प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण ७ वें.
विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय
 
प्राचीन अवशेषांचा अभ्यास:- यंग याला कांहीं थोडक्याशाच चिन्हांचा अर्थ लागला होता पण पुढें शँपोलिअन नामक फ्रेंच माणसानें तो अभ्यास तसाच पुढें चालू ठेवून बरेच शोध लावले व इजिप्तविषयक ज्ञानाच्या आधुनिक शास्त्राचा मूळ पाया घातला. शँपोलिअननंतर त्या क्षेत्रांत लहानमोठे असे अनेक संशोधक होऊन गेले. त्यांपैकी कोणी नवीन लेख शोधून काढले आहेत, तर कोणी इजिप्ती भाषेचा अभ्यास केला, तर कोणी त्यांची लिपी अभ्यासिली आहे. अशा रीतीनें, ख्रि. पू. पांचव्या सहस्त्रकाच्या मध्यांत होऊन गेलेल्या मेना नामक पहिल्या ऐतिहासिक राजापावेतों बरीचशी खात्रीलायक माहिती आपणांस आज उपलब्ध झाली आहे. आपणांस मेनानंतरच्या बहुतेक सर्व राजांचीं नांवें ठाऊक झाली आहेत. एवढेंच नव्हे तर त्यांच्या हातून ज्या काय गोष्टी घडल्या त्यांची देखील कांहीं माहिती मिळाली आहे; आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही कीं, इजिप्ती लोकांच्या जीवनक्रमाविषयीं व त्यांतल्या त्यांत विशेषत: त्यांची उञ्च संस्कृति, त्यांची विचार करण्याची पद्धति, त्यांचें शास्त्रीय ज्ञान ह्या ज्या गोष्टीसंबंधीं माहिती मिळविण्याची आशा देखील कोणास कधीं वाटली नव्हती त्यांच्यासंबंधीहि बरेंचसें ज्ञान प्राचीन वाड्.मयाचा आधुनिक पद्धतीनें अर्थ लागला गेल्यामुळें आपणांस आतां झालें आहे. ह्या आदिराजांसंबंधीं माहिती मिळवूनच आधुनिक संशोधन थांबले नाहींत तर अमेलिनो डी. मॉर्गन, यांच्यासारखा पुराणवस्तुशास्त्रवेत्यांच्या संशोधनामुळें, ज्याला तज्ज्ञ लोक आतां राजवंशपूर्वकाल ह्मणूं लागले आहेत त्या काळांतील बरेच अवशेष बाहेर आले आहेत. या काळांत नाईल खोऱ्यांतील लोक अणकुचीदार पत्थराचीं आयुधें वापरीत असत. त्यांचीं मातीची भांडीं कुंभाराच्या चक्रावर घडविली जात नसत. ते मृतांच्या शरीरांत मसाला भरून न ठेवतां त्यांची एक विचित्र रीतीनें गडठी करून त्यांनां पुरीत असत. इजिप्तचे हे मूळचे रहिवाशी ऐतिहासिक काळांत मोडत नाहींत. कां कीं, त्यांच्या अवशेषांचा काळ आपणांस यत्किंचितहि नक्की ठरवितां येत नाहीं. तथापि राजवंशकाळांतील इजिप्ती लोकांच्या संस्कृतीची प्रथमावस्था कशी होती याची मात्र त्यांच्यावरून आपणास कल्पना करतां येण्यासारखी आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .