प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

आमची बाहेरच्या जगांत किंमत.- पारीस येथें असलेले शेपन्नास जवाहिरे आणि लंडन, लिव्हरपूल, जिनोवा इत्यादि ठिकाणीं असलेले तुरळक दुकानदार सोडून दिले आणि प्रोफेसर, ब्यारिस्टर या नात्यानें  उपजीविका करणारा बोटावर मोजण्यासारखा वर्ग वगळला तर आपले जे लोक यूरोपीय संस्कृतीच्या देशांत जातात त्यांची किंमत मजूर होण्यापलीकडे लागत नाहीं हें सामान्यतः सांगितलें पाहिजे. जेथें हिंदुस्थानी वस्ती पुष्कळ आहे,तेथें कांही लोक हिंदूंच्याच गरजा भागविणारे खाणावळवाले आणि दुकानदार बनतात यांतहि नवल नाहीं. पूर्वेकडे जाणार्‍या आणि आफ्रिकेंत गेलेल्या लोकांत व्यापारी वर्ग आहे तोहि मोठा महत्त्वाचा नाहीं. त्याची मजल लहानसान दुकानदारीपलीकडो जात नाहीं. अमेरिकेंत मजूर म्हणून देखील भारतीयांची किंमत मोठी नाहीं. वाशिंग्टन संस्थानांत १९०७ सालचे निरनिराळ्या लोकांस मिळणारे मजुरीचे दर पाहतां असें दिसलें कीं, अमेरिकनांस मजुरी अडीच डालर मिळत होती, तर जपान्यांस सवादोन डालर मिळत होती, चिनीस दोन डालर पंधरा सेंट म्हणजे पूर्णांक पंधरा शतांश डालर मिळत होती  आणि हिंदुस्थानी लोकांस पावणेदोन डालर मिळत होती. या निरनिराळ्या लोकांच्या कामाची किंमत त्यांस मिळणार्‍या वेतनाच्या प्रमाणांतच होती असें इमिग्रेशनचे कमिशनर डॉ० जेंक्स यांस माहिती देणारांकडून कळलें. म्हणजे मजूर या नात्यानें हिंदुस्थानी लोकांची किंमत अमेरिकन लोकांच्या पाऊणपट आहे. येथें हेंहि सांगितलें पाहिजे कीं, अमेरिकेस जाणारा वर्ग बर्‍याच मेहनती अशा पंजाबी लोकांचा असतो.

कलाकौशल्यांत मागसपणा आणि विद्वान् वर्गांचा अभाव हीं ज्या हिंदू वसाहतींचीं लक्षणें आहेत, आणि भांडवलाचें एकीकरण होऊन जींत स्वजनांचा अभिमान बाळगणारे मोठाले संघ बनले नाहींत, अशा हिंदूंची जगांत आर्थिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या कांहींएक किंमत नाहीं.

जगामध्यें आपली पदवी अंत्यजाची आहे हें वाक्य लाला हरदयाळ यानें उच्चारून बर्‍याच भारतीयांच्या मनास दुखविलें, तथापि त्यांत सत्यांश बराच आहे. कांहीं संस्कृतचे प्रोफेसर आपल्या समाजिवषयीं ग्रंथ वाचून लिहिणारे कांहीं ग्रंथकार आणि प्राचीन संस्कृतीचे संशोधक यांनीं थोडीबहुत आपली स्तुति केली म्हणजे आपण हुरळून जातों आणि जगांत आपणांस मोठी मान्यता आहे असें समजतों. तथापि परदेशीं गमन करणारांस आपल्या राष्ट्राचा उपमर्द वारंवार ऐकूं येतो. रूझवेल्ट म्हणतो, ज्या देशानें व्हिक्टर ह्यू गो आणि डान्टे यांसारखे लोक निर्माण केले तो देश, ज्या देशांत  तीस कोट लोक आहेत आणि जे उंदारांसारखे ‘फळतात’, अशा देशापेक्षां कितीतरी पटीनें श्रेष्ठ आहे. पुष्कळ परकीय ग्रंथकार लिहितातः “हिंदुस्थानी मनुष्यांस स्वतःच्या अस्तित्वाबद्दल गर्व वाटण्यास कोणती गोष्ट आहे म्हणाल तर ती ही कीं, दोन तीन हजार वर्षांपूर्वींच्या त्यांच्या पूर्वजांनीं साबणाच्या बुडबुड्यांप्रमाणें सुंदर दिसणारे विचार व्यक्त केले.” परकीय देशांत आपल्याकडील लोक गेले तर कांही माणसें आपल्या बुद्धिवैभवानें किंवा कर्तृत्वानें इतरांवर छाप पाडतात. तथापि एकंदरींत आपली इभ्रत फारशी मोठी नाहीं. निग्रोपेक्षां आपली जात जराशी वरची लेखितात हें खरें आहे. तथापि त्याच्यापलीकडे आपणांस लोकांनीं आदरानें वागवावें असें आपलें वर्तन नाहीं.  ज्या चिनी मनुष्याविषयीं अमेरिकन लोकांत द्वेषबुद्धि वाटते त्याच चिनी लोकांनीं प्रामाणिकपणामुळें अमेरिकन लोकांच्या मनांत आदर उत्पन्न करविला. आपल्याविषयीं तसें विधान आपणांस करतां येत नाहीं. हिंदुस्थानी मजूर कामचुकार, दारूबाज, कज्जेखोर, कोर्टांत वारंवार जाणारा असी यांनीं आपली ख्याती करून घेतली आहे. हार्वर्डचे प्रोफेसर अर्चिबाल्ड कूलिज अमेरिकेच्या राजनीतिविषयक प्रश्नाविषयीं विचार करतांना ‘America as a world power’ या ग्रंथांत लिहितातः “हिंदुस्थानी मजुरास बंदी करणें कठिण नाहीं; कां कीं, ब्रिटिश सरकारच त्यांस आपल्या वसाहतींत संचरूं देत नाहीं. पण चिनी व जपानी लोकांची गोष्ट तशी नाहीं. त्यांच्या पाठीमागें स्वाभिमानी साम्राज्यें आहेत.” आपल्या पारतंत्र्यामुळें आपली किंमत बाहेर देशीं बरीच कमी होत हें यावरून उघड आहे.

आफ्रिकेंत गेलेल्या भारतीयांची काय स्थिति आहे याची कल्पना सामान्य जनतेस आज पुष्कळ आहे. नाताळ, ट्रान्सव्हाल, इत्यादि प्रदेशांत जो आपला तिरस्कार आणि छळ झाला त्यांचा इतिहास महात्मा गांधी यांच्या चरित्रावरून सर्वविश्रुत झालाच आहे. कोठेंहि जा, आपलें वास्तव्य तद्देशीयांस प्रिय नाहीं हें खरें. प्रिय नसण्याचीं कारणें  अनेक आहेत. त्यांत हिंदुस्थानचें पारतंत्र्य हें एकटेंच महत्त्वाचें कारण असेल असें वाटत नाहीं. सीरियन्, आर्मेनियन, इत्यादि राष्ट्रें देखील परकीय अंमलाखालींच आहेत. तथापि हिंदूचा परदेशांत जसा तिरस्कार होतो तसा त्यांचा होत नाहीं. जेथें हिंदुस्थानीं लोकांची तद्देशीय किंवा यूरोपांतून तेथें वसाहतीसाठीं गेलेल्या लोकांशीं स्पर्धा होते तेथें मत्सरभाव आणि द्वेषभाव हीं उत्पन्न व्हावयाचींच. ज्यांच्यांशीं स्पर्धा होते त्या लोकांशीं स्पर्धा करणारांचें जितकें सादृश्य जास्त असेल किंवा त्यांच्याशीं स्पर्धा करणारांची आत्मीयता होणें जितकें शक्य असेल तितकी त्या दोघांमध्यें द्वेषबुद्धि कमी उत्पन्न होते असा सामान्य नियम आहे. स्पर्धामूलक द्वेष एका देशांतील जातीजातींतहि असतो हें आपण पहातोंच. अमेरिकेसारख्या देशांतहि तो आहेच. या स्पर्धेमुळें अमेरिकन लोकांचे ज्यू, आयरिश, पोल, इटालियन इत्यादि अनेक लोकांशीं वारंवार खटके उडतात आणि कधी कधी त्यामुळे खुनाचे प्रसंगहि उत्पन्न होतात. आयरिश आणि इटालियन हे ख्रिस्ती खरे, पण क्याथोलिक आहेत. त्यांची इतरांशी लग्न करण्याची प्रवृत्ति सहज होत नाहीं आणि त्यामुळें त्यांच्याविषयीं जरा निराळेपणा अमेरिसन लोकांस भासतो. डच, डेन, स्वीड आणि जर्मन हे प्राटेस्टंट असल्यामुळें अमेरिकनांत सहज मिसळून जातात. रशियांतून अमेरिकेंत जे लोक जातात त्यांची कथा ज्यू वगैरे लोकांप्रमाणेंच असते. जितका एखादा बाह्य वर्ग अगर जात पचनीं पाडण्यास म्हणजे आपल्या समाजांत समाविष्ट करून घेण्यास कठिण तितका तद्देशस्थांत त्यांच्याविषयीं द्वेष अधिक, अशी वस्तुस्थिति आहे.

पुढे वाचा:आमची बाहेरच्या जगांत किंमत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .