प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

हिंदुसमाजाची संग्राहकता.- बाह्यांनां आपल्या समाजाचे अंश करावयाचे झाल्यास त्यांस तुम्ही अत्यंत कनिष्ठ पद स्वीकारा असें म्हणून चालणार नाहीं. यूरोपीय, चिनी व जपानी यांसारखीं सुधारलेलीं राष्ट्रें व भिल्ल; तोडा, गारो यांसारख्या हिंदुस्थानांतील रानवट जाती यांमध्यें संस्कारावरून वर्ण ठरविणारा हिंदु समाज भेद करीत नाहीं. हिंदूंस हे सर्वच म्लेच्छ अथवा बर्बर आहेत. हिंदूंच्या दृष्टीनें जगांत एकच संस्कृति आहे; आणि ती हिंदू किंवा ब्राह्मण संस्कृति होय. या संस्कृतीबाहेर ज्या समाजव्यवस्था आहेत त्या हिंदूंच्या दृष्टीनें रानवट पंथ, भ्रष्ट आचरण अथवा पतितांचे मार्ग होत. पूर्वींच्या काळीं परीकय लोक आपल्या समाजांत येऊन केवळ शूद्रस्थान किंवा अंत्यजस्थान पावले असें मात्र नाहीं. कित्येकांनीं क्षत्रियस्थान मिळविलें आहे; आणि शातवाहनासारख्या कुळानें त्यांच्यांशीं लग्नसंबंध केले आहेत. *

समाजाची संग्राहकता अलीकडे कमी झाली आहे. याचा अर्थ बाहेरून येणार्‍या लोकांनां समाजांत मानाचें स्थान देण्याची समाजाची शक्ति गेली असा आहे. ही शक्ति एकटीच गेली नाहीं तर समाजांतील व्यक्तींचा कर्माप्रमाणें वर्णनिर्णय करण्याच्या शक्तीबरोबर ही गेली. समाज स्वतःच्या स्थितीमध्यें कोणतेहीं फेरफार करण्यास आज असमर्थ आहे. समाजाची अशी असहाय स्थिति झाल्यानें एखाद्या परकीय समाजांतील चांगल्या माणसांनां हिंदु समाजांत येण्याला एकच मार्ग आहे तो हा कीं, आर्यसमाज, ब्रह्मसमाज, व यांसारखे बाह्यांनां आपले दरवाजे खुले ठेवणारे जे दुसरे संप्रदाय आहेत त्या संप्रदायापैकीं एखाद्यांत त्यांनीं शिरावें. केवळ अर्वाचीन संप्रदायच मोकळ्या तोंडाचे असतात असें नाहीं. एका मुसुलमानाला महानुभावांनीं आपल्यांत घेतल्याचें व एका पारशाला जैनांनीं आपल्यांत ओढल्याचें उदाहरण मधून मधून ऐकूं येतें. असो. याप्रमाणें संप्रदायांच्या दारांतून आंत येणें हा एकच मार्ग सुधारलेल्या कुलाला हिंदुत्व स्वीकारण्यास म्हणजे हिंदु समाजाचे घटक होण्यास आज मोकळा आहे. पुनरुद्धृत झालेल्या व्रात्यस्तोमानें आणखी एक मार्ग खुला करून दिला, त्याप्रमाणें भविष्यत् काळीं परकीयांस अन्य मार्गहि खुले होतील असें वाटतें. परंतु ते होण्यास हिंदुत्वाची सुधारणा घडून येणें जरूर आहे. या ठिकाणीं एवढें सांगणें उचित होईल कीं, आर्यसमाज, ब्रह्मसमाज यांनां व इतर संप्रदायांनां ब्राह्मण कितीहि नांवें ठेवोत, पण आज हे समाज उपरिनिर्दिष्ट जी सेवा करीत आहेत तिजबद्दल त्यांचे ब्राह्मणांनीं उपकार मानणेंच युक्त आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .