक वाङ्मयाच्या अभिरूचीमुळें वैदिक कर्माचा अधिक आश्रयदाता बनावयाचा. या वर्गाच्या अस्तित्वामुळें इतर लोकांचें पौरोहित्य करून जें द्रव्यसाधन करावयाचें त्याच्या ऐवजीं भिक्षुकी पेषा न घेतलेल्या ब्राह्मणांचेंच पौरोहित्य करून त्यांच्यावरच अवलंबून राहण्याची प्रवृत्ति उत्तरकालीन भिक्षुकांत सुरू झाली असावी आणि त्यामुळें भिक्षुकवर्गास इतर जातींची अधिकाधिक घाण येऊं लागण्यास प्रारंभ झाला असावा. त्याबरोबरच ज्यांचे पूर्वज विशिष्ट वेदांचें किंवा विशिष्ट शाखांचें अध्ययन करणारे असतील त्यांस दुस-या शाखेच्या मनुष्याकडून किंवा दुस-या शाखेनें सांगितलेलीं कर्में तुम्ही करूं नका अशा तर्हेचा उपदेश स्वशाखीयांस करण्याची वृद्धि झाली असें दिसतें. पारस्कर म्हणतोः-'ब्रह्वल्पं वा स्वगृह्योक्तं यस्य यावत् प्रकीर्तितं । तस्य तावति शास्त्रार्थे कृते सर्वः कृतो भवेत्' अर्थात् त्रयीपैकीं प्रत्येक वेदास स्वतंत्रपणें अस्तित्वच नाहीं, आणि प्रत्येकाचें श्रौतकर्म दुस-याच्या आश्रयानेंच झालें पाहिजे, आणि कोणासहि ॠग्वेदी किंवा यजुर्वेदी म्हणण्यास त्यांचे नवीन चोरलेलें गृह्य कारण नसून इतर वेदावर अवलंबून असणारें श्रौतच कारण आहे, या ठळक गोष्टींची आठवण भिक्षुकी वृत्तीमुळें विसरणें भिक्षुकांस हितावह वाटलें. एका श्रौतधर्माचे तिन्ही वेदांचे अभ्यासक हे निरनिराळे अवयव होते ती स्थिती नाहींशी होऊन हे अभ्यासक जेव्हां एकमेकांस अनवश्य समजणारे बनले, तेव्हां ब्राह्मण जातींत विद्यामूलक असलेला परस्पराश्रय जाऊन पोटजाती पडण्यास सुरूवात झाली असावी. कालांतरानें गृह्यकर्ममूलक भेदहि विशिष्ट शिक्षणांच्या अभावानें नष्ट झाला, पण जातिभेद मात्र उरला. ही क्रिया कशी झाली याचें महाराष्ट्रापुरतें सविस्तर विवेचन केलेच आहे.

लोकांचें भिन्नत्व रक्षिण्यावर भिक्षुकांची मिळकत जेव्हां अवलंबून रहाणार तेव्हां त्या लोकांस भिन्न राखण्यासाठीं भिक्षुक खटपट करणारच.

यज्ञांतर्गत कार्याच्या भिन्नत्वामुळें उपस्थित झालेल्या समुच्चभिन्नत्वाचा फायदा घेऊन यज्ञक्रियेस अनवश्य असें आचारभिन्नत्व आणि शिक्षणभिन्नत्व उपस्थित करण्यांत आले. आचारभिन्नत्व स्थापन करण्याचा व तें रक्षिण्याचा जो प्रयत्न झाला, त्यांत आपणांस एक प्रकारची भिक्षुकी हुषारी दिसते. जगभर पसरलेल्या मनुष्यप्राण्याच्या समूहामध्यें आपणांस असें दिसून येईल कीं, कांहीं प्राणी विशिष्ट आचारामुळें, किंवा विशिष्ट दैवतामुळें किवां विशिष्ट शासनसंस्थेमुळें एकमेकांशी सदृश आणि इतरांपासून भिन्न झालेले असतात.

प्रत्यक्ष आचारविषयक विचारामुळे समाजांतील व्यक्तींमध्यें सादृश्य किंवा असादृश्य फारसें होत नसून पारमार्थिक विचारामुळे किंवा समाजांत जीं स्पर्धाविषयक ध्येयें पसरलेलीं असतात त्यांमुळे अनेक प्रकारचे निरनिराळ्या स्पर्ध्यमान समूहांस लागू पडणारे आचारनियम उत्पन्न होतात, आणि नियमांमुळे समाजांतील निरनिराळ्या लोकांमध्यें विविधता उत्पन्न होते. विशिष्ट आचार ज्या शासनसंस्थेमुळें उत्पन्न होतो ती संस्थाच कधीं कधीं लयास जाते आणि तिनें उत्पन्न केलेला आचार मात्र टिकतो व याप्रमाणें पूर्वीच्या शासनसंस्थेखालीं त्या शासनसंस्थेच्या जीवनार्थ असलेलें किंवा उत्पन्न केलेलें परंतु उत्तरकालीं कुचकामाचें व तापदायक होणारें आचार विशिष्टत्व जिवंत राहतें. ज्या संस्थेच्या जीवनार्थ जें आचार विशिष्टत्व असेल तें रक्षिण्यासाठीं त्या संस्थेच्या अनुयायी मंडळींत त्या विशिष्टत्वाबद्दल आदर, प्रेम व भीतियुक्त अवलंबन उत्पन्न करावें लागतें. लोकांस नियमाचा कार्याशीं असलेला अन्वय समजण्याची शक्ति नसल्यामुळें किंवा संस्थेच्या मंत्र्यांची स्वार्थबुद्धि लपविण्यासाठीं उपर्युक्त विशिष्ट नियमास केवळ धर्म म्हणूनच माना असा उपदेश होत असल्यामुळें संस्थेच्या किंवा चालकवर्गाच्या हितासाठीं उत्पन्न झालेल्या आचारासच सोंवळेपणा येऊं लागतो; आणि मग प्रयोजनापासून पृथक् झाल्यामुळें वेडगळ दिसणा-या आचारांचे समर्थन करणे कठिण होत जातें. श्रद्धायुक्त समाजांस त्या आचारांचें प्रयोजन व मार्मिकता दुस-यातिस-या कारणांमुळे सिद्ध करून देणारे तत्त्ववेत्तेहि उत्पन्न होतात. हिंदुस्थानांत सध्यां शास्त्रीय बाबतींत अज्ञान असल्यामुळें आणि विशेषेंकरून 'इलेक्ट्रिसिटि' सारख्या वस्तूंच्या गुणधर्माचेंहि अज्ञान असल्यामुळें  जुन्या चालत आलेल्या पुष्कळ आचारांची उपयुक्ता इलेक्ट्रिसिटिच्या साहाय्यानें सिद्ध करून देणा-या अत्यंत हुषार उपदेशकांचा उपदेश पुष्कळ महाराष्ट्रीयांनीं ऐकला असेल. असो. आचार प्रचारांत  असून त्यांचें प्रयोजन गेलें आहे अशा जुन्या आचारांस नव्या सृष्टींत स्थान देणारें सूत्रें व ॠग्विधान यांसारखे वाङ्मय श्रौतकर्म संपल्यानंतरच्या काळांत सपाटून झालें असून त्या प्रकारच्या प्रयत्नांची परंपरा विसाव्या शतकापर्यंत चालू आहे. असो.

श्रौतकर्म प्रथमतः जरी बरेंचसें स्वेच्छ होतें तरी त्यास कालांतरानें नियमबद्धता प्राप्त झाली. गृह्यकर्म होतें तेंहि हळुहळु नियमबद्ध होऊं लागलें. गृह्यकर्म नवीन होतें आणि श्रौतकर्म जुनें होतें असें नव्हे. गृह्यकर्म श्रौताहूनहि जुनें असावें. श्रौताऐवजीं गृह्यासच त्याच्या सार्वत्रिकतेमुळें नियमबद्धता अधिक अवश्य आहे. पण ती त्यास एकदम आली नाहीं, तर श्रौतधर्मांच्या विकासानंतर आली असावी.

श्रौतकर्म हें समाजास अवश्य असें कर्म दिसत नाहीं. ज्याप्रमाणें मनुष्यास कमी आवश्यक मालास विकण्यासाठीं जाहिरात मोठी करावी लागते, त्याप्रमाणें जनतेस कमी आवश्यक असा जो श्रौतधर्म त्याच्या आचरणासाठीं किंवा प्रचारासाठीं श्रौतधर्मांच्या अभिमान्यांस अधिक विद्वत्ता खर्च करणें भाग झालें.

श्रौतकर्माच्या सान्निध्यानें सामाजांत गृह्यकर्म असलेंच पाहिजे यांत शंका नाहीं. कोणताहि समाज लग्नाशिवाय किंवा मार्तिकाशिवाय कसा राहील? हीं कर्मे कशी करावी हें बोधण्याचें काम त्रयी मुळींच करीत नाहीं. त्रयी हें समाजास मधून मधून लागणा-या पक्वान्नांचें पाकशास्त्र होय; आणि गृह्यसूत्रें किंवा अथर्ववेद हें रोजचें नेहमींचें जेवण करण्याचें पाकशास्त्र होय. ज्याप्रमाणे पक्वान्नें करणारा वर्ग नेहमींचें जेवण करणा-या वर्गास हलका समजतो, त्याप्रमाणें त्रैविद्य अथर्व्यांस हलके समजत यांत नवल नाहीं. ज्या गोष्टी करण्यास कौशल्य बरेंच लागतें, पदार्थ अनेक लागतात आणि ज्या करण्याचें काम नित्य पडत नाहीं त्या करण्यासाठींच मोजमाप व विधिनियम हीं प्रथम उद्भवतात. तथापि मोजमाप करण्याची आणि ती क्रिया नियमबद्धतेनें करण्याची संवय लागली म्हणजे नियमबद्धता सामान्य व्यवहारांतहि येऊ पहाते. या कारणामुळें नित्य गृह्यकर्मास नियमबद्धता येण्यापूर्वींच जाडया यज्ञांस नियमबद्धता आली यांत नवल नाहीं.

गृह्यकर्मांमध्यें आचारभिन्नता जी शिरली तिच्या मुळाशीं केवळ आपल्या शाखेच्या लोकांची भिक्षुकी आपल्यामध्येंच रहावी हाच हेतु प्राधान्येंकरून होता असें सर्व आचार भिन्नतेसंबंधानें म्हणंता येणार नाहीं. कां कीं, मनुष्याच्या आचारास भिन्नत्व आणणा-या ज्या गोष्टी आहेत त्यांत कुलोपदिष्ट आचारच केवळ नाहीत. जनपदधर्म, देशधर्म, ग्रामधर्म, यांचेंहि अस्तित्व फार जुन्या काळापासूनचें आहे आणि यांची मान्यता आचारधर्म सांगणा-या ग्रंथकारांनीं केली आहे. लग्नाच्या वेळेस जनपदधर्म आणि ग्रामधर्म पाळावेत म्हणून आश्वलायन गृह्यसूत्र म्हणतें. पुष्कळदां असें दिसून येतें कीं, एका शाखेस न बोधिलेला आचार त्या शाखेच्या लोकांत प्रचारांत आहे तथापि तो आचार दुस-या कोणत्या तरी स्मृतींनीं स्मरला आहे. उदाहरणार्थ कळसवणी म्हणजे लग्नांत वधूवरांनां न्हाऊं घालतांना चारी कोंप-यांवर पूर्वीं मांडून ठेवलेले जलपूरित कलश (घडे) शेवटीं वधूवरांच्या मस्तकावर ओतावयाचे ही चाल घ्या. ही चाल आपस्तंब व गोभिल यांच्या गृह्यसूत्रांत उल्लेखिलेली आहे, तथापि ही चाल या शाखांच्या लोकांखेरीज इतरांच्या घरीं देखील दृष्टीस पडते, येवढेंच नव्हे तर महाराष्ट्रांत ही चाल जवळजवळ सार्वत्रिक आहे व कोणत्याहि सूत्राचा परिग्रह करण्याचें ज्यांस प्रयोजन नाहीं अशा शूद्रांत देखील ती आहे. विशिष्ट शाखेनें कर्माचा उपदेश करावा आणि चाल मात्र सार्वत्रिक असावी याची संगति दोन तर्हांनीं लागते. एकतर स्थानिक चाल ग्रंथकारांनीं आपल्या स्वशाखीय प्रयोगग्रंथांत घेतलीं असावी किंवा एका विशिष्ट सूत्राचें अवलंबन करणा-या संस्कर्त्यांचे म्हणजे भिक्षुकांचें प्रामुख्य विवक्षित ठिकाणीं झाल्यामुळें त्या चालीस तेथें सार्वत्रिकपणा आला असावा. स्थानाचा परिणाम ग्रंथांवर किती झाला आणि ग्रंथांचा परिणाम स्थानावर किती झाला हें ग्रंथांच्या वारंवार होणा-या बृंहणामुळें आणि मनुष्याच्या चालीरीतींत वारंवार फरक होत असल्यामुळें सांगतां येत नाहीं. ग्रंथाचें बृंहित स्वरूप आणि चालीरीतींची हल्लींची स्थिति हींच आपणांस आज दिसतात. ग्रंथाबाहेरील चाली लोकांत शिरतात यासहि कारण आहे. सामान्य लोक केवळ शास्त्रच पहात नाहींत, तर शास्त्र आणि रूढि या दोहोंसहि यथाशक्ति महत्त्व देतात.

शास्त्रें आणि रूढि यांची वारंवार एकमेकांशी विसंगतता दाखविण्यांत येते आणि यांच्यापैकीं अधिक बलवान् कोण, जनतेनें महत्त्व कशास द्यावें, याविषयींचे एकमेकांविरूद्ध विचार वारंवार दृष्टीस पडतात. ''शास्त्राद्रूढिर्बलीयसी' हें सत्य आहे म्हणजे शास्त्र किंवा परंपरागत उपदेश बाजूला ठेवून लोक रूढ असलेलींच कर्मे करितात आणि त्यामुळें रूढि बलवान् ठरते. बलवान् ठरते म्हणजे बलवान् असली पाहिजे व रूढीकडेच लक्ष द्यावें असें मात्र नाही. रूढीकडेच जर लक्ष द्यावयाचें तर ग्रंथ कशाला? वेदोक्तता कशाला? वेदांपासून तों आजकालच्या पुस्तकांपर्यंत सर्व तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथ जाळून टाकण्यास हरकत नाहीं, कारण रूढींच तेवढी पाळावयाची. धर्म, नीति इत्यादि तत्त्वज्ञानें, अर्थशास्त्रें व कर्मांच्या परिणामांवरून योग्यायोग्यता दाखविणारे इतिहास यांचाहि उपयोग नाहीं. मनुष्याच्या वुद्धीला शिरकूं द्यावयासहि सवड ठेवावयाची नाहीं असें रूढीसच आचारनिर्णायकता द्यावयाची असें ठरविल्यास करावें लागेल, कां कीं, बुद्धीचा उपयोग झाला कीं कालांतरानें शास्त्राचा जन्म झालाच. अर्थात् केवळ रूढींचे अवलंबन भयंकर आहे. रूढि बाळगावयाची म्हणजे चांगली कोणती व वाईट कोणती याचाहि विचार नको. जंगली लोकांनीं माणसें बळीं देण्याचें काम अव्याहत चालवावें आणि रजपुतांनी मुलींच्या हत्या होत्या तशाच चालू ठेवल्या पाहिजेत. अमुक चाली ठेवाव्या आणि अमुक बंद कराव्या असेंहि म्हणतां येणार नाहीं. कां कीं, तसें केलें म्हणजे शास्त्र उत्पन्न होऊं लागतें. यासाठीं रूढींचें उवलंबन करा हा उपदेश मनुष्यांस व्यवहारोपयोगी नाहीं. उलटपक्षीं रूढींची आणि त्यांच्या अवलंबनाची आवश्यकता आहेच. कां कीं, मनुष्याच्या इतिहासांत रूढी अधिक प्राचीन होत आणि वाङ्मय उत्तरकालीन होय. अडचण आली म्हणजे मनुष्य तोड काढतो. कार्य करावयाचें झालें म्हणजे त्याची पद्धति बसवितो. म्हणजे रूढी प्रथम उत्पन्न होतात आणि धर्मवाङ्मय नंतर उत्पन्न होते. प्रत्येक विषयावर धर्मविषयक वाङ्मय, कायद्यासंबंधांचे वाङ्मय, किंवा नीतिविषयक वाङ्मय असतेंच असें नाही. पण लोकरीति मात्र अनेक गोष्टीसंबंधाने निश्चित असते. जेव्हां लोकरीति ही धर्मशास्त्रपंडितांच्या, न्यायाधीशांच्या किंवा नीतिवेत्त्यांच्या अवलोकनाचा विषय होते तेव्हा लोकरीतीस धर्मनियमाचें, कायद्याचें किंवा नितिनियमाचें स्वरूप येतें. व्यवहारामध्यें पुष्कळदां ग्रांथिक वचनापेक्षां लोकरीतीच अधिक उपयोगीं पडते. ग्रांथिक नियम व्यवहारास अपूर्ण आहेत एवढेंच नव्हे तर तेहि लोकरीतीचें अनुकरण करणारे आहेत. ते अधिक जुन्या काळीं परिचित असलेल्या लोक रीतीवरूनच निघालेले असतात. लोकरीती प्रसंगाच्या वौविध्यामुळें अधिक विविध असते. जेव्हां आचारनियम कोर्टांत झालेल्या निवाडयांवरून निघूं लागले तेव्हां लोकरीतीस कायद्याचे स्वरूप येऊ लागेल. जेव्हा धर्मशास्त्रकार लौकिक विधिसंस्कार चालू असतां निरनिराळ्या लोकविधींशीं परिचित झाले तेव्हां त्यांपैकी कांहींस मान्यता देऊं लागले. लौकिकविधीस ग्रांथिक वाक्यांनीं मान्यता देण्याचा काल म्हणजे गृह्यसूत्रांचा काल होय. या काळांत त्रैविद्यांनीं श्रौतसूत्रें व गृह्यसूत्रें तयार करून अथर्ववेद्यांचा पूर्णपणें पाडाव केला. ग्रंथरचना करतांना प्राचीन धर्मांचा म्हणजे विधिनिषेधांचा त्रैविद्यांनीं हिशोब घेऊन जें ठेवावेंसें वाटलें तें ठेवले आणि बाकीच्या जुन्या धर्मांस म्हणजे रीतींस रजा दिली. या काळामध्यें जे ग्रंथ झाले त्यांचें अवलोकन करितां ब्राह्मणांच्या सच्छील वर्तनाबद्दल व अज्ञानाचा घात व्हावा या व्यक्त होणा-या इच्छेबद्दल आणि दयालुत्वाबद्दल तारीफ केल्यावांचून राहवत नाहीं. भिक्षुकी चालावी ह्या इच्छेखालीं देखील वरील तीन गुण दडपले गेले नाहींत. लोकांच्या चाली जंगली असतील तशाच ठेवणें, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जादूटोणा करणें, इत्यादि गोष्टी अथर्वमूलक असतां ही गृह्यसूत्रें बनण्याच्या वेळेस ब्राह्मणांनीं त्या आंत शिरकूं दिल्या नाहींत, अथर्वांत सतीचे, जारणमारणाचे, बायका फसविण्याचे, मंत्र आहेत पण त्यांस गृह्यसूत्रांत स्थान मिळालें नाहीं. उलटपक्षीं पुष्कळ लौकिक विधी गृह्यसूत्रांत समाविष्ट केले आहेत. सोळा संस्कारांतील गर्भाधान, पुंसवन व सीमंतोन्नयन, हे संस्कार जरी जादूटोण्यासारखे म्हणजे समाजास अनवश्यक दिसतात तरी ते निरूपद्रवी आहेत आणि त्या कालीं लेकांस उत्सवाचे प्रसंग घरांत अधिकाधिक हवे असल्यास त्यांस संधि देणारे आहेत.

सूत्रकालीन परिस्थितीचें स्वरूप व्यक्त करण्यासाठीं आश्वलायन गृह्यसूत्रावर कांहीं तुटक विचार येथें देतों आश्वलायन गृह्यसूत्रामध्यें जो मजकूर आला आहे त्याचें पृथक्करण करतां आपणांस खालील घटक आढळून येतात.

(१) पाकसंस्था.
(२) संस्कार.
(३) व्यावहारिक ज्ञान व उपदेश.
(४) काम्येष्टींचे संक्षेप.
(५) बलि.
(६) ब्राह्मणभोजन, आतिथ्य इत्यादि.

पैराणिक धर्माची छटा आश्वलायन गृह्यसूत्रांतील खालील उपदेशांत पुष्कळच दिसून येते.

(१) जनपदधर्म आणि ग्रामधर्म यांचें विवाहांत अवलंबन करावें. १.७.१.

(२) ॠग्वेदांचें अध्ययन केलें असतां दुधाच्या नद्या, यजुर्वेदाचें अध्ययन केलें असतां तुपाच्या नद्या, सामाचें अध्ययन केलें असता सोमरसाच्या नद्या व ब्राह्मणें, सूत्रें, गाथा, नाराशंसी, इतिहास-पुराणें यांचें अध्ययन केलें असतां अमृताच्या नद्या अध्ययनकर्त्यांच्या पितरांस प्राप्त होतात. (३.३.३.)

या विधानांत स्वर्गाची मधुभौतिक कल्पना आणि इतिहास पुराणांच्या अभ्यासास वेदाध्ययनापेक्षां दिलेले महत्त्व या गोष्टीं लक्षांत ठेवण्याजोग्या आहेत.

जनपदधर्म आणि ग्रामधर्म यांचे अवलंबन म्हणजे कांहीं स्थानिक दैवतें किंवा थोर पुरूष यांचे उत्सव किंवा पूजन असावें. स्थानिक दैवतें आलीं याचा अर्थ मुर्तिपूजा आली. तथापि जनपदधर्म आणि ग्रामधर्म यांचा अर्थ गांवांतील चाली व रिवाज असाहि होईल आणि यासाठीं जागेस चिकटलेलीं दैवते होतीं असे विधान करण्यास आणखी पुरावा आणला पाहिजे.

प्रस्तुत सूत्रांत ''चैत्ययज्ञ'' या विषयावर तीन सूत्रें (१.१२) लिहिलीं आहेत. तीं स्थानिक दैवतांचीं उत्पत्ति दाखवितात.

यज्ञार्थ पशुहननाविषयींची जुगुप्सा केवळ स्मार्तधार्मांतच आहे असें नाहीं. श्रौतधार्मांतहि पशुहत्येपासून निवृत्ति व्हावी असा भाव दृष्टीस पडतो.  उदाहरणार्थ, दर्श-पूर्णमास ही इष्टीची प्रकृति म्हणजे नमुना आहे. ऐंद्राग्न ही पशुयागाची प्रकृति आहे. इष्टींमध्ये पशुहनन नाहीं. तसेच अग्न्याधानांत देखिल पशुयज्ञ नाहीं. तथापि या दोहोंतहि पशुहोमाचे अवशेष शिल्लक राहिले आहेत. अग्न्याधानांतील पुरोडाश हा गाईच्या आकाराचा बनवावयाचा असतो आणि त्यावेळेस म्हणावयाचे जे मंत्र आहेत ते देखील गोविषयकच आहेत. दर्शपूर्णमासामध्यें पुरोडाश कूर्माकृति करावा लागतो. तथापि पुरोडाश कूर्माकृति करण्याचें कारण असें आहे की, तो अभंग राहिला पाहिजे. जेव्हां प्रतिकृति उपयोगांत आली नसून मूळची कल्पना वहिवाटींत असेल त्या वेळेस कूर्माचा याग न होतां दुसरा एक मोठा पशु हुत होत असावा याची सूचकें त्या विधींत आहेत. प्रतिकृति ज्याची होते तो प्राणी प्रथम हुत होत असावा आणि प्राण्याऐवजीं पुढें त्याची पिष्टमय प्रतिकृति येत असावी, हा साधारणपणें नियम समजावा. तथापि या नियमास देखील कांही अपवाद आहेत. अग्निष्टोम यागांतील प्रवर्ग्यांत मडक्यांच्या उतरंडीच्या आकाराचा 'महावीर' असतो. हा पुढें छिन्नभिन्न करावा आणि नंतर सोमपान करावें असा इतिकर्तव्यतांचा गोषवारा आहे. महावीर यजमानाचेंच रूपक होय. अर्थात् प्रत्यक्ष यजमानाचाच होम अशक्य आहे म्हणून होमांत ज्याची प्रतिकृति होते तो मूळचें होमद्रव्य होय या नियमास कांहीं मर्यादा उत्पन्न होते.

पशुहनन आणि यज्ञ यांचा निकट संबंध आहे असें नाहीं. ज्या वेळेस पशुयाग प्रचारांत होता त्या वेळेस इष्टी पशुहोमाशिवाय होत असत. शिवाय पशुहनन केवळ यज्ञांगानेंच होत असे असेंहि नाही. जें लोकांचे भक्ष्य तेंच देवास द्यावयाचें किंवा अग्नीस समर्पण करावयाचें. पशुहनन यज्ञाखेरीज इतर प्रसंगीहि होत असे उदाहरनें गृह्यसूत्रांत आहेत.

मधुपर्क मांसाखेरीज होत नाहीं हें तत्त्व आश्वलायन गृह्यसूत्रांत व त्याप्रमाणेंच कांही धर्मसूत्रांतहि व्यक्त केलें गेलें आहे. त्या प्रसंगीं असें सांगितले आहे की, मधुपर्कासाठीं गाईचा मेध करावा आणि गाईचा मेध जर करावयाचा नसेल तर गाय सोडून द्यावी आणि दुसरें कसलें तरी मांस ॠत्विजांस अगर स्नातकास मधुपर्कप्रसंगीं द्यावें. गोमेधासंबंधानें प्रश्न शतपथब्राह्मणकालीं देखील निघाला आणि तेथें यज्ञवक्ल्यानें तें चांगलें लागतें म्हणून मी खातों असें उत्तर देऊन आपला दांडूपणा व्यक्त केला आहे.

गोमेध ज्याप्रमाणें मधुपर्कप्रसंगी (आ.सू.अ.१ खं.२४) कर्तव्य केलें आहे त्याप्रमाणें अग्निहोत्र्याच्या और्ध्वदेहिकाच्या प्रसंगीहिं तें कर्तव्य केलें आहे. (आ.सू.अ.४खं.२.) अनुस्तरणी करावी म्हणून विधि आहे. अनुस्तरणी म्हणजे ज्या स्त्रीपशूनें प्रेताचें आच्छादन करितात तो पशु. अनुस्तरणी करावयाचा विधि म्हणजे गाईस किंवा शेळीस विदारण करून तिचे अवयव प्रेताच्या अवयवांवर ठेंवणें. गाय किंवा शेळी यांची अनुस्तरणी करणें वेकल्पिक आहे म्हणून पुढील वृत्तिकार अर्थ काढीत आहेत. मृताच्या पत्नीस प्रेताजवळ नेऊन निजवावयाचें आणि मग दिरानें किंवा दासाने तिला उठवावयाचें हा विधि झाल्यानंतर अनुस्तरणी करण्याचा विधि आहे. यावरून अनुस्तरणी देखील स्त्रीच्या प्रतिनिधिरूप असावी असा संशय उत्पन्न होतो.

श्रोतधर्म आणि स्मार्तधर्म यांमध्यें जे अनेक फरक आढळून येतात त्यांचें सकल्यानें पण संक्षिप्त वर्णन करावयाचें झाल्यास थोडक्यांत असें सांगतां येईल कीं, यज्ञजुगुप्सा उत्पन्न होऊन यज्ञसंकोच झाला व यज्ञेतर कर्मांनां मान्यता प्राप्त होऊन भक्तितत्त्वाचा व मूर्त दैवतांचा उदय झाला आणि परंपरेच्या प्रचारांनी पवित्र झालेला शब्द जो यज्ञ तो इतर प्रकारच्या   परमार्थोद्यमांस लागला.

पशुयज्ञांविषयींची जुगुप्सा सामान्यजनांत पुष्कळच उत्पन्न झाली होती. वेदानुयायी व यज्ञकर्माचा पुरस्कार करणा-यांसहि थोडीबहुत जुगुप्सा उत्पन्न झाली होती याला अनेक प्रमाणें आहेत. जेव्हां धर्माचरण चोरून करावें लागतें तेव्हां असें समजावें कीं, तेथें धर्म जनतेस अप्रिय आहेत. शूलगवाचा म्हणजे बैल मारण्याचा जो विधि आश्वलायन सूत्रांत (४.९) सांगितला आहे त्यांत तो ''असंदर्शने ग्रामात्'' म्हणजे जेथून गांव दिसत नाहीं किंवा गांवातील लोकांनां आपण दिसत नाहीं अक्षा स्थळीं जाऊन करण्यास सांगितला आहे.

पितृमूलक धर्मांचा पुरस्कार करणारांमध्येंच पशुहननासंबंधानें आणि विशेषेंकरून गाईचा वध करावा आणि तिचे मांस खावें या कर्तव्यासंबंधानें प्रतिकूल मत उत्पन्न होऊं लागलें होतें असें यावरून दिसते.

आश्वलायन गृह्यसूत्रांत गोमांसाच्या मधुपर्काचा, अनुस्तरणी म्हणून गाईचें विदारण करण्याचा किंवा शूलगवाचा केलेला उपदेश हें गृह्यसूत्र ज्या कालांत लिहिलें गेलें त्या कालापेक्षां बराच जुना असावा असें दिसतें. प्रस्तुत सूत्राच्याच कालांतील गोवधाविषयींचे उल्लेख त्याकाळीं गोवधाविषयीं प्रतिकूल मत होत असावें असें दाखवितात. लोकमताची प्रतिकूलता शुलगव गांवाबाहेर करावा या आदेशावरून स्पष्ट होत आहे. आणि पुत्रादिकांस बरोबर घेण्यासंबंधाचा निषेध या सूत्रकारानेंच केलेला आहे. शिवाय गोमांसाहारासंबंधानें प्रतिकूल मत उद्भवूं लागलें होतें असें दिसतें. शूलगवांत बैलाचा वध जरी केला तरी त्याचा हुतशेष खावा (४.९.३५) या मताबरोबरच खाऊं नये(४.९.३२) असेंहि विधान केलें आहे. त्याप्रमाणेंच स्नातकास अगर ॠत्विजांस करावयाच्या मधुपर्कासंबंधानें जें गोहनन करावें लागे त्याऐवजीं गाईचा उत्सर्ग करून दुसरें कसलें तरी मांस भोजनास द्यावे अशी देखील अनुज्ञा दिली आहे (२.२४.२५) तसेंच अनुस्तरणी म्हणून गाय मारण्याऐवजीं अजा मारावीं (४.२.६.) किंवा अनुस्तरणी करण्यामध्यें देखील विकल्प आहे (४.३.२३) अशी कल्पना मांडली आहे.

प्रतिमापूजनाचा आरंभ या गृह्यसूत्रांत थोडाबहुत दिसतो. पहिल्या सूत्रांत चैत्याला बलि द्यावयाचा तो स्विष्टकृत् नांवाच्या आहुती देण्यापूर्वीं द्यावा असें सांगितलें आहे. दुस-या व तिस-या सूत्रांत जर चैत्य विदेशीं असेल तर तो बलि कसा पाठवावा हें सांगितलें आहे. दूतानें पळसाची कावड घ्यावी, यत्र बेत्थ. (३.८.२१) ही ॠचा म्हणावी व दोन बली करून त्या कावडींत ठेवून दूतास ती कावड द्यावी आणि सांगावें कीं, हा बलि त्याला (चैत्याला) दे आणि हा बलि तूं घे. या दूताला मार्गांत भय होईल असें वाटलें तर एखादें लहान हत्यार त्या दूताजवळ द्यावें आणि मध्यंतरीं मोठी नदी वेगैरे असेल तर एखादें लहानसें तरून जाण्याचें साधन (भोंपळा वैगरे) 'अनेन तरितव्यम्' असें म्हणून त्या दूताजवळ द्यावें.

अश्वलायन सूत्राच्या कालीं यज्ञ कमी होत चालले होते यास प्रमाणेः-

(१) यज्ञ हा शब्द अधिक व्यापक केला म्हणजे वेदाध्ययन आणि अतिथिसत्कार यांसहि यज्ञ या सदरांत घेतलें.

(२) अनेक पाकसंस्था सूत्रकारांनीं उपदेशिल्या आहेत त्या श्रौतसंस्थांचा संक्षेप आहेत. उदाहरणार्थ, पार्वण स्थालीपाक घ्या. हा दर्शपूर्णमासाचा संक्षेप आहे. तो दर्शपूर्णमासाप्रमाणेंच पोर्णिमा व अमावास्या या दोन पर्वकालीं करावयाचा आहे. याला आदल्या दिवशीं त्या श्रौत इष्टीप्रमाणेंच उपवास आहे. यांत दर्शपूर्णमासाप्रमाणेंच इध्म व बर्हि यांचें संहनन आहे. निर्वाप, प्रोक्षण, कंडण, श्रपण, होम, आघार, चक्षुषी, स्विष्टकृत् इत्यादि क्रिया यांत आल्या आहेत, आणि दर्शपूर्णमासाचा अतिदेश ज्याप्रमाणें इतर इष्टींत आहे त्याचप्रमाणें इतर पाकयज्ञांत स्थालीपाकतंत्राचा अतिदेश आहे.

(३) बलिदान व ब्राह्मणभोजन यांसहि पाकयज्ञ म्हटलें आहे.

(४) शिवाय भक्तीचें महत्त्व वाढविलें आहे, आणि प्रयोगाच्या ठाकठिकीचें महत्त्व कमी केलें आहे. कोणी श्रद्धाबुद्धीनें जर एक समिधा किंवा एक आहुति अर्पण केली किंवा वेदाध्ययन केलें तर यज्ञाचें फल मिळतें हाहि उपदेश केला आहे. (१.२.५)

 (५) सोमयागास तर अजीबांत फांटा दिला आहे. तथापि सोमयागाच्या अभावामुळें सामगायनाचा जो अभाव उत्पन्न झाला तो टाळण्यासाठीं सीमन्तोन्नयनासारख्या स्त्रीसंस्काराच्या प्रसंगीं वीणा वाजविणारे व गाथा म्हणणारे आणले आहेत.

श्रौतधर्मांचा इतिहास तयार करावयाचा झाल्यास आपणांस साहित्य अनेक प्रकारचें सांपडते, आणि त्यांतून निरनिराळ्या काळांचा इतिहास सांपडतो. भारतीय आणि इराणी या दोन संस्कृतींचा तौलनिक अभ्यास करतां येईल. हा अभ्यास अत्यंत प्राचीन काळचा यज्ञधर्म आपणांस बोधील. तसेंच ब्राह्मणवाङ्मयाचे व सूत्रवाङ्मयापर्यंतचे धागे जोडतां येतील. हे जोडतांना जी तुलना करावी लागेल ती यज्ञधर्माची अत्यंत जोरानें वाढ चालू असतां काय फरक होत गेले हें कळवील. सूत्रोक्त श्रौतधर्म अंतिम वाढीचें पण अत्यंत नियमबद्ध स्वरूप दाखवितो. ब्राह्मणें पूर्ण विकास झालेले पण यज्ञयोजकांचे स्वातंत्र्य बरेंच कायम आहे अशा स्थितींतलें यज्ञस्वरूप दाखवितात.

संहितांचा मंत्रभाग तपासून त्यांत येणा-या उल्लेखांवरून, ब्राह्मणांतील विधिवाक्यांनीं जी यज्ञसंस्था दर्शविली जाते तिच्या पाठीमागें देखील जातां येईल. पर्शूंच्या यज्ञसंस्थेशीं ब्राह्मणदृष्ट यज्ञसंस्थेचा संबंध जोडतांना, मंत्रदृष्ट श्रौतधर्म ही अत्यंत महत्त्वाची पायरी होय.

यज्ञसंस्थेचा तोलनिक अभ्यास करावयाचा झाल्यास त्या अभ्यासाची अंगें अनेक आहेत.

(१) पर्शूंचा आणि भारतीयांचा धर्म
(२) मंत्रदृष्ट श्रौतधर्म आणि ब्राह्मणदृष्ट श्रौतधर्म.
(३) भिन्नशाखादृष्ट धर्म.
(४) वेददृष्ट आणि सूत्रदृष्ट धर्म.
(५) भिन्नसूत्रदृष्ट धर्म.

यांची तुलना जितकी अधिक होत जाईल तितका प्राचीन सामाजिक इतिहास खुला होत जाईल. या इतिहासाचा पूर्ण उलगडा होण्यासाठीं अनेक ग्रंथांची तुलना केली पाहिजे. हें करण्यास संशोधकास अनेक वर्षें लागतील किंवा संबंध आयुष्य खर्च करावें लागेल. या महत्त्वाच्या कामापैकीं कांहीं काम आणि त्याचें फल मात्र येथें दिलें आहे. ग्रंथांची तुलना करून काय निघतें याचीं कोष्टकें पुढें येतील.

यज्ञसंस्थेत दोन निरनिराळ्या गोष्टी समाविष्ट झालेल्या दिसतात. लोकविनोदार्थ होणारे उत्सव व खेळ आणि पारमार्थिक बुद्धीनें केलेलें हवन. खेळांस आणि उत्सवांस धार्मिक स्वरूप दिलें गेलें अथवा उपासनेस खेळ चिकटविले हें नहेमींच सांगतां येण्याजोगें नसतें. ॠग्वेदमंत्रांच्या रचनेच्या कालीं अश्वमेधासारखे मोठे उत्सव असतील, पण ते यज्ञच होते असें म्हणतां येत नाही. त्या कालीं इष्टि असेल, काम्यपशु असेल किंवा कसाबसा सोमयाग देखील असेल. पण कांहीं तरी मंत्र म्हणून आहुति देणें यापलीकडे त्याचे स्वरूप नसावें.

यज्ञसंस्थेचे कालभाग पाडतांना पहिला काल म्हटला म्हणजे अमंत्रक हवनें करणा-या अथर्व्यांचा काल होय.

अमंत्रक अथर्व्याच्या कालापासून सुरूवात करून ज्या कालामध्यें कर्मांच्या भेदामुळें ब्राह्मणांचे प्रथम होता, अध्वर्यु, सामक इत्यादि भेद पडले आणि नंतर त्यांच्यामध्येंहि आणखी पक्ष पडून निरनिराळीं आध्वर्यवें उत्पन्न झालीं, त्यांची शेवटीं संगति लावली जाऊन श्रौतसूत्रोक्त श्रौतधर्म तयार झाला त्या सर्व कालाचा इतिहास हा यज्ञसंस्थेचा इतिहास होय.

अमंत्रक अथर्व्यांच्या कालानंतर श्रौतधर्मांच्या उपबृंहणाच्या दिशेंने पहिली क्रिया झालेली दिसते ती ही कीं, हवन हें एकटयानें न करतां २०।२५ जणांचे आवाज एकत्र मिळून करावें.

समुच्चयांनीं एकत्र जमून जे यज्ञ करावयाचे त्यांत देखील क्रियाविभागणी फारशी नसून सगळ्यांनीं एकत्र जमून कांहीं तरी मंत्र गावेत व आहुती टाकाव्यात असा, म्हणजे आज ज्याप्रमाणे मंत्रपुष्प म्हणूण देवावर फुलें टाकतात त्याप्रमाणें, प्रकार होता असें दिसतें.

या प्रकारांत प्रथम जो फरक झाला असेल तो गाण्याच्या चालीवरून किंवा वृत्तावरून झाला असावा. 'गायंति त्वा गायत्रिणः' हें सूक्त विधानास पुष्टि देईल.

यज्ञप्रयोग वैयक्तिक कमी करून ते सांघिक करावेत ही प्रवृत्ति मंत्रद्रष्टया ॠषींच्या कालांतच तयार झाली होती.

सांघिक श्रौतकर्म आणि मनोरंजक खेळ अगर उत्सव हीं एकत्र जोडण्याचा प्रयत्न अमंत्रक अथर्वकाल  आणि श्रौत धार्माच्या ठाकठिकीचा अध्वर्युकाल यांच्या मध्यंतरींच्या काळांत झाला असावा.

या मधल्या काळांत एक महात्त्वाचा उपकाल येतो तो काल म्हटला म्हणजे ब्रह्माध्वर्युभेदकाल होय.

गायत्री, अर्की, होते, ब्रह्म्ये इत्यादि लोकांच्या स्पर्धेमध्यें होते आणि ब्रह्म्ये टिकले व अर्की, गायत्री हे लयास गेले असें दिसतें.

होता याचा अर्थ हवन करणारा असावा. अध्वर्यु हवन करीत असतां ''होता'' हा शब्द अध्वर्यूस कां लावतात अशी पृच्छा प्राचीन काळीं देखील केली आहे आणि होता याचा अर्थ आह्वान करणारा असा शास्त्रार्थ सांगून ही शंका मिटविण्यांत आली आहे. 'होता' या नांवानें  स्पष्ट होणारें कर्म म्हणजे जें अध्वर्यु करतो तेंच कर्म होय. यावरून अध्वर्यु हा होत्यांतलाच कमी विद्वान् पण लटपट्या व दांडगा वर्ग असावा असें दिसतें. अध्वर्यु या शब्दावरून कोणत्याहि यज्ञकर्माचा बोध होत नसल्यामुळें तो होत्यांतून निघाला नसल्यास दुस-या कोणांतून तरी निघाला असावा.

ब्रह्म्याचे सहायक स्वतंत्र आहेत. त्या सहायकांत हौत्र आणि आध्वर्यव करणारेहि आहेत. यावरून असें दिसते कीं, भिक्षुकीची जोपासना करण्याच्या संस्थेमध्यें दोन परस्परांशीं स्पर्धा करणारे बलवान् समुच्चय होते. एक अध्वर्युप्रमुख व दुसरा ब्रह्मप्रमुख.

ब्रह्म्यांच्या यज्ञसंस्थेमध्यें औद्गात्र फारसें नसावें आणि हा औद्गात्राचा अभाव त्यांची यज्ञसंस्था दुर्बल करण्यास कारणीभूत झाला असावा.

ब्रह्म्यांची यज्ञसंस्था बरीचशी राजाश्रयानें चालत असावी आणि अध्वर्यूंची लोकाश्रयानें चालत असावी.

ब्रह्मकर्म आणि आध्वर्यव यांत वस्तुतः फारसा भेद नाही. दोघेहि व्यवस्थापकच. एकीकडचा व्यवस्थापक जो ब्रह्मा तो जास्त सुखावलेला आणि म्हणून त्यास आग्नीध्रासारखा पटाईत हस्तक लागे.

अध्वर्युंस ब्रह्म्यांशीं तडजोड करण्याचें कारण ब्रह्म्यांचें राजपैरोहित्य असावें.

ब्रह्म्यांस अध्वर्युंशीं सलोखा करण्याचें कारण लोकाश्रयावर राहणा-या अध्वर्युंनी बृंहण केलेल्या यज्ञसंस्थेंत आणलेला लोकाकर्षक भाग असावा.

असा एक काल आला असावा कीं, ज्या वेळेस लोकांस श्रौतधर्माविषयीं औदासीन्य उत्पन्न झालें होतें आणि श्रौतधर्म टिकला म्हणजे श्रौत्यांची भिक्षुकी चालली तर ती केवळ राजाश्रयानेंच चालणें शक्य होतें, सनीहारार्जित द्रव्यावर चालणें शक्य नव्हतें. अर्थात् हा काल म्हटला म्हणजे यजुरथर्वैक्यकाल होय. हाच काल संहितीकरणाचा होय.

संहितीकरणामध्यें दोन किंवा तीन क्रिया झालेल्या आहेत. मंत्रब्राह्मणवाक्यांचे संचय करणें ही एक क्रिया होय. प्रयोग करणा-या ॠत्विजांस उपयोगीं पडणारे वाङ्मय निराळें करावयाचें या दृष्टीनें पृथक्करण करणें ही दुसरी क्रिया होय. तिसरी क्रिया म्हणजे एकस्वरूपी वाङ्मयाचें उपबृंहण आणि व्यवस्थीकरण ही होय. आध्वर्ययाच्या संहिता अनेक आहेत आणि अथर्ववेदाची संहिता आणि कृष्णयजुर्वेद हीं परस्परापेक्षी आहेत. यांवरून हें उघड आहे कीं, अंतिम संहितीकरणाच्या पूर्वीं शुक्लकृष्णांचें भांडण झालें होतें, आणि अथर्व्यांशीं यजूंचा समेट झाला होता. हा समेट होतेवेळेस प्रथमतः तो शुक्लयजू व अथर्वे यांच्यामध्यें झाला असावा आणि होत्यांमधील कांहीं होत्यांमधील कांही अप्रमुख समुदाय त्यांस मिळाला असावा; आणि पुढे कालांतरानें म्हणजे एखादी पिढी उलटल्यानंतर कृष्णयजुर्वेदी व अथर्वे यांचेंहि सख्य जुळलें असावें. शुक्लांचा आणि अथर्व्यांचा परस्परस्नेह प्रथम जुळला असावा हें शुक्लयजूंच्या पारस्कराचा उल्लेख कौशिक आणि वैतान या सूत्रांनीं केला आहे त्यावरून दिसून येतें.

श्रौतकर्माची वृद्धि झाली तिच्या पाय-या येणेंप्रमाणे असाव्यात. सत्रें, अश्वमेधादि यज्ञ, आणि दैनिक अग्निहोत्र हीं नित्य आणि नैमित्तिक कर्में अत्यंत प्राचीन असावींत. सोमाचा उपयोग दैनिक कृत्यांत होत असून सोमयाग हा नवीन शिरला असावा, आणि बृहत्सोमयाग अघ्यवर्यूंनीं योजिल्यानंतर नंतर हौत्रक अधिक शिस्तवार झालें असावें व ॠग्वेदघटना व्हावयास लागली असावी. इष्टी आणि पशु हीं केवळ अग्निहोत्रासारखींच अत्यंत सामान्य कर्में असावींत त्यांचें बृंहण अध्वर्यूंनींच केलें असावें आणि अध्वर्यू जर होत्यांतूनच निघाले असेल तर त्यांच्या हौत्राच्या ज्ञानाची पुंजी इष्टी व पशु यांमध्येंच खर्च झाली असावी. सोमयाग ही जी कृती अध्वर्यूंनीं नवी आणली तींत सामगायन त्यांनीं लोकप्रियता मिळविण्यासाठीं आणलें. सोमयाग हीच अध्वर्यूंची विशिष्ट कृति असल्यामुळें याची अनावश्यकता सिद्ध करण्याची ब्रह्म्यांस इच्छा उत्पन्न होऊन 'यो विद्यात् ब्रह्म प्रत्यक्षं' हें आतिथ्यधर्म आचरला असतां सोमयागाचें श्रैय येतें असें सांगणारें सूक्त निर्माण करण्याची त्यांस स्फूर्ति झाली असावी. सोमयागांत इष्टी आणि पशु घुसडून देण्याचें कारण हें कीं, अध्वर्यूंच्या विद्येशिवाय सोमयाग होऊं नये. अग्न्याधान तर बोलून चालून नवेंच. म्हातारपणीं पेनशन घेतल्यानंतर   धर्मकार्य करण्याची जेव्हां कोणाला स्फूर्ति होईल तेव्हां त्यास वाजतगाजत अग्निहोत्री करण्याची ही क्रिया. ही अर्थात् श्रौतधर्माचा पूर्ण लोप होण्याचे वेळीं आलेली. अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, अतिरात्र, अप्तोर्याम व वाजपेय हे तर सगळे सोमयागाचेच विकार. सप्तहविः- संस्थांपैकीं ज्याप्रमाणें इष्टी व पशू हे यजूंचे त्याप्रमाणेंच सौत्रामणिहि यजूंचाच. सौत्रामणीच्या प्रसंगीं होत्यांची यजूंनीं विशेष फिकिर केलेली दिसत नाहीं. सौत्रामणि म्हणजे निरूढपशु. याज्यापुरोनुवाक्या मात्र निराळ्या आणि त्या याज्यापुरोनुवाक्या हौत्रकांकडे सूत्रद्दष्ट आहेत, ब्राह्मणदृष्ट नाहींत. म्हणजे हविःसंस्थांची वृद्धि होईपर्यंत हविःसंस्था चालविण्यासाठीं यजूंनीं म्हणजे अध्वर्यूंनी होत्याची पर्वा मुळींच केलीं नाहीं.

अथर्व्यांचा आणि यजूंचा समेट झाल्यानंतर जी क्रिया झालेली दिसते ती ही कीं, जीं कर्में लैकिक महत्त्वाचीं होतीं तीं देखील यजूंनीं म्हणजे त्रैविद्यांनीं म्हणजे अध्वर्युप्रमुखांनीं आपल्याकडे खेंचावयास सुरूवात केली. जीं श्रौतांत जातील तीं श्रैतांत घालविलीं, जीं श्रौतांत शिरण्याजोगीं नसतील तीं स्मार्तांत घातलीं आणि कांहीं श्रौतांत व स्मार्तांत अशीं दोहोंकडे ठेवलीं. जर मोठें कर्म पाहिजे असेल तर तें करण्यास त्रैविद्य तयारच. एखाद्या यजमानास धाकटें कर्म करावयास पाहिजे असलें तरी तें करण्यास यजू तयारच. परिणाम असा झाला कीं. मोठ्या यागाचें कर्म अथर्व्यांकडून स्वतंत्रपणें होऊं नये आणि त्रैविद्यांस तर तें करतां यावें, आणि लहान सहान कर्मेंदेखील त्यांस करतां यावींत. व्रात्यस्तोम हा मूळचा अथर्व्यांचा. तैत्तिरीयसंहितेंत त्याचें नांव देखील नाहीं. पण त्यास देखील त्रैविद्यांच्या सूत्रकारांनीं (उदाहरणार्थ, बौधायन, लट्यायन यांनीं) श्रौत स्वरूप दिलें. लहानशा विधींने समाजांत प्रविष्ट होण्यांपेक्षां एखाद्या मोठया लट्ठ आणि अगडबंब विधीनें समाजप्रविष्ट झालेलें व्रात्यांस कां आवडणार नाहीं? आणि सोमयागाच्या अनुषंगानें होणा-या व्रात्यस्तोमांत जर आपण समाजप्रविष्ट झालों तर पुष्कळ अधिक ॠत्विजांच्या सहानुभूतींने आपण समाजप्रविष्ट झालों असें स्वाभाविकपणेंच व्रात्यांस वाटणार. यामुळें सामान्य तंत्राचा व्रात्यस्तोम बाजूस सारून अधिक अगडबंब व्रात्यस्तोम जो यजूंनीं तयार केला त्यांत अथर्व्यांचे अनुयायी देखील इतके सांपडलें कीं, वैतानसूत्रामध्यें व्रात्यस्तोमासंबंधाच्या पंधराव्या कांडाचा व्रात्यस्तोमाकडेच उपयोग केला नसून अथर्व्यांनीं ॠग्वेदांतून उसन्या घेतलेल्या विसाव्या कांडांतील ''आत्वेता निषीदत' व 'अधाहींद्रगिर्वणः' ह्याच तूचांचा विनियोग दिला आहे. यावरून वैतानसूत्राच्या प्रसंगीं व कदाचित् अथर्ववेद संहितारूप पावला त्या प्रसंगी व्रात्यस्तोम अथर्व्यांच्या विद्येंतून अजीबात नाहींसा होऊन त्रैविद्यांच्या श्रौताच्या अनुषंगानेंच जिवंत राहिला होता असें दिसतें.

पुढे वाचा:श्रौतकर्मसंकोचानंतरच्या भिक्षुकी चळवळी

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .