प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण २ रें.
राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण.

राष्ट्रसंघाचा करारनामा (समयपत्रिका)

राष्ट्राराष्ट्रांत सहकारित्व वाढत जावें, राष्ट्राराष्ट्रांतील परस्परसंबंध शांततेचे राहून सर्वांनां निर्भयतेची स्थिति प्राप्‍त व्हावी, आणि एतदर्थ ( इष्टप्राप्‍तीसाठीं) युद्धाचा आश्रय करणार नाहीं (तर शांततेच्या मार्गांनीं शक्य तेवढी सर्व खटपट राष्ट्रसंघसमयपत्रिकेनुसार करुं) हें बंधन मान्य करणें, राष्ट्राराष्ट्रांतील व्यवहार उघडपणें व न्यायाच्या आणि सन्मान्यतेच्या तत्त्वावर चालतील असें करणें, सार्वराष्ट्रीय धर्मशास्त्राच्या सर्वसंमत तत्त्वांनां शासनसंस्थानीं (सरकारांनीं) प्रत्यक्ष आचारनियमांत स्थान द्यावें व ही सुधारणा कायमची व्हावी असा प्रयत्‍न करणें, सुसंघटित जनसमाजांच्या परस्परव्यवहारांत न्याय राखणें, व तहनाम्यांनीं उत्पन्न झालेल्या सर्व बंधनांबद्दल सर्वांकडून पूर्ण आदरभाव कृतीनें व्यक्त केला जाईल अशी व्यवस्था करणें, या हेतूंनीं करार करणारे महापदस्थ पक्ष (राष्ट्रें) हा राष्ट्रसंघाचा करारनामा मान्य करितात.

कांड १-(१) या करारनाम्याला जोडलेल्या परिशिष्टांत तहनाम्यावर सही केलेल्या ज्या राष्ट्रांचीं नावें दिलीं आहेत तीं राष्ट्रें व (२) सदरील परिशिष्टांत जीं इतर राष्ट्रें उल्लेखिलीं आहेत त्यांतील जी कोणीं हा करारनामा बिनशर्त कबूल करतील तीं, या राष्ट्रसंघाचे उत्पादक सभासद गणले जातील.  हा करारनामा अमलांत आल्यानंतर दोन महिन्यांच्या आंत राष्ट्रसंघाच्या चिटनवीस-कचेरींत कबुलायतनामा (राष्ट्रसंघाचे सभासद झाल्याचें मान्यातापत्र) वरील उल्लेखिलेल्या राष्ट्रांच्या समूहांतून जें राष्ट्र हजर करील ते संघाचें सदस्य झालें असें मानलें जाईल.  संघाच्या इतर सदस्यांनां हें नवें राष्ट्र सदस्य झाल्याची वार्ता वटपत्रानें दिली जाईल.

परिशिष्टांत दाखल न झालेल्या अशा कोणत्याहि पूर्ण स्वायत्त संस्थानाला, संस्थानसंघाला (डॉमिनियन) * अथवा वसाहतीला राष्ट्रसंघाचे सदस्य होतां येतें.  मात्र, संघ-सभेंतील दोन तृतीयांश सभासदांची या गोष्टीस अनुमति पाहिजे, आणि या सदस्य होऊं इच्छिणारानें खालील दोन गोष्टी केल्या पाहिजेत : (अ) एक, आपलीं अन्यराष्ट्रविषयक कर्तव्यें व बंधने पाळण्याची आपली इच्छा मनापासूनची आहे हें सिद्ध करणारीं चोख तारणें * त्यानें द्यावीं, (आ) दुसरें, त्याची लष्करी व आरमारी सामुग्री व फौज किती असावी इत्यादि संबंधी जे नियम संघ त्याला घालून देईल ते त्यानें मान्य करावे.

राष्ट्रसंघाच्या सदस्यास, दोन वर्षांची सूचना देऊन, सदस्यत्व सोडतां येतें; मात्र, सदस्यत्व सोडूं इच्छिणारानें त्याजवर संघाच्या करारनाम्यानें पडलेली जबाबदारी व या करारनाम्यानें उत्पन्न होणारीं त्याचीं अन्यराष्ट्रविषयक कर्तव्यें सदस्यत्व सोडण्याच्या पूर्वी पार पाडलीं पाहिजेत.

कांड २ - एक संघ-सभा, एक कारभारी-मंडळ आणि एक कायम चिटनवीस-कचेरी या यंत्रांमार्फत राष्ट्रसंघाचें कार्यकर्तृत्व व्यक्त होईल.

कांड ३ - राष्ट्रसंघाच्या सदस्यभूत राष्ट्रांचे प्रतिनिधी हे प्रस्तुत संघ-सभेचे सभासद समजावे.

प्रस्तुत संघसभेच्या बैठकी नियमित वेळीं होऊन शिवाय प्रसंगोपात्त प्रश्नांचा विचार करण्यास नियमित वेळांबाहेरहि या सभेच्या बैठकी होतील.  या बैठकी संघाचे 'गृह-स्थानीं' अथवा इतरत्र पूर्वनिश्चित अशा स्थानीं होतील.

या बैठकींत राष्टसंघाच्या कार्यक्षेत्रांत येणार्‍या अथवा जगाच्या शांततेशीं संबद्ध अशा कोणत्याहि गोष्टीचा विचार संघ-सभा करील.

या बैठकींत संघसदस्यांनां प्रत्येकीं एक मत असेल.  कोणत्याहि सदस्यराष्ट्रास तीनपेक्षां अधिक प्रतिनिधी संघसभेच्या बैठकींत पाठविण्याचा अधिकार नाहीं.

कांड ४ - कारभारी-मंडळांत अमेरिकेंतील संयुक्त संस्थानें, ब्रिटिश साम्राज्य, फ्रान्स, इटली व जपान या राष्ट्रांचे प्रतिनिधी असून शिवाय इतर चार संघ-सदस्यांचे प्रतिनिधी असतील. कोणत्या चौघांचे प्रतिनिधी उल्लेखित राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबर असावयचे, हें वेळोवेळीं ठरविण्याचा पूर्ण अधिकार संघ-सभेला आहे.  संघ-सभा आपल्या अधिकारानें हे प्रतिनिधी निवडून देईपावेतों ..... या राष्ट्रांचे प्रतिनिधी कारभारी-मंडळांत नेमले आहेत.

पुढे वाचा

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .