प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १४ वें,
भूशास्त्रें

जेम्स हटन व त्याचा शिलाविषयक अभ्यास.- ह्या सर्व तर्कांनां वस्तुस्थितीचा पाठिंबा जरूर पाहिजे असें डॉक्टर जेम्स हटन ह्याला वाटून तत्संबंधीं अभ्यास करण्याचा त्यानें निश्वय केला. रसायनशास्त्राचा अभ्यास करीत असतां तदनुषंगानें खडक आणि जमीन ह्यांचाहि त्याला अभ्यास करावा लागला. ह्या वेळीं त्याला पृथ्वीचें स्वरूप एकदम निराळेंच दिसूं लागलें. वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून आजपर्यंत अशी कल्पना लोक उराशीं बाळगून बसले होते कीं, भूपृष्ठांत कांहीं फरक होत नाहींत, भूपृष्ठ आहे तसाच राहील. परंतु भूपृष्ठांत दरवर्षी फरक होत असतो ही गोष्ट निदर्शनास आल्यामुळें हटननें वरील समजूत फोल आहे असें दर्शविलें. मोठमोठे खडक देखील वारा, पाणी इत्यादिकांच्या परिणामानें झिजतात, त्यांच्यावर रासायनिक कार्ये होऊन त्यांची माती होत असते. समुद्र आपल्या लाटांचे तडाखे मारून या खडकांनां क्षीण करित असतात व त्यांयोगें जिकडे तिकडे सावकाश पंरतु निश्चितपणें पृथ्वीचा पृष्ठभाग झिजत असून त्यास समुद्रात समाधि मिळत आहे. ही झीज सारखी चालून केव्हां तरी सा-याच भूपृष्ठाचा नाश झाला पाहिजे अशी कल्पना हटनच्या डोक्यात आली. परंतु त्याबरोबर त्याला हीहि गोष्ट आठवली कीं, सू-याचें आयुष्य फार दीर्घ आहे. या गोष्टीवर विचार करून त्यानें आपली पृथ्वीची उपपत्ति बसविली.

भूपृष्ठाची झीज होऊन त्याचा भाग समुद्राच्या तळाशीं जाऊन बसत असल्यामुळें कांहीं भूभाग नाश पावत असतां महासागराच्या पोटांत नवीन भूपृष्ठाची रचना सुरू झालेली असते. चुनखडीचे दगड व खडकांतील प्रस्तरीभूत अवशेष हीं ह्या म्हणण्याचें प्रत्यंतर देतात. ह्या शिलाचें प्रस्तरीभवन व त्यांत सांपडणारे सजीव प्राण्यांचे अवशेष इत्यादि गोष्टींचा उलगडा एरव्हीं कसा लागणार? कांहीं लोक हे केवळ सृष्टिचमत्कार आहेत असें म्हणून मोकळे होत असत. हटनच्या अगोदर ह्याचें समाधानकारक उत्तर कोणींच दिलें नव्हतें. प्राक्कालीन जमिनीची झीज होऊन आलेल्या द्रव्यानें हल्लींच्या भूपृष्ठाचा पाया प्राक्कालीन समुद्रांत तयार झाला असें हटननें प्रथम प्रतिपादन केलें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .