प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ८ वें.
ज्योतिषशास्त्राचा इतिहास
ज्योतिषशास्त्राचे विभाग.- ज्योतिष शास्त्राचें साधारणपणें अभ्यास करण्याच्या दृष्टीनें दोन विभाग करतात; ज्योतिर्विषयक गणितशास्त्र आणि ज्योतिर्विषयक अवलोकनशास्त्र. ज्योतिर्गणित अवलोकनाशिवाय शक्यच नाहीं. तथापि अर्वाचीन यंत्रसामुग्रीमुळें खस्थज्योतींविषयीं जी माहिती आपणांस उपलब्ध होत आहे ती प्राचीनकाळीं उपलब्ध असणें शक्य नव्हतें. केवळ द्दष्टीनें जें दिसेल तेंच घेऊन प्राचीनांनीं आपलें शास्त्र सजविलें. यावरून असें समजूं नये कीं, प्राचीन संशोधक आपल्या वेधांमध्यें यंत्रांचां उपयोग करीतं नसत. तुरीययंत्र, गोलयंत्र, यांविषयीं पुढें शरीरखंडामध्यें जे लेख आहेत त्यांवरून या शास्त्राच्या अभ्यासार्थ वापरीत असलेल्या यंत्रांची कल्पना येईल. स्थूल परंतु वर्षानुवर्ष चाललेल्या अवेलोकनावरून प्राचीनांनीं ग्रहांच्या गती, ग्रहणें, इत्यादिकांविषयी जे महत्त्वाचें शोध लावलें त्यांचा इतिहास पुढें दिला आहे, त्यावरून आपणांस हें दिसून येईल कीं, व्यवहारोपयोगीं ज्योतिषशास्त्र आपणांस प्राचीनांनींच दिलें आहे. ज्योतिषशास्त्रा कालगणनेसाठीं उपयोगी पडतें. याखेरीज ज्योतिषशास्त्राचा व्यावहारिक उपयोग फारसा नाहीं. फलज्योतिष आजचा सुशिक्षित वर्ग शास्त्र म्हणण्यास तयार नाहीं. सूर्यावरील डागांचा आणि पृथ्वीवरील दुष्काळांचा संबंध केरोपंत छत्रे व लॉकियर इत्यादिकांनीं पुढें मांडला त्यासंबंधानेंहि फारसें खात्रीनें आज लिहितां येणार नाहीं, पृथ्वीवरील मोठमोठाले फरक उदाहरणार्थ, उत्तरध्रुवावरील कायमचें हिमाच्छादन किंवा कायमचा वसंतकाल याविषयीं शोध होऊन त्यांचा संबंध पृथ्वीपासून सूर्याचा अंतराशीं लावण्यांत येत आहे हा एक महत्त्वाचा व्यवहारोपयोगी ज्योतिषशास्त्राचा भाग प्राचीनांस परिचित नसावा. तेवढा व्यवहारोपयोगी भाग वगळून आपणांस असें म्हणतां येईल कीं; प्रत्यक्ष व्यवहाराशीं संबंध ज्या ज्ञानाचा येतो तें ज्योतिर्ज्ञान प्राचीनांनीच मिळविलें होतें अर्वाचीनांनीं नाहीं. यासाठीं ज्योतिषशास्त्राच्या इतिहासांत प्राचीन इतिहासास महत्त्व मोठें आहे. ज्योतिषशास्त्राचा अत्यंत प्राचीन इतिहास आपणांस आज मिळणें अशक्य आहे. ऋग्मंत्र काळांतच चांद्रवर्ष व सौरवर्ष यांतील भेद लक्षांत येऊन अधिक मासाचा प्रचार झालेला दिसतो.