प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १४ वें,
भूशास्त्रें

भूशास्त्रांसंबंधाच्या १६ व्या शतकापूर्वीच्या कल्पना.- भूविषयक वरील सर्व शास्त्रांची वाढ अर्वाचीन काळांत, व विशेषत: १८ व्या व १९ व्या शतकांत झालेली आहे. तथापि प्रागैतिहासिक काळांतहि या शास्त्रांसंबंधीच्या कित्येक गोष्टी आद्य मानवजातींच्या अवलोकनांत होत्या. भूकंप, ज्वालामुखीचे स्फोट, जमिनीवरील व समुद्रावरील भयंकर अनर्थकारक वादळें वगैरे नैसर्गिक घडामोडी, तसेंच हिमाच्छादित पर्वत, द-याखोरीं इत्यादि नैसर्गिक परिस्थिति प्राचीन काळापासून लोकांच्या अवलोकनांत येऊन त्यांच्या उत्पत्तीसंबंधानें अनेक काल्पनिक कथाहि तयार झालेल्या आहेत.

भूकंप व ज्वालामुखीचे स्फोट.- भूमध्यसमुद्राच्या किना-यालगत या सर्व प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी विशेष प्रमाणांत असल्यामुळें मिसरी, ग्रीक व रोमन विद्वानांनी या घडामोडींसंबंधानें लौकिक कथांवर विसंबून न राहतां त्यांची शास्त्रीय रीत्या कारणमीमांसा लावण्याचा प्रयत्न सुरू केला. आरिस्टॉटलनें आपल्या 'मीटिऑरिक्स' नामक ग्रंथांत भूकंपाची अनेक पूर्वकालीन विद्वानांनीं प्रतिपादिलेलीं कारणें प्रथम देऊन नंतर स्वत:चें मत असें दिलें आहे कीं, सू-याच्या उष्णतेमुळें व पृथ्वीच्या पोटांतल्या उष्णतेमुळें पृथ्वीच्या अन्तर्भागामध्यें वायु उत्पन्न होऊन त्यामुळें भूकंप होतो. तसेंच भूकंप व ज्वालामुखीचे स्फोट हे दोन व्यापार परस्परसंबद्ध असून वर वर्णिलेला वायु पृथ्वीच्या अन्तर्भार्गांत चळवळ करतो, तेव्हां धरणीकंप होतो व तोच पुढें जोरानें बाहेर पडला म्हणजे ज्वालामुखीचा स्फोट होतो. हेंच चमत्कारिक कारण पुढें स्ट्रेबो, सेनेका, थोरला प्लिनी, वगैरे विद्वानांनीं आपल्या ग्रंथांत मान्य केलेलें आढळतें.

नद्यांचें कार्य.- नाइल नदीच्या पुराबरोबर जो गाळ दोन्ही बाजूंनां दरसाल बसत असे तिकडे हिरोडाटेसचें लक्ष जाऊन, 'मिसर देश ही नाइलची देणगी होय' असे उद्गार त्यानें काढलेले आहेत. आरिस्टॉटलनें भूमध्यसमुद्राला मिळणा-या मोठमोठ्या नद्यांचें कार्य कसें चालू आहे तिकडे बरेंच लक्ष पुरवून त्यांच्याबरोबर वहात येणा-या गाळानें समुद्रकिनारा कोठें कोठें कसा मोठा होत चालला आहे त्याचें वर्णन लिहून ठेविलें आहे. काळ्या समुद्रांतील अनेक बंदरांतल्या पाण्याची खोली कमी झाल्यामुळें साठ वर्षांपूर्वीइतकीं मोठालीं जहाजें तेथें त्या वेळीं येऊं शकत नव्हतीं असें तो सदरहू ग्रंथांत म्हणतो. अशाच प्रकारच्या गोष्टी स्ट्रेबोनें आपल्या ग्रंथांत लिहून ठेविल्या आहेत.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचीं स्थित्यंतरें.- जमिनीच्या ठिकाणीं पाणी व पाण्याच्या ठिकाणीं जमीन असा फेरफार झाला असल्याचें सिद्ध करणारा पुरावाहि प्राचीन ग्रीक, रोमन विद्वानांच्या लक्षांत आला होता. शंख व समुद्रांत सांपडणारे इतर पदार्थ भूमध्यसमुद्रकांठच्या अनेक देशांतील जमिनीवर सांपडत असत. व त्यावरून तेथें एके काळीं समुद्र असावा अशा प्रकारचीं अनुमानें अनेक ग्रीक व लॅटिन ग्रंथांत दिलेली आढळतात. झीनॉफानेझनें ( ख्रि. पू. ६१४ ) कोलोफोनमध्यें, झॅन्थसनें ( ख्रि. पू. ६४६ ) आर्मेनिया व लोअर फ्रीजियामध्यें,  आणि हिरोडोटस व स्ट्रेबोनें इजिप्तमध्यें, कांहीं भाग पूर्वी जलमय असावा अशीं तेथील भौगोलिक परिस्थितीवरून काढलेली अनुमानें आपल्या ग्रंथांत नमूद करून ठेविलीं आहेत. आरिस्टॉटलनें आपल्या उपर्युक्त ग्रंथांत अशाच प्रकारची पुष्कळशी माहिती देऊन त्यासंबंधाचा शास्त्रीय ऊहापोह बराचसा केला आहे, व अखेर असा निश्चित निष्कर्श काढला आहे कीं, पूर्वी जेथें कोरडी जमीन होती तेथें समुद्र बनले आहेत व उलट समुद्र असलेल्या ठिकाणीं पुढें पुन्हां जमीन होण्याचा संभव आहे.

यावरून असें दिसतें कीं, भूशास्त्रांतील आधारभूत असलेली भूपृष्ठविषयक पुष्कळशी माहिती प्राचीन विद्वानांनीं जमविली होती. परंतु या नैसर्गिक व्यापारांसंबंधीं त्यांची कारणमीमांसा बरीच चुकीची व चमत्कारिक असे. तथापि याच त्याच्या कल्पना स्तिमित युगांत व मध्ययुगांत १६ व्या शतकापर्यंत यूरोपांत प्रचलित होत्या.

भूस्तरशास्त्र.

आपणांला स्वाभविकपणें असें वाटतें कीं, जेव्हां इतर शास्त्रांची विशेषत: दूरदूरच्या ग्रह ता-यासंबंधींच्या ज्योति:शास्त्राची वाढ होत होती तेव्हां त्याबरोबर आपण ज्या पृथ्वीवर राहतों तिजबद्दलच्या भूशास्त्रांची वाढ फार जलद नाहीं तरी निदान त्यांच्या इतक्या गतीनें होत असली पाहिजे. पण वास्तविक गोष्ट अगदीं निराळी आहे. मनुष्याचें लक्ष प्रथम जवळच्यापेक्षां दूरच्या गोष्टींकडेच लवकर जातें. लहान मुलाला ज्याप्रमाणें हातांतील खेळणें टाकून दूरचा चंद्र घेण्याची इच्छा होते त्याप्रमाणेंच मनुष्यालाहि आपल्या जवळच्यापेक्षां आपल्या आटोक्याबाहेरील वस्तूचा ध्यास जास्त लागतो. यामुळेंच अठराव्या शतकाच्या अखेरीस जोति:शास्त्रांत विश्वांतील दूरदूरच्या भागांतल्या चमत्कारांबद्दल शोध चालले होते, त्यावेळीं भूशास्त्र इतकें जवळचें असूनहि भूपृष्ठरचनेबद्दलचीं मतें अगदींच अनिश्चित व परस्परविसंगत होतीं. त्या वेळीं भूपृष्ठरचनेबद्दल जे तर्क लढविले जात ते बहुतेक 'तर्कट' ह्या नांवालाच पात्र असत. पूर्वी पृथ्वी हा एक बर्फाचा गोळा होता आणि एका धूमकेतूचा त्यावर संघात होऊन त्या गोळ्यांत चेतना उत्पन्न झाली असें एका पक्षाचें म्हणणें होतें. दुस-या एका पक्षाचें असें म्हणणें होतें कीं हा गोल पूर्वी जलमय होता, आणि ह्या जलपृष्ठावर बाष्पपटलें तरंगत असत. हीं बाष्पपटलें घन मूलद्रव्यांचीं बनलेलीं असत व हीं मूलद्रव्यें हळूहळू घनरूपांत येऊन त्या पाण्यावर स्थिर झालीं. याप्रमाणें पाणी, बर्फ, घनपदार्थ व पाणी यांचें मिश्रण, यांपैकी मनास वाटेल त्या पदार्थांकडे पृथ्वीचें जनकत्व देऊन कोणत्या तरी काल्पनिक कारणानें पाणी व घन पदार्थ यांचें पृथग्भवन झाल्याचें वर्णन त्या वेळचे तत्वज्ञ करीत. हे जे तर्ककुतर्क चालत ह्या सगळ्याला आधार बायबलमधला जलप्रलय होय. कांहीं जणांनीं असा तर्क लढविला कीं भूगोलाचा अंतर्भाग जलमय आहे, ह्या जलमय गर्तेमध्यें बाह्य आवरण पडलें. ह्यामुळें ह्या आवणावर सर्वत्र पाणीच पाणी झालें. सर्वास ज्यास्त संमत असा तर्क होता तो हा कीं, पृथ्वीशेजारी एखादा धूमकेतु संभ्रमण करीत असतां त्या धूमकेतूच्या आकर्शणानें पाणी सर्व खंडांवर पसरलें. अशा त-हेनें अठराव्या शतकांत कल्पनेच्या कोलंटउडया मारण्यांत लोक चूर झाले होते पण आपल्या पायाखालच्या पृथ्वीची रचना प्रत्यक्ष कशी झाली आहे हें पाहण्याचें एकालाहि सुचलें नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .