प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १ लें.
वेदांविषयीं भारतीय वृत्ति.

वेद आणि वेदस् या शब्दांचा ऋग्वेद व अथर्ववेद यांतील उपायोगाचें कोष्टक.
Table Insert

वरील कोष्टकावरून वेदस् शब्द कमी कसा होत गेला आणि वेद हा शब्द त्याच्या ठिकाणीं कसकसा स्थापित होत गेला हें सहज कळून येईल सामान्यतः बोलवयाचें तर असें म्हणतां येईल कीं, वेदसचा पहिला अर्थ धन, नंतरचा अर्थ ज्ञान, त्यानंतर वेद शब्दाचा ज्ञान या अर्थानें प्रचार, याप्रमाणें अर्थक्रम होऊन त्याच्या नंतरच्या कालीं वेद या शब्दास ऋग्यजुःसामांचा समुच्चय असा अर्थ आला असावा.

अथर्ववेदांतील पुष्कळ वचनें प्रकृत अर्थानें वापरलीं आहेत. याला उदाहरणें देतां येतील. त्यांतील कांहीं उद्धृत करितों. ‘यस्मिन् वेदा निहिता विश्वरूपाः’ (अथ० .३५,६.) त्याचप्रमाणें ‘ऋचं साम यदप्राक्षं हविरोजो यजुर्बलम् । एष मा तस्मान्मा हिंसीत वेदः पृष्टः शचीपते (अथ० .५७,१) या ठिकाणीं सायणाचार्यांनीं ‘एष वेदः ऋकसामयजुरात्मकः’ असें लिहिलें आहे. त्याचप्रमाणें “ये अर्वाङ् मध्य उत वा पुराणं वेदं विव्दांसमभितो वदन्ति (अथ ० १०.८,१७.) ‘ताभ्यामुद्धृत्य वेदमथ कर्माणि कृण्महे (अथ. १९.६८,१) ‘यस्मास्कोशादुदभराम वेदं’ (अथ. १९.७२,१.) ‘ब्रह्म प्रजापतिर्धाता लोका वेदाः सप्तऋषयोऽग्नय:’ (अथ.१९.९,१२.) या ठिकाणीं ‘वेदाः’ या पदाचा अर्थ ‘चत्वारः साड्गा वेदाः’ असा केला आहे. यावरून वर दिलेल्या ऋग्वेदांतील स्थलीं (क्र. ८.१९,५) ‘वेदेन’ या पदाचा अर्थ सध्यां आपण ज्यास वेद असें म्हणतों तोच असावा असें निश्चित होतें.

‘विद्’ या धातूचा आणि विद् या धातूशीं संबद्ध अशा शब्दांचा उपयोग ऋग्वेदांतील ज्या वाक्यांत दिसून येतो तीं वाक्यें आम्ही खालीं देत आहों. (स्वर गाळले आहेत.)

१.११,६ विदुष्टे तस्य कारवः (विदुःजानन्ति, विद् ज्ञाने लट्)
१.११,७ विदुष्टे तस्य मेधिराः (जानन्ति)
३.५५,१८ प्रनुवोचाम विदुरस्य देवाः (जानन्ति)
२.२३,१६ हृदि बृहस्पते न परः साम्नो विदुः (जानन्ति)
१.१०५,१ वित्तं (स्तोत्रं)
१.१८६,८ विदा कामस्य वेनतः(विद=लम्भयत प्रयच्छ तेत्यर्थः)
७.,२ समानो बन्धुरूत तस्य वित्तम् (वित्तं जानीतम्)
८.९२,११ उदिता यो निदिता वो वेदिता (वेदिता=वेत्ता=ज्ञाता)
४.२१,८ विदत् गोरस्य गवयस्य गोहे (विदत्=लभत्)  
९.६८,९ पुनान इन्दुर्वरिवो विदत् प्रियम् (विदत्=लम्भयति प्रयच्छतीत्यर्थः)
तद्विदत् शर्यणावति (विदत्=अज्ञासीत्)
५.३९,१ राधस्तन्नो विदव्दसो (विदव्दसो=लब्धधन)
१.३१,१ तव व्रते कवयो विद्मनापासः (विद्मन्=ज्ञान)
५.४८,५ न तस्य विद्म पुरूषत्वता वयं (जानीमः)
१०.८८,१८ पृच्छामि वः कवयो विद्मनेकं (विज्ञानाय)
२.९,६ सैनानीकेन सुविदत्रो अस्मे (सुविदत्र=सुप्रज्ञः)
२.१,१८ विशस्त्वा राजानं सुविदत्रं ऋञ्जते (सुविदत्रं=सुधनं)
२.२४,१० बृहस्पतेःसुविदत्राणि राध्या (सुविदत्राणि सुष्ठु लब्धव्यानि सुविदत्रं धन भवति इति यास्कः)

-२-३ रथमिव वेद्यं शुक्रशोचिषम् (वेदो धनं तस्मै हितम्)

‘विद्’ म्हणजे जाणणें किंवा ज्ञान असणें अशा अर्थाचीं वाक्यें अनेक आहेत आणि वेद, विदत्र, विद्मत्, वित्त इत्यादि अनेक रूपें दोन्ही अर्थांशीं जुळविण्याजोगीं आहेत. यावरून एवढें मात्र निश्चितपणें म्हणतां येईल कीं, दोन्ही अर्थ फार जुने आहेत. ‘विद्’ धातूचा जाणणें या अर्थानेंच उपयोग ज्यांत आहे असे उतारे अधिक आहेत. वेद याचा पहिला अर्थ ज्ञान न करतां धन केला तर ‘विद्’ धातूच्या अनेक अर्थावरून निघालेला निर्णय त्यास पोषक होत नाहीं. असा हा ‘वेद’ शब्दाच्या अर्थासंबंधाचा परस्परविरूद्ध पुरावा पुढें ठेवून आम्ही  मोकळे होतों.

आतां यज्ञप्रकरणांतील कांहीं विशेष स्थलीं ‘वेद’ या पदाचा अर्थ ‘दर्भपिञ्जूल’ किंवा ‘केरसुणी’ सारखें स्वच्छता करण्याचें साधन असा करण्यांत येतो. याचें उदाहरण मीमांसेंत प्रामुख्यानें येणारें ‘वेदं कृत्वा वेदिं करोति’ हें वाक्य होय. येथें ‘वेद’ पदाचा अर्थ ‘कुशमुष्टिनिर्मित पदार्थ’ असा करितात. व याच अर्थानें शुक्लयजुर्वेदांतहि एक मंत्र आला आहे तो पुढीलप्रमाणेः-

‘वेदोसि’ त्वं देव वेद देवेभ्यो वेदो भव’ (वा.सं.२,२१) या ठिकाणीं ‘वेद’ या संबोधनाचा अर्थ ‘कुशमुष्टिनिर्मित पदार्थ’ असाच महीधरानें केला आहे, पण हें विधान कुशमुष्टिवाचक असेल असें खात्रीनें म्हणतां येत नाहीं. जुने मंत्र नव्या कामास लावतांना अर्थ फिरविणें ही क्रिया वारंवार दृष्टीस पडतेच. महीधरास देखील या मंत्रार्थासाठीं ‘वेद’ या शब्दाचे दुसरे अर्थ देणें अवश्य वाटलेंच. ‘वेदोऽसि’ या ठिकाणीं वेद शब्दाचा अर्थ ‘त्रयीवेद’ असा घेतला आहे. व ‘वेदोभव’ याचा अर्थ ‘ज्ञानकोभव’ असा केला आहे. व ‘वेदेन रूपे व्यापिवत्सुतासुतौ प्रजापतिः’ (वा. सं. १९, ७८) येथें ‘परिज्ञानेन त्रैविद्यया वा’ असा अर्थ केला आहे.

या वरील सर्व पुराव्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कीं, ‘वेद’ हा शब्द ऋग्वेदांत सध्यांच्या अर्थानें निश्चित रीतीनें वापरण्यांत येत असे असें दिसत नाहीं. शुक्लयजुर्वेद व अथर्ववेद यांच्यावेळीं मात्र वेद शब्दाला निश्चत अर्थ प्राप्त झाला होता असें दिसतें. ऋग्वेद व सामवेद आणि शुक्लयजुर्वेद व अथर्ववेद यांनां मध्यकालीन असणारी जी तैत्तिरीय संहिता किंवा ब्राह्मण त्यांमध्यें ‘वेद’ शब्दाचा अर्थ ‘दर्भपिञ्जल’ किंवा ‘मार्जनी’ असाच फार वेळां येतो ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. ‘वेद’ शब्दाचा अर्थ निश्चत झाला नव्हता हें या गोष्टीवरून सिद्ध होतें.

अथर्ववेदकालीं वेदपदाचा अर्थ पूर्ण निश्चित झाला यांत शंका नाहीं. ‘वेदं विद्वांसमभितो वदन्ति’ (अथ.१०.८,१७) हा तैत्तिरीय आरण्यकांतील मंत्र अथर्ववेदसंहितेंत आला आहे ही गोष्ट फार लक्षांत ठेवण्यासारखी आहे. यावरून तैत्तिरीयसंहिताकालीं वेद शब्दाचा अर्थ निश्चित झाला नव्हता असेंच सिद्ध होणे विशेष संभवनीय दिसतें. ऋग्वेदकालापासून क्रमानें पहात आल्यास ‘वेदस्’ या शब्दाचे प्रयोग कमी होत चालले आहेत व ‘वेद’ या शब्दाचे प्रयोग वाढत चालले आहेत असे दिसून येईल.

शुक्लयजुर्वेद व सामवेद यांमध्यें ‘वेदस्’ हा शब्द फक्त एकाच ठिकाणीं येतो व त्याहि ठिकाणीं ती ऋचा ऋग्वेदांतीलच आहे. शुक्लयजुर्वेद म्हणजे जुनीं निवजलेलीं वाक्यें. त्यामुळें उसन्या घेतलेल्या मंत्रांत ‘वेदस्’ हा शब्द एक वेळ आला या पुराव्यावरून कांहीं एक सिद्ध होत नाहीं. सामवेदांत थोडासा पाठभेद करून ही ऋचा पठित आहे. परंतु सामवेदाचा स्वतंत्र रीतीनें विचार करण्याचें कारण नाहीं, कारण वाङ्मयदृष्ट्या तो वेद स्वतंत्र ग्रंथ नाहीं.

आतां सद्यःकालीं प्रचारांत असलेले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे जे शब्द त्यांसंबंधीं विचार करूं. या सामासिक पदांतील वेदशब्दाचा ऐतिहासिक विचार वर आलाच आहे व त्यावरून पुष्कळ कालपर्यंत वेदशब्दाचा अर्थ निश्चित होता असें भासत नाहीं. उलटपक्षीं, ऋक्, यजुः व साम या पदांचा अर्थ मात्र निश्चित होता याबद्दल संशय राहत नाहीं. सामान्यतः ‘ऋक्’ शब्दाचा अर्थ स्तुति, मंत्र व ऋत्विग् असा येतो. ऋग्वेदांतील कांहीं स्थलांवरून मंत्रकाराला ऋग्वेदच उद्देशित होता किंवा छन्दोबद्ध भागच विवक्षित होता असें म्हणावयास हरकत दिसत नाहीं. उदाहरणार्थ ‘ऋचः सामानि जज्ञिरे’ (ऋ. १०.९०,९) ‘आ ऋचो गिरः सुष्ठुतयः’ (ऋ.१०.९१,१२) तं ऋचः कामयन्ते (ऋ. ५.४४,१४-५) ऋचा मित्रं हवामहे (ऋ ५.६४,) हीं स्थलें पाहिलीं असतां ऋग्, यजुः साम शब्दांबद्दल त्यांचा निश्चय झाला होता अशी खात्री पटते.

वेद वगैरे शब्दांच्या अर्थांसंबंधानें इतका विचार झाल्यानंतर आतां वेदविषयक वृत्तिभेदाच्या विवेचनाकडे वळूं.

वेदांचें महत्त्व भारतीय समाजास काय होतें हें जाणण्यासाठीं याविषयीं प्राचीन ग्रंथकारांच्या ग्रंथांत व प्रत्यक्ष वेदांत काय मतें दृष्टीस पडतात हें पाहूं. या कार्यासाठीं जे उतारे येथें आम्ही देत आहों त्यांवरून वेदाविषयीं अत्यंत आदराबरोबर विचारविविधत्वहि भारतीय समाजांत पूर्वींपासून होतें ही गोष्ट स्पष्ट होईल.

प्राचीन काळीं विचाराचे अनेक प्रकारचे भिन्न प्रवाह दृष्टीस पडतात. अध्यात्माचें महत्त्व गातांना कोणी वेदपांडीत्याला गौणत्व देई, वेदांपैकीं कांहीं भाग पौरूषेय होता अशा तर्‍हेचें मतहि मधून मधून कोणी व्यक्त करी, कोणी विशिष्ट मताची किंवा दैवताची प्रतिष्ठ गातेवेळीं वेदांवरहि शिंतोडे टाकी, आणि कोणी वेदांची प्रतिष्ठा गाऊनहि त्याच्याबरोबर आपला आवडता विषय अभ्यासिला पाहिजे असें प्रतिपादी. येणेंप्रमाणें सर्वसामान्यपणें पूज्य बुद्धि जरी व्यक्त होत असे, तरी अनुयायी म्हणविणारांनींहि आपली बुद्धि श्रद्धेनें मंद होऊं न देतां वेदाविषयीं आपलें विचारस्वतंत्र्य कायम ठेवलें होतें असें दिसतें.

प्राचीन काळाकडे नजर फेंकण्यापूर्वीं आणि वेदविषयक वृत्ति शोधण्यापूर्वीं आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. ती ही कीं, ऋचांस, सामांस आणि यजूंस वेद हें नांव जरासें उत्तरकालींच मिळालें यासाठीं अत्यंत प्राचीन काळीं वेदांविषयीं भारतीयांचें मते पहावयाचें म्हणजे ऋचा, सामें व यजू यांविषयीचें त्यांचें मत पहावयाचें.

निरनिराळ्या काळीं भारतीयांच्या मनांत असलेली वेदाविषयींची भावना दाखविण्यासाठीं जे उतारे द्यावयाचे त्यांत अग्रस्थान वेदांचें महत्त्वस्थापन ज्या काळांत होत होतें त्या काळांतील वाक्यांस दिलें पाहिजे.

वेदांचें श्रेष्ठत्व वर्णावयाचा एक प्रकार म्हटला म्हणजे त्यांस श्रेष्ठ उत्पत्ति देणें. जगदुत्पत्तीबरोबरच वेदोत्पत्ति झाली अशा कल्पना वेदांतच दिसतात. ऋग्वेदाच्या पुरूषसूक्तांत असे वर्णिलें आहे कीं, सर्वात्मक अशा विराट् पुरूषास पशु करून त्याचा देवांनीं जो यज्ञ केला त्यापासून ऋचा, सामें, छंद व यजू उत्पन्न झाले (* तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे। छदांसि जज्ञिरे तस्मद्यजुस्तस्मादजायत). पुरूषसूक्ताखेरीज वेदांच्या उत्पत्तीविषयीं ऋग्वेदांत इतरत्र कोठेंहि उल्लेख आढळत नाहीं.

अथर्ववेदांत जगदाधारभूत एक स्तंभ (स्कंभ) आहे अशी कल्पना असून त्या स्तंभापासूनच वेद झाले असें म्हटले आहे. प्रथम जन्मलेले ऋषी, ऋचा, सामें व यजू ज्याच्या ठिकाणीं उत्पन्न होतात, विस्तीर्ण अशी पृथ्वी ज्याच्या आश्रयावर राहिली आहे व एक ऋषि ज्याच्या ठिकाणीं सर्वस्व अर्पण करून राहिला त्या (आश्रयीभूत) खांबाची (स्कंभाची) स्तुति कर. तो स्कंभरूप देव कोणता आहे बरें ? (* यत्र ऋषयः प्रथमजा ऋचः साम यजुर्मही एकर्षि यस्मिन्नर्पितः स्कंभं तं ब्रूहि कतमः स्विदेव सः). वेदांस स्कंभावयव करणारा अथर्ववेदांत दुसरा आणखी उल्लेख आहे तो असाः “ज्याच्या प्रेरणेनें ऋचा तासून नीट नेटक्या बनतात, यजु ज्याच्या इच्छेनें तयार होतात, सामें ज्याच्या शरीरावरचे केंस आहेत व अथर्वांगिरस ज्याचें मुख आहे त्या खांबाची स्तुति कर. तो खांब कोणता बरें?” (* यस्मादृचो अपातक्षन्यजुर्यस्मादपाकषन्। सामानि यस्य लोमान्यथर्वांगिरसो मुखं स्कंभं तं ब्रूहि कतमः स्विदेव सः) वेदांचें प्राचीनत्व दाखविण्यासाठीं अनादि अशा कालापासूनच वेद उत्पन्न झाल्याची कल्पना वेदांत आढळून येतेः कालापासून ऋचा व यजु उत्पन्न झाले (* कालादृचः समभवन्यजुः कालादजायत)

वेद व देवता यांचा अन्योन्याश्रय दाखविणें हा वेदमहतीगायनाचा दुसरा प्रकार होय. अथर्ववेदांत एके ठिकाणीं वर्णन आढळतें कीं, “तो इंद्र ऋचांच्यापासून झाला व त्याच्यापासून ऋचा झाल्या” (* स (इंद्र) वा ऋग्श्र्यो जायत तस्मादृचौऽजायन्त). वेदमहत्त्व स्थापन होऊन तेच उपमानभूत झालें आहेत असेहि पुरावे वेदांत आहेत. त्यांचें साहचर्य हवींस व यज्ञद्रव्यांस देऊन यज्ञद्रव्यांची महती गाइली आहेः- “ज्यांच्या योगानें ऋत्विज व यजमान यज्ञकर्में करतात त्या ऋचा व सामें यांचें हवींच्या सहवर्तमान मी यजन करतों. ऋचा व सामें हीं दोघें ‘सद’ नामक मंडपांत प्रकाशित होतात व नंतर देवांच्याकडे हवींसह अर्पिलीं जातात” (* ऋचं साम यजामहे याभ्यां कर्माणि कुर्वते । एते सदसि राजतो यज्ञं देवेषु यच्छतः)

वेदांनीं आमची हिंसा करूं नये म्हणून इंद्राची प्रार्थना बवि वगैरेंनीं केल्याचें वर्णन वेदांच आढळतेः ‘मी हवि ऋचेला प्रश्न विचारतों, मी ओज सामाला प्रश्न करतों, मी बल यजूला प्रश्न विचारतों; मी ज्या ज्या वेदाला प्रश्न विचारीन, तो तो वेद हे शचीपते इंद्र, माझी हिंसा न करो. (* ऋचं साम यदप्राक्षं हविरोजो यजुर्बलमू ।। एष मा तस्मान्मा हिंसीद्वेदः पृष्टः शचीपते)

“ज्या शिजलेल्या भातापासून अमृत उत्पन्न झालें, जो भात गायत्रीचा अधिपति झाला, ज्याच्या ठिकाणीं अनेक रूपांनीं युक्त असे वेद सांठविले गेले आहेत, त्या शिजलेल्या भाताच्या योगानें मृत्यूला ओलांडून आम्ही पलीकडे जाऊं,” अशा तर्‍हेचें अद्भुत प्रकारचें वेदांच्या विषयीचें वर्णन वेदांत दृष्टीस पडतें (* यस्मात्पक्कादमृतं संबभूव यो गायत्र्या अधिपतिर्बभूव । यस्मिन्वेदा निहिता विश्वरूपा, स्तेनौ  दनेनार्ति तराणि मृत्युम्)
 

पुढे वाचा:वेद आणि वेदस् या शब्दांचा ऋग्वेद व अथर्ववेद यांतील उपायोगाचें कोष्टक

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .