प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १४ वें,
भूशास्त्रें

पृथ्वीचें वयोमान.- पृथ्वी उत्पन्न होऊन ६,००० वर्षे झालीं, हें बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथांतील मत १७ व्या शतकाच्या अखेरपर्यंत यूरोपांत प्रचलित होतें. परंतु 'पृव्थीचें वयोमान' ह्या भौतिक शास्त्रीय प्रश्नांचें उत्तर धर्मग्रंथाधारें: देणें हें अतिक्रमण अयोग्य असल्याचें ठरवून १८ व्या शतकांत अनेक शास्त्रज्ञांनीं हा प्रश्न हातीं घेतला. त्यांत प्रथम जेम्स हटन ( १७२३-१७९७ ) यानें असें दाखविलें कीं, भूगोलाची भूस्तरशास्त्रदृष्टया सांप्रतची स्थिति तपासून पृथ्वीच्या गत आयुष्याबद्दल नक्की अनुमान काढणे शक्य आहे. पुढें विल्यम स्मिथनें इंग्लंडांतीलच जमिनीखालील अनेक निरनिराळे थर निदर्शनास आणून देऊन ते बनण्यास अनेक युगें लागलीं असलीं पाहिजेत असें प्रतिपादन केलें. नंतर कूव्हिए व इतर शास्त्रज्ञांनीं प्रस्तरावशेषशास्त्राचा पाया घातला; आणि अनेक प्रकारच्या प्रस्तरांतील वनस्पतिजाती व प्राणिजाती फार फार जुन्या काळच्या असल्या पाहिजेत असें मत दिलें. जॉन प्लेफेअर यानें १८०२ मध्यें एक पुस्तक प्रसिद्ध करून त्यांत असें म्हटलें कीं, जग किंवा पृथ्वी अनादि आहे, त्यांची अमक्या वर्षांपूर्वी उत्पत्ति झाली असें कांहींच म्हणतां येत नाहीं. तात्पर्य, १९ व्या शतकाच्या आरंभीं बायबलांतील मत पूर्णपणें त्याज्य टरून पृथ्वी फार फार जुनी आहे याबद्दल शास्त्रज्ञांत तरी एकमत झालें.

पुढें १८६२च्या सुमारास लार्ड केल्व्हिन यांनीं अनादित्ववादी भूस्तरशास्त्रज्ञांचीं मतें केवळ बांबगोळा टाकल्याप्रमाणें हादरून सोडलीं. कारण केल्व्हिन व इतर पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांनीं पृथ्वीच्या वयोमानासंबंधानें कांहीं नक्की म-यादा पुढें मांडल्या. त्यांचा पुरावा लक्षांत घेऊन भूस्तरशास्त्रज्ञांनीं आपला अनादित्ववाद सोडून दिला. लवकरच जीविशास्त्रज्ञ दोघांच्या मदतीला आले; व तिघांनीं आपआपल्या परीनें या प्रश्नाबद्दल पुढीलप्रमाणें मतें जाहीर केलीं आहेत.

( अ ) पदार्थविज्ञानशास्त्रीयअनुमानें.- या शास्त्रांतील विद्वानांनीं आपलीं अनुमानें ( १ ) पृथ्वीच्या पोटांतील वाढतें उष्णमान, ( २ ) भरतीओहोटीच्या घर्षणामुळें पृथ्वीच्या दैनंदिन गतीस आलेला मंदपणा ( पृष्ठ ३५६ पहा ) व ( ३ ) सू-याच्या वयोमानाची म-यादा, या तीन गोष्टींच्या आधारावर उभारलीं आहेत. लॉर्ड केल्व्हिन यांनीं 'पृथ्वी कमींत कमी दोन कोटी व जास्तींत जास्त चार कोटी वर्षांपूर्वी उत्पन्न झाली असली पाहिजे असें मत दिलें. तथापि या बाबतींत या शास्त्रांतल्या विद्वानांतहि मतभेद आहे. उदाहरणार्थ, प्रो. जार्ज डार्विननें असे मत दिलें कीं, पदार्थविज्ञानशास्त्रीय अनुमानांत निर्णायकता फार थोडी असल्यामुळें पृथ्वीच्या उत्पत्तीचा काल याहूनहि अधिक मागें नेणें अशक्य नाहीं.

( ब ) भूशास्त्रीयअनुमानें.- पृथ्वीवरील सर्व खंडांचा र्हास होत चालला आहे; म्हणजे जमीन, पर्वत, टेकडया वगैरेंचा पृष्ठभाग वरील थर धुपून जाऊन अधिकाधिक सखल होत चालला आहे. एका मनुष्याच्या आयुर्म-यादेच्या मानानें फारच दीर्घ काल या सखलीकरणाला लागत असतो व त्यामुळें आज आपणांस दिसणा-या टेकडयाहि अनादि कालापासूनच्या आहेत असें सामान्यत: म्हणतात. तथापि पाऊस, धुकें, जलौघ, वादळें, वगैरे कारणांमुळें पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावरील जमीन विरघळून समुद्रांत जात आहे. ही गोष्ट सर्वांनां मान्य आहे. सांप्रत या सखलीकरणाचें प्रमाण दरसाल सरासरी १/२४०० ते १/२६०० फूट पडत असतें परंतु येथून जी माती वाहून जाते ती दुसरीकडे कोठेंतरी साचत असली पाहिजे किंवा दुस-या शब्दांत सांगावयाचें म्हणजे एकंदर सखलीकरण एकंदर प्रस्तरीभवनाइतकेंच असलें पाहिजे. प्रत्यक्ष नदीच्या पाण्यांतील गाळाचें मोजमाप घेऊन असें आढळून आलें आहे कीं नदीच्या पाण्याबरोबर जमिनीचा १/७३० ते १/६८०० फूट जाडीचा थर दरसाल वाहून जातो. म्हणजे सखलीभूत झालेल्या जमिनीच्या क्षेत्राइतक्या समुद्राच्या तळावर १ फूट थर होण्यास ७३० ते ६८०० वर्षे लागतात. कांहीं ठिकाणीं अशा थरांची जाडी १,००,००० फुटांपर्यंत वाढली आहे. या होत असलेल्या फरकाला किती काळ लागला असेल तें ठरविणें शक्य आहे. हल्लींचें सखलीकरणाचें व प्रस्तरीकरणाचें ( डिपॉझिशन ) मान आधारास घेऊन हिशेब केल्यास हल्लींची स्थिति प्राप्त होण्यास कमींत कमी सात कोटी तीस लक्ष वर्षे व जास्तींत जास्त अडुसष्ट कोटी वर्षे लागलीं असतील. प्रो. सोलस यांचा हिशेब असा आहे कीं, प्रस्तरीभवनानें बनलेल्या खडकांची जाडी २,६५,००० फूट आढळते; आणि एक फूट जाडीचा थर होण्यास शंभर वर्षे याप्रमाणें हिशेब केल्यास पृथ्वीवरील अशा थरांची वयोव-यादा दोन कोटी साठ लक्ष वर्षांहूनहि अधिक असली पाहिजे.

( क ) समुद्रजलाच्या खारटपणावरून काढलेलें अनुमान.- प्रो. जॉलीनें, समुद्र तयार झाल्यापासून आठ नऊ कोटी वर्षे लोटली आहेत असें ठरविलें आहे. समुद्राचें पाणी अगदीं गोडे होतें. नद्यांच्या पाण्याबरोबर पृथ्वीवरील क्षार वाहात जाऊन समुद्राला हल्लींचा खारटपणा प्राप्त झाला आहे. एकटा सिंधुक्षार विचारांत घेतल्यास, नद्यांच्या द्वारें दरसाल समुद्रांत जितका क्षार जातो त्याच्या नऊ कोटी पट एकंदर क्षार समुंद्रांत जमलेला आढळतो. म्हणजे समुद्राचें वयोमान ९ कोटी वर्षांहून अधिक आहे.

( ड ) जीविशास्त्रनिष्पन्न अनुमानें.- जीविशास्त्रज्ञ तर भूशास्त्रज्ञांपेक्षां पृथ्वीचें वयोमान अधिक ठरवूं पाहातात. अत्यंत जुन्या प्रस्तरावषेशदृष्टया खडकांमध्यें सांपडणारे प्राणीहि जीविशास्त्रदृष्टया ब-याच उच्च कोटींतील असतात. इंग्लंडांत कँब्रियनच्या खालच्या ८०,००० फूट खोलीच्या प्रस्तरीभूत खडकांत प्रस्तरावषेश मुळींच सांपडत नाहींत याचें कारण हें कीं, या खडकांमधील अवशेष अगदीं ठिसूळ शरीराच्या जीवकोटींचे असावेत. असले एकपेशीमय जीव, नंतर त्यांपासून अनेकपेशीमय जीव त्यांच्यापासून नंतर कठिणशरीरी जीव होण्यास दोन कोटी साठ लक्षांपेक्षां पुष्कळ अधिक वर्षे लागलीं असलीं पाहिजेत.

तात्पर्य, १९ व्या शतकाच्या आरंभीं पृथ्वी ६,००० वर्षांची आहे असें पाश्वात्त्य मत होतें, व त्याच शतकाच्या शेवटीं तिचें वयोमान २/४ कोटी वर्षांहूनहि अधिक असावें, अशी मतें पदार्थविज्ञानी, भूस्तरशास्त्रज्ञ, जीविशास्त्रज्ञ वगैरे पंडितांनीं पुढें मांडली. तथापि हा प्रश्न अद्यापहि सुटलेला नाही.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .