प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

तार्तरी.- आतां तार्तरीचें निरिक्षण करूं. तार्तरीचे दोन भाग करतां येतील. एक भाग पूर्वतार्तरी व दुसरा पाश्चिमतार्तरी. पूर्वतार्तरी (Eastern Turkistan) चीनच्या सत्तेखालीं आहे व पश्चिमतार्तरी रशियाच्या सत्तेखालीं आहे. पश्चिमतार्तरीमध्यें बुखारा हें संस्थान आहे आणि या संस्थानांतील बरचसा महत्त्वाचा व्यापार हिंदूंच्या हातांत आहे. हिंदू लोक तेथील रहिवाशी नसून सिंधप्रांतांतील आणि विशेषेंकरून शिकारपूर या शहरांतील आहेत. या लोकांस मुंबईचे लोक गैरसमजुतीनें मुलतानी म्हणतात. या व्यापारी हिंदूंची संख्या बुखारा येथें सुमारें तीनशें असावी असा अजमास आहे. एशियांतील रशियामध्यें हिसार नांवाचें एक शहर व प्रांत आहे. तेथील व्यापारी वर्गांत अफगाण व हिंदूं यांचें अस्तित्व दिसून येतें. सैबिरियांत आबाकान्स्क नांवाचें एक शहर आहे. तेथें कांहीं हिंदुत्वाचें व बौद्धसंप्रदायाचे अवशेष मूर्तिरूपानें दृष्टीस पडतात. पण तेथील शिलालेखांचा अद्याप अर्थ लावला गेला नाहीं.

याबरोबरच चिनि तुर्कस्तानची माहिती सांगून टाकतों. चीन देशांत बौद्धसंप्रदाय आहे हें सांगावयास नकोच. तथापि चिनई तार्तरीमध्यें हिंदुत्व किती आहे याच्याविषयीं थोडीशी माहिती दिली पाहिजे. काशगर प्रांत येथें शकराजे होते, आणि मनुस्मृतींत उल्लेख केलेल्या खश नांवाच्या जातीचा आणि या शहराचा कांहीं संबंध असावा कीं काय असा संशय उत्पन्न होतो. इ. स. च्या प्रारंभापासून ८ व्या शतकापर्यंत बौद्धसंप्रदाय येथें प्रचलित होता आणि तेथें अजूनहि त्याचे कित्येक अवशेष सांपडतात. काशगरपेक्षां अधिक महत्त्वाचें ठाणें म्हटलें म्हणजे खोतान होय. खोतान हा शब्द कुस्तन या शब्दाचा अपभ्रंश आहे असें पाश्चात्त्य ग्रंथकारांचें म्हणणें आहे. या ठिकाणीं डॉ. स्वेन हेडिन यानें दोन तीनदां प्रवास करून बरीच माहिती व ग्रंथसंपत्ति पैदा केली. इ. स. १८९६ सालीं त्यानें येथें अनेक बौद्धमूर्ति, नाणीं व हस्तलिखितें मिळविलीं, आणि खरोष्ट्री लिपींतील अनेक लेख अवगत करून घेतले. त्यानें जमविलेल्या हस्तलिखितांमध्यें अनेक संस्कृत हस्तलिखितेंहि आहेत. त्याच्या संशोधनापासून ज्ञाननिष्पत्ति काय झाली, ती देण्यास येथें अवकाश नाहीं, तथापि एवढें सांगतां येईल कीं, या प्रांतांत ग्रीक व हिंदु कला यांचें मिश्रण होऊन ती कला बुद्धसेवेस लावली गेली होती.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .