प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

शास्ते पुढारी झाल्यानें होणारे हितकर परिणाम.- वर सांगितलेल्या गोष्टींवरून हिंदुस्थानांत होणार्‍या निरनिराळ्या मालाच्या खपाच्या बाबतींत क्रांति घडवून आणण्याकरितां व लोकांच्या अभिरूचीस चांगलें वळण देण्याकरितां आणि त्यांनीं आपली राहणी सुधारून उच्च प्रकारची करावी यासाठीं सरकारला भारतीयत्वाचें पुट कसें चढविलें पाहिजे हें लक्षांत येईल. जर इंग्रज लोकांनीं हिंदुस्तानांतीलच वस्तू घेऊन एक नवीन हिंदी पोषाखाची पद्धति रूढ केली तर तिचा परिणाम लोकांमध्यें सामान्य अशी पोषाखाची पद्धति उत्पन्न करण्याच्या कामीं होईल. अशा पद्धतीचा दोन तर्‍हेनें परिणाम होईल. लोकांमधील अनुकरणाची इच्छा आपलें कार्य करील आणि यामुळें हा प्रतिष्ठित समजला जाणारा पोषाख स्वीकारण्याची सर्व हिंदुस्थानांत प्रवृत्ति होईल. शिवाय हा पोषाख लोकांच्या परंपरेला सोडून नसून उलट तींत सुधारणा होऊन बनलेला असल्यामुळें त्यांस तो अप्रिय होणार नाहीं. दुसरें, ब्रिटिश लोकांस निरनिराळ्या प्रांतांतील पोषाख करण्यास तितकें अवघड वाटणार नाहीं; त्यांनां आज मराठी, उद्यां बंगाली तर परवां गुजराथी पोषाख करतां येईल, कारण त्यांच्या मनांत कोणत्याच विशिष्ट पोषाखाबद्दल विशेष आत्मीयभावना उत्पन्न झालेली नसणार; आणि याचा परिणाम असा होईल कीं, आज निरनिराळ्या प्रांतांत जे निरनिराळ्या जातींचे निरनिराळे पोषाख आहेत ते सर्वच कांहीं दिवसांनीं राष्ट्रीय पोषाख बनतील. आज जर एखाद्या महाराष्ट्रीय अथवा बंगाली गृहस्थानें आपला स्वतःचा पोषाख टाकून देण्याचें मनांत आणलें तर तो इंग्रजी पोषाखाचाच स्वीकार करतो. परंतु वर दाखविल्याप्रमाणें स्थिति पालटली असतां एका प्रांतांतील मनुष्यास दुसर्‍या कोणत्याहि प्रांतांतील पोषाख स्वीकारणें जड वाटणार नाहीं. यामुळें हिंदुस्थानांतील पोषाखाच्या धाटणींत वरचेवर फरक होत जाईल व त्यांत नवीन नवीन टुमी निघत जातील.

याबरोबरच आणखीहि एक फायदा होईल. जर हिंदुस्थानांत आलेल्या इंग्रज लोकांनीं हिंदी पोषाखाचा स्वीकार केला तर इंग्रजांखेरीज इतर यूरोपीय लोकहि तसेंच करतील. पुष्कळ अमेरिकन व यूरोपियन आपल्याकडे देश पाहण्याच्या हेतूनें आले म्हणजे त्यांनां आपल्या कडील पोषाख विकत घ्यावे असें वाटूं लागेल.

सध्यांचा अँग्लोइंडियन लोकांचा पोषाख सौंदर्याच्या दृष्टीनें चांगला नाहीं. हिंदुस्थानांत राहणार्‍या इंग्रज स्त्रियांच्या पोषाखांतहि फरक होणें जरूर आहे. यूरोपियन लोकांसहि पुष्कळ वेळां आपल्या पोषाखांत कांहींतरीं फरक केला पाहिजे असें वाटूं लागतें. परंतु व्यक्तिशः कोणताहि सामान्य इंग्रज देशी पोषाख करूं शकत नाहीं किंवा पोषाखाची एखादी नवीन तर्‍हा शोधून काढूं शकत नाहीं. पोषाखांतील कोणत्याहि नवीन धाटणीचा उगम नेहमीं उच्च वर्गापासूनच होतो. तेव्हां वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनींच हें काम हातीं घेतलें पाहिजे. या गोष्टीचें आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्टींनीं फार महत्त्व आहे.

या देशांत राहणार्‍या यूरोपीय समाजापुढें या आमच्या त्यांजसंबंधाच्या अपेक्षा स्पष्टपणें मांडण्याचा परिणाम काय होतो हें आपणांस पाहिलें पाहिजे. हिंदू लोकांनीं इंग्रजांस आपल्या अवास्तव कल्पना बाजूस ठेवून येथील परिस्थितीस अनुकूल असा जरा सुधारलेला पोषाख करण्याची सल्ला दिली पाहिजे.

हिंदुस्थानांतील इंग्रजांचें स्वरूप थोडेंसें हिंदी बनलें म्हणजे परकीय रुचिवैचित्र्यामुळें उत्पन्न होणारे दोष नाहींसे होतील व हिंदुस्थानांत एकरूपता येण्यास मदत होईल. यामुळें परस्परांतील स्पर्धेस चांगलें वळण लागेल. हे सर्व बदल घडून आले म्हणजे त्यांचा परिणाम राष्ट्रीय आर्थिक स्थितीवर झाल्यावांचून रहावयाचा नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .