प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
 
यास्काचें निरूक्त व त्याचा काल- यास्काचा काल कोणत्याच प्रकारानें अद्याप निश्चित झालेला नाहीं. त्याचा काल पाणिनीच्या कालावर बरासचा अवलंबून आहे. पाणिनी व यास्क यांच्यामध्यें फार जरीं नाहीं, तरी निदान एक शतकाचे अंतर असावयास पाहिजे. पाणिनीच्या अष्टाध्यायींत ज्या गोष्टी दिसतात तेथपर्यंत भाषेची वाढ व उन्नति होण्यास एवढा काळ अवश्य आहे. पाणिनीच्या कालाचा विचार इतरत्र केलेला आहे. त्यावरून तो बरोबर आहे असें धरून चालले तर यास्काचा काल ख्रि.पू. ७०० किंवा ८०० वर्षे ठरवावा लागेल असें डॉ.बेलवलकर समजतात.

'सूर्या', 'अपार्ण' वगैरे शब्दांची व्युत्पत्ति पाणिनीच्या व्याकरणांत नाहीं. शिवाय 'सूर्य' शब्दाची यास्काची व्युत्पत्ति पाणिनीला माहीती होती असेंदिसत नाहीं. तेव्हां, यास्क पाणिनीच्या पूर्वीचा नसून पाणिनीच यास्काच्या पूर्वीचा होता असा एक यावर आक्षेप आहे. परंतु, या युक्तिवादानें परस्परविरूद्ध अशीं अनुमानें निघत असल्यानें हा युक्तिवाद विश्वसनीय पुरावा म्हणून मानला जाणें शक्य नाहीं.

यास्काच्या निरूक्तांत निरनिराळया व्याकरणकरांचे [हाच विभाग पृष्ठ ४७ पहा]व व्याकरणसंप्रदायांचे जे उल्लेख आहेत त्यांवरून व्याकरणशास्त्राची प्रगति त्या काळांत बरीच झालेली होती असें दिसतें. नाम, आख्यात, उपसंर्ग आणि निपात या शब्दांच्या चार जाती शोधून काढण्यास यूरोपांत आरिस्टॉटल जन्मास यावा लागला;परंतु आमच्या इकडे यास्कास ही गोष्ट पूर्वीच माहीत होती. कालवाचक प्रत्यय, पुरूषवाचक प्रत्यय आणि कृदन्तप्रत्यत यांच्यांतला भेदहि यास्काच्या वेळीं माहीत होता. इतकेंच नव्हे, तर प्रत्येक नाम धातुसाधित आहे ही उपपत्तीहि त्यानेंच बसविली होती. सध्यांच्या व्युत्पत्तिशास्त्राचा हाच मूळ पाया होय. आजच्या ऐतिहासिक द्दष्टीनें ही उपपत्ति बरोबर आहे असें म्हणतां येणार नाहीं. तथापि भाषेच्या उपयोगाच्या द्दष्टीनें आणि भाषेंतील शब्दांची फिरवाफिरव करून उपयोग करण्याच्या द्दष्टीनें ही गृहीत कल्पना उपयुक्त आहे हें खास.