प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १३ वें.
गणितशास्त्राचा इतिहास
गणितशास्त्राचें एक मुख्य अंग म्हणजे संख्यालेखन. या संख्यालेखनाच्या प्राचीन निरनिराळ्या पद्धती व हल्लीं सर्वत्र प्रचलित असलेली शून्यान्वित नऊ अंकी दशमानात्मक संख्यालेखनपद्धती यांचा सविस्तर इतिहास मागें तिस-या प्रकरणांत दिला आहे. गणितज्ञान हें ज्योतिष व वैद्यक यांप्रमाणेंच अत्यंत प्राचीन असून या शास्त्राची भूमिति ही शाखा तर ग्रीक पंडित युक्लिड यानें ख्रिस्ती शकाच्या पूर्वीच बऱ्याच पूर्णतावस्थेप्रत नेली होती. तथापि आधुनिक ज्योतिष, पदार्थविज्ञान, व यांत्रिक ज्ञान यामुळें गणितशास्त्रांत अनेक शाखा उपशाखा अलीकडील काळांत उत्पन्न झाल्या असून अद्यापि या शास्त्राची वाढ चालू आहे असें पुढील इतिहासावरून दिसून येईल. कोणत्याहि शास्त्राची वाढ किती झाली आहे हें पहाण्याचा एक मार्ग म्हणजे त्या शास्त्राचें वर्गीकरण किती विस्तृत झालें आहे व त्या शास्त्राच्या एकंदर शाखा किती पडल्या आहेत हें पहाणें हा होय. त्याप्रमाणें गणितशास्त्राची हल्लीं किती वाढ झाली हें पुढील शाखाविस्तारावरून दिसून येईल.