प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

एकदां, मन आणि वाचा यांच्यांत आपणां दोघांत श्रेष्ठ कोण ह्याविषयीं भांडण उत्पन्न झालें. “मी श्रेष्ठ आहें” असें दोघेंहि म्हणूं लागलीं. मन म्हणालेः खरोखर पाहतां, मी तुझ्यापेक्षां श्रेष्ठ आहे, कारण मीं जें आधीं योजून ठेवतें तेंच तूं बोलतेस, पदरचें कांहीच नाहीं; माझ्या कृतीचें तूं फक्त अनुकरण करतेस, तूं फक्त मला अनुसरतेस; तेव्हां, केव्हांहि मी तुझ्यापेक्षां श्रेष्ठच आहे.” यावर वाचा बोललीः “असें आहे तरी मीच तुझ्यापेक्षां श्रेष्ठ आहे; कारण तुला जें कळतें, तें मी प्रथम कळवितें, निवेदन करतें.” हें भांडण मिटावें. या उद्देशानें दोघें प्रजापतीकडे गेलीं. प्रजापति मनाच्या बाजूनें निकाल देतांना वाचेला म्हणालाः “मन तुझ्यापेक्षां श्रेष्ठ आहे, कारण तूं त्याची केवळ कृतानुकरी व अनुचरी आहेस.” आपल्या विरुद्ध निकाल झाल्यामुळें वाचा भग्नवीर्य झाली, ह्या क्षोभाचा तिच्यावर परिणाम होऊन तिचा गर्भपात झाला. ती प्रजापतीला बोलली कीं. “तूं माझ्या विरुद्ध निकाल दिला आहेस तेव्हां मी कधींहि तुझ्या हव्यवहनाला हेतुभूत होणार नाहीं.” म्हणून यज्ञांत प्रत्येक प्रजापतिदेवताकर्म मुकाटयानें करतात, कारण प्रजापतीच्या हव्याचें वहन वाचा करीत नाहीं.

 

पुष्कळ कथानकांतून वाचेचा प्रामुख्यानें उल्लेख आलेला आहे. त्यांतून तिला स्त्रियांचा नमुना असें मानण्यांत आलें आहे. ह्याचें उदाहरण ब्राह्मणांतून वारंवार येणा-या सोम-चौर्याच्या कथानकांत सांपडेल. हें कथानक येणेंप्रमाणेः पहिल्यानें सोम स्वर्गांत असे. गायत्री पक्षिरूप होऊन त्याला पृथ्वीवर घेऊन येऊं लागली, तेव्हां वाटेंत एका गंधर्वानें तिच्यापासून त्याला पळविलें. तेव्हां देवांनीं एकत्र जमून चोरून नेलेला सोम परत मिळविण्याचा विचार चालविला. त्यांनीं असें ठरविलें कीं, गंधर्व हे बायकांचे लोभी आहेत, तेव्हां वाचेला त्यांच्याकडे धाडून द्यावी म्हणजे ती सोम पुन्हां परत घेऊन येईल. त्याप्रमाणें देवांनी तिला गंधर्वांकडे पाठविली व तिनें सोम परत आणला. पण गंधर्व तिच्यामागें आले व म्हणालेः “तुम्ही सोम घ्या पण वाचेला आमच्या ताब्यांत द्या.” यावर देवांनीं उत्तर केलेः “बरें, तुमच्या म्हणण्याप्रमाणें करूं; पण ती होऊन जर आमच्याकडे परत आली तर मात्र तुम्हांला तिला बळजबरीनें नेतां येणार नाहीं. आपण चढाओढ लावून तिला कोण वश करतो तें पाहूं या.” नंतर त्यांनीं वाचेला वश करण्यासाठीं चढाओढ सुरु केली. गंधर्वांनीं तिच्यापुढें वेदपठण केलें व “हो, आम्ही हें जाणतों” तें जाणतों वगैरे वेदघोष सुरु केला. इकडे देवांनीं वीणा निर्माण करुन ते वाजवीत व गात बसले आणि त्यांनीं वाचेला “आम्ही असें तुला गावून दाखवूं, अशा रीतीनें तुला तुष्ट करूं.” अशा रीतीनें बोलून खूष केलें, तेव्हां ती देवांकडे वळली. ती निरर्थक गोष्टीला भुलली. जे प्रशंसना व स्तवन करीत होते त्यांनां धिक्कारुन, जे गात होते, नाचत होते त्यांच्याकडे ती गेली. म्हणून अजून देखील स्त्रियांचा निरर्थक व क्षुल्लक गोष्टींकडे धांव घेण्याचा स्वभाव कायम आहे. तेव्हां या गोष्टीचें सार काय कीं, स्त्रिया, जो चांगला गातो व नाचतो त्याला भुलतात व त्याच्या आधीन होतात.” *

ही लहानशी गोष्ट ज्याप्रमाणें स्त्रियांचा एक स्वभावधर्म निरूपण करण्याकरितां मुद्दाम योजिली आहे, त्याप्रमाणें पुष्कळ कथा एखाद्या गोष्टीचें किंवा संप्रदायाचें ‘मूळ’ कशांत आहे हें दाखविण्याकरितां घातल्या आहेत. अशा मूळविषयक कथांत उत्पत्तिविषयक कथाहि येतात, व इतिहास किंवा आख्यानें ह्यांपासून या कथा भिन्न आहेत हें दाखविण्याकरितां, प्राचीनांनीं यांनां पुराणें * अशी संज्ञा दिली आहे. 

या ‘पुराणां’पैकीं, कांहीं पुराणें अध्यात्मज्ञान्यांनीं रचलीं आहेत, कांहीं अगदीं प्राचीन कथापुराणांपैकीं आहेत, तर कांहीं यज्ञशास्त्राला जोडून असलेल्या दंतकथांचा आधार घेऊन तयार केलेलीं आहेत.

ब्राह्मणांत चारी वर्णांचा मूळ इतिहास वारंवार दिलेला आढळतो. ऋग्वेदांतील पुरुषसूक्तासारख्या * तत्त्वज्ञानविषयक सूक्तांतून, देवांनीं यज्ञांत बळी दिलेल्या पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण कसे उत्पन्न झाले, बाहूंपासून क्षत्रिय, मांडयांपासून वैश्य व पायांपासून शूद्र कसे आले या विषयीं वर्णन दिलें आहे. पण ब्राह्मणांत, प्रजापतीनें आपल्या मुखापासून ब्राह्मण व त्याबरोबर अग्निदेव उत्पन्न केला, आपल्या हृदयापासून व बाहूंपासून क्षत्रिय व इंद्र, शरीराच्या मध्यभागापासून वैश्य व इतर सर्व देव, व पायांपासून शूद्र निर्माण केले अशी कथा आहे. शूद्रांबरोबर कोणीहि देव निर्माण झाला नसल्यानें, त्यांनां यज्ञाचा अधिकार नाहीं. वरील प्रकारांनीं उत्पत्ति झाली असल्यानें, ब्राह्मणवर्ण आपलें धार्मिक कृत्य मुखानें करतो; क्षत्रिय बाहूंनीं; वैश्यवर्ण, ब्राह्मण व क्षत्रिय हे त्याच्यापासून आपला वाटेल तितका फायदा करुन घेत असतांहि, कांहीं एक करीत नाहीं; शुद्राला फक्त उच्च वर्णांतील लोकांचे पाय धुणें एवढेंच धार्मिक कृत्य करण्याचा अधिकार पोहोंचतो, कारण तो पायापासून उत्पन्न झाला आहे. *

मैत्रायणी संहितेमधील रात्र व पक्षधारी पर्वत यांच्या उत्पत्तिविषयक दोन कथा मौजेच्या आहेत. *  त्या खालीलप्रमाणेः

यमो वा अभ्रियत ते देवा यम्या यममपाब्रुवस्ता यदपृछन्त्साब्रवीदद्यामृतेति तेऽब्रुवन्नवा इयमिममित्थं मृष्यतें रात्रिसृजावहा इत्यहर्वाव तर्ह्यासीन्न रात्रिस्ते देवा रात्रिमसृजंत ततः श्वस्तनमभवत्ततः सा तममृष्यत तस्मादाहुरहोरात्राणि वावाघं मर्षयंतीति. मै.सं. १.५, १२.
“यम जेव्हां वारला, तेव्हां देवांनीं त्याची सावत्र बहीण यमी हिची पुष्कळ समजूत घातली. तरी तिला त्याचा विसर म्हणून पडेना. देवांच्या पृच्छेला ती यम आजच वारला असें म्हणत दुःख करीत राहिली, तेव्हां देवांनीं विचार केलाः “अशा रीतीनें तिला विसर पडणें शक्य नाहीं, तर आपण रात्र उत्पन्न करूं.” त्या वेळीं फक्त दिवस असे, रात्र म्हणून नसे. देवांनीं रात्र निर्माण केली; तेव्हां अर्थातच दुसरा दिवस अस्तित्वांत आला; व नंतर तिला त्याचा विसर पडला. म्हणून म्हणतात कीं, “दिवस व रात्र हीं दुःख विसरवितात” (मैत्रा. सं. १.५, १२.)

प्रजापतेर्वा एतत् ज्येष्ठं तोक यत्पर्वतास्ते पक्षिण आसस्ते परापातमासत यत्र यत्राकामयन्ताथ वा इयं तर्हि शिथिरासीत्तेषामिंद्रः पक्षानछिनत्तैरिमामदृहद्ये पक्षा आसस्ते जीमूता अभवस्तस्मादेते सपदि पर्वतमुपप्लवतें.
मै.सं. १.१०, १३.

“पर्वत हे प्रजापतीचीं पहिलीं मुलें होत. तेव्हां त्यांनां पंख असत * म्हणून ते लागेल तेथें उडून जात, लागेल तेथें मुक्काम करीत. त्या वेळीं पृथ्वी ही स्थिर झाली नव्हती, ती इकडे तिकडें फिरत असे. इंद्रानें त्या पर्वतांचे पंख छेदिले व त्यांच्या (पर्वतांच्या) साधनानें ही पृथ्वी अचल केली. मग ते पंख ढग होऊन पर्वतांवर नेहमीं लोंबत राहूं लागले.” (मैत्रा. सं. १.१०, १३).

ब्राह्मणांतून उत्पत्तिविषयक कथा फार आहेत. साध्या यज्ञकर्मविषयक सूचना देतांना आध्यात्मिक विचारहि त्यांत प्रकट केले आहेत. मोठमोठ्या महत्त्वाच्या यज्ञकर्मांपैकीं अग्निहोत्र हें एक आहे. त्यांत अग्नीला दररोज सकाळ-संध्याकाळ दूध अर्पण करावें लागतें. या यज्ञकर्माची उत्पत्ति व महत्त्व शतपथब्राह्मणांत खालीलप्रमाणें दिलें आहेः-

“मुळारंभीं फक्त प्रजापतीच काय तो एकटा होता. प्रजा कशी उत्पन्न करावी ?”हा त्याला विचार पडला. त्यानें तपाचरण केलें, शरीराला पुष्कळ कष्ट दिलें. * आपल्या मुखापासून त्यानें अग्नि निर्माण केला. अग्नीला त्यानें मुखापासून उत्पन्न केलें म्हणून अग्नि हा अन्नाद म्हणजे अन्न भक्षण करणारा झाला. ज्याला खरोखरीच अग्नि हा अन्नाद म्हणून माहीत आहे, तो स्वतःच अन्नाद होतो. सर्व देवांत त्याला पहिल्यानें उत्पन्न केलें म्हणून त्याला अग्नि-अग्नि (अग्रे जातत्वात् अग्निः)-असें नांव दिलें. यानंतर प्रजापतीला असा विचार पडला “मीं अग्नीला अन्नाद म्हणून उत्पन्न केलें. पण येथें माझ्याखेरीज दुसरें अन्न नाहीं, तेव्हां तो मलाच खाणार नाहीं का ।” कारण त्या वेळीं पृथ्वीवर कांहीं एक नव्हतें. झाडें वनस्पति वगैरे कांहीं नव्हतें. म्हणून प्रजापतीला मोठें संकट पडलें. अग्नि तर इकडे आ वासून त्याच्या अंगावर आला, तेव्हां प्रजापतीला भय वाटलें व त्याचा महिमा त्याला सोडून गेला. पण त्याचा महिमा म्हणजे त्याची वाणी, तेव्हां त्याची वाणी नाहींशी झाली. (ह्यापुढें असें सांगितलें आहे कीं, प्रजापतीला स्वतःच्या शहरीरांतच आहुति देण्याची इच्छा झाली व हातावर हात घांसून त्यानें घृत, पय निर्माण केलें. यापासून ओषधी झाल्या. दुस-यांदा जेव्हां हात घांसून घृत किंवा पय निघालें, तेव्हां या द्रव्यापासून सूर्य व वायु उत्पन्न झाले).

अशा रीतीनें हवन करण्यांत एक तर त्यानें प्रजा उत्पन्न केली व दुसरें, त्यानें आपल्याला गिळंकृत करण्याच्या बेतांत असलेल्या मृत्यूपासून म्हणजे अग्नीपासून आपलें संरक्षण केलें. जो हें जाणून अग्निहोत्राहुती देतो, तो प्रजापतीप्रमाणें प्रजा उत्पन्न करतो व खाण्याला टपलेल्या काळापासून आपलें संरक्षणहि करुन घेतो. तो जेव्हां मरण पावतो व त्याला चितेवर ठेवण्यांत येतें तेव्हां तो अग्नीपासून पुन्हां जन्म घेतो. अग्नि फक्त त्याचें शरीर दहन करतो, * व आईपासून किंवा बापापासून जसा जन्म घ्यावा तसा तो या ठिकाणीं अग्नीपासून जन्म पावतो. जो अग्निहोत्रहोम करीत नाहीं त्याला पुन्हां नवीन जन्म मिळत नाहीं. म्हणून प्रत्येकानें अग्निहोत्र करावें.” (यापुढें, प्रजापतीनें उत्पन्न केलेले अग्नि, वायु व सूर्य ह्या देवांनीं कसें अग्निहोत्र केलें व गाईला कसें निर्माण केलें याविषयीं सविस्तर वर्णन आहे). “या गाईची इच्छा धरुन अग्नीनें असा विचार केला कीं आपण हिच्याशीं गमन करावें. त्याप्रमाणें तिच्याशीं गमन करून त्यानें आपलें बीज (रेत) तिच्या ठिकाणीं घातलें. त्यापासून दुध झालें. म्हणून गाय थंड असते तरी दूध ऊन ऊन असतें. कारण कीं दूध हें अग्नीचें रेत आहे; व म्हणून दूध काळ्या किंवा तांबड्या गाईचें असलें तरी सुद्धां तें नेहमीं पांढरें व अग्नीसारखें तकतकीत असतें; कारण हेंच कीं तें अग्नीचें रेत आहे; व म्हणून तें धार काढतांनाच ऊन असतें, कारण तें अग्नीचें रेत आहे.”

ज्याप्रमाणें ह्या उत्पत्तिविषयक क्रियांचा आरंभ प्रजापतीच्या तपश्चरणांत व देहदंडनांत झालेला आपणांस दिसतो त्याच प्रमाणें आपणांस असें आढळून येतें कीं, उत्पत्ति केल्यानंतर तो अगदीं अशक्त होतो, दमून जातो व पुढें त्याला अवसान रहात नाहीं. म्हणून त्याच्या वीर्यवर्धनासाठीं कांहीं यज्ञ सांगितला आहे. एकदां देवांनीं हा यज्ञ केला तर दुस-या वेळीं अग्नीनें हा यज्ञ करुन प्रजापतीवर उपकार केला व आणखी एका वेळीं प्रजापतीनें स्वतःच सूक्तें गाऊन व तप आचरून यज्ञपशू निर्माण केले व त्यांनां यज्ञांत बळी दिले. * त्यांतल्या त्यांत आश्चर्य हें, कीं, हा विश्वस्त्रष्टा प्रजापति, जो ब्राह्मणांत सर्वश्रेष्ठ देव म्हणून मानला आहे, त्याच्या ठिकाणीं श्रेष्ठपणा तर मुळींच आढळून येत नाहीं; उलट कांहीं कांहीं वेळां त्याची करुणाजनक स्थिति मात्र होते. एकदां तर देवांनीं खुद्द त्यालाच यज्ञांत बळी द्यावयास काढला होता । * एका कथेंत, (ही कथा पुष्कळ ठिकाणीं आलेली आहे) त्याच्यावर व्यभिचाराचा आरोप केला आहे, कारण त्यानें उषा व द्यौ या आपल्या कन्यांशीं गमन केलेलें आहे. या अपराधाला शिक्षा म्हणून देवांनीं आपल्या उग्र रूपांपासून रुद्र देव निर्माण केला. त्यानें आपल्या बाणानें प्रजापतीला विद्ध केलें, तेव्हां मृग व इतर राशिनक्षत्रें उत्पन्न झालीं. * यूरोपांत ज्याप्रमाणें बायबलमधील कथानकांनां लोकांची थोडीबहुत मान्यता मिळते त्याप्रमाणें ब्राह्मणांतील व वेदांतील सुद्धां उत्पत्तिविषयक कथापुराणांनां उत्तरकालीन ग्रंथांत मान्यता नाहीं. वरील प्रकराचें एकहि कथानक सर्वमान्य नसावें, हें विशेष आहे. अशा पुष्कळशा कथानकांतून विचित्र कल्पना व एकमेकांशीं न जुळणारीं मतें ग्रथित केलेलीं दृष्टोत्पत्तीस येतात. ह्याचें उदाहरण द्यावयाचें म्हणजे, शतपथब्राह्मणांत वर दिलेल्या कथानकाच्या लगेच पुढें वेगळ्याच तर्‍हेची उत्पत्तिकथा दिलेली आहे. या ठिकाणींहि असेंच म्हटलें आहे कीं, * प्रजा निर्माण करण्याकरितां प्रजापतीनें उग्र तपश्चर्या केली. त्यानें प्रथम पक्षी, नंतर सरपटणारे प्राणी, नंतर सर्प अशा प्रकारें प्राणी उत्पन्न केले. पण त्यांनां उत्पन्न करुन थोडा वेळ झाला नाहीं तोंच ते पुन्हां नाहींसे झाले, व प्रजापति पहिल्यासारखाच एकटा राहिला. असें होण्याचें कारण काय असावें ह्याचा बराच विचार केल्यावर त्याच्या असें लक्ष्यांत आलें कीं हे प्राणी अन्नान्न करून मेले. तेव्हां त्यानें पुन्हां नवीन प्राणी उत्पन्न करुन त्यांच्या स्तनांत दूध निर्माण केलें, व म्हणून ते जिवंत राहिले. याच ब्राह्मणांत दुस-या एका ठिकाणीं * प्रजापतीनें आपल्या प्राणांपासून (प्राण असणा-या अवयवां पासून) पशू निर्माण केल्याचें सांगितलें आहेः मनापासून पुरुष, डोळ्यापासून अश्व, प्राणापासून (श्वासापासून) गाय, कानापासून मेष, वाचेपासून अज. पुरुष प्रजापतीच्या मनापासून उत्पन्न झाला आहे व मन हें सर्व प्राणांमध्यें श्रेष्ठ (पहिलें) आहे म्हणून पुरुष हा सर्व पशूंमध्यें श्रेष्ठ व पराक्रमी आहे.

बहुतेक कथांतून प्रजापति नुसता स्पष्टा म्हणजे निर्माण करणारा असें मानण्यांत येतें. त्याच्यापासून विश्व व प्राणी निर्माण झाले आहेत. पण ब्राह्मणांत कांहीं कांहीं जागीं असेंहि दिलें आहे कीं, प्रजापति हा देखील सृष्ट वस्तूंपैकींच आहे व आद्य सृष्टि म्हणजे जल किंवा असत् किंवा ब्रह्मन्. शतपथ ब्राह्मणांत (११.१, ६) अशी कथा आहेः

“प्रथम या विश्वांत, जलांखेरीज कांहीं एक अस्तित्वांत नव्हतें. या जलांनां आत्मसदृश असें कांहीं  निर्माण करण्याची इच्छा होऊन त्यांनीं देहदंडनाला व * तपा-चरणाला सुरुवात केली. त्याचें फळ म्हणून त्यांच्या ठिकाणीं एक सुवर्णाचें अंडें उत्पन्न झालें. त्या काळीं संवत्सर अशी कालगणना नव्हती; तरी पण जवळ जवळ वर्षभर हें अंडें पाण्यावर तरंगत राहिलें. एका वर्षानंतर त्याच्यांतून एक पुरुष बाहेर आला. तो प्रजापति होय. म्हणून स्त्री, किंवा गाय, किंवा घोडी एक वर्षात बाळंतीण होते, कारण प्रजापति एक वर्षांत जन्म पावला. त्यानें जेव्हां ते अंडें फोडलें तेव्हां त्याला बाहेर उभें रहावयाला जागा नव्हती. म्हणून तो ज्या अंडयांत उत्पन्न झाला, तें वर्षभर तसेंच पाण्यावर तरंगत राहिलें. वर्षानंतर तो बोलूं लागला व त्यानें “भूः” असा उच्चार केल्याबरोबर पृथ्वी निर्माण झाली; “भुवः” म्हटल्याबरोबर सभोंवतालीं वातावरण उत्पन्न झालें, व “स्वर” या उच्चाराबरोबर आकाश झालें. म्हणून वर्षानंतर मूल बोलूं लागतें, कारण प्रजापति वर्षानंतर बोलूं लागला. प्रजापतीनें प्रथम एक अक्षरी, दोन अक्षरी शब्द म्हणण्यास सुरुवात केली, म्हणून मूल जेव्हां बोलूं लागतें तेव्हां प्रथम प्रथम एकअक्षरी शब्द, दोनअक्षरी शब्द म्हणण्यास सुरुवात करतें, भूः, भुवः, स्वर ह्यांपासन प्रजापतीनें वर्षाचे पांच ऋतू केले, म्हणून पृथ्वीवर पांच ऋतू असतात. अशा प्रकारें निर्माण केलेल्या सृष्टीवर तो एक वर्षानें उभा राहिला; म्हणून, एक वर्षानें मूल उठून उभें राहतें, कारण प्रजापति उठून उभा राहूं लागला. हजार वर्षे आयुष्य बरोबर घेऊन तो जन्मला. ज्याप्रमाणें आपणाला लांबून नदीचें पलीकडचें तीर दृष्टीस पडतें त्याप्रमाणें त्याला आयुष्याची दुसरी कड दृष्टीस पडत होती. प्रजापतीनें जन्म घेतला, तेव्हां मृत्यु हा त्याच्या पाठीमागें आहेच. त्याला प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा होती. तेव्हां तो स्तोत्रें म्हणत व तप आचरीत काळ घालवूं लागला.प्रजननशक्ति आपणांत आणून त्यानें मुखानें देव उत्पन्न केले....... देव उत्पन्न केल्यावर त्याला दिनप्रकाश (दिवा) दिसूं लागला व देवांतील देवपणा तो हाच कीं, प्रजापतीनें त्यांनां निर्माण केल्यावर त्याला दिन-प्रकाश दिसला. नंतर, त्यानें आपल्या प्राणवायूपासून असुर निर्माण केले.......त्यांनां निर्माण केल्यावर, त्याला अंधार दिसूं लागला. त्यानें ओळखलें कीं, “आपण आपल्याकरितां अरिष्ट उत्पन्न केलें आहे; कारण ह्यांना उत्पन्न केल्याबरोबर अंधार झाला.” तेव्हां या पूर्वावस्थेंत देखील त्यानें असुरांवर अरिष्टें आणून त्यांचा बींमोड केला व त्यावेळींच त्यांची गति खुंटली. म्हणून असें म्हणण्याची वहिवाट आहेः “अन्वाख्यानांत व कांहीं इतिहासांत देव व असुर यांच्या मधील लढायांचें जें वर्णन केलें आहे तें खरें नाहीं, कारण मागेंच प्रजापतीनें ज्या वेळीं त्यांचा पार बींमोड केला त्याच वेळीं त्यांचा ऊर्जित काळ संपला.” ..... देवांनां उत्पन्न केल्यावर जो प्रकाश पडला, त्याचा दिवस केला व असुरांनां उत्पन्न केल्यावर जो अंधार पडला, त्याची रात्र केली. तेव्हांपासून दिवस व रात्र असा कालक्रम अस्तित्वांत आला.” (शतप. ब्रा. ११.१.६, १-११.)

यापेक्षांहि विलक्षण व बरीच दुर्बोध अशी दुसरी एक उत्पत्तिविषयक कथा आहे (शतपथ. ब्राह्मण ६.११, १) तिची सुरुवात अशी आहेः-

“असद्वाऽइदमग्रऽआसीत् ।” “प्रथम येथें फक्त ‘असत्’चें अस्तित्व होतें” पण लागलेंच पुढें असें म्हटलें आहे कीं, हें ‘असत् म्हणजे ऋषी होते. ह्या ऋषींनीं देहदंडन व तप करुन सर्व कांहीं निर्माण केलें. हे ऋषी म्हणजे दुसरे कोणी नसून प्राण होते. त्यांनीं पहिले सात पुरुष निर्माण केले-कसे केले तें माहीत नाहीं-व त्यांचें एकीकरण करुन एक पुरुष प्रजापति निर्माण केला.

“ह्या पुरुषाला म्हणजे प्रजापतीला प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा झाली. त्यानें देहदंड व तपश्चर्या केली. हीं केल्यावर, त्यानें त्रयी विद्या (ब्रह्म) उत्पन्न केली. हा त्याचा (पुढील सृष्टीचा) पाया (प्रतिष्ठा) झाला. म्हणून असें म्हणण्यांत येतें की, “ब्रह्म ही सर्वांची प्रतिष्ठा आहे.” या कारणानें वेदाभ्यास झाल्यावर मनुष्याचा पाया भक्कम होतो, कारण ब्रह्म (वेद) हाच मूळ पाया आहे.”

पुढील कथा अशी आहे कीं, ह्या ब्रह्मप्रतिष्ठेवर उभें राहून प्राजपतीनें तपाचरण केलें व प्रथम जल निर्माण केलें. नंतर वेदाच्या साह्यानें त्यानें एक अंडें उत्पन्न केलें; त्यापासून अग्नि झाला व त्याची कवची जी होती तिची पृथ्वी झाली व पुढें अमुक अमुक झालें इत्यादि वर्णन आहे. त्यांत फार पाल्हाळ व गोंधळ आहे. यांत महत्त्वाचा भाग हा कीं, ब्रह्माचा मूळ अर्थ स्तोत्र किंवा मंत्र असा होता; पुढें त्याला पवित्र ज्ञान किंवा वेद असा अर्थ आला, व या ठिकाणीं तर त्याचा अर्थ अस्तित्वांत असलेल्या सर्व वस्तूंची प्रतिष्ठा असा केलेला आहे. ह्याच्या पुढचीच पायरी म्हणजे, ब्रह्म हेंच उत्पत्तिकारण आहे या ब्रह्मवादाची. हें मत (शतप. ब्राह्मण ११.२.३, १) यापूर्वीच आलेलें आहे; त्या ठिकाणीं असें म्हटलें आहेः-

“विश्वाच्या आरंभीं, फक्त ब्रह्मच काय तें होतें. त्यानें पुढें देव निर्माण केले व तदनंतर त्यानें त्यांस राहण्याकरितां ह्या सृष्टी वांटून दिल्या – अग्नीला पृथ्वी दिली, वायूला अंतरिक्ष व सू-याला स्वर्ग दिला.”

अशा रीतीनें, ज्या कल्पनांचा आरण्यकें व उपनिषदें यांत पहिल्याप्रथमच पूर्ण विकास झालेला आहे अशा सर्व कल्पनांची ब्राह्मणग्रंथांतून, अगोदरच सिद्धता होती, हें आपल्या चांगलें दृष्टोत्पत्तीस येतें, भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासांत ब्राह्मणांनां जें फार महत्त्व आहे तें या कारणामुळेंच आहे. शांडिल्यानें म्हटल्याप्रमाणें, उपनिषदांचें मूलतत्त्व जें आहे तें शतपथब्राह्मणांत अगोदरच आलें आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .