प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

सान्निध्यानें हिंदुत्वप्रसार.- हिंदुत्वसाधक सादृश्य उत्पन्न करण्याचें कार्य कसें करावयाचें? याला उत्तर ‘केवळ सान्निध्यानें’ हें आहे. कांहीं हिंदू लोक एकत्र होऊन ते प्रगल्भसंस्कृतिविहीन लोकांत मिसळून त्यांजमध्यें महत्त्वाचें स्थान व्यापून बसले म्हणजे कालांतरानें ते असंस्कृत लोक हिंदू चालीरीती स्वीकारतील. असें झाल्यानें ज्या असंस्कृत लोकांत हिंदू महत्त्वाची जागा व्यापितील त्या लोकांनां हिंदु जनतेचें स्वरूप येऊ “कनिष्ट हिंदू जाती” हें नांव जगाकडून त्यांस मिळण्यास ते लायक होतील. पुष्कळ प्रसंगी हिंदु या नांवाची अधिक जाहिरात करण्याचेंच काम उरलेलें असतें पुष्कळ लोकांनां आपली जात कोणत्या मोठ्या समुच्चयांत मोडते त्याची माहिती नसते. सिलोनमधील पुष्कळ शैवधर्मी तामिल लोकांस आपण हिंदू हें ठाऊक नाहीं. क्यांबोडियांतील शैवधर्मी ब्राह्मणांस देखील हिंदु या नांवाचा परिचय कोठें आहे? आपल्याकडे अडाणी किंवा वन्य जातींपैकीं बर्‍याचशा लोकांस आपण ‘हिंदू’ आहोंत हें ठाऊक नसतें. या लोकांत हिंदु या शब्दाचा प्रचार झाला म्हणजे ते हिंदू झाले असें होईल. सादृश्यावरच केवळ समाजसदस्यत्व अवलंबून नाहीं. कां कीं, गोंडांसारख्या जातींपैकीं जे लोक आपणांस हिंदू म्हणवितात आणि जे आपणांस तसें म्हणवीत नाहींत त्यांच्यामध्यें मोठें वैसदृश्य उत्पन्न झालेलें नाहीं, किंवा गोंड हिंदूंत आणि इतर हिंदूंत सादृश्य फार आहे असेंहि नाहीं. एका वर्गाला हिंदु हें नांव परिचित झालें आहे आणि आवडलें आहे आणि दुसर्‍या वर्गास तें परिचित झालेलें नाहीं एवढेंच. कधीं कधीं मनाची समजूत करून घेतांनां “नांवांत काय आहे” असा प्रश्न लोक विचारतात आणि “कांहीं नाहीं” असें उत्तर देतात. पण या ठिकाणीं उत्तर दिलें पाहिजे तें हें कीं, जें कांहीं आहे तें नांवांतच आहे.

हिंदूंची संख्या वाढविण्याची सान्निध्यात्मक शक्ति असंस्कृत जातींच्या बाबतींत यशस्वी झाली, परंतु कमी अधिक प्रगल्भ संस्कृतीनें युक्त अशा परकीय लोकांच्या बाबतींत तिला यश आले नाहीं याचें कारण काय? हिंदुस्थानांतील मुसुलमान लोक व ख्रिस्ती लोक यांच्या चालीरीती व कल्पना हिंदू लोकांशीं सदृश झालेल्या नाहींत असें नाहीं. परंतु याबरोबर हेंहि खरें आहे कीं, भारतीय मुसलमान किंवा ख्रिस्ती स्वतःस हिंदू म्हणवीत नाहींत. हिंदु शब्द नाकारण्याचें त्यांचें एक कारण हें दिसतें कीं, हिंदूंची समाजपद्धति आपली म्हणून जर त्यांनीं स्वीकारली तर त्यायोगें ते लोक हिंदू समाजाच्या कनिष्ठ जातींत मोडले जातील. जीं कुलें असंस्कृत आहेत तीं अनन्यगतिक असतात, आणि यामुळें हिंदूंच्या सान्निध्यानें तीं हिंदु समाजांत अंतर्भूत होतात; परंतु मुसुलमान व ख्रिस्ती यांची अर्थांतच अशी स्थिति नाहीं. हिंदु समाजाहून आपण वेगळें आहोंत ही वृत्ति राखण्याची या लोकांत इच्छा आहे. शिवाय हिंदु म्हणून एक मूर्तिपूजक पारमार्थिक संप्रदाय आहे अशी त्यांची कल्पना झाली ही गोष्ट देखील त्यांनीं हिंदु या नांवाचा त्याग करण्यास कारण आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .