प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.

चातुर्वर्ण्य बिघडतें कसें.?- अशी कल्पना करा कीं, चातुर्वर्ण्यक्त समाज आज आहे आणि प्रत्येक वर्णास त्याच्या कर्मानुसार संस्कार घडत आहेत. अशा प्रकारच्या समाजाचें चातुर्वर्ण्य कशानें बिघडेल हें पाहूं.

ज्यानें चातुर्वर्ण्य बिघडणें अत्यंत स्वाभाविक आहे असें एक कारण प्रत्येक समाजांत असतें तें हें कीं, मनुष्याची कर्तृत्वशक्ति त्याच्या कुलावर म्हणजे त्याच्या बापाच्या संस्कारावर अवलंबून नसते. या कारणामुळें चातुर्वर्ण्य बिघडूं द्यावयाचें नसेल तर दोन गोष्टी अवश्य आहेत.

(१) संस्कार वर्णानुरूप असून वर्ण गुणकर्मावरच अवलंबून पाहिजे.
(२) वर्णनिर्णयार्थ (म्हणजे गुणकर्मनिर्णयार्थ) इतिहासापेक्षां प्रत्ययास म्हणजे सद्यःकालीन प्रत्ययास अधिक महत्त्व पाहिजे.

या दोन तत्त्वांची अंमलबजावणी कशी काय होईल तें आपण पाहूं.

चारहि वर्णांस जे संस्कार सांगितले आहेत त्यांत अनेक संस्कार असे आहेत कीं, ते मनुष्यानें आपलें आयुष्यांतील कर्म सुरू करण्यापूर्वींच करावे लागतात. उदाहरणार्थ उपनयन. हा उपनयनाचा संस्कार म्हणजे अध्ययनप्रारंभाचा संस्कार होय. अध्ययनास प्रारंभ तर बाल्यांतच करणें भाग आहे, आणि व्यक्तीचें आयुष्यांतील भावी कार्य जर अनिश्चित असणार तर त्यास कोणत्या वर्णाचा संस्कार करावा? ब्राह्मणाचे संस्कार करावे तर तो पुढें शुद्रकर्म करणार नाहीं कशावरून? अर्थात् अशा प्रसंगीं एक कल्पना गृहीत धरावी लागते ती ही कीं, बाप जें कर्म करीत आहे तेंच मुलगा करणार. व यावरून असा निर्णय करितात कीं, बापाजो संस्कारविषयक अधिकार आहे तोच मुलाचा आहे. असा संस्कारविषयक निवाडा करितांना आपण जें गृहीत धरतों तें खरें असतेंच असें नाहीं. बाप जें कर्म करतो तें मुलगा करीलच आणि बापांत जे गुण असतात ते मुलांत असतीलच असें नेहमींच कोठें शक्य आहे? वर्णविषयक शिक्का अगोदर मिळतो, आणि कर्म कोणतें करावयाचें हें मागाहून ठरतें. हीच क्रिया पिढ्यान् पिढ्या चालून गुणक्रियेमुळें होणारे वर्ण आणि संस्कारामुळें होणारे वर्ण हे एक न राहतां भिन्न होऊं लागतात. कार्यभिन्नत्वमूलक चातुर्वर्ण्य आणि संस्कारभिन्नत्वमुलक चातुर्वर्ण्य यांची असंगति होणें म्हणजे चातुर्वर्ण्य बिघडणें आणि चातुर्वर्ण्यसंरक्षण करणें म्हणजे अशी असंगति न होऊं देणें.

समाजांतील पदवी वर्णानुरूप असणार आणि वर्ण जर केवळ गुणकर्मानुरूप असला पाहिजे तर वर्णनिर्णय करण्यासाठीं इतिहासाचें प्रयोजन काय? कर्म तर प्रत्यक्ष अवलोकनानें ओळखतां येतें,  मग इतिहासाचा द्राविडी प्राणायाम कशाला? शिवाय इतिहास फार तर प्रस्तुत व्यक्तीचे पूर्वज काय करीत होते हें सांगणार. वर्ण जर गुणकर्मावर तर पूर्वजांशीं काय करावयाचें आहे? ही वर्णनिर्णयार्थ एक दृष्टि झाली आणि तत्त्वतः चातुर्वर्ण्याचें ध्येय हेंच आहे कीं, प्रत्यक्ष व्यवहारांत दृश्य होणार्‍या वर्णांप्रमाणें समाजाचें वर्गीकरण असावें. तथापि वर्णनिर्णयार्थ इतिहासाचा उपयोग आपणांस वारंवार होतांना दिसतो; तर मग याचें कारण काय?

कारण एवढेंच कीं, वर्णनिर्णयप्रसंगाशीं समकालीन असेल तेवढीच वस्तुस्थिति वर्णनिर्णयार्थ लक्षांत घेतली असतां घोंटाळे फार होण्याचा संभव आहे. वर्ण म्हणजे एक प्रकारची संपत्ति आहे. त्या संपत्तीस देखील अधिकारी शोधावा लागतो. केवळ प्रत्यक्षानें वर्णनिर्णय करावयास लागलें असतां ‘ज्याच्या हातीं ससा तो पारधी’ हा नियम अवलंबावा लागणार. एखादा दुसर्‍याचें नांव धारण करून संपत्तीचा उपभोग घेत असला म्हणजे त्यास मालक म्हणणें योग्य होणार नाहीं हें कोणीहि सांगेल; पण केवळ तत्कालीन प्रत्यक्षावरच भिस्त ठेवली तर त्यासच मालक म्हणावयाचा प्रसंग येणार. अर्थात् जें आज आहे तें सर्व धर्म नव्हे. त्याचेंहि नियंत्रण धर्मानें झालें पाहिजे, नाहीं तर अपहार योग्य होईल. जी गोष्ट द्रव्यापहारास लागू आहे तीच राज्यापहारास लागू आहे. क्षत्रियत्वहि केवळ राज्यापहरणावर अवलंबून नाहीं. राजाचा राज्यावर हक्क असल्या शिवाय तो खरा राजा नाहीं तसा क्षत्रियहि नाहीं अशी साधारणतः लोकांची विचारसरणी असते. अर्थातच केवळ प्रत्यक्ष हें तत्त्व सोडलें म्हणजे इतिहासाचा प्रश्न आला. आणि ऐतिहासिक पद्धतीनें अमक्या वर्णांत हा जन्मला म्हणून त्याचा वर्ण अमुक हें तत्त्व आलें म्हणजे गुणकर्मानेंच वर्ण ठरवायाचा हें तत्त्व आलें म्हणजे गुणकर्मानेंच वर्ण ठरावयाचा हें तत्त्व मागें पडलेंच.

वर्ण जर गुणकर्मावर ठरवावयाचा असेल तर अर्थात् व्यक्तींच्या पूर्वजांच्या इतिहासास गौण स्थान दिलें पाहिजे आणि केवळ अपहारात्मक प्रवृत्ति टाळण्यापलीकडे न जाईल अशा तर्‍हेची सद्यःकालीन स्थितीची आणि इतिहासाची कांहींतरी तोंडमिळवणी केली पाहिजे.

चातुर्वर्ण्याचा बिघाड होण्याचें स्वाभाविक नित्य कारण वर सांगितलें. तथापि त्याचा बिघाड होण्यास दुसरीं कित्येक कारणें प्रसंगीं उत्पन्न होतात, व झालीं आहेत.

एक तर ब्राह्मणांकडे आणि त्यांनीं दिलेल्या संस्कारांकडे दुर्लक्ष करण्यास उपदेशिणारीं मतें वारंवार प्रस्तृत होतात. आणि त्यामुळें असें होतें कीं, त्या मताचां प्रसार ज्या लोकांत म्हणजे विशेषेंकरून ब्राह्मणेतरांत होतो त्यांचे संस्कार नष्ट होतात. याचा परिणाम असा होतो कीं, जे लोक क्षत्रिय किंवा वैश्य वर्णाचे असतात त्यांचे संस्कार नष्ट झाल्यामुळें ते शूद्र वर्णाचे ठरतात. ज्या अनेक क्षत्रिय जाती ब्राह्मणांच्या अदर्शनानें शूद्र झाल्या त्यांपैकीं कांहींची यादी मनुस्मृतींत दिली आहे. बौद्ध व जैन हे संप्रदाय देशांत कांहीं काळ पसरल्यामुळें असा परिणाम झाला कीं, जनतेमध्यें जे क्षत्रिय आणि वैश्य होते ते शूद्र बनले. त्यांस पुन्हां संस्कार करून क्षत्रिय किंवा वैश्यपद देण्याचें काम समाजाकडून झालें नाहीं. म्हणजे व्रात्यस्तोमादि विधी वापरले गेले नाहींत.

चातुर्वर्ण्याचा बिघाड होण्यास दुसरें कारण झालें तें असें. परदेशांहून आलेल्या शक-यवन-पल्हावादि बर्‍याच जाती व राष्ट्रे यांनीं देश काबीज केला. जुनी राजघराणीं त्यामुळें नष्ट झालीं आणि नव्या राजघराण्यांनीं देश जिंकला. या जेत्यांनीं प्रथम संस्कारांची पर्वा केली नसावी किंवा त्यांस ते संस्कार मिळाले नसावेत.

ज्या राष्ट्रांच्या किंवा राजघराण्यांच्या मागें त्यांचे स्वतःचे धर्मोपाध्याय नव्हते तीं राष्ट्रें किंवा राजघराणीं देशांत आल्यानंतर कालांतरानें त्यांचे आचारविचार देशांतल्या लोकांसारखेच झाले आणि ते जनतेंत मिसळून गेले. कित्येक प्रथम बौद्धांचे अनुयायी झाले. व कित्येकांनीं कालान्तरानें हरिहरादि देश्य उपास्यें स्वीकारलीं ही गोष्ट देवदत्त भांडारकरांनीं नजरेस आणली आहे. चातुर्वर्ण्यांत त्यांनां प्रसंगीं क्षत्रियांचेंहि स्थान मिळालें, म्हणजे ते आपणांस क्षत्रिय म्हणवून घेऊं लागले. अशा रीतीनें बिघडलेलें चातुर्वर्ण्य पुन्हां कसेंबसें स्थापित होई; तथापि राजे जेव्हां समाजबाह्य असतात तेव्हां राजत्व आणि क्षत्रियत्व यांची असंगति होते आणि चातुर्वर्ण्य बिघडावयास त्यांचें बाह्यत्व कारण होतें हें वरील हकिकतीवरून उघड होतें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .