प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

पितृमूलक शाखेंत बदलः- वेदभेदाचें मूळ प्रयोजन एवढेंच कीं, प्रत्येकानें आपआपला धंदा करण्यास समर्थ व्हावें. ज्यास आध्वर्यव करावयाचें आहे त्यानें यजुर्वेदाचा अभ्यास करावा, ज्यास हौत्र करावयाचें असेल त्यानें ऋग्वेदाचा अभ्यास करावा आणि ज्यास यज्ञांत औद्गात्र करावयाचें असेल त्यानें सामें अभ्यासावीं. बाप तोच शिक्षक त्यामुळें बापाची शाखा तीच मुलाची शाखा हा प्रकार अर्थात् स्वाभाविक आहे आणि जे केवळ अभ्यासवैशिष्ट्य मूलक संघ होते ते कालांतरानें जाती बनले. जाती केवळ वेदावरुन म्हणजे ऋत्विजांच्या प्रकारावरुन पडल्या नाहींत तर शाखाभेदावरुनहि पडल्या. आणि पुढें शाखेंतल्या शाखेंत ज्या सूत्राचा अभ्यास होई त्यावरुन पडल्या. श्रौतकर्म जवळ जवळ लुप्त झालें. तें काय आहे याची व्यक्तीस आठवणहि बुझाली. तथापि श्रौतकर्ममूलक जें अध्यनवैशिष्टय तें आणि त्या अध्यनवैशिष्टयामुळें पुढें जे जातिसमुच्चय उत्पन्न झाले ते मात्र टिकले आणि अध्ययनग्रंथांच्या अभिमानाऐवजीं जात्यभिमान उत्पन्न झाला. अध्ययन आणि जाती यांची फारकत पूर्ण झाली आहे हें दर्शविणारी एक गोष्ट येथें देतों. जेव्हां एखाद्या यजमानास विशिष्ट सूत्राचा आपल्या अग्निहोत्रासाठीं परिग्रह करावयाचा असतो तेव्हां कर्म त्याच्या सूत्राप्रमाणें चालतें, परंतु तें कर्म चालविण्यास आणलेले ऋत्विज त्या त्या शाखेचेच असतात असें मात्र नाहीं. प्रयोग आपस्तंब किंवा बौधायन सूत्राप्रमाणें असेल परंतु आध्वर्यव हिरण्यकेशीहि चालवील. प्रसंगीं आध्वर्यव ऋग्वेदी ब्राह्मण देखील करील आणि इष्टीपुरतें हौत्र ऋग्वेदीयाच्या घरीं देखील यजुर्वेदी करील, विद्या आणि जाति यांची असंगति एवढ्यावरुनच दिसत नाहीं. कण्वशाखी, जाबालशाखी, किंवा चरकशाखी लोकांस आपल्या मुलाची मुंज करतेवेळेस दुस-या शाखेचा आचार्य (स्वशाखीय न मिळाल्यामुळें) घ्यावा लागतो आणि त्यामुळें मुलगा प्रसंगीं निराळ्याच शाखेची संध्या शिकतो, परंतु आपणांस आपल्या बापाच्या शाखेचाच म्हणवितो. आज पुष्कळ ब्राह्मणलोक संध्याच करीत नसल्यामुळें पैतृक शाखेशीं अध्यापनविषयक संबंध कायम ठेवणारा एकुलता एक दुवा देखील नष्ट झाला आहे आणि अध्ययनमूलक भिन्नत्व केवळ जातिमूलक भिन्नत्वाच्या रूपानें शिल्लक उरलें आहे.

जातीचें पृथक्त्व जर अध्ययनमूलक आहे तर अध्ययनांत बदल झाल्यास किंवा परंपरागत अध्ययन नष्ट झाल्यास सामाजिक पृथक्त्व तरी कां रहावें ? राहतें हें खरें. आणि तें केवळ वैदिक कारणासाठीं नसून लैकिक कारणासाठीं राहतें असें म्हणणें प्राप्त आहे. तथापि जेव्हां जात्यंतर्गत कुल आपली अध्यनपरंपरा सोडून नवी परंपरा घेतें तेव्हां तें कुल पूर्वीच्या शाखेचें न राहतां दुस-या शाखेचें बनतें. माध्यंदिन कुलांतील व्यक्ति काण्वकुलांत मोडली जात नाहीं याचें कारण लौकिक जातिभेद होय. तथापि देशस्थ म्हणविणा-या व परस्पराशीं मोकळेपणानें लग्न करणा-या मोठ्या जातीमध्यें बौधायन कुलें, आपस्तंब किंवा ऋग्वेदी देखील बनलीं आहेत. या प्रकारचीं कुलें कर्नाटकांत व दक्षिणमहाराष्ट्रांत पुष्कळ आहेत. कोंकणस्थ पूर्वी कृष्णयजुर्वेदी असून त्यांतील कांहीं पुढें ऋग्वेदी बनले असा समज ब-याच जुन्या पंडितांत आहे. ज्ञानकोशमंडळांतील हौत्रवेत्ते चिंतामण भट्ट दातार ह्यांचें घराणें पूर्वी कृष्णयजुर्वेदी असून त्यांच्या कोणत्या तरी एका पूर्वजास त्यांच्या ऋग्वेदी मामानें वाढविलें व पढविलें असल्यामुळें सांप्रत ऋग्वेदी बनलें आहे. तसेंच आपल्या पारमार्थिक गुरुविषयींच्या भक्तीमुळें बापट उपनांवाचें एक हिरण्यकेशी (कृष्णयजु) गृहस्थ सातारा येथें ऋग्वेदी वैदिक तयार झाले आहेत. उलटपक्षीं हरभट केळकर या नांवाचा एक ऋग्वेदीकुलोत्पन्न जन्मांध कृष्णयजुर्वेदी वैदिक म्हणून थोड्या वर्षांपूर्वीं पुण्यास प्रसिद्ध असे.

सर्व हिंदुस्थानांतील सध्यां अस्तित्वांत असलेल्या ब्राह्मणांच्या सात आठशें जातींपैकीं कोण कोणत्या वेदाचे व कोण कोणत्या शाखेचे यांविषयीं आपणांस फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ब्राह्मणांमध्यें जे जातिभेद पडले ते सर्व वेदाध्ययनवैशिष्टयमूलक नाहींत. कांहीं भेद स्थानमूलक आहेत, कांहीं सोंवळ्याओंवळ्याच्या कल्पना ब-याच लाडावल्यानंतर अधिक सोंवळे राहणारांनीं कमी सोंवळ्यावर बहिष्कार घालावयाचा या क्रियेमुळें उत्पन्न झाल्या आहेत, कांहीं उपास्यमूलक आहेत आणि कांहीं मतमूलक आहेत. अभ्यासक्रमाच्या भेदांमुळें किंवा यज्ञ करतांना कोणतें सूत्र वापरावें या विचारमुळें कांहीं प्रसंगीं जातिभेद उत्पन्न झालेला दिसला तर कांहीं प्रसंगीं श्रौताचारभिन्नता राहूनहि जातिभेदाचा अभाव दिसतो. कांहीं जातींत शाखा किंवा सूत्र हें केवळ कुटुंबविशिष्ट होय किंवा व्यक्तिविशिष्ट होय ही भावना दिसते. उदाहरणार्थ, कोंकणस्थांत ऋग्वेदी व कृष्णयजुर्वेदी (हिरण्यकेशी) या दोन्ही शाखांचीं अभ्यासक कुटुंबें आहेत आणि लौकिक व्यवहारामध्यें या भेदाचें महत्त्व कांहींच नाहीं. फक्त श्रावणीच्या वेळेस अमुक घराणें कोणच्या शाखेचें आहे हें विचारण्याचें प्रयोजन पडतें. कोंकणस्थांत लग्न जुळविण्याच्या वेळेस वेदाची म्हणजे शाखेची चौकशी कोणीहि करीत नाहीं. उलटपक्षीं चरक, जाबाल, काण्व, मैत्रायणीय, माध्यंदिन या सर्व यजुर्वेदाच्याच शाखा असून त्या एकमेकांशीं लग्न न करणा-या भिन्न भिन्न जाती बनल्या आहेत.

जाती व वेदशाखा यांची संगति किंवा वेदशाखा व त्यांचा प्रचार यांचा हिशोब घेण्याचें काम महार्णवकारांनींच काय तें केलें. महार्णवकारांची माहिती आज अत्यंत अपुरी आणि वस्तुस्थितीस न जुळणारी अशी भासते. चरणव्यूहाच्या टीकाकारांनीं महार्णवांतूनच उतारा घेऊन आपला प्रसंग भागविला आणि आचारभूषणकार (आनंदाश्रम ग्रंथ ५७) त्र्यंबकशास्त्री ओक यांनीं तोच उतारा आपल्या ग्रंथांत उद्धृत केला. तो उतारा व त्यावरील त्र्यंबकशास्त्री यांचें भाष्य यांचा गोषवारा येणेंप्रमाणेः-

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .