प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.

चातुर्वर्ण्यसंरक्षण हा आपला प्रथमधर्म होय.- सामाजिक प्रश्नांवर जो विचार देशांत उत्पन्न होतो त्यांत सर्व समाजाच्या घटनेसंबंधाचा म्हणजे सध्यांची घटना कायम राखावी अगर बदलावी यासंबंधाचा विचार सर्वांत महत्त्वाचा होय. जातिभेद मोडावा किंवा राखावा म्हणून सुधारकउद्धारकांडून होणारा विचार याच स्वरूपाचा आहे. वर्णाश्रमधर्मासंबंधानें होणारा विचार हा देखील घटनाविषयकच आहे.

कायद्यासंबंधाच्या शास्त्रांत सामान्यतः अलीकडचे पाश्चात्त्य शास्त्रज्ञ शासननियमांचे दोन वर्ग करतात. पहिल्या वर्गास सोईकरितां आपण “प्रथमधर्म” असें म्हणूं. या प्रथमधर्मांत सर्व समाजास लागू असणारा व जो बदलण्याचा समाजाच्या शास्त्यांस अधिकार नाहीं किंवा जो बदलणें समाजास फारसें शक्य नाहीं, अशा प्रकारच्या कायद्याचा अंतर्भाव होतो. दुसर्‍या प्रकराचा कायद्यासंबंधानें असें बंधन असतें कीं, प्रथमधर्मानें ज्या मर्यादा घालून  दिल्या असतात त्या मर्यादेंत याचे नियम असले पाहिजेत. या भेदाच्या स्पष्टीकरणार्थ आपण आधुनिक व्यवहारांतील एक उदाहरण घेऊं. म्युनिसिपालिट्यांचे अधिकार सरकारनें म्युनिसिपालिट्यांसंबंधानें जो कायदा केला आहे त्यानें नियमित होतात. म्युनिसिपालिट्यांनीं नगरशासनासंबंधानें जे नियम करावयाचे ते सरकारी कायद्यानें घालून दिलेल्या मर्यादेंत केले पाहिजेत. त्यांचा अतिक्रम नगरच्या अधिकारी वर्गानें करतां कामा नये. असें असल्यानें सरकारनें म्युनिसिपाट्यांच्या अधिकारासंबंधानें केलेला कायदा हा म्युनिसिपालिटींत काम करणारांचा प्रथमधर्म झाला.

हा प्रथमधर्म नेहमीं शब्दांनीं व्यक्त केलेला असतो असें नाहीं; तर लोकांनां स्वाभाविकपणें त्या प्रथमधर्माचीं तत्त्वें मान्य असतात, आणि त्यांचा अतिक्रम करणें बरें वाटत नाहीं. जेथें लोकसत्ता नाहीं व राजा जेथें पूर्णपणें स्वतंत्र आहे अशा ठिकाणचा राजा देखील कांहीं नियमांचें मला उल्लंघन करतां येणार नाहीं असाच बाणा बाळगील. ब्रिटिश साम्राज्यांत “राजा व पार्लमेंट” ही जोडी सर्वाधिकारी सत्ता आहे. तथापि पार्लमेंट करीत तो कायदा असें इंग्रजांचें कायद्यासंबंधानें तत्त्व असतांहि इंग्रजी पार्लमेंटला असें वाटतें कीं, ख्रिस्ती संप्रदायाचीं आदितत्त्वें आपल्या इच्छेपेक्षां अधिक आदरणीय आहेत व त्यांचा आपल्याकडून अतिक्रम होऊं नये. मागें एकदां मृत पत्‍नीच्या बहिणीबरोबर लग्न करण्यास लोकांस परवानगी द्यावी असें इंग्रज राष्ट्राचें मत झालें; त्या वेळेस अशी लग्नें करूं देणें हें ख्रिस्ती धर्मशास्त्राप्रमाणें म्हणजे ख्रिस्तीसंप्रदायान्तर्गत लोकशासनाचीं तत्त्वें जीं आहेत त्यांस अनुसरून कायदेशील आहे कीं नाहीं याविषयीं वादविवाद सुरू झाला, आणि त्यासंबंधानें तज्ज्ञांचीं मतें गोळा करणें इंग्रज राष्ट्रास अवश्य झालें. अर्थात् ख्रिस्ती संप्रदायाचीं आदीतत्त्वें हीं इंग्रज राष्ट्राचा “प्रथमधर्म” होत असें यावरून दिसतें.

हिंदुधर्मशास्त्रांत देखील “प्रथमधर्म” आहेच. एका गृहस्थास मुलका नसतां त्याची इस्टेट मुलीनें घ्यावी अगर पुतण्यानें घ्यावी यासंबंधाचे नियम धर्मविषयक भिन्न ग्रंथांत भिन्न असणें शक्य आहे व ते तसें आहेतहि; राजा आणि धर्मशास्त्रावरील ग्रंथकार यासंबंधानें लोकप्रवृत्ति पाहून किंवा स्वेच्छेनें भिन्न पद्धती अमलांत आणण्याचा प्रयत्‍न करतील; तथापि अशीं धर्मतत्त्वें अनेक आहेत कीं त्यांस गुंडाळून ठेवावें आणि तसें करण्याचा आम्हांस अधिकार आहे, असें सहसा कोणी जबाबदार शासक म्हणूं शकणार नाहीं. धर्मशास्त्रपंडित देखील ग्रंथांत व्यक्त झालेल्या तत्त्वांपैकीं कांहीं तत्त्वें अधिक आदरणीय आणि कांहीं कमी आदरणीय आहेत असें समजतो आणि अधिक आदरणीय तत्त्वांस बुद्धया बाजूस सारावें असें म्हणत नाहीं. त्यास असें वाटतें कीं काहीं धर्मतत्त्वें समाजानें पाळलींच पाहिजेत आणि कांहींच्या पालनासंबंधानें समाजास विकल्प म्हणजे स्वयंनिर्णायक अवकाश आहे.

चातुर्वर्ण्यसंरक्षण हें असें तत्त्व आहे कीं, तें तत्त्व पाळलेंच पाहिजे असें कोणाहि धर्मशास्त्रपंडितास वाटेल. तो चातुर्वर्ण्यसंरक्षण म्हणजे काय हें समजून बोलेल असें नाहीं, तर परंपरेनें सोंवळ्या झालेल्या शब्दांनीं अर्थबोध काय होतो याचा विचार न करतां पण शब्दांचें महत्त्व भासून बोलेल. कां कीं, चातुर्वर्ण्यसंरक्षण करण्यासंबंधानें सर्व धर्मशास्त्रावरील ग्रंथांत व नीतिशास्त्रावरील ग्रंथांत वचनें आहेत आणि त्यासंबंधानें राजे लोकांस ग्रंथकारांनीं आदेश केला आहे. वेद हे आपणांस धर्मशास्त्राचे मान्य आदिग्रंथ आहेत हें तत्त्व प्रत्येक धर्मशास्त्रज्ञास जितकें मान्य आहे, तितकेंच जवळ जवळ चातुर्वर्ण्यसंरक्षणाचें तत्त्वहि त्यास मान्य आहे, व इतर सर्व बाबतींतील धर्मनियम चातुर्वर्ण्यसंरक्षणास जुळते करून घ्यावेत अशी धर्मशास्त्रकारांची प्रवृत्ति आहे. बौद्धादि वेदविरुद्ध संप्रदायांनीं देखील चातुर्वर्ण्य मान्य केलें आहे. मुंजांचीं वयें काय असावीं? मुंजानें जानवें कशा प्रकारचें घ्यावें? दंड कसल्या लांकडाचा घ्यावा? धंदा कोणता करावा? लग्न कोणाशीं करावें? सुतक किती दिवस पाळावें? एका पुरुषाच्या अनेक वर्णाच्या स्त्रिया असल्या तर त्यांच्य संततीस हक्क कशा प्रकारचे असावेत? कोर्टांत शपथ घ्यावयाची ती कोणीं कशी घ्यावी? लोकांनीं  एकमेकांचें स्वागत कसें करावें? इत्यादि गोष्टींसंबंधानें जे धर्मशास्त्रकारांचे नियम आहेत ते चातुर्वर्ण्यसंरक्षणाच्या तत्त्वानुरूप आहेत.

अर्थात् चातुर्वर्ण्य हा “प्रथमधर्म” आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं, आणि चातुर्वर्ण्य ज्याच्या योगानें बिघडेल असें करणें योग्य होणार नाहीं. चातुर्वर्ण्यास प्रथमधर्म समजण्यास मुख्य साधक गोष्ट म्हटली म्हणजे चातुर्वर्ण्यविचाराचें अत्यंत प्राचीनत्व ही होय. चातुर्वर्ण्य हें सनातन आहे.

चातुर्वर्ण्याची कल्पना म्हणजे समाजांत कर्मपृथक्त्वामुळें चार वर्ग झाले आहेत ही कल्पना अत्यंत जुनी आहे. वेदपूर्व कालामध्यें म्हणजे जेव्हां वेददृष्ट्या ऋषींचे पूर्वज आणि इराणी व यूरोपियन लोकांचे पूर्वज एकत्र होते त्या कालीं देखील ती होती असें अनुमान काढण्यास जागा आहे. जुन्या ग्रीक ग्रंथांत चार भेदांचा उल्लेख केलेला आहे आणि हे चार भेद म्हणजे काय आहेत, हे धंद्यावरून पडले आहेत अगर हे चार वंश म्हणजे जाती आहेत कीं काय, असा वादविवाद तेथें उपस्थित केला आहे. “अवेस्ता” मधील अथर्वणादिक चार वर्गांचा उल्लेख तर सुप्रसिद्ध आहे. याप्रमाणें वेदकालापूर्वींपासूनची ही कल्पना आहे, म्हणून हिला सनातन म्हणण्यास हरकत नाहीं.

चातुर्वर्ण्याच्या कल्पनेस जितकें सनातनत्व आहे तितकें सनातनत्व धर्मशास्त्रांतील दुसर्‍या कोणत्याहि सामाजिक नियमास असलेलें दृष्टीस पडत नाहीं. श्रुतींत अनेक रीतीभातींचा आणि अनेक संस्थांचा उल्लेख आहे, म्हणजे वेदकालांत अनेक संस्था व रीतीभाती ठरल्या होत्या; पण आज त्या रीतीभातींपैकीं आणि संस्थांपैकीं अनेक नष्ट झाल्या आहेत. वेदोत्तरकालांत व्यवहारनियम बदलले, भोजनाचे पदार्थ बदलले, कालगणनापद्धति बदलली, वजनेंमापे बदललीं, परमार्थाचे मार्ग अगर साधनें बदललीं, लग्नव्यवहाराच्या रीतीभाती बदलल्या, शासनसंस्था बदलल्या, आयुष्याचा हेतु काय, मनुष्याचें कर्तव्य काय इत्यादिविषयींचे सिद्धान्तहि बदलले, अभ्यासविषय बदलले; पण एक गोष्ट स्थिर राहिली. चातुर्वर्ण्यसंरक्षण केलें पाहिजे ही कल्पना तेवढी स्थिर राहिली आणि यामुळें सनातन या पदवीस योग्य असें जर कांहीं असेल तर ती चातुर्वर्ण्याची कल्पना होय.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .