प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

मृत झालेलें ज्योतिर्ज्ञान:- मृत झालेल्या ज्योतिर्ज्ञानाकडे व कालगणनेकडे आतां वळूं.

आफ्रिका- आफ्रिकेंत जाती अनेक आहेत. पुष्कळांच्या कालगणना अत्यंत बाल्यावस्थेंत आहेत. ज्यांची कालगणना थोडिबहुत प्रगत झाली आहे असें राष्ट्र म्हणजे योरूबा होय. त्यांच्या कालगणनेंतील अंगें येणेंप्रमाणें: (१) वर्षाचें ज्ञान. (२) वर्षाचे तीन काळ; कोरडा काळ (युवोएरून), वार्‍याचा काळ (इवोओये) व पावसाळा (इवो ओजे). पावसाळ्याचे दोन भाग: पहिले पाऊस (अरोको) व शेवटचें पाऊस (अरोकुरो). (३) पांच दिवसांचा आठवडा. पहिल्या दिवशीं काम करावयाचें नाहीं कांकी दिवस अशुभ. (४) सहा पंचाहिक आठवड्यांचा महिना. (५) दिवसाचे विभाग पांच, रात्रीचे तीन. रात्रीचा कालविभागवाचक शब्द कोंबड्याचे आरवणें अशा अर्थाचा आहे.

अमेरिका:- उत्तर अमेरिकेंतील जातींत व्याधसंस्कृति आणि कृषीवलसंस्कृति यांचे मिश्रण आहे; आणि त्यामुळें कित्येकांत ऋतुदर्शक आणि विधीस उपयोगी अशा दिवसांची वाढ झाली आहे, व कांहीत नाहीं. दक्षिणेंतील लोकांची स्थिति फारशी भिन्न नाहीं. या सर्वांचा इतिहास येथें देण्याची आवश्यकता नाहीं. तो त्यांच्या संस्कृतिविषयक वर्णनांत सांपडेल. अधिक विकसित झालेलीं राष्ट्रें म्हणजे मेक्सिको व पेरू हीं होत. त्यांचीं वर्णनें त्या त्या राष्ट्रांवरील लेखांत सांपडतील.

पॉलिनेशिया:- पॉलिनेशियामध्यें म्हणजे भारतीयांच्या दृष्टीनें दक्षिण द्वैपायन प्रदेशांत कालगणनापद्धति बरीच भिन्न दिसते. जावा बेटांत हिंदुच्या संस्कृतीचा परिणाम झाला आहे असे भाग त्यांत आहेतच; तथापि कांहीं भाग असे आहेत कीं ज्यावर हिंदु व मुसलमान संस्कृतींचा मुळीच परिणाम झाला नाहीं. मिलेनेशिया, कॅरोलाइन आयलंड्स व टाहिटी हे ते भाग होत. परंतु त्याविषयीसुद्धां थोडथोडा मतभेद दिसून येतोच. मिलेनेशियामध्यें महिने चांद्र आहेत, परंतु वर्षाची देश्य कल्पना नाहीं. कॅरोलाईन बेटामध्यें महिने चांद्र आहेत, कॅरोलाईन टाहिटीमध्यें वर्षांतील ऋतूंची पद्धति भारतीय पद्धतीप्रमाणेंच आहे. न्यूझीलंडमध्यें वर्ष कृत्तिकेपासून सुरू होतें. कालगणना अत्यंत प्राचीन स्वरूपाची कोठें सांपडत असेल तर ती आस्ट्रेलियांतील देश्य लोकांत सांपडेल. त्यांच्यामधील कालगणनावाचक शब्द झोंप व चंद्र या अर्थांचें आहेत; आणि एकंदर कालगणनेसंबधीं भाषा फारच प्राथमिक स्वरूपाची आहे.

आतां ज्या विस्तृत प्रदेशामध्यें एकमेकांनी एकमेकांपासून कालगणनेचें अंश घेतले ते देऊन त्यांचा एकमेकांशी संबंध देण्याचा प्रयत्‍न करूं. भारतीय कालगणनापद्धति ही केद्रींभूत धरून तिचा केवळ शास्त्रविकास कालानुक्रमानें न सांगतां इतरांशीं संबंध दिला तर तें वाचकांस सोपें जाईल म्हणून तीच विधानपद्धति येथें स्वीकारतो.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .