प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

समाजांतील जबाबदार वर्ग व त्यांचीं कर्तव्यें.- आपला भविष्यकाल उज्जवल व्हावा याकरितां समाजांतील निरनिराळ्या वर्गांनीं आपणांवरील जबाबदारी ओळखली पाहिजे. या जबाबदारीच्या दृष्टीनें समाजाचे आपणांस तीन वर्ग करतां येतील. कामकरी, पुढारी व सरकार हे ते तीन वर्ग होत. समाजाच्या पुढार्‍यांचें, सरकाराचें आणि व्यक्तिशः कामकर्‍यांचें या बाबतींतील कर्तव्य काय आहे याबद्दल येथें दोन शब्द सांगणें अवश्य आहे. लोकांची सामाजिक व आर्थिक उन्नति व्हावयाची ती निरनिराळ्या व्यक्तींनीं आपापली उन्नति करून घेण्याचा स्वतंत्र प्रयत्‍न केल्यानें जो एक संयुक्त परिणाम होतो त्यामुळें व लोकांनीं संघटित प्रयत्‍न केल्यामुळें होते. जनतेनें एकमतानें स्वतः होऊन अथवा सरकारच्या मदतीनें अशा तर्‍हेची परिस्थिति उत्पन्न करावी कीं, प्रत्येक व्यक्तीला तिच्या समाजांतील स्थानापासून अधिकतम हित साधून घेतां यावें आणि एकंदर समाजाच्या हितास शक्य तितकी मदत करतां यावी. सरकारला व व्यापार्‍यांच्या मंडळांसारख्या खासगी मंडळांनां बहुतेक सारखेंच काम करावयाचें असतें. दोघांसहि व्यक्तीच्या प्रयत्‍नास उत्कृष्ट मोबदला मिळेल अशी तजवीज करावयाची असते. मनुष्यानें आपल्या बुद्धीचा कितीहि उपयोग केला तरी त्याला फळ येणें कांहीं अंशीं परिस्थितीवर अवलंबून असतें.

मनुष्याला लागेल ती योग्य संधि कांहीं स्वतः होऊन आणतां येत नाहीं किंवा त्याला परिस्थितीमध्यें वाटेल तो बदल करतां येत नाहीं. त्याचा हातांत फक्त कोणत्याहि कलेंत प्राविण्य मिळविणें, आपणास योग्य अशा धंद्याची निवड करणें आणि प्रामाणिकपणानें व मेहनतीनें काम करणें एवढ्याच गोष्टी असतात. त्याला समाजाची कोठें चूक होत आहे अथवा समाज नागरिकांनां योग्य संधि मिळण्याच्या कसा आड येत आहे इत्यादि गोष्टी नागरिक या नात्यानें दाखवितां येतील. यापेक्षां जास्त त्याला कांहीं करतां यावयाचें नाहीं. प्रत्येक मनुष्यास स्वतःच्या पोटाचा धंदा चालवून समाजसुधारणेचें, धर्मप्रचाराचें अथवा अशाच एखाद्या चळवळीचें काम करतां यावयाचें नाहीं. समाजांतील पुढार्‍यांनीं व सरकारनें आर्थिक प्रगतीमध्यें अडथळा करणार्‍या ज्या कांहीं गोष्टी असतील किंवा ज्यांच्यामुळें मनुष्याच्या संपत्ति मिळविण्याच्या मार्गांत अडथळा येत असेल त्या दूर करण्याची खटपट केली पाहिजे. मनुष्यानें परिस्थितीचा फायदा घेण्याचा व परिस्थित्यनुरूप आपलें काम करण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. परंतु त्याला आपल्या स्थितीमध्यें एकदम फार मोठा फरक करणें भाग पडूं नये. त्याच्याकडून अशक्य अशी गोष्ट घडवून आणण्याची समाजानें अपेक्षा करतां कामा नये. कधींकधीं सभोंवतालच्या परिस्थितीमध्यें समाजानेंच फरक घडवून आणणें जरूर असतें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .