प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

संस्कृतींचें ऐक्य.- जेव्हां आम्ही सर्व जगांतील संस्कृतीच्या ऐक्याची कल्पना करतों तेव्हां सर्व जग अगदीं एकसारखेंच होईल असें आमचें म्हणणें नसतें. कारण तसें होणें अगदींच अशक्य आहे. कारण निरनिराळ्या देशांतील नैसर्गिक परिस्थितीच पुष्कळ भिन्न असते. तथापि निरनिराळ्या संस्कृतींच्या सन्निकर्षामुळें एक तर्‍हेची सामान्य संस्कृति उत्पन्न होणें शक्य आहे. निरनिराळ्या ठिकाणच्या व राष्ट्रांच्या संस्कृतींची वाढ होत असतांना जी एका संस्कृतींत उणीव असेल ती दुसर्‍या संस्कृतींतून भरून निघण्याचा संभव आहे. पूर्ण कार्यक्षम पद्धति आणि कला यांच्या पुढें अर्धवट कार्यक्षम पद्धतींचा आणि कलांचा टिकाव लागणार नाहीं.

संस्कृतीचें एक अंग असें आहे कीं, त्यामध्यें इतरांपेक्षां लवकर ऐक्य होण्याचा संभव आहे आणि त्याचा परिणामहि इतर अंगांवर होण्यासारखा आहे. हें अंग म्हटलें म्हणजे जगांतील ज्ञान आणि विचार हें होय. या बाबतींतील मुख्य तत्त्व म्हणजे सत्यें परस्परविरुद्ध असूं शकत नाहींत हें होय. या एकीकरणाच्या बाबतींत बरीचशी प्रगति आजच झाली आहे. पाश्चात्त्य देशांत वाढलेलीं बरींचशीं शास्त्रें पौरस्त्य देशांनीं उचललेलीं आहेत. यूरोपियन रसायनशास्त्रापेक्षां निराळें असें पूर्वेकडील रसायनशास्त्र असूं शकणार नाहीं, दोन परस्परविरुद्ध गोष्टी प्रतिपादन करणारीं निरनिराळीं पदार्थविज्ञानशास्त्रें असूं शकणार नाहींत, हें आतां सर्वांस पटलें आहे.

तथापि आजहि निरनिराळ्या लोकांच्या कल्पनांमध्यें आणि समजुतींमध्यें बराच विरोध असतो. हा विरोध बहुधा ज्या गोष्टींत सत्य अज्ञात असतें अशा बाबतींत असतो. या विरोधाचें स्वरूप विशेषतः परमार्थविषयक कल्पनांमध्यें दिसून येतें. सुशिक्षित हिंदूंच्या या बाबतींतील विचाराचा प्रसार केल्यास हा विरोध आणि त्यापासून उत्पन्न होणारा द्वेष बराचसा कमी होईल.

मतें आणि उपास्यें याबद्दल सुशिक्षित हिंदू लोकांच्या कल्पना येणेंप्रमाणें आहेत. ईश्वर ही अनंतत्वाची कल्पना असल्यामुळें त्याचें वास्तविक ज्ञान होणें शक्य नाहीं. एखाद्या आकस्मिक व चमत्कृतिजनक आविष्करणानें या अनंतत्वाचें सामर्थ्य, अद्भुतता वगैरे एखाद्या अंगाच्या रूपानें कांहींसें ज्ञान होतें. एखाद्या मनुष्यानें या शक्तीच्या एकाच दृश्य स्वरूपाचा अभिमान बाळगून बाकीच्या स्वरूपांकडे दुर्लक्ष करणें अयोग्य आहे. तेव्हां उपासनेच्या सर्व प्रकारांनां मुभा असावी. उपासकाची ईश्वराबद्दलची कल्पना जर विस्तृत झालेली असेल तर त्यानें कोणत्याहि देवतेची उपासना केली तरी हरकत नाहीं. एक देवता काढून टाकून तिच्या ठिकाणीं दुसरी देवता स्थापन करण्याचें कारण नाहीं. कारण, ईश्वराबद्दलची अनंतत्वाची आणि केवलत्वाची कल्पना शिव, विष्णु, दुर्गा अथवा बुद्ध यांपैकीं कोणत्याहि नांवांनीं ओळखली गेली तरी हरकत नाहीं. मनुष्य सूर्याची, बृहस्पतीची, शनीची अथवा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीची उपासना करतो किंवा एखादा साधु अथवा गंगेसारखी नदी किंवा ज्या एखाद्या वस्तूबद्दल त्याला भीति किंवा आदर वाटेल अशी एखादी वस्तु यांपैकीं कोणाची उपासना करतो या गोष्टीस कांहीं महत्त्व नाहीं. हीं सर्व दैवतें अथवा ईश्वराचीं बाह्य स्वरूपें या फक्त उपासनेमधील आरंभींच्या पायर्‍या आहेत. मनुष्याच्या मनाची जोंपर्यंत उच्च कल्पनांचा स्वीकार करण्याइतकी तयारी झाली नाहीं तोंपर्यंत त्याचा सगुण दैवतावरील विश्वास उडविणें मूर्खपणाचें होईल. ईश्वर सर्वत्र असून एकच आहे हीच कल्पना ईश्वराच्या बाबतींत नेहमीं टिकाव धरून राहूं शकेल. परंतु ही कल्पना मनांत ठसणें फार कठिण आहे. कारण ही कल्पना समजून घ्यावयाची म्हणजे मनुष्याला फार कठिण आणि गूढ असे नियम, अत्यंत  दुर्बोध तत्त्वें आणि अतिशय अमूर्त कल्पना व त्यांचें एकीकरण यांचें ज्ञान व्हावें लागतें. या तर्‍हेच्या अद्वैताची कल्पना पूर्ण बाणली म्हणजे मनुष्याचा पापपुण्याबद्दलच्या कल्पनांवरील विश्वास नाहींसा होईल आणि अशा वेळीं जर त्याच्या मनाची चांगली तयारी झाली नसेल तर त्या मनुष्याचें व त्याच्या समाजाचें अहित होईल.

दिवसेंदिवस जगाची प्रवृत्ति अशी दिसते कीं, समाजघटनेच्या बाबतींत मत अथवा उपास्य याला कमी महत्त्व द्यावयाचें. पुढें मागें सर्व जगाचा एक समाज होईल. मनुष्यांच्या नैतिक कल्पना एकसारख्या होत जातील. बर्‍याचशा चालीरीती सारख्याच होतील. जगांतील बुद्धिमान् लोकांकडून हिंदुस्थान, अरबस्थान व जूडिया या देशांत होऊन गेलेल्या महात्म्यांस कमी अधिक प्रमाणानें सर्वत्र मान मिळत जाईल. परलोक आणि अगम्य वस्तूंबद्दलच्या कल्पना हीं केवळ मतें म्हणून समजलीं जातील. त्यांनां तत्त्वें म्हणून सर्वांनीं मान्य केलींच पाहिजेत असें कोणी प्रतिपादणार नाहीं. या मतांच्या बाबतींत हिंदुस्थानांत जें स्वांतत्र्य आजपर्यंत चालत आलें आहे तें पुढें सर्वानांच राहिल. निरनिराळ्या देशांतील धार्मिक चालीरीती तशाच चालू राहतील, पण त्या केवळ पूर्वींपासून चालत आलेल्या आणि परंपरागत म्हणून मौजेकरितां राहतील. अशा रीतीनें ज्याकरितां हिंदुसमाजाची स्थापना झाली ती क्रीया हळूहळू पूर्ण होईल.

पूर्वोक्त विवेचन सूत्ररूपानें थोडक्यांत मांडून इतिकर्तव्यतेचा प्रथम शब्द बोलला पाहिजे. या दोन्ही क्रीया खालील सूत्रांत केल्या आहेत.

(१) हिंदुसमाजाला राष्ट्ररूपास जाण्याइतकें आत्मविकासाचें सामर्थ्य आहे.

(२) पाश्चात्त्य संस्कृति व हिंदु संस्कृति यांचें स्वरूपैक्य होत आहे. जागतिक संस्कृति स्थापन होऊन हिंदुस्थान हा तिचा एक भाग होईल.

(३) हिंदु समाजाला हें जें जागतिक समाजामध्यें स्थान मिळणार आहे तें त्यास अगोदर आपलें राष्ट्रीकरण करूनच मिळवावें लागेल.

(४) अशा तर्‍हेचें राष्ट्रीकरण करावयाचें म्हणजे हिंदुत्वाचें रूपांतर राष्ट्रीयत्वामध्यें करण्याचा प्रयत्‍न करणें होय.

(५) हें राष्ट्रीकरण हिंदुसमाजाचें व हिंदुसंस्कृतीचें सामर्थ्य वाढविलें असतां घडवून आणणें जास्त सोपें जाईल.
 
(६) एखाद्या भारतीयानें आपण हिंदु समाजाचें नागरिक असावें अगर नसावें हें ठरवितांना सर्व जगाचें सांस्कृतिक ऐक्य हिंदुसमाजाचें सामर्थ्य वाढविलें असतांनाच घडवून आणणें शक्य आहे ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .