प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १ लें.
वेदांविषयीं भारतीय वृत्ति.

वेदवाङ्मयाचे तीन वर्ग:- आज ज्याला आपण वेद किंवा वैदिक वाङ्मय म्हणतो त्यांत तीन प्रकारच्या ग्रंथांचा अंतर्भाव होतो. प्रत्येक वर्ग कांहीं स्वतंत्र ग्रंथांचा झालेला आहे. परंतु या तीन वर्गांतील ग्रंथांची संख्या सारखी नाहीं. यांपैकीं कांहीं आज उपलब्ध आहेत, पण बरेच कालवश झालेले आहेत. हे तीन वर्ग येणेंप्रमाणेः-

(१) संहिताः- या शब्दाचा अर्थ संग्रह. यांत स्तोत्रें, प्रार्थना, मंत्रप्रयोग, आशीर्वादात्मक सूक्तें, यज्ञविधिसंबंधाचे मंत्र, अरिष्टशांत्यर्थ केलेल्या प्रार्थना, यांचा अंतर्भाव झाला आहे.

(२) ब्राह्मणें:- हीं ब्राह्मणें म्हणजे मोठमोठाले गद्य ग्रंथ आहेत. यांजमध्यें देवादिकांच्या कथा, यज्ञांसंबंधीं विचार, निरनिराळ्या ऋतूंतील क्रियांचें व्यवहरिक व आध्यात्मिक महत्त्व असला भाग येतो.

(३) आरण्यकें व उपनिषदेः- यांतील कांहीं ब्राह्मण ग्रंथांनां जोडलेलीं आढळतात, व कांहीं स्वतंत्र आहेत.

संहिता व ब्राह्मण हा जो ग्रंथिक भेद वर दिला आहे तो संचयांस मिळालेल्या नांवांवरून दिला आहे. संचयांस मिळालेलीं नांवें आंतील मजकुरावरूनच मिळालीं आहेत. मंत्र आणि ब्राह्मण हे दोन केवळ निरनिराळे संचय नाहींत; ते निरानिळे पदार्थ आहेत. मात्र संहिता अथवा मंत्र या जुडग्यांत कांहीं ब्राह्मण आलें आहे, तसेंच ब्रह्मण या संचयांत कांहीं मंत्र म्हणजे संहिता आली आहे. संहिता व ब्राह्मण हीं  नांवें ऋग्वेद व शुक्लयजुर्वेद यांच्या बाबतींत बरोबर आहेत. तेथें नांवानें ओळखला जाणारा संचय व आंतील पदार्थ यांचें ऐक्य आहे. तसें ऐक्य कृष्णयजुर्वेदच्या तैत्तिरीय, कठ, मैत्रायणीय, कापिष्ठल या शाखांत नाहीं.

उपनिषदांत व आरण्यकांत अरण्यांत राहणार्‍या  यति, संन्यासी वगैरे लोकांचे परमेश्वर, जगत् व मनुष्य या त्रयीसंबंधाचे विचार आहेत व भारतीयांचें प्राचीनतम तत्त्वज्ञान यांत सापडतें. वेदांचा शेवटचा भाग म्हणून व वेदकर्मापासून होणार्‍या अंतिम ज्ञानाचा संग्रह म्हणून यांस वेदांत हें सार्थ नांव मिळालें आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .