प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १४ वें,
भूशास्त्रें

लायेल आणि नियतक्रमविकासवाद.- तप्तरसावस्थेंत असलेली द्रव्यें भूगर्भांत आहेत हें ठरल्यानंतर ओघानेंच असेंहि ठरतें कीं, ह्या पदार्थांचें उष्णमान कमी झालें कीं त्यांचा संकोच झालाच पाहिजे. आंतील द्रव्यांचा संकोच झाला म्हणजे घनीभूत भूकवचाच्या उंचसखलपणांत फरक होणें क्रमप्राप्तच आहे. हटन अगोदरपासून म्हणत होता त्या भूखंड आणि पर्वत ह्यांचा वर येण्याची अशानें उपपत्ति लागली. परंतु ह्या घडामोडींच्या विवरणांतील कांहीं बाबींसंबंधांत तीव्र मतभेद उपस्थित झाला. हटनपंथीय लोकांचें असें म्हणणें होतें कीं, बराच काळपर्यंत भूपृष्ठांत सापेक्षत्वें स्थिरता असते. परंतु त्याच्या मागून थोडा काळ अत्यंत खळबळीचा येऊन त्या अवधींत भूपृष्ठांत अतिशय झपाटयानें फेरफार होतो. परंतु आतां समपरंपरावादाचा पुरस्कर्ता लायेल यानं पुढे येऊन असें प्रतिपादन केलें कीं, भूपृष्ठांत पूर्वी कोणत्याहि काळीं जितक्या प्रमाणांत फेरफार झाले असतील, तितक्याच प्रमाणांत ते आजहि होत आहेत; व खंडें व पर्वत तयार होण्याचें कार्य पूर्वीप्रमाणेंच आजहि होत आहे. अपूर्व आणि नियमबाह्य असे फेरफार पृथ्वींत केव्हांहि घडून येत नाहींत. हे सर्व फरक हळू हळू मंद मंद कंपांनीं किंवा फार झालें तर आपल्या नेहमीं अनुभवास येतात तसे एकामागून एक अनेक भूकंप होऊन घडून येतात.

आपल्या म्हणण्याला बळकटी आणण्याकरितां लायेलनें भूपृष्ठांतील अलीकडच्या घडामोडींची माहिती मिळविली. स्वीडनचा किनारा वर येत आहे हें १८०२ मध्यें प्लेफेअरनें व नंतर १८०७ मध्यें व्हान बुश ह्यानें केलेलें विधान त्यानें स्वानुभवानें पडताळून पाहिलें. त्याप्रमाणें पॅटेगोनिआ वर येत आहे हें सिद्ध करणारा डार्विनचा अनुभव आणि ग्रिनलंड खचत आहे हें पिंजेलचें मत त्यानें आपल्या मताच्या पुष्टयर्थ पुढें मांडलें. भूकंपांमुळें भूपृष्ठावरील विस्तीर्ण प्रदेश कित्येक फूट खचल्याचा किंवा वर आल्याचा पुरावा तर विपुल जमा झाला होता. या सर्व पुराव्यावरून हें निश्चित ठरलें कीं, भूपृष्ठाचें खचणें किंवा वर उचललें जाणें सदोदित नियमितपणानें चाललेले असतें. आणि ही घडामोड एकाच दिशेनेंच जर एकसारखी चालू राहिली, तर अतिशय मोठे उंचवटे देखील या रीतीनें तयार होऊं शकतील. पृथ्वीवरील अत्युच्च पर्वत देखील आकास्मिक व अघटित उत्पातांवांचून तयार होणें शक्य आहे ही गोष्ट आतां सरसहा मान्य झाली.

दिसावयाला स्थिर असे भूभाग वस्तुत: स्थलांतर करणा-या समुद्रापेक्षांहि जास्त अस्थिर आहेत, व बाह्यत: इतकीं स्थिर दिसणारीं भूखंडें केवळ युगांतरीं नव्हे तर क्षणोक्षणीं समुद्राच्या लाटांप्रमाणें खालीं वर होत असतात हें आतां स्पष्ट झालें. भूपृष्ठांचीं हीं सावकाश होणारीं आंदोलनें नीट ध्यानांत आलीं तेव्हां भूस्तरशास्त्रांतील अनेक प्रमेयांचा उलगडा झाला. पॅरिसजवळ खा-या व गोडया पाण्यांत सांपडणारे पदार्थ असलेले प्रस्तर प-यायानें एकावर एक कूव्हिए आणि ब्राँग्नार्ट ह्यांनां आढळून आले होते. ह्या विलक्षण गोष्टींतील रहस्य आतां सर्वांच्या ध्यानांत आलें. वातावरणाखालीं तयार झालेले कोळशाचे प्रस्तर पाण्याखालीं तयार झालेल्या मातीच्या थरामध्यें अगर वाळूच्या खडकांमध्यें पोळींतल्या पुरणाप्रमाणें सांपडतात ते कसे ह्याची उपपत्ति लागली. समुद्राच्या जास्तींत जास्त खोलीच्या अनेकपट जाडीचे कर्दमप्रस्तर कसे तयार होऊं शकतात या चमत्काराचा उलगडा हे प्रस्तर ज्यांचा तळ हळू हळू खचत होता अशा महासागरांत बनले, या स्पष्टीकरणानें पूर्ण झाला.

प्रस्तरीभूत खडकांच्या उत्त्पतीसंबंधीं सर्व शंकांचें निरसन झाल्यानंतर हटनच्या मताच्या दुस-या भागाबद्दल देखील लोकमत निवळूं लागलें. जमीनीचें सखलीकरण ( डेन्यूडेशन ) आस्ते आस्ते एकसारखें होत असतें ह्याची प्रचीति कोणालाहि येण्यासारखा आहे. प्रस्तर ज्या ठिकाणीं कललेले दिसतात, तेथें तर उघड उघड असें आढळतें कीं, कित्येक मैल उंच असलेली शिखरें साफ झिजून जाऊन पूर्वी जेथें उंच उंच पर्वत होते तेथें आतां द-या झाल्या आहेत. प्रस्तर जेथें सपाट असतात तेथें ह्या सखलीकरणाची साक्ष जास्तच चांगली पटते. कारण, द-या आणि टेंकडया ह्या समुद्रांतून वर आलेल्या जमिनीपासून सखली करण्याच्या क्रियेनें तयार झाल्या असतात हें तेथें उघड उघड दिसून येतें.

वारा, पाऊस आणि धुकें ह्यांच्या आस्ते आस्ते होणा-या क्रियेमुळें पृथ्वीची अशी अवाढव्य घडामोड होत असेल या कल्पनेचें हटननें तिचें विवरण केल्यानंतर पन्नास वर्षेंपर्यंत कोणास आकलन करतां आलें नाहीं. उत्पातवादावर लायेल ह्यानें १८३० सालीं हल्ला चढविला. पंचवीस वर्षे लायलेचें म्हणणें लोकांमध्यें मुरलें, तेव्हां नियतक्रमानें चाललेल्या दीर्घकालीन सृष्टिव्यापारामुळें अवाढव्य घडामोडी होतात हें मत लोकांस पटूं लागले आणि हटनच्या मतावर त्यांचा विश्वास बसूं लागला. ह्यानंतर सुद्धां मर्किसनसारख्या प्रख्यात भूस्तरशास्त्रज्ञांनीं हटनच्या मताला विरोध करण्याचा प्रयत्न केला. भूगर्भांतील उत्तोलक प्रेरणांमुळेंच पर्वत व द-या तयार झाल्या या जुन्या मताचा तो पुरस्कर्ता होता. तथापि तो जादुगाराच्या पोतडींतून छू मंतर म्हटल्या बरोबर वस्तु बाहेर निघतात त्याप्रमाणेंच पर्वत तयार झाले, असें प्रतिपादन करणा-या यूरोपांतल्या एली डी बोमाँट व लिओवोल्ड व्हॉन बुश व इतर देशांतील शास्त्रज्ञांपर्यंत मात्र गेला नव्हता. व्हॉन बुश हा १८५३ त मरण पावला. त्याचा स्नेही व वर्ग बंधु व्हान हंबोल्ट याच्या मतें तो एक प्रख्यात भूस्तरशास्त्रज्ञ होता. तथापि अगदीं मरेपर्यंत त्याची, ज्युरा पर्वतावरील खडकांवर उंच ठिकाणीं आढळणा-या मोठमोठ्या धोंडी तेथें एखाद्या तोफेच्या गोळ्याप्रमाणें जिनिव्हा खो-यापलीकडील पर्वताच्या ओळीवरून फेंकल्या गेल्या आहेत अशीच समजूत कायम होती.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .