प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.

कानडांतील वसाहत.- कॅनडांतील हिंदी लोकांच्या वसाहतीला १९०५ पासून खरी सुरुवात झाली, आणि १९१३ सालीं तेथें ब्रिटिश सम्राटाचे हिंदी प्रजाजन ४५०० होते. यांपैकीं निम्मेहून अधिक शेतकींत पडले आहेत, बरेच रेल्वेचे कामांत व कांहीं कारखान्यांत आणि लांकडांच्या गिरण्यांत आहेत.

वसाहतसरकारनें उपस्थित केलेल्या अनेक अडचणींतूनहि  त्यांनीं आपल्या धैर्य उद्योग व स्वाभाविक नियमितपणाची राहणी इत्यादि गुणांच्या बळावर सुधारलेलीं निर्वाहाचीं साधनें हस्तगत केलीं आहेत. जवळ जवळ ७,०००, ००० डॉलर (२१,०००,०००रु.) इतकें भांडवल त्यांनीं ब्रिटिश कोलंबियामध्यें मालमत्ता उद्योगधंदे इ. यांत गुंतवून ते कॅनडांत कायमचे रहिवाशी झाले आहेत. त्यांनां मतदारीचा हक्क मात्र नाहीं!

या लोकांपैकीं शें. ९० शीख आहेत. त्यांपैकीं कांहीनीं पूर्वीं हिंदी लष्करांत शौर्य गाजवून बिल्लेही मिळविलेले आहेत. १९०७ सालापर्यंत वसाहतखात्याकडून या वसाहतींच्या बाबतींत कांहीं त्रास होत नव्हता; पण त्य सालापासून मात्र “आतां दरवाजा बंद” असे जे उद्‍गार जनरल स्वायने यांनीं काढले त्याप्रमाणें धोरण ठेविलें जात आहे. हे जनरल स्वायने एकेवेळीं हिंदी लष्करांतील अंमलदार होते व सध्या ब्रिटिश हांडुरस येथें गव्हर्नर-जनरल व कमांडर - इन- चीफ आहेत.

कॅनडांतून ह्या हिंदी वसाहतवाल्यांची ब्याद दूर करण्याकरतां त्या सर्वांनां हद्दपार करून ब्रिटिश हांडुरस येथें नेऊन टाकण्याची योजना तयार करण्यांत आली होती. पण तेथील वाईट हवा व स्थलान्तरासंबंधीं अपमानकारक अटी लक्षांत घेऊन व ह्या ‘मोहक’ सूचनेंतील धोरण जाणून तिला कॅनडातील हिंदीलोकांनीं एकमतानें विरोध केला. या योजनेच्या मुळाशीं असलेलीं कारणें स्वायने साहेबांनीं स्वमुखानें स्पष्ट सांगितलीं आहेत तीं अशीः “गोरे लोकांच्या वसाहतीमध्यें येऊन हे पौरस्त्य हिंदी लोक आपल्या मूळ जाती वगैरे सर्व विसरून गोर्‍या लोकांशीं मोठी सलोखा वाढवितात ही गोष्ट मोठी बाधक आहे; आणि दुसरें असें कीं, हेच लोक परत हिंदुस्थानांत जाऊन तेथें समानहक्कसंपादनाचा उपदेश करूं लागतात; आणि या प्रकारें राज्यकारभार व शांतता यांच्या मार्गांत अडथळा आणतात.”

असो. सदरील योजना मागें पडल्यावर “कॅनडी वसाहतीचे कायदे” करून हिंदी ब्रिटीश प्रजाजनांचा दर्जा इतर पौरस्त्यजपानी, चिनी इत्यादी लोकांपेक्षां कमी ठरविण्यांत आला. कॅनडामधील हिंदी लोकांस ब्रिटिश प्रजाजन म्हणूनहि हक्क नाहींत व वसाहती (Immigrant) म्हणूनही हक्क नाहींत. तेथील ब्रिटीश प्रजाजन याची व्याख्या अगदींच निराळी आहे. असले प्रकार खुद्द इंग्लडमध्येंहि नाहींत.

या जुलमी कायद्यांतील “अखंड प्रवासाचें कलम” सर्वांत जाचक आहे; तें असेः

“९ मे १९१० पासून पुढें कॅनडांत येणार्‍या ज्या कोणी इसमानें स्वदेशांत किंवा कॅनडात आगाऊ पैसे भरून एकदम थेट कॅनडापर्यतचें तिकिट काढलें नसेल आणि स्वदेशापासून कॅनडापर्यंत अखंड प्रवास केला नसेल त्यास कॅनडाचे किनार्‍यावर उतरूं दिलें जाणार नाहीं.”

हिंदुस्थान व कॅनडा यामध्यें थेट जाणार्‍या बोटी नसल्यामुळें, व कोणतीहि आगबोट कंपनी अशी थेटचीं तिकिटें देत नसल्यामुळें कायद्याच्या या अटी पाळणें हिंदी लोकांस अर्थात् अशक्य आहे. या ठिकाणीं कंपन्यांनां थेटचीं तिकिटें देण्यास व थेटचा प्रवास करण्यास हिंदुस्थानसरकारनें भाग पाडणें एवढाच मार्ग दिसतो.

९ मे १९१० पासून अमलांत आलेला दुसरा जुलमी कायदा असाः “आशियामधील ज्या कोणा इसमाजवळ स्वतःचे २०० डॉलर नसतील त्या पुरुषास किंवा स्त्रीस कॅनडांत उतरण्यास मनाई आहे.” कॅनडाशी ज्या देशाचा या बाबतीत विशिष्ट तह झाला असेल किंवा ज्या देशाला या बाबतींत विशेष नियम लागू असतील अशा देशांतील इसमास हे कायदे लागू नाहींत.

जपान व चीन यांच्याबरोबर असे स्वतंत्र तह झाले असल्यामुळें जपानी व चिनी लोकांनां बायकांमुलांसह कॅनडांत येतां येतें. पण हिंदी लोकांनां वरील ‘अखंड प्रवासाच्या’ कलमाच्या अडचणीमुळें असें करणें अशक्य होतें.

रा. नथुराम ह्या गृहस्थानें १९१० सालीं करकत्ता ते व्हांकोव्हरचें तिसर्‍या वर्गाचें थेट तिकिट काढलें होतें. पण येतांनां वाटेंत हांगकांगला त्यानें पहिलें तिकिट बदलून दुसर्‍या वर्गाचें घेतलें. तेव्हां थेट तिकीट नाहीं या सबबीवर त्याला व्हांकोव्हरहून त्याच बोटीनें परत जाणें भाग पडलें. रा. हिंरासिंगला बायकामुलांबद्दल किनार्‍यावर उतरल्याबरोबर एक हजार डॉलर जामीनगत भरूनहि तीन महिने कोर्टांत भांडावें लागलें. व इतकें भांडल्यावर देखील केवळ ‘दया’ (act of grace) म्हणून त्याच्या बायकोला व मुलांनां कॅनडांत उतरण्यास परवानगी मिळाली. रा. भागासिंग व बळवंतसिंग यांनांहि असेंच कोर्टांत भांडून तीनतीन महिन्यांनंतर बायकामुलांनां आणण्याची परवानगी ‘दया’ म्हणून मिळाली. रा.हकीमसिंग याचीं मुलेंमाणसें हांगकांग येथें थेटचें तिकिट मिळावे म्हणून दोन वर्षें तिष्ठत बसलीं होतीं. रा. विष्णु पिंगळे या विद्यार्थ्यास कॅनडांत उतरण्यास परवानगी मिळाली नाहीं पण युनैटेड स्टेट्सचे सरकारनें त्यास आपल्या हद्दींत उतरूं दिलें. हाच दुर्दैवी तरुण महारष्ट्रीय इंग्रजी राज्य उलथून पाडण्यासाठीं पुढें गदर म्हणून चळवळ सुरू झालीं तींत सामील झाला आणि पुढें सांपडून फांशी गेला.

असा हा बायकामुलांची ताटातूट करणारा कायदा असल्यामुळें कॅनडांत वसाहत करण्याचा मार्ग हिंदीलोकांनां पूर्ण बंद झाला आहे.

ही निराशाजनक स्थिति दूर व्हावी म्हणून १५ दिसेंबर १९११ रोजीं ओटावा येथील अंतर्व्यवस्था-मंत्री ना. आर. रॉजर्स यांची आमच्या शिष्टमंडळानें गांठ घेतली. त्यांनीं कबूल केलें कीं “बायकामुलांनां आणण्याची परवानगी देण्याचा विचार ताबडतोब करून बाकीच्या गोष्टींचाहि लवकरच योग्य निकाल करण्यांत येईल.

या आश्वासनाला पुरें सव्वा वर्ष होऊन गेलें तरीहि कायद्यांत कांहीं फरक न होतां त्याचा अम्मल पूर्ववत् चालू आहे, असें पाहून येथील हिंदी लोकांनीं आपली अडचण साम्राज्यसरकार व हिंदुस्थानसरकार यांजपुढें मांडण्याचें ठरविलें आणि २२ फेब्रुवारी १९१३ रोजीं वरील तीन इसमांचें शिष्टमंडळ नेमून पुढील ठराव केलाः-

“हिंदू लोकांनां आपलीं बायकामुलें कॅनडांत आणण्यास परवानगी असावी  या संबंधानें केलेल्या सर्व विनवण्यांकडे व शिष्टयांकडे कॅनडासरकानें दुर्लक्ष केल्यामुळें वरील त्रिवर्गास लंडनमध्यें साम्राज्यसरकारपुढें हें गार्‍हाणें मांडण्याकरतां पाठविण्यांत येत आहे. शिवाय हिंदुस्थानसरकारचें आणि हिंदी राष्ट्रीयसभा, मॉस्लेम लीग वगैरे संस्थांचें या कामीं साहाय्य मिळविण्याचें कामहि या त्रिवर्गावर सोंपविलें आहे.”

या ठरावाअन्वयें या त्रिवर्गानें लंडनांत जाऊन मे १४ १९१३ रोजीं कॅक्स्टनहॉलमध्यें सर भावनगरी यांच्या अध्यक्षतेखालीं सभा भरविली. या सभेनें पुढील ठराव पास केला.

“कॅनडांतून आलेल्या शिष्टांचें ‘अंखड प्रवासाचे कलमा’बद्दलचें म्हणणें विचारांत घेतां असें स्पष्ट दिसतें कीं, या कलमाच्या योगानें हिंदुस्थानांतून थेटच्या बोटी येण्याची सोय नसल्यामुळें, हिंदू लोकांचा कॅनडामध्यें प्रवेश होणें पूर्णपणें बंद होणार आहे. इतकेंच नव्हे तर हल्लीं कॅनडांत असलेल्या हिंदी लोकांची व त्यांच्या बायकामुलांची ताटातूट होणार आहे. करितां हा कायदा रद्द व्हावा किंवा हिंदी लोकांनां तो लागू नसावा, अशी या सभेची साम्राज्य, कॅनडा व हिंदुस्थान या तिन्ही सरकारांजवळ आग्रहाची मागणी आहे.”

१९१४ मध्यें सरदार गुरुदत्तसिंग यानें “कोमागाटा मारू” नांवाचें एक जहाज भाड्यानें घेऊन त्यांतून पंजाबी माणसें नेण्याचा प्रयत्‍न केला. त्यांतहि त्यास यश आलें नाहीं. हा प्रकार जर्मनीशीं युद्ध सुरु असतांच घडला. मज्जावामुळें चिडून गेलेले बोटीवरील लोक आणि तेथेंच “गदर” चळवळींत शिरलेले लोक या दोघांनीं हिंदुस्थानांत येऊन बंड करण्याचा निश्चय केला व हे लोक येथें आले. त्यांचे बंडाचे बेत अगोदरच उघडकीस येऊन पूर्णपणें कसे फसले याचा वृत्तांत सर्वांस विदित आहेच. या कटांत  सांपडल्यामुळें पिंगळे आडनांवाच्या महाराष्ट्रीय ब्राह्मणांस प्राणांस मुकावें लागलें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .