प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.

मारिशस. - येथें १८३४ पासून हिंदी लोक कुली कामासाठीं नेले जाऊं लागले. निग्रो लोकांची गुलामगिरींतून मुक्तता झाली तो काळ म्हणजे १८३४ ते १८३९ पर्यंतचा काळ होय. ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे कीं, इकडे निग्रो लोक गुलामगिरींतून मुक्त होत होते तों इकडे त्यांचें काम करण्यासाठीं त्याचवेळीं हिंदी लोकांची योजना होत होती. गुलाम न म्हणतां गुलामगिरींत राबविण्याची अजब युक्ति निग्रो- गुलामीच्या अंत्येष्टीच्या वेळींच अर्थैकपरायण गौरकायांनां सुचली. गुलाम गेले त्यांच्या जागीं हिंदी कुली आले. मारिशसच्या साखरमळेवाल्यानीं हिंदी कुलींना नानाप्रकारें छळलें. पण थोडीशी समाधानाची गोष्ट आहे कीं, अलीकडे मारिशस येथें हिंदी जनतेचें प्राबल्य वाढत आहे आणि तेथील जमिनीवर हिंदी मंडळीची मालकीहि वाढत  आहे. हिंदु किंवा मुसलमानी पद्धतीची लग्नें  बहुतेक वसाहतींतून अद्यापि मान्य नाहींत. या जाचणुकींतून मारिशस येथील हिंदी लोकांची मात्र १९१२ सालीं मुक्तता झाली. तेथील वैवाहिक नियमांचें अलीकडीलें स्वरूप येणेंप्रमाणें आहे. *

पूर्वी प्रसिद्ध केल्याशिवाय किंवा १८९० च्या २६ व्या कायद्यांत सांगितलेला कोणताहि शिष्टाचार केल्याशिवाय मुसुलमानांच्या किंवा हिंदू लोकांच्या उपाध्यायानें अनुक्रमें मुसुलमान किंवा एकाच जातीचे हिंदू यांची लग्नें लावणें हें कायदेशील होईल. जेथें लग्न करण्यासाठीं लागणारी योग्यता व दुसर्‍या अटी या संबंधाच्या त्या कायद्यांतील ४६ ते ५० या कलमांमध्यें या कलमामुळें कोणत्याहि तर्‍हेनें फरक होणार नाहीं असें वाटेल तेथें, २६ व्या कायद्याला अनुसरून दिवाणी कामगारानें लाविलेलीं लग्ने जितकीं कायदेशीर ठरतात तितकींच हीं लग्ने या कायद्याच्या कलमांप्रमाणें कायदेशीर ठरतील.

(अ) दोन्ही पक्षांची मंडळी आपली संमति दर्शविण्यासाठी समर्थ असल्याशिवाय, व सही किंवा निशाणी करणार्‍या दोन साक्षीदारांसमक्ष, दोन्ही पक्ष विवाह-करारनाम्यावर आपली सही किंवा निशाणी लावण्यास कबूल असल्याशिवाय, अशाप्रकारचा लग्नसमारंभ करितां कामा नये.

(आ) नियोजित वर २१ वर्षांपेक्षां लहान व नियोजित वधू १८ वर्षांपेक्षां लहान असल्यास, १८९० ज्या २६ व्या कायद्यान्वयें ज्यांची संमति अवश्य आहे, अशा आईनें किंवा बापानें लग्नासाठीं लेखी अधिकार न दिल्यास किंवा सही करून आपली अनुमती न दिल्यास अशा प्रकारचा विवाहसमारंभ करितां येणार नाहीं.

हिंदी उपाध्यांनां मार्गदर्शक म्हणून मारिशस सरकारनें खालील सूचना केल्या आहेतः-

महत्त्वाच्या कारणांमुळें गव्हर्नरानें परवानगी दिल्याशिवाय १८ वर्षांखालील पुरुषास व १५ वर्षांखालील स्त्रीस लग्न ठरवितां येत नाहीं.

(अ) पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याशिवाय दुसरें लग्न करितां येत नाहीं.

(आ) घटस्फोट करण्यास कारणीभूत झालेल्या व्यभिचारी इसमाशीं, घटस्फोट करणार्‍या व्यक्तीला लग्न लावितां येत नाहीं.

(इ) विधवा झालेल्या किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीला १० महिनेपर्यंत पुनर्विवाह करितां येत नाहीं.

पुतणीशीं, पुतण्याशीं व विधवा भावजईशीं लग्न करणें गैर कायदेशीर आहे. याप्रमाणें मारिशस येथील विवाहनियमांचें अलीकडील स्वरूप आहे.

[ज्या ठिकाणीं कुलींचीच केवळ वसाहत होती त्याच ठिकाणीं आपल्या लोकांचा छळ झाला इतरत्र झाला नाहीं असेंहि नाहीं. पुष्कळ ठिकाणीं जागेवर आपण अगोदर असतां आणि यूरोपीय मागाहून आले असतां आपणांस  हांकलून देण्याचा प्रयत्‍न होतो आणि छळणुकीचे कायदेहि पास होतात. असल्या कायद्यांचा एक चांगला नमुना म्हणजे ब्रि० पू० आ० तील डोईपट्टीचा कायदा होय. या कायद्याची हकीकत खालीं दिली आहे.]

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .